बुवा शक्तिनिरूपण
माणसे खपाट खंगलेली,
आतून आतून भंगलेली,
अदृश्य दहशतीने तंगलेली,
आधार नाही.
प्रत्येकासि येथे हवा
कोणीतरी जबरा बुवा
जो काढील सार्या उवा
मनातल्या चिंतांच्या
आपण शोधायचे नाही,
आपण लढायचे नाही,
आपण भिडायचे नाही
आयुष्याला!
बुवा मंत्रून देई दोरे,
बुवामुळेच होती पोरे,
बुवामुळेच संकटे घोरे
नाश होती!
येक बुवा भविष्यवेत्ता
ग्रहांवरी चालवी सत्ता,
मंत्रीसुद्धा त्याचा पत्ता
शोधीत येती.
येक बुवा हलवोन दाढी
रिकाम्या हाती आंगठी काढी
कोणा रित्या भांड्यातून वाढी
शंभर लोकां!
येक बुवाची खाऊन पुडी
म्हातार्याची रसरसली कुडी,
तो मारून कोलांटी उडी
लग्नासाठी उभा राहे!
कोणाची तरणीताठी
बायको लागो बुवाच्या पाठी,
बुवा तिला ध्यानासाठी
एकान्ती नेई.
येक बुवा फार मोठा,
अध्यात्मधंद्यात नाही तोटा,
तो आपुल्या धोतरा कासोटा
वर्ज्य मानी!
कोणी बुवा ताईत देती,
कोणी बुवा भस्म लाविती,
कोणी बुवा अंगारा फाशिती,
नाना तर्हा.
आधी म्हणे, “जय साई,”
मगचि अधिकारी लाच खाई,
अजून पकडला गेला नाही,
कृपा मानी बाबांची!
कणा झिजून गेला पार,
शिरजोरांपुढे सर्व लाचार,
बुवानामजपाचा उच्चार
नशा देई.
इति श्रीउदासबोधे कविजनाता
संवादे बुवाशक्तिनिरूपणनाम समाप्त