अंनिस व प्रशासनाच्या पुढाकाराने मरडमुरे ग्रामस्थांचा निर्धार!
आता गावकीच्या माध्यमातून निर्णय होणार नाहीत. कोणत्याही ग्रामस्थाच्या चुकीबद्दल दंड आकारण्यात येणार नाही. कुणाला बहिष्कृत करण्यात येणार नाही. सगळे विषय सामोपचाराने सोडविले जातील. कुणाबद्दल तक्रार असल्यास पोलीस आणि प्रशासनाकडेच ती केली जाईल आणि विकासाच्या रस्त्यावर एकदिलाने वाटचाल केली जाईल…..
वर्षभरापूर्वी गावातील आढाव कुटुंबाला बहिष्कृत करून त्यांच्याकडून दंड वसूल करणार्या मरडमुरे(ता.जावळी, जि.सातारा) ग्रामस्थांचा हा निर्धार. गावकीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली असली, तरी कायद्यानुसार गुन्हे ठरतील असे निर्णय गावकी करीत असेल तर अशा प्रथेला पूर्णविराम दिलाच पाहिजे ही गोष्ट ग्रामस्थांना अंनिस व तहसीलदार रणजीत देसाई आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी कौशल्याने हा विषय हाताळून त्यांची चूक दाखवून दिली.
तानाजी गणपत आढाव आणि त्यांच्या पत्नी रंजना यांना गावातील कोणत्याही सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे निमंत्रण मिळेनासे झाले होते. त्यांचा मुलगा सुनील याचा गावातील काही युवकांशी गेल्यावर्षी यात्रेत वाद झाल्यानंतर हा अघोषित बहिष्कार सुरू झाला होता. बहुतांश युवक मुंबईत स्थिरावलेले. सुनीलसुद्धा मुंबईत नोकरी करणारा. अशावेळी वयोवृद्ध आढाव दांपत्याला गावात एकटे पडावे लागले होते. त्यांनी अंनिस साताराकडे लेखी तक्रार केल्यानंतर या प्रश्नी गावात प्रशासन व गावकरी मिळून मिटींग घेण्यात आली. गावकर्यांशी कधी नरम, कधी गरम भूमिका घेतली. सुनीलच्याच कशा चुका आहेत हेही सांगण्याचा प्रयत्न झाला. थोडीफार वादावादी झाली. तहसीलदार देसाई यांनी कायदेकानून लक्षात आणून देताच गावकर्यांनी सहकार्याची भूमिका घेतली.
चूक करणार्या ग्रामस्थांकडून वेळोवेळी गोळा केलेल्या दंडाचा हिशोब कोण ठेवतो. त्या पैशांचे काय केले जाते असे सवाल अधिकार्यांनी उपस्थित करताच ग्रामस्थांनी यात्रा आणि पारायणासाठी हा पैसा खर्च केल्याचे सांगितले. लोकांना जबरदस्तीने दंड करून त्या पैशातून पारायण भरवता? अशा पारायणाने विठ्ठल कधी पावेल का? असा सवालही करण्यात आला. दंड वसूल करण्याचा प्रकार कधी थांबेल, असा प्रश्न पोलिसांनी विचारताच गावकर्यांनी एका आवाजात सांगितले आजपासून लगेच….
लोकशाही मार्गाने पुढे या
आढाव दाम्पत्याचा मुलगा सुनील याने फेसबुकवर गावाविषयी अवमानकारक मजकूर प्रसिद्ध केल्याची तक्रार मरडमुरे गावकर्यांनी बैठकीत केली. या विषयावरून थोडी वादळी चर्चा झाली. तथापी त्याला शिक्षा देण्याचा अधिकार गावकीला कुणी दिला. या प्रश्नावर गावकरी गप्प झाले. ‘प्रश्न कोणताही असो लोकशाही मार्गानेच तो सोडविला पाहिजे. कायदा हातात घेऊन कुणाला दंड ठोठावला तर खंडणीचा गुन्हा दाखल करावा लागेल’ अशी तंबी प्रशासनाकडून देण्यात आली. आढाव दाम्पत्याला 25 हजारांचा दंड ठोठावून नंतर एक हजारांवर तडजोड करण्यात आली आणि तो वसूलही करण्यात आला अशी कबुली गावकर्यांनी दिली. यापूर्वीही गावकीने काही जणांकडून दंड वसूल केल्याचे बैठकीदरम्यान समोर आले.
नवविचारांची शाळा भरवली
बैठकीसाठी मुद्दाम आलेल्या अंनिसच्या डॉ.शैला दाभोलकर, प्रशांत पोतदार व शंकर कणसे यांनी मरडमुरे गावातील जि.प.च्या शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा म्हणजे काय? निर्भयपणे कसे वागावे? डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी कोणत्या विचारांसाठी आपले प्राण दिले? याविषयी मुलांना माहिती दिली. ‘शूर गडी तू, वीर गडी तू, कोण्या कोण्या शक्तीला घाबरतो तू’ अशा गाण्यांमधून लिंबू, मिरची, भूतबाधा, करणी अशा प्रकारांनी भांबावून न जाता कणखरपणे अशा गोष्टींना विरोध करण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांनी लहानग्यांमध्ये यानिमित्ताने पेरली.
या सर्व मोहिमेत अंनिसच्या डॉ.शैलाताई दाभोलकर, प्रशांत पोतदार, शंकर कणसे, प्रदीप संकपाळ व तहसीलदार रणजीत देसाई, पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पत्रकार राजीव मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
–प्रशांत पोतदार
संपर्क : 9421121328