Categories
अभियान

‘कुंभमेळा व हिंसा के खिलाफ, मानवता की ओर अभियान’ मअंनिस राबविणार!

खुनाच्या तपासाच्या पाठपुराव्यासाठी 20 जुलैला राज्यव्यापी धरणे आंदोलन मुंबईत
जुलै - २०१५

नाशिक येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 3 दिवशीय विस्तारीत राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. त्यामधून सहभागी 30 जिल्ह्यांतील प्रमुख 150 पदाधिकार्‍यांच्या सहभागाने आगामी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अ‍ॅड. गोविंदराव पानसरेंच्या निर्घृण खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी व तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यभर हिंसा के खिलाफ, मानवता की ओर अभियान राबविण्याची सुरवात दि. 20 जुलै 2015 रोजी मुंबईत राज्यव्यापी धरणे आयोजनाने करण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित कुंभमेळ्यामुळे निर्माण होणार्‍या प्रश्नांबाबत आणि विकासाच्या प्राधान्याबद्दल प्रबोधन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र अंनिसच्या रौप्य वर्षपूर्तीच्या निमित्ताने दि. 7, 8, 9 ऑगस्ट रोजी विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद व संघटनेचे रौप्य वर्षपूर्तीचे अधिवेशन पुण्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला येत्या 20 जुलैला 23 महिने पूर्ण होत आहेत. सीबीआयकडे सुपूर्द करून एक वर्ष झाले आहे. परंतु ठोस काहीही हाताशी लागलेले नाही. त्यामुळे खुनाचा तपास आता न्यायालयाच्या देखरेखीत करण्याची मागणी करणारी याचिका आम्ही दाखल करण्याच्या प्रयत्नात आहोत. तसेच अ‍ॅड. गोविंदराव पानसरेंच्या खुनालाही 5 महिने होत असताना मारेकर्‍यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले असताना आणि आता तपास विशेष तपास पथकाकडे(एस. आय. टी. )कडे देऊन देखील काही विशेष प्रगती झाल्याचे दिसत नाही. ज्याप्रमाणे मागील सरकारने तपासासाठी प्लँचेटचा वापर करणार्‍या पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना पाठीशी घातले तसे आताच्या सरकारला आम्ही कदापी करू देणार नाही असा निर्धार कार्यकर्त्यांचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या काळात दि. 20 जुलै 2015 रोजी मुंबईत आम्ही समविचारांसह राज्यव्यापी धरणे आयोेजित करणार आहोत. तसेच तेव्हापासून पुढे 20 ऑगस्टपर्यंत राज्यभर निषेध मोहीम राबविली जाणार आहे. त्यामध्ये देशाच्या राष्ट्रपतींच्या नावे लाखो पोस्टकार्ड लिहिणे, लोकप्रतिनिधींना शिष्टमंडळासह भेटून विचारणा करणे, तालुक्यांमधून विविध प्रबोधनाचे आणि समर्थन मिळवण्याचे कार्यक्रम राबविणे आणि जिल्हानिहाय धरणे निदर्शने, मोर्चांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन महिनाभर आधीच सुचित करण्यात येत आहे. जेणेकरून त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवून संबंधित तपास यंत्रणांना गतीमान करावे व महाराष्ट्राच्या जनतेला खुनाच्या तपासाचा ठोस निष्कर्ष द्यावा असे अपेक्षित आहे.

नाशिक येथे ऑगस्ट 2015 पासून पुढील वर्षभर चालणार्‍या सिंहस्थ कुंभमेळा आयोजनामुळे निर्माण होण्याची अनेक प्रश्नांची सामुहिक चर्चा उपस्थित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंनिस करणार आहे. मिथकांवर आधारीत, पर्यावरणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारा, विकासाचे प्राधान्यकम बदलविणारा आणि सामाजिक नितीमत्ता व संविधानिक मूल्य आशयाला हरताळ फासणारा सिंहस्थ कुंभमेळा आयोजनासाठी देशाचे व राज्याचे सरकार पुढाकार घेत आहे. त्यासाठी 2,500 कोटी रूपयांपर्यंतची आर्थिक तरतूद करत आहे. धार्मिक पर्यटनाची जाहिरात केली जात आहे. हे सर्व भारतीय संविधानाच्या लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या भूमिकेशी विसंगत वर्तन आहे. त्यामुळे त्याबद्दलची चर्चा भारतीय नागरिकांमध्ये सुरवात म्हणून नाशिक येथे 6 जून रोजी ‘सिंहस्थ कुंभमेळा’ की कालसुसंगता’ याविषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजनाने करण्यात आली असून त्यावेळी संत तुकारामांचे अभंग ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचे पोस्टर्स प्रकाशित करण्यात आले आहे. त्याचे महाराष्ट्रात वितरण करण्यात येत आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटीत कार्याला 25 वर्षे 2014-15 साली पूर्ण झाली. संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाच्या धक्क्यातून सावरून संघटना आता नव्या दमाने कार्यरत झाली आहे. त्यामुळे संघटनेचे रौप्यवर्षपूर्ती अधिवेशन दि. 8 व 9 ऑगस्ट 2015 रोजी पुण्यात होणार आहे. त्यासोबतच दि. 7 ऑगस्ट रोजी ‘विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद’ घेतली जाणार आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र अंनिसच्या 25 वर्षांच्या कार्याचा उहापोह आणि भविष्याची वाटचालीची क्षेत्रे यासोबत राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या विवेकी समाज उभारणीच्या कामाची दिशा व महाराष्ट्र अंनिसचे वेगळेपण आणि चर्चा उपस्थित केली जाणार आहे.

आपले विनित,

अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष

सुशिला मुंडे

राज्य प्रधान सचिव

मिलिंद देशमुख

राज्य प्रधान सचिव

माधव बावगे

राज्य प्रधान सचिव