‘सावित्रीच्या लेकींनो’,
सविनय सादर प्रणाम,
स्त्री-पुरुष समानता मानणारा व शक्य ती कृतीत उतरवणारा मी एक परिवर्तनवादी विचारांचा कार्यकर्ता. आज मुद्दाम तुमच्याशी संवाद साधतोय. 8 मार्च ही तारीख कॅलेंडरवर लागली की, तुम्हा सर्व स्त्रियांचे कर्तृत्व बोलताना माझ्यासारख्या असंख्य परिवर्तनवाद्यांचा कंठ दाटून येतो. तुमच्या ‘गौरवाचे पोवाडे’ आम्ही गातो. स्त्री-पुरुष समानता आचरणात आणा असा मोठ्याने गळा काढतो. गार्गी, जिजाऊ, सावित्रीबाई, ताराराणी, ताराबाई शिंदे या ऐतिहासिक स्त्रियांपासून इंदिरा, मेरी कोम, कल्पना चावला, नर्गिस अशा अनेक विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांचा ‘गुणगौरव’ आम्ही करतो. त्याचबरोबर महात्मा फुले, आगरकर, शाहू महाराज, आंबेडकर, गांधीजी, महर्षी कर्वेया महापुरुषांचे ‘स्त्री उद्धाराचे’ कार्यही आठवणीने सर्वांना सांगतो. एक नुसते ‘कर्तव्य’ या भावनेनेच नव्हे तर मनातूनच स्त्री-पुरुष समानतेची इच्छा बाळगून शक्य तेवढ्या प्रामाणिकपणे कृती करणारे आम्ही आज पुन्हा तुमच्या कर्तृत्वाचे गोडवे व तुमच्या प्रश्नांचे थोडेफार ‘चिंतन’ यानिमित्त करतोय. आशा आहे, मनापासून समजून घ्याल.
सर्वात प्रथम आठवण झाली ती, ‘गार्गी’ या विदुषीची. ‘महापंडित’ याज्ञवल्क्याला निरूत्तर करणारा प्रश्न तिने उच्चारताच त्या महापंडिताने तिला ‘स्वत:ची पायरी’ ओळखण्याचा इशारा दिला. एक स्त्री विदुषी एका पुरुष महापंडिताला भरसभेत निरूत्तर करते हे प्राचीन काळी रूचणे जसे शक्य झाले नाही तसेच आजच्या विज्ञानयुगातही पुरुषी मानसिकतेला शक्य होत नाही हे वास्तव आहे. ‘तुझी लायकी नाही’ हे अभद्र वचन स्त्रियांना ही पुरुषप्रधान वर्चस्ववादी मानसिकता सतत सुनावत असते. समाजाच्या विविध क्षेत्रांत याची उदाहरणे भरपूर मिळतात. देशाचा राज्यकारभार कुशलतेने हाकणारी, जिला प्रत्यक्ष ‘दुर्गा’ असे संबोधले गेले त्या इंदिरा गांधींना प्रधानमंत्री असताना मंदिरात प्रवेश नाकारला होता. दक्षिणेकडील शबरीमल देवस्थानात व महाराष्ट्रात शनिशिंगणापूरच्या चौथर्यावर असाच स्त्रियांचा ‘धार्मिक उपासनेचा’ हक्क बिनदिक्कत नाकारला जातोय. प्रत्यक्षात ‘न्यायदेवता’ म्हणून एका स्त्रीची डोळ्यावर पट्टी बांधलेली प्रतिमा आम्ही न्यायालयात सजवतो. पण त्याचबरोबर स्वतंत्र भारताच्या ‘सरन्यायाधीशपदी’ एकही महिला आजपर्यंत ‘पात्र’ ठरू नये, याचा अर्थ कसा लावायचा? फुले, शाहू, आंबेडकर, कर्वेयांचा ‘पुरोगामी’ म्हणवणारा महाराष्ट्राच्या ‘मुख्यमंत्री’ म्हणून एकही महिला आजपर्यंत मिळू नये या कटू वास्तवाला उत्तर कोणते? दहावी-बारावीच्या परीक्षेत नेहमी पहिल्या येणार्या मुलींचे वर्तमानपत्रातील फोटो पाहून आम्ही धन्य होतो. पण मग याच मुलींचे उच्च शिक्षणाच्या बाबतीत कोणते घोडे अडते? कोणती व्यवस्था तिला ‘आता, शिक्षण पुरे’ असा इशारा देऊन करिअरच्या आकाशात भरारी घेण्यापासून रोखते याचाही विचार कधीतरी व्हावा. सांस्कृतिक-कला क्षेत्रात मोगुबाई, नर्गिस, लता, स्मिता, फैय्याज अशी नावे घेताना ऊर भरून येतो; पण याच क्षेत्रात होणार्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे व स्त्रीला भोगवस्तू बनवणार्या व्यवस्थेला काय करायचे? एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतून तुम्हाला आरक्षण द्यायचे अन् तुम्ही सरपंच झालात की, ग्रामपंचायत सदस्यांनी नेहमीच असहकार करायचा….. दलित असाल तर खुर्चीवर बसू द्यायचं नाही, हा अलिकडचा ‘राजकीय इतिहास’ आहे.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कधी आई, पत्नी, बहीण, मुलगी, मैत्रीण बनून तुम्ही आम्हा पुरुषांना किती आनंद दिलाय. या आनंदाने आयुष्य बहरून गेलंय आमचंही, जाहीर कबुली देतो. पण आमच्या पुरुष जातीपैकीच कितीनी हा ‘आनंद’ तुम्हाला परत केलाय हा प्रश्नच आहे. याज्ञवल्क्याचे ‘आधुनिक वारस’ असणार्या काही पुरुषप्रधानी मानसिकतेच्या पुरुषांनी माणुसकीला अत्यंत काळीमा फासणारी कृत्ये केलीत. घराघरात भारतमाता, देवी, मदर तेरेसा यांच्या तसबिरी पुजणारी ही मंडळी आपल्या घरात जन्मदात्या आईलाच जगणं मुश्किल करतात. म्हणून तर समाजात ‘मातोश्री’ वृद्धाश्रम वाढत आहेत. पोटच्या पोराला आई ‘जड’ झाल्याची उदाहरणे आढळतात. ‘चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून’ ही बातमी नसणारे एक वर्तमानपत्र मला दाखवाल तर एक हजार रुपये बक्षिसी देईन मी. पत्नी म्हणजे मालमत्ताच जणू या पतिराजांची. योनिशूचितेच्या संस्काराखाली पत्नीच्या रूपातली बाई रोज सरेआम चिरडली जातेच. ‘बहीण’ म्हणजे खरेतर भाऊरायासाठी आनंदाची पर्वणी. परंतु ‘पुरोगामी’ म्हणवणार्या आमच्या कोल्हापुरात बहिणीने जीन्स पँट घातली म्हणून रागाने भावाने बहिणीचा डोके आपटून निर्घृण खून केला. याच कोल्हापुरात बहिणीने आंतरजातीय लग्न केले याचा राग मनात धरून नराधम भावांनी मेघा कुलकर्णी या बहिणीचा तिच्या जीवनसाथीसह घरात घुसून खून केला. केवढं हे क्रौर्य!
‘मुलगी म्हणजे धनाची पेटी’ ‘खानदानकी इज्जत’ या कुविचाराने या पुरूषी मानसिकतेनं इतकं ग्रासलंय की, मुलगी जन्माला येऊच नये म्हणू तिला आईच्या उदरातचं आधुनिक उपायांनी मारलं जातं. मुलगा झाला की, ‘पेढा’ मुलगी झाली की बर्फी, मुलगा झाला की, बारशाला ‘मटण’, मुलगी झाली की ‘जिलेबी’ ही विषम विभागणी आम्ही मनोमन मान्यच केलीय.
मैत्रिणीच्या रूपात पुरुषाला मन मोकळं करणारी हक्काची असणारी स्त्री अमानुष वासनेची बळी पडणारी उदाहरणे समाजात घडतात. पुरुषाला मन मोकळं करायला मैत्रिणीच्या आवश्यकता असणारे पुरुष आपल्या पत्नीला ‘मित्राची’ गरज असते, हे खोट्या प्रतिष्ठेपायी नाकारतात, चारित्र्याच्या संशयाखाली ही निखळ मैत्री कोमेजते. निकोप व निर्मळ मैत्री शक्यच नसते, जणू असे या पुरुषी मानसिकतेने ठरवून टाकलंय आणि म्हणूनच ‘पत्नीचा मित्र’ ही कल्पना तो स्वीकारताना नाखूष असतो.
बाईला मारण्याचे किती अमानुष प्रकार या पुरुषसत्ताक व्यवस्थेने अमलात आणले आहेत. आठवले तरी ‘माणूसपणाची’ लाज वाटते. गंधर्वाची रासक्रीडा पाहिल्यावर तुझं पातिव्रत्य ढळलं म्हणून जमदग्नी आपला मुलगा परशुरामकरवी माता रेणुकेचे ‘शीर’ उडवतो. पुरुषानंतर जणू काय स्त्रीचे विश्वच संपते असे समजून त्या स्त्रीला ‘सती’ जायला लावणारी अमानुष प्रथा-परंपरा याच पुरूषसत्ताक मानसिकतेचे प्रतीक. रामाने सीतेला केवळ अग्निपरीक्षा नाही द्यायला लावली तर पुढे ती भूमातेत सामावून घेतली गेली ती ही याच पार्श्वभूमीवर. सध्या मराठवाड्यात बाईला (विशेषत: मागासवर्गीय) ‘डाकीण’ ठरवून सर्रास मारलं जातंय. ‘हुंडाबळी’ कायदा असूनही सुरूच आहे. ‘चारित्र्याच्या संशयावरून खून’ ही बातमी नसणारा एखादा दिवस तरी पेपर निघावा ही इच्छा आमरण पुरी होईलसे वाटत नाही. प्रेमाला, तेही एकतर्फी प्रतिसाद दिला नाही म्हणून चेहर्यावर अॅसिड फेकून रिंकू पाटील, अमृता देशपांडेचा जीव याच पुरुषसत्ताक मानसिकतेने घेतला. राजरोस बलात्कार करून निर्घृण हत्या करायची ही परंपरा ‘निर्भया’ प्रकरणाने पुन्हा दिसून आली. जीन्स पँट घातली म्हणून भावाने बहिणीचा केलेला खून अथवा आंतरजातीय विवाह केला म्हणून बहिणीचा बळी ही उदाहरणे समोर आहेतच. आई-बाबा हे मुलींचा सर्वाधिक विश्वास असणारे नातेवाईक. आरूषी तलवार हत्याकांडात स्वत:च्या आई-बाबानेच मुलीचा खून केला, जातीत बदनामी होतेय म्हणून मुलगीला माहेरी नेतो म्हणून वाटेतच खून पाडणारा ‘बाप’ इथे समाजाने अनुभवलाय. पण हे सारे केव्हा? तर मुलगी जन्माला आल्यावर. आता तर या पुरुषसत्ताक मानसिकतेने तिला गर्भाशयातच मारून टाकून आपली अमानुषता जपलीय किती व कसे या प्रकारांचे वर्णन करू?
बाईला द्यावयाच्या शिक्षाही संस्कृती-परंपरेचा आधार घेऊन उभ्या आहेत. इंद्राने ‘शील’ लुटून ‘अपवित्र’ झालेली अहिल्या ‘शिला’ बनवली जाते. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागते. नवरे जुगारात हरले म्हणून द्रौपदीचे वस्त्रहरण होते. जातपंचायतींच्या पंचांना कौमार्याचा ‘दाखला’ द्यावा लागतो. ‘नग्नधिंड’ शिक्षा देऊन अनेक ‘फुलनदेवी’ जन्माला घातल्या जातात. विराट कोहली क्रिकेटमध्ये अपयशी ठरला तर ‘पांढर्या पायाची’ म्हणून अनुष्काला अघोषित शिक्षा सुनावली जाते. बलात्कार झालेल्या वृंदाचे अर्थात तुलसीचे लग्न बलात्कारी विष्णू (श्रीकृष्ण रूप) बरोबर लावून ती परंपरा मोठ्या थाटात तुलसी विवाहाच्या नावाखाली साजर्या करणार्या लोकांकडून वेगळी काय अपेक्षा असणार?
पण सावित्रीच्या लेकींनो, आपल्या जीवनविकास क्रमात तुम्ही स्वत:ही काही बंधने कळत-नकळत स्वीकारत गेलात. पुरुषसत्ताक परंपरेला ‘बळी’ पडलात. कधीकधी स्वत: ती अमानुष परंपरा बळकट करण्यास हातभार लावलात. अलिकडेच शनीच्या चौथर्यावर स्त्रियांना प्रवेश असावा यासाठी जे मोहोळ उठले त्यातून शनी विश्वस्तपदी एका महिलेची नेमणूक झाली. पण या महिलेनेही ‘परंपरा’ चालूच ठेवण्याची कृती करून दाखवली तेव्हा ती ‘स्त्री’ पुरुषसत्ताक परंपरेची ‘वाहक’ बनतेय, हे दुर्दैवी आहे. महिला व बालकल्याण ज्यांच्या हाती आहे त्या राज्यमंत्री पंकजा मुंडे परंपरा चालू ठेवण्याची भाषा करतात तेव्हा ही पुरुषसत्ताक परंपरा आपली मुळे किती घट्ट रोवून आहे, याची साक्ष पटते. स्त्री उद्धाराच्या, मुक्तीच्या कार्यक्रमांना महिलांची उपस्थिती नेहमीच रोडावलेली. याउलट ‘अथर्वशीर्ष पठण’ असेल तर महिलांची गर्दी आवरत नाही, हे वास्तव आहे. नवरा कितीही वाईट वागला तरी त्याच्यासाठी ‘उपवास’ करून त्याची दीर्घायुष्य कामना करून स्वत:च्या आरोग्याची ‘वाट’ लावण्यात तुम्ही धन्यता मानता. सावित्रीबाईंची जयंती कधी येते, हे माहीत नसेल. पण ‘वटसावित्री’ कधी आहे अचूक माहिती असते. स्वत:चा बौद्धिक विकास करण्यात वेळ नसणार्या महिला ‘इडियट बॉक्सवर’ पारंपरिकता जपणार्या अर्थहीन मालिका पाहण्यासाठी विशेष वेळ काढतात. राजकीय क्षेत्रात ‘चुणूक’ दाखवण्याची क्षमता असतानाही पतिराजांच्या सन्मानासाठी स्वत:ची क्षमता दाबून टाकतात. दहावी, बारावीत मेरिटमध्ये येणार्या मुली पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी आग्रही राहत नाहीत. परिस्थितीच्या दबावाला बळी पडतात. ज्या ‘योनीशूचितेच्या’ नावाखाली पुरुषसत्ताक परंपरा स्वत:चे अस्तित्व जपते, नव्हे खरेतर वाढवते. या योनीशूचितेला बहुसंख्य जणी पवित्रतेच्या जोखडाखाली आयुष्यभर जपतात. तेव्हा ‘स्त्रीमुक्तीचे स्वप्न’ दूर दिसू लागते.
असो, या नकारात्मक बाबीबरोबरच बर्याच सकारात्मक बाबीही घडून आल्यात. ज्या गार्गीला मुंडके छाटण्याची धमकी दिली गेली, त्याच गार्गीच्या कृतिशील वारसदार असणार्या रणरागिणींचा डंका आज सर्वत्र उमटतोय ही अत्यंत आश्वासक बाब होय. ज्या सीतेला स्वत:ला जमिनीत गाडून घ्यावे लागले त्याच सीतेची आधुनिक वारस कल्पना चावलाच्या रूपात अंतराळात झेपावली आणि पुढच्या पिढीला आदर्श घालून दिला. ज्या जुगारी पतींसाठी द्रौपदीला स्वत:ची अबु्र पणाला लावावी लागली तीच द्रौपदी आज रखमाबाई बनून ‘मला हे लग्न मान्य नाही’ हे ठणकावून सांगू लागली. पंढरपूरच्या रुक्मिणीची पूजा करण्याचा ‘मान’ तिला मिळाला आता ती शनि चौथरा, कोल्हापूरचा अंबाबाई गाभारा प्रवेश, शबरीमल या ठिकाणी आपल्या धार्मिक हक्कासाठी संघर्षाला तयार झाली. चूल आणि मूल हेच तिचे कार्यक्षेत्र म्हणणार्यांना यशस्वी उद्योजिका बनून चोख उत्तर दिलंय तुम्ही. ज्या ‘डाकीण’ प्रथेच्या नावाखाली बळी जातो, त्या प्रथेविरोधात आसाममधून बिरूबाला पुढे आली हे आश्वासक चित्र आहे. ज्या जातपंचायतीने तिला विविध मार्गांनी अमानुष छळले ती जातपंचायत बरखास्त व्हावी म्हणून ‘अंनिस’बरोबर लढ्यात उभी राहू लागली. ज्या गर्भागृहात तिला जन्मापूर्वीच मारण्यात येते त्याच गर्भगृहातून बाहेर पडून ती आता मृताचे अंत्यसंस्कार करू लागली. केवढी ही क्रांती. जीवनातल्या विविध क्षेत्रात आज तुम्ही पाय रोवून घट्ट उभे आहात. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षिका, बस कंडक्टर, उद्योजिका, इस्त्री कामगार, नाभिक, पत्रकार, रिक्षावाली, कलाकार, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक सर्वच्या सर्व क्षेत्रात तुम्ही स्वत:ला कणखरपणे उभे केलात. स्वत:बरोबर राष्ट्राचा विकास केलात.
सावित्रीच्या लेकींनो, तुमचा लढा सोपा नाही याची आम्हांस जाणीव आहे. हा लढा तुमच्या यशाचा आलेख उंचावणारच यात शंका नाही. एक विवेकवादी कार्यकर्ता म्हणून इतकेच सांगतो की, स्त्री पुरुष समानता रूजवण्याच्या या लढ्यात बुद्ध, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे, गांधीजी, आगरकर, गाडगेबाबा, प्रबोधनकार, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी; तसेच गार्गी, जिजाऊ, सावित्री, ताराबाई शिंदे, अहिल्यादेवी यांचा कृतिशील वारसा सांगणारे आम्ही तुमच्यासोबत सर्व पातळीवर स्त्रीमुक्तीसाठी कृतिशील भागीदारी करू……
॥स्त्रीमुक्तीसाठी आयुष्यभर झटणार्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन॥
एक मानवमुक्तीचा समर्थक
उमेश सूर्यवंशी
लेखक संपर्क : 9922784065