चळवळीतील आपल्या सहकार्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर पत्ररूपाने संवाद करीत. अशा पत्रांचा हा भावोत्कट संग्रह आहे. कार्यकर्त्यांच्या सुखदु:खाशी समरस होऊन त्याचा विवेक जागता ठेवण्यासाठी ते लिहीत असत. याचे उदाहरण म्हणून त्यांनी प्रगती पाटील यांना लिहिलेली पत्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरतील. आपल्या पत्रात डॉ. दाभोलकर प्रख्यात कवींच्या ओळींचा उल्लेख करीत. ‘इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर, डोके गहाण टाकणारे महाभाग नाहीत असेही नाही’ नारायण सुर्वेच्या कवितेतील या ओळी एका पत्रात डॉक्टरांनी मुळे दांपत्याला पाठविल्यात. अशा कवितेतून त्यांची साहित्य अभिरूची आणि विवेकशीलता प्रत्ययास येते. चळवळीला मदत करणार्या अनेक सहकार्यांना कृतज्ञतेची पावती देणारी पत्रे या संग्रहात सापडतील. या सर्व पत्रातून डॉक्टरांची सहकार्यांबद्दलची उत्कट भावना त्यांच्या प्रश्नाबाबतची आपुलकी आणि चळवळींवरची निष्ठा प्रकर्षाने दिसून येते.
प्रिय प्रगती,
स.न.
तुझे पत्र पोचले. त्यामुळे संकोचल्यासारखे झाले. हल्ली या स्वरूपाच्या भावना व्यक्त करणार्या मला येणार्या पत्रांची संख्या वाढली आहे. त्यामुळे समाधान व आनंद याऐवजी अपुरेपणा व मर्यादा हीच जाणीव तीव्रतेने होते. असो. तुझ्यामध्ये एक अतिशय संवेदनशील, तरल व ध्येयवादी व्यक्ती आहे. डॉक्टर हा त्याचा एक महत्त्वाचा पण मर्यादित भाग आहे. त्याला न्याय देण्यासाठी तू जो मार्ग निवडला आहेस, त्याबद्दल मी काही सल्ला देणे उचीत नाही. तुझ्या क्षमता लक्षात घेतल्या तर लष्करातील नोकरीपेक्षा अधिक मोठा सर्वस्पर्शी आवाका असलेल्या पटाची त्याला गरज आहे. मात्र याबाबत तुला काही सल्ला द्यावा, असे आज माझ्याकडे काही नाही. मात्र या क्षमतांची जाण ठेवून तू संधी शोधावयास हवी. पुढील शिक्षण जे आजच्या काळात अनिवार्य आहे आणि विवाह या दोन्ही बाबतीमुळे निर्णयाचा गुंता अधिक वाढू शकतो. परंतु जीवनातील महत्त्वाचे प्रश्न अवघड असतातच.
‘स्पार्टाकस’वरील तुझी कथा पहिला प्रयत्न म्हणून नक्कीच चांगली आहे. तू सतत स्वत:चा हात लिहिता ठेवावयास हवा. त्यामुळे व वाढत्या चिंतनानंतर लेखनात अधिक कसदारपणा निर्माण होईल. ही कथा कोठे छापली जाईल हे आत्ता सांगणे अवघड आहे. सध्या कथा छापणार्या दर्जेदार मासिकांची तशी उणीव आहे. मी प्रयत्न करेन. ‘साधने’बाबतही प्रयत्न करेन. परंतु आत्ता कोणत्याही स्वरूपाची खात्री देता येणे अवघड आहे. गैरसमज वा राग नसावा. कथा प्रसिद्ध होवो न होवो वाचन, चिंतन व लेखन चालू ठेवावे. मी सुरुवातीच्या काळात ललित लिहीत होतो. पुढे सारे लेखन चळवळीसाठीच राबू लागले. हे मी टाळायला हवे होते, असे आता वाटते. असो.
घरी सर्वांना नमस्कार.
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय प्रगती,
स.न.
तुझे पत्र मिळाले.
यवतमाळला एका सर्वार्थाने अपंग वधू-वरांचे सत्यशोधकी पद्धतीने शिबिराच्यावेळी विवाह लावला; तो सोहळा खूपच दृढ झाला. तुला यावयास जमले असते तर तुलाही खूप भावला असता. शिबीर ठीक झाले. त्यानंतर ठाणे, मुंबई, लातूर, नांदेड शिबीरे झाली. वेगळ्या पद्धतीने, प्रत्यक्ष सहभागावर आधारित शिबिरे घेण्याचा प्रयत्न आहे. संघटनात्मक व वैचारिक बांधणी यावर यावर्षी भर देण्याचा विचार आहे. इतरही अनेक उपक्रम वगैरे आहेतच. असो.
तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करता तुझा विवाहविषयक विचार योग्यही असू शकेल. मात्र केव्हाही लग्न करावेसे वाटले तर या विचाराची बळी होऊ नकोस. अट्टाहासाने लग्न करण्याची गरज नाही. तसेच न करण्याचीही गरज नाही. अर्थात, आज याबाबत आणखी काही लिहिणे योग्य नाही. पण सहजीवन हे समर्पित ध्येयवादाच्या विरोधीच असते असे नव्हे. असो.
पाच वर्षांनी तुझी पुढील वाटचाल ठरेल. त्यावेळी तुला आवश्यक वाटल्यास बोलू. मात्र तुझ्या कर्तृत्वाचे क्षेत्र समाज आहे; लष्कर नव्हे, असेच माझे मत आहे.
माझ्यावर मनापासून प्रेम करणारे अनेक जण आहेत. त्यामुळे मी गोंधळून जातो. त्यांच्या प्रेमात आदराचा भाग असतो. त्यामुळे तर अधिकच. मी सामान्य आहे हे मला (कोणतीही खोटी नम्रता न बाळगता) माहीत आहे. त्यामुळे आत्मचरित्र लिहिणे शक्य नाही.
प्रकृतीची काळजी मात्र जरूर घेईन.
–नरेंद्र दाभोलकर
कॅप्टन प्रगती पाटील,
अनेक आशीर्वाद
तू लवकरच लखनौ आणि नंतर भारतात कुठेही जाशील हे समजले. भारतीय जवानांची व त्याद्वारे देशाची सेवा करण्याची तुझी उमेद व कळकळ कौतुकास्पद आहे. त्याला माझ्या शुभेच्छा!
तू आयुष्यातील किती वर्षे लष्करात काढशील आणि तुझ्या विवाहानंतर तुझ्या निर्णयाला आणखी कोणती परिमाणे प्राप्त होतील हे सर्वच आज पूर्णत: अस्पष्ट (मला) आहे. मात्र मला असे वाटते की, तुझ्यामध्ये एक खूप चांगली व कार्यक्षम कार्यकर्ती आहे. या पैलूलाही आयुष्यात न्याय व वेळ देण्याचा विचार कर.
संघटना वाढते आहे; मान्यताही. मात्र वैचारिक व संघटनात्मक ढिसाळपणा आहे. यासाठी सर्व जिल्ह्यातील क्रियाशील कार्यकर्त्यांची तीन दिवसांची संघटनात्मक वैचारिक शिबिरे घेण्याचे ठरवले आहे. सर्वत्र जाण्याचाही माझा व्यक्तिगत प्रयत्न आहे. अशा शिबिरात विषय घ्यायला तू नसशील; पण तुला टिपणे पाठवत आहे. विचार करून तुझा आराखडा सूचना कळव.
तब्येतीबाबत तुझी काळजी स्मरणात ठेवतो.
तुझा
-नरेंद्र दाभोलकर
ता.क. : मी 21 एप्रिलला सायं.7॥ ला वर्ध्याला धर्मनिरपेक्षतेवर माझे भाषण आहे. 29 ला यवतमाळ शिबीर- आर्णी, पांढरकवडा.
प्रिय प्रगती
स.न.
हे पत्र तुला कदाचित मिळणार नाही; मिळाले तर उत्तर पाठवशीलच.
कार्याध्यक्षपदाचा निर्णय दिवाळीच्या राज्य कार्यकारिणीपर्यंत पुढे गेला आहे. तोपर्यंत कायदा होईल अशी आशा बाळगून आहे. तुझ्या विवाहाबद्दलच्या तुझी मानसिकता तशी बरोबर आहे. ती तुझ्या तीव्र संवेदनशीलतेशी सुसंगत आहे. परंतु हाच निर्णय योग्य असा ठामपणा अकारण मानू नकोस, एवढेच.
स्मिता ही खूपच चांगली कार्यकर्ती आहे. तिच्या विवाहाबद्दल मी शक्यते सर्व जरूर करेन.
लखनौ येथील तुझ्या अनुभवाबद्दल जरूर कळव.
मी आत्मचरित्र लिहिण्याची शक्यता नाही. परंतु तू आत्तापासून नीटपणे डायरी ठेवत जा. त्यामुळे आयुष्यात जेव्हा लिहावेसे वाटेल, तेव्हा हातात नोंदी राहतील. तुला लेखनाचेही चांगले अंग आहे. त्याचा सराव चालू कर.
शुभेच्छांसह.
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय कॅप्टन प्रगती
स.न.
तुझे सविस्तर पत्र पोचले. त्यामुळे मनापासून आनंद झाला. तुला नवीन अनुभव मिळत आहेत आणि स्वत:चा देश अधिक चांगला समजत आहे, याचे आणखी समाधान वाटले. ईशान्य भारतातून आलेल्या डॉक्टरांच्या अनुभवांचा व विवेचनाचा सूर मांडणारे पत्र तू ‘साधना’ला पाठव. ते आपण जरूर छापू या. तुझा अंक तुझ्या या पत्त्यावर चालू करायचा असेल तरी कळव.
मुंबईतील घटना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला व्यथित करणारीच होती. सुदैवाने त्याला मुस्लिम विरोधी रूप न देण्याचे शहाणपण बहुतेकांनी दाखवले. एक अगदी वेगळी गोष्ट या स्फोटात संपादक म्हणून माझ्या वाट्याला आली. ‘साधने’च्या माहिमच्या एका वर्गणीदाराने स्फोटात सापडल्यामुळे घरी जाणे अशक्य बनलेल्या विविध ठिकाणच्या 15 जणांना सायंकाळी घरी आणले. त्या दिवशी त्या सर्वांनी मुक्काम करणे अटळ होते. चहा झाला, खाली थोडे पाय मोकळे करून झाले, जेवणापूर्वी वेळ काढण्यासाठी काही इंग्लिश, मराठी दैनिके, लोकप्रभासारखी साप्ताहिके व साधना याचे जुने अंक त्या वर्गणीदारांना या मंडळींच्यासमोर टाकले. तासाभरात जेवण तयार झाले आणि तेवढ्यात प्रत्येकाच्या हातात बाकीची साप्ताहिके जाऊन फक्त ‘साधना’च उरली. जेवणानंतर झोपण्याऐवजी ‘साधने’तल्या मजकुराबाबत चर्चा चालू झाली. ती चांगली रंगली. रात्री 12.30 ला कॉफी झाली. तरीही ‘साधने’तल्या विविध बाबींवर लोकांना बोलायचे होतेच. शेवटी पहाटे 3 ला लोक झोपले. संकटात सापडलेल्या, अत्यंत वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना साधनातील विविध मजकुरांचा आधार व रूची वाटावी यामुळे मला धन्य वाटले. साने गुरुजींचा वारसा सांभाळला गेला याचे समाधान दाटून आले. बाकी तुझ्या दैनंदिनीतील उल्लेखाबद्दल तू लिहिले आहेस ते मला सुखावणारे असले तरी माझी मर्यादा मी बर्याच प्रमाणात ओळखून आहे. ती इतरांना जाणवत नाही का, माझ्यावरील लोभापोटी त्याकडे दुर्लक्ष केले जाते, कोण जाणे? असो.
सवडीनुसार पत्र पाठवत जा.
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय प्रगती,
स.न.
तुझे पत्र पोचले. तुझ्या कामामध्ये तुला वेगळा व हवा असलेला अनुभव मिळत आहे, याचे समाधान वाटले. प्रत्यक्ष रणक्षेत्रातील पोस्टिंग हे थोडे ताणाचे व आम्हा सर्वांनाच चिंता वाढवणारे आहे. परंतु तो जीवनाचा आणि तुझ्या कर्तव्याचा भाग असल्याने त्यासाठी तुला मनोमन सदिच्छा देणे एवढेच हातात आहे. तुझ्या डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे तीन वर्षांतील नोंदींच्यामुळे एक वेगळा दस्तऐवज पुस्तक रूपाने तयार होऊ शकेल.
तू चळवळीला मदत करत आहेत व करत राहणार आहेस, याचे समाधान वाटले. सातत्याने ही बांधिलकी जाणीवपूर्वक जपणारे तुझ्यासारखे कमी आढळतात. गणपती मिळाले नाहीत, याचे फार दु:ख वाटून घेऊ नकोस आपला मुद्दा गणपतींची संख्या हा नाही, तर लोकांना धर्मचिकित्सेसाठी उद्युक्त करणे हा आहे. यासाठीच आपण धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय याची शैक्षणिक सनद तयार करण्यासाठी एक राज्यव्यापी परिषद बारामती येथे 23 व 24 सप्टेंबरला घेतली. फारच यशस्वी झाली. आता ती शासनाला सादर करत आहोत. तुझी व स्मिताची अनुपस्थिती खूप जाणवली. तुला कोणत्या पत्त्यावर साधना व वार्तापत्र चालू करायचे ते कळव. इंग्लिश त्रैमासिक बंद करून आपण ते आता वेबसाईटवर लवकरच टाकत आहोत.
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय प्रगती,
स.न.
तुझे सदिच्छा पत्र पोचले. मनापासून आनंद झाला. तू कामाला सरावत आहेस, याचे समाधान वाटले. हिमवर्षाव पाहण्याची तुझी इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी सदिच्छा. तुला हे पत्र पोचेपर्यंत दिवाळी अंक पोचला असेल, अशी आशा आहे. कसा वाटला जरूर कळव. फटाकेमुक्त दिवाळी हे काही ठिकाणी उपक्रमाच्या स्वरूपात साजरे होते आहे. परंतु त्याला मोहिमेचे रूप देणे अजून जमलेले नाही. त्यासाठी संघटन अधिक सक्षम व नियोजनबद्ध हवे.
अमेरिकेतील मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र फाऊंडेशनने मला दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता म्हणून पुरस्कार दिला तो 10 लाख रुपयांचा आहे. तो स्वीकारण्यासाठी मी 20 दिवसांचा अमेरिकेचा दौरा करून कालच परतलो. अमेरिकेतील महाराष्ट्रीयन लोकांच्या समोर चार भाषणे झाली. एक इंग्लिशमध्ये रोटरीत झाले. विचाराला प्रतिसाद चांगला होता. मदत करणारा एक गट तेथे उभा राहील, असे दिसते.
मला मिळालेले रुपये 10 लाख समितीला दिले आहेत. माझा पुरस्कार हा खरेतर माझे सहकारी, कुटुंबीय, हितचिंतक या सर्वांच्या कामाचे माझ्या नावावर जमा झालेले ते फळ आहे, याची सत्य जाणीव मी नम्रपणे बाळगत आहे. आपल्या कामाची साता समुद्रापलिकडे दखल घेतली गेली. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. असो. अमेरिकेचा सर्व लांबलचक धावपळीचा दौरा प्रकृतीला पूर्णत: झेपला. (हे खास तुझ्यासाठी).
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय प्रगती,
स.न.
तुझे पत्र मिळाले. ते मिळाल्यावर नेहमीच आनंद होतो. तसाच याही वेळी झाला. स्वत:ला कोणी ‘प्रेरणादायी’ असे विशेषण लावले की, व्यक्तीचा ईगो सुखावतो. तो एक भाग आहेच. परंतु दुसरे असे की, तू पत्रात जे सांस्कृतिक वातावरण आणि युवापिढीची मानसिकता लिहिली आहेस, ती अत्यंत आश्वासक वाटते. तुला परस्पर संबंधांतून आयुष्य समृद्ध आणि विशाल होण्याचा अनुभव येतो आहे, सृष्टीसौंदर्य अप्रतिम आहे. काश्मिरी जनतेतील देशभक्तीची भावना प्रखर आहे, या सर्व गोष्टी मनाला समाधान देणार्या आहेत. तुला तर त्यामुळे खूपच आश्वासक व उमेदीचे वाटत असणार आणि ते तसे आहेच. असो.
तरीही मला असे वाटते की, आज ना उद्या तुझ्यासारखीची जागा ही या समाजात ही प्रेरणा, उमेद, हिंमत निर्माण करण्याची असावयास हवी. कारण हे आव्हान खूप गरजेचे व खूप बिकट आहे आणि तुझ्या क्षमतेच्या व तळमळीच्या तरुण व्यक्तींचे प्रमाण खूपच कमी आहे. असो. याबाबतही विचाराला तुझ्याकडे अजून 5 वर्षे तरी आहेतच.
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय रमेश माणगावे, जयसिंगपूर
सप्रेम नमस्कार,
आपण उदार अंत:करणाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जी देणगी दिलीत, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. समितीचे कार्य कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय अथवा फंडिंगशिवाय चालते, हे आपण जाणताच. यामुळे आपल्या सारख्या व्यक्ती उत्स्फूर्तपणे जी मदत देतात, त्याचे मोल आमच्या लेखी मोठेच आहे.
वरील पत्र औपचारिक आहे म्हणून पुन्हा हाताने लिहीत आहे.
तुम्ही प्रकृतीच्या मर्यादा असतानाही ज्या चिकाटीने व सातत्याने काम करत आहात, त्याला माझा सलाम. नीलिमाताईंना नमस्कार.
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय रमेश,
स.न.
तुम्ही आवर्जून पाठवलेली मदत प्रतिवर्षी प्रमाणे मिळाली. तुमच्यासारखे गुप्त दाते हा माझा व संघटनेचा मोठाच आधार आहे. क्लार्क सध्या गावाला असल्याने पावती व आयकर माफी काही दिवसात पाठवतो. माझे ‘तिमिरातूनी तेजाकडे’ हे अंधश्रद्धा निर्मूलनाची समग्र मांडणी करणारे पुस्तक- 500 पानांचे ‘राजहंस’ काढत आहे. प्रसिद्ध झाल्यावर भेट म्हणून पाठवतो.
घरी सर्वांना नमस्कार.
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय टी.आर.शिंदे, इचलकरंजी
स.न.वि.वि.
गेले वर्षभर संघटनेच्या दृष्टीने व माझ्या दृष्टीनेही बरेच धामधुमीचे गेले. मागील नोव्हेंबरमध्ये मला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा 10 लाखाचा पुरस्कार अमेरिकेत दिला गेला. हे सर्व पैसे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिले आहेत. मात्र तरीही समितीचे कार्य, संघटनेसमोरील आव्हाने, त्यासाठीची आर्थिक गरज याची तोंडमिळवणी होऊ शकत नाही. संघटनेचे कार्य जसजसे वाढते आहे, तसेच त्या कामामुळे ज्यांना धक्का पोहोचतो त्या लोकांकडून, हितसंबंधांकडून होणारा विरोध वाढतो आहे. जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठी होणारा विरोध हे त्याचेच एक रूप आहे. मात्र त्याला तोंड देत या हिवाळी अधिवेशनात हा कायदा होईल असे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेवरून मला वाटते. असो. सर्व प्रकारच्या विरोधाला तोंड देत समितीची वाटचाल महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत दमदारपणे चालू आहे.
दीपावली अंकाची जाहिरात समितीचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती की, तुमच्या शब्दामुळे ज्या जाहिराती मिळणे शक्य असेल त्या सर्व ठिकाणी कृपया प्रयत्न करावेत. आपल्या अन्य कामाच्या व्यापामध्येही यासाठी थोडा वेळ काढावा, ही आग्रहाची विनंती.
इचलकरंजी येथे आपल्या सहभागाशिवाय जाहिराती मिळणे शक्य नाही. कृपया वेळ काढावा. रवी कोठारीलाही लिहीत आहे. मनावर घेतल्यास सर्वांना कामाला लावून रुपये 40 हजार इष्टांक गाठणे आपणास निश्चितपणे शक्य आहे.
-नरेंद्र दाभोलकर
निशाताई भोसले, सोलापूर
स.न.वि.वि.
तुमचे विशेष आभार मानण्यासाठी हा पत्रप्रपंच. दरवर्षी दिवाळी आली की, मी अस्वस्थ होतो. दिवाळी अंकाला पुरेशा जाहिराती जमतील का? अंकाचा वाढता खर्च त्यामधून भागून पुढील वर्षाच्या चळवळीसाठी किमान आवश्यक तेवढा निधी राहील ना? याबद्दलची ती अस्वस्थता असते. यंदा ती थोडी जास्तच होती. एकतर मागील वर्षीचा जाहिरात संकलनाच्या रकमेचा आकडा मोठा होता. तो गाठणे अवघड असे वाटत होते. दुसरीकडे साधना साप्ताहिक हीरक महोत्सव सांगता सोहळ्यात अडकल्याने संपर्कही बरेच उशिरा चालू झाले. प्रत्यक्षात माझी भीती खोटी ठरली. कार्यकर्त्यांनी स्वत:च्या पुढाकाराने आपापल्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मागील वर्षीचा स्वत:चा उच्चांक मोडला. (यामुळे पुढच्या वर्षाची काळजी आतापासूनच वाढली. पण ते असो.) या सर्व धावपळीतले तुम्ही एक सच्चे सहकारी आहात. याबद्दल मला जो आनंद, अभिमान व आधार वाटतो तो व्यक्त करण्यासाठी हे पत्र. शक्यता आहे की, कदाचित काही जणांना पत्र पाठवणे माझ्याकडून राहून जाईल. तेव्हा हेच पत्र जाहिराती गोळा करण्यासाठी तुम्हाला मदत करणार्या सहकार्यांना दाखवावे. माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. तुमच्याबरोबरच त्यांनाही माझा सलाम सांगावा.
तुमच्यासारखे सहकारी मिळाल्याचा आनंद पुन्हा एकदा व्यक्त करतो. (तो खर्या अर्थाने समजण्यासाठी तुम्हाला माझ्या भूमिकेतच यावे लागेल.)
आपला सहकारी,
-नरेंद्र दाभोलकर
प्रभाताई, गोरेगाव
स.न.
तुम्हाला माझा वेळ घेणे अपराधीपणाचे वाटते, हे वाचून मी जरा कोड्यात पडलो. मला तर तो वेळ अगदी सत्कारणी लागला असे वाटते. तुमच्याकडे एक परिपक्व वैचारिक; पण तरीही सहृदय आणि व्यवहारी दृष्टिकोन आहे. असे सहकारी लाभणे विशेषत: चळवळीत ही बाब किती महत्त्वाची असते हे तुम्ही माझ्या जागी आल्यावर तुम्हाला समजू शकेल. असो. आपण भोजन भेट सोडून देऊन व्यक्तिगत संपर्क करू या. भेटीत ठरवू.
साधनात ‘निशाणी डावा अंगठा’ याबद्दल आले आहेच. मात्र मी ती वाचलेली नाही. वाचतो. शक्य तर जाहीर चर्चाही घडवून आणतो.
आपण आपल्या घरच्या दु:खद घटनेच्या वेळी ज्या धीरोदात्तपणे वर्तन केले ते एक आदर्श आहे. याचे अनुकरण सवर्र्त्र व्हावयास हवे. सातारा आकाशवाणीचा अनुभव चांगला नाही. तरीही भेटीत त्याबद्दल बोलू या.
पाडगावकरांची कविता 500 वा 1000 छापणे याचा खर्च (चांगला कागद, योग्य आकार व एखादे चित्र) याची माहिती घेऊन ठेवा. भेटीत निर्णय घेऊ या.
तुम्ही मुंजीच्या वेळी साधलेला संवाद महत्त्वाचा आहे. कप्पीकरण टाळून संवाद साधावयास हवाच. हा विषय चर्चेचा बनवण्यासारखा आहे. 24 तारखेला सकाळी थेट पोचतो.
घरी सर्वांना नमस्कार.
आपला सहकारी,
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय व्ही.सी.भुयागळे, कन्नड
सप्रेम नमस्कार,
मन:पूर्वक अभिनंदन करण्यासाठी व आभार मानण्यासाठी हे पत्र.
आपल्या समितीचे अर्थकारण वार्षिक अंकाला मिळालेल्या जाहिरातींच्यावर अवलंबून असते, हे आपण जाणताच. यावर्षी एकूण आर्थिक परिस्थिती अस्थिर असल्याने जाहिरात संकलनाबाबत मनात काळजी होती. शिवाय दरवर्षी तेच ते मागण्याचे काम केल्याने कार्यकर्ते कंटाळल्याचा परिणाम देखील होईल काय, अशीही साशंकता होती. या दोन्ही गोष्टी तुमच्या चिकाटीच्या प्रयत्नाने खोट्या ठरल्या. यासाठी तुम्हाला सलाम करण्यासाठी हे पत्र. जाहिराती व देणग्या यांच्या एकूण रकमेने आलेख चढताच राहिला आणि आतापर्यंत सर्वोच्च संकलन असलेला मागील वर्षीच्या रकमेचा आकडाही ओलांडला, हे कळवताना आनंद वाटतो. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाबद्दल मन कृतज्ञतेने भरून येते. विशेष म्हणजे यावर्षी नागपूर ते कोल्हापूर अनेक ठिकाणी नव्या कार्यकर्त्यांनी जाहिराती मिळवण्याची आपली खाती परिणामकारकपणे खोलली, याचे विशेष समाधान आहे. हे यश व्यक्ती म्हणून तुमच्याबाबत आणि संघटना म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबाबत जी मान्यता लोकमानसात आहे, त्यातून लाभलेले आहे. ते आपण सांभाळूया आणि वाढवूया. कारण याबाबतीत अशी सातत्यपूर्ण कामगिरी करणारी सामाजिक क्षेत्रातली अन्य कोणतीही जनचळवळ आज तरी महाराष्ट्रात नाही. यामुळे आपल्या यशाचे महत्त्व व जबाबदारी दोन्ही वाढते. पुन:श्च एकदा धन्यवादासह.
तुमचा सहकारी,
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय विठ्ठलराव जाधव, नाशिक
स.न.वि.वि.
आपली संघटना आता महाराष्ट्रात विस्तारली आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत. आपण एका मोठ्या संघटनेचा भाग आहोत, याची थेट प्रचिती त्यांना यावी कशी? त्यासाठी कल्पना अशी की, दूरच्या जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याशी आपण दर महिन्यातून एकदा छानसे पत्र लिहून संपर्क करायचा. घरातील चळवळीतील बाबी अनौपचारिकपणे त्याला लिहावयाच्या. वर्षभर हा वसा सांभाळायचा. प्रेम एकतर्फी झाले तरी वसा सोडायचा नाही.
फोन हा पत्राला पर्याय नाही, हे पक्के लक्षात ठेवायचे. अर्थात, अशी पत्रे त्याला लिहिण्यापूर्वी एक पत्र मला लिहून होकार कळवा. पत्ता त्वरित पाठवतो.
तुमचा सहकारी,
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय रामराव गुंजाळ,
स.न.
तुमचे पत्र पोचले. तुम्हाला मार्गदर्शिका आवडली, याचे समाधान वाटले. तुमच्यासारखे कार्यकर्तेच समितीचा विचार कृतिशीलपणे पुढे नेत असतात.
आता तुम्ही लिहिलेल्या दुसर्या प्रश्नाबद्दल.
अंधश्रद्धांचे प्रकार अक्षरश: असंख्य आहेत. त्यापैकी काही विज्ञान व अंधश्रद्धा याच्या सीमारेषेवरचे आहेत. त्यापैकी तुम्ही लिहिलेले प्रकरण आहे. संबंधित जाहिराती हुशारीने, कायदेशीर सल्ला घेऊन केल्या जातात. त्यामुळे त्याबाबत कारवाई परिणामकारक ठरत नाही. अशा बाबतीत चळवळ करण्यास स्त्री संघटना उत्साही नसतात. कारण त्यांच्या प्राधान्याचे विषय अन्य असतात. यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईचा विचार हा फारसा उपकारक ठरत नाही. अशा बाबतीत करावयाचा खरा उपाय म्हणजे लोकांना संमोहनाचे स्वरूप, वास्तव व मर्यादा समजावून सांगणे. हे काम पूर्वी ‘अंनिस’ जास्त प्रमाणात करत असे. संबंधित व्यक्तीबरोबर नाशिक येथे माझा जाहीर वादविवाद झाला होता व त्याला सपशेल माघार घ्यावयास लागली होती. प्रश्न असा आहे की, लोकांना सोईच्या सोप्या उपायांची ओढ असते. त्यामुळे संमोहनात तथ्य नाही हे प्रभावीपणे पटवून दिले तरी करून पाहण्यास काय हरकत आहे? तोटा तर नाही? अशी लोकांची मानसिकता असते. त्यामुळे शक्यतेनुसार याबाबत केलेल्या प्रबोधनापलिकडे या संदर्भात आणखी काही करू नये, असे मला वाटते. संमोहन व त्याद्वारे उपचार करणारे दर चार पाच वर्षांनी कोणी नवीन नवीन येत असतात. काही दिवस त्यांचा धंदा चालतो. मग लोक कंटाळतात. मग पुन्हा काही दिवस शांतता. मग आणखी कुणीतरी येतो. असे चक्र गेले 20 वर्षे मी पाहत आहे. असो. तुमचे समाधान झाले नाही तर पुन्हा लिहीन.
सर्व सहकार्यांना नमस्कार.
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय संजय बारी, चिंचवड
स.न.
आपले पत्र येऊन खूपच दिवस झाले. मी शक्यतो पत्रांना लगेच उत्तर देतो. गेले दीड महिना दोन दिवाळी अंक व अन्य संघटनात्मक धावपळ यामुळे जमले नाही. क्षमस्व.
तुमच्या पत्रात संघटनावाढीबद्दल उत्साहवर्धक व क्रियाशील सूर आहे. मला त्याचे समाधान वाटले. भोसरी व सांगवी येथे शाखा चालू करण्याचा जरूर प्रयत्न करावा. पुस्तकांच्या सी.डी.चा स्टॉल लावण्याचा प्रयत्न अत्यंत चांगला आहे. कार्यकर्त्यांना यासाठी जो प्रवास व अनुषंगिक खर्च होईल तो जरूर देण्यात येईल. अंक गेला नाही तरी संपर्क आवश्यक आहे.
विवेकी विचारसरणीची आचारसंहिता ही कल्पना फारच चांगली आहे. मात्र आध्यात्मिक बाबतीत झटपट व फार मोठे आश्वासन असते.
आपला मार्ग कष्टाचा व लांबचा हा फरक राहणार. भेटीत बोलू या.
स्वातीला नमस्कार.
स्नेहांकित,
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय डॉ.शाम राऊत, आंबेगाव
आपण पाठवलेले देणगीची पावती व आयकर माफीचे प्रमाणपत्र सोबत पाठवत आहे. आपल्यासारखे कृतिशील लोकच समाजाला पुढे नेत असतात. मला तुमचा; तसेच तुमच्या सर्व कुटुंबियांचा अभिमान वाटतो. आपल्या देणगीबद्दल मी आपला मन:पूर्वक आभारी आहे. मी ते वार्तापत्राच्या संपादकांकडे माझ्या शिफारशीसह पाठवले आहे. मात्र कोणतीही गोष्ट छापणे या त्यांच्या संपादकीय स्वातंत्र्यांचा मी आदर करतो.
माझे नवीन पुस्तक ‘तिमिरातूनी तेजाकडे’ नुकतेच बाजारात आले आहे. 500 पानाच्या या ग्रंथाची किंमत 400 रु. आहे. साधना मीडिया सेंटर, 431, शनिवार पेठ, पुणे 30 येथे ते उपलब्ध होईल. त्यामध्ये मी विषयाची सर्वांगीण मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. जरूर वाचावे व कळवावे.
घरी सर्वांना नमस्कार.
आपला नम्र
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय हरिभाऊ हिंगसे, बारामती
स.न.
विवाह समारंभ चांगला झाला. निळूभाऊ व रामभाऊंनाही चांगला वाटला. तुम्ही परिश्रमपूर्वक आखणी केली होती. म्हणूनच हे शक्य झाले. तुमचे मन:पूर्वक अभिनंदन! विवाहाचे एक दोन फोटो पाठवून द्यावेत. स्थानिक बातम्यांच्या झेरॉक्सही पाठवाव्यात.
सातारच्या बैठकीत तुम्ही व पंकज गांधी यांनी सोलापूर जिल्ह्यामधील केंद्रांची प्राथमिक पूर्तता पाहणीची जबाबदारी स्वीकारली होती. मी पंकजलाही लिहिले आहे. तुमच्या मदतीला विठ्ठलराव आहेतच. सोलापूर जिल्ह्यात शाखा बर्याच आहेत; परंतु संघटनात्मक विस्कळितपणा जाणवतो. यादृष्टीने प्राथमिक पूर्ततेचा अहवाल द्यावा. मी 21, 22, 23 ऑगस्ट आपल्या जिल्हा शिक्षण शिबिरासाठी सोलापूरलाच आहे. त्यावेळी सर्व जिल्ह्याच्या बैठक घेऊ.
विवाहाला टेंभुर्णी शाखेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील अन्य कार्यकर्तेही आले याचा आनंद वाटला. टेंभुर्णी शाखेची संघटनात्मकता कौतुकास्पद आहे.
सर्व सहकार्यांना नमस्कार.
आपला,
-नरेंद्र दाभोलकर
प्रिय हरिभाऊ हिंगसे/विठ्ठलराव पाटील, बारामती
स.न.वि.वि.
सातारा येथील बैठकीत आपल्या जिल्ह्यातील संघटनात्मक प्राथमिक बांधणीची जबाबदारी आपण घेतली होती. आपल्या जिल्ह्यात ज्या शाखा सध्या अस्तित्वात आहेत, त्यांची किमान निकषाबाबत पूर्तता करणे असे या जबाबदारीचे स्वरूप आहे. जुलै 15 पर्यंत आपण प्रत्यक्ष वा (अपवादात्मक परिस्थितीत) प्रतिनिधी भेट देऊन आवश्यक निकषांची पूर्तता झाली आहे की, नाही ते पाहावे व त्याप्रमाणे माहिती मला पाठवावी. म्हणजे पुढील संघटनात्मक बांधणीस नीटपणे प्रारंभ करता येईल.
कृपया हे महत्त्वाचे कार्य प्राधान्याने करावे, ही विनंती. निकषांची पूर्तता होईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावाच.
केंद्र मान्यतेचे निकष
1) 25 सभासदांची नोंदणी (वार्षिक फी विद्यार्थी रु.2 अन्य रु.10) 2) कार्यकारिणी व पदाधिकारी यांची निवड पूर्ण. 3) केंद्राची किमान पाक्षिक बैठक. 4) अंधश्रद्धा निर्मूलनावरील 10 पुस्तकांची केंद्राची लायब्ररी. 5) 1 एप्रिल 1993 नंतर संलग्नता फी रु.50 श्री.मुंडे यांना पाठवलेले असाणे.
जी केंद्रे हे निकष पुरे करू शकणार नाहीत, ती केवळ संपर्क केंद्रे राहतील. क्रियाशील केंद्रे म्हणून त्यांना संघटनात्मक दर्जा मिळणार नाही. क्रियाशील व संपर्क यापैकी कोणत्याही स्वरूपाचे केंद्र असले तरी तेथील पदाधिकार्यांचे वा 5 प्रमुख कार्यकर्त्यांचे पूर्ण पत्ते आपल्या अहवालासोबत पाठवावेत/तालुका पातळीखालील गावात जी केंद्रे आहेत, त्यांनी जानेवारी 93 नंतर वार्तापत्राचे किमान 5 वर्गणीदार केलेले हवेत. तालुका व त्यापेक्षा वरील ठिकाणी वर्गणीदारांची संख्या कार्यकारिणी संस्थेएवढी असावी.
-नरेंद्र दाभोलकर
-संकलन : राहुल थोरात