Categories
चळवळ

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विस्तारीत राज्यकार्यकारणी अहवाल

जुलै - २०१५

दिनांक 5, 6 व 7 जून असे तीन दिवस नाशिक येथील सिटू भवन, खुटवडनगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस राज्यातील 26 जिल्ह्यांतील एकशे तीस पदाधिकारी उपस्थित होते. ह्या बैठकीचे उद्घाटन कुंभमेळ्याविषयी प्रबोधन करणार्‍या संत तुकाराम यांचा आली सिंहस्थ पर्वणी हा अभंग व कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या पर्वणी ह्या कवितेच्या पोस्टरच्या प्रकाशनाने झाले. ह्या तीन दिवशीय बैठकीत संघटनेच्या एकूण चौदा विभागाच्या माध्यमातून चाललेल्या विषयांवर चर्चा, विचारमंथन होऊन निर्णय घेण्यात आले. त्यानुसार चळवळीच्या कामाची पुढील दिशा ठरविण्यात आली. त्यात शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासात राज्य व केंद्र सरकार तसेच तपास यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करून आतापर्यंत चळवळीने केलेल्या सर्व सनदशीर मार्गांचा आढावा घेण्यात आला. 20 ऑगस्ट 2015 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला दोन वर्षे होत आली आहेत. ह्या काळात चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्रभर निषेधात्मक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये आणखी निर्भय मॉर्निंग वॉक, जिल्हाधिकार्‍यांना निवेदने देणे, विवेकी विचार व्याख्यानमाला, ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ ह्या चतु:सुत्रीनुसार जिल्हावार कृती करण्याचा निर्धार करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत हा विषय मागे पडू देणार नाही असे कार्यकर्त्यांनी ठामपणे ठरविले. त्यासाठी जी जी कृती करता येईल ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत 130 गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. त्यातील एका केसचा निकाल आला असून आरोपीस शिक्षा देण्यात आली आहे. ह्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस यंत्रणेतील अधिकारी व्यक्तींची प्रशिक्षणे घेण्याचा निर्णय झाला.

येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात होणारे पाणी व अन्न प्रदूषण, आरोग्य व निवारा यांचे प्रश्न, प्रशासकीय व्यवस्थेवरील ताण, वाढती गुन्हेगारी, वाढते अपघात, व्यसन याबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्याच पार्श्वभूमीवर आय. एम. ए. हॉल, नाशिक येथे ‘कुंभमेले की कालसुसंगता’ या विषयावर जाहीर परिसंवाद घेण्यात आला, मार्गदर्शक म्हणून राजेंद्रसिंह (राजस्थान), फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायक(बेंगलोर) गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे राजेश पंडीत व महाराष्ट्र अंनिसचे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ह्या परिसंवादात सहभाग घेतला.

वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या मार्फत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी 26 जिल्ह्यांत शिक्षकांची प्रशिक्षण शिबीरे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित जिल्ह्यांनी आपण कोणती व किती शिबीरे घेणार यांचे संकल्प जाहीर केले. त्याप्रमाणे हा विभाग पुस्तकांची व प्रमाणपत्रांची छपाई करेल. जिल्ह्यांनी याबाबतचे नियोजन केल्यास या विभागाचे राज्य कार्यवाह प्रशांत पोतदार, सातारा यांच्याशी संपर्क साधावा.

चळवळीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला 25 वर्षेपूर्ण होत आहेत. यानिमित्ताने जिल्ह्याजिल्ह्यातून वाचक मेळावे घेण्याचा निर्णय झाला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन, सर्व अंकांचे स्कॅनिंग सुरू असून ते काम अंतिम टप्प्यात आहे, ते काम पूर्ण झाल्यावर विषयनिहाय त्यांची वर्गवारी करण्यात येईल, आणि ते ज्यांना संदर्भासाठी हवे त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. वार्तापत्र विभाग हा रिसोर्स सेंटर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली, त्यासाठी त्या विभागात ज्या ज्या वस्तू आवश्यक असतील त्या त्यांनी घ्याव्यात असा निर्णय घेण्यात आला.

मानसमित्र-समाजामध्ये वाढत असलेल्या मानसिक आजारांच्या प्रश्नांवर गेल्या अनेक वर्षांपासून मानसमित्र हा उपक्रम राबविला जात आहे. याविषयी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रत्येकी दोन दिवसांचे एक याप्रमाणे तीन टप्प्यांत प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला.

रौप्यपूर्ती अधिवेशन दिनांक 7, 8 व 9 ऑगस्ट 2015 रोजी पुणे येथे विवेकवाद्यांची राष्ट्रीय पातळीवरील परिषद व दोन दिवशीय रौप्यपूर्ती अधिवेशन घेण्याचे निश्चित करण्यात आले.

संघटनेच्या युवा विभागाच्या वतीने राज्यातील 50-60 महाविद्यालयात जोडीदाराची विवेकी निवड व अन्य उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना कृतीशील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जातपंचायतीच्या माध्यमातून भारतीय राज्यघटना व न्यायव्यवस्थेला फाटा देऊन पर्यायी न्यायव्यवस्था निर्माण करून शोषण व बहिष्कृत करण्याचा निर्णय, मनमानी दंडवसुली आदि प्रश्न महाराष्ट्र अंनिसने प्रथम चव्हाट्यावर आणले. यासाठी जातपंचायतीच्या मनमानीविरोधी कडक कायदा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र अंनिसच्या 306 शाखा, महिला विभाग, राष्ट्रीय अनुसंधान, प्रकाशन विभाग, सांस्कृतिक विभाग इत्यादी विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सांस्कृतिक विभागाच्या वतीने रिंगणनाट्याच्या कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या विभागाचे प्रा. योगेश कुदळे यांनी इस्लामपूर गट, पुणे गट व पिंपरी चिंचवड गटाच्या कामांबाबत माहिती दिली, ही माहिती कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारी होती.

माधव बावगे,

प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस