Categories
जट निर्मूलन

चंपाताई झाल्या जटामुक्त

जून – २०१५

खटाव तालुक्यातील वडुज येथील श्रीमती चंपावती केशव यादव या 57 वर्षीय महिलेच्या केसांतील 15 वर्षांपासूनच्या जटा सोडवण्याचे कार्य समितीतर्फे करण्यात आले. इतक्या वर्षांच्या या जटांमुळे महिलेला मानदुखीचा तसेच इतर आरोग्याचे प्रश्न उद्भवू लागले होते. त्यांचा मुलगा गिरीधर यादव (वय 38) यांना या त्रासातून आईची मुक्तता व्हावी असे वाटत होते म्हणून त्यांनी अंनिसशी संपर्क साधला. अंनिसने यात पुढाकार घेऊन त्यांच्या समस्येचे निवारण केले.

मंगळवारी सातार्‍यात श्रीमती चंपावती केशव यादव यांना जटेतून मुक्त करण्यात आल्यानंतर “आता खूप मोकळे व हलके वाटत आहे.” अशी बोलकी व आनंदी प्रतिक्रिया त्यांनी दिली व समितीचे आभार मानले. समितीतर्फे इथून पुढे केसांची निगा कशी राखावी व पुन्हा अशी समस्या आल्यास काय करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.

समितीने यापूर्वीही अनेक महिलांना जटामुक्त केलेले आहे. अस्वच्छता व वेळच्यावेळी वेणीफणी न करणे या कारणांमुळे स्त्रियांना जटेच्या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र ते देवाचे बोलावणे आहे किंवा देवानेच हे केले असे समजून देव-देवस्की आणि प्रचंड खर्च केला जातो, पण मूळ समस्या तशीच राहते. आजही अनेक महिलांना जटामुक्त करणे आवश्यक आहे त्यासाठी समिती नेहमीच प्रयत्नशील आहे. अन्य कोणाला जट समस्येतून मुक्त होण्यासाठी समितीची मदत हवी असल्यास समितीशी संपर्क साधावा असे समितीतर्फे सांगण्यात आले.

संपर्क – अंनिस हेल्पलाईन नंबर- 7588806688

यावेळी उदय चव्हाण, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, प्रकाश खटावकर, दशरथ रंधवे, श्रीनिवास जांभळे, वैशाली जांभळे, कोमल घाडगे, अश्विनी जाधव, शितल निकम, पूजा चव्हाण आणि कार्यकर्तेसहभागी होते.

श्रीनिवास जांभळे, सातारा