डॉ.नरेंद्र दाभोलकरांवरील विशेषांकासाठी डॉक्टर आणि संघटना उभारणी, डॉक्टरांचे कार्यकर्तेपण, डॉक्टर आणि कार्यकर्त्याचं नातं याविषयी लिहावे असं संपादकांनी सुचविले. डॉक्टरांचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी होतं की, त्यातील प्रत्येक पैलू शब्दबद्ध करणं कठीण आहे. पण आम्ही तरीही प्रयत्न केलाय….
डॉक्टरांच्या खुनानंतर वर्षभरात डॉक्टरांच्याविषयी इतके प्रचंड लिहिले गेले आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियातून इतकी भरभरून चर्चा झाली की, त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. तरीदेखील कार्यकर्तेम्हणून त्यांच्याबरोबर गेली 25 वर्षे काम करताना, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे झालेले आकलन कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून आपणासमोर मांडत आहे.
मागे डॉ.अनिल अवचटांचं ‘मुक्तांगणची गोष्ट’ या पुस्तकाची चर्चा आम्ही डॉक्टरांजवळ करीत होतो. त्या चर्चेत डॉक्टर म्हणाले, मलाही अंनिसची गोष्ट लिहायची आहे, पण ती गोष्ट केवळ माझ्याचभोवती फिरण्याचा धोका आहे. आम्ही म्हणालो, “डॉक्टर, असू द्या, तो धोका पत्करा, पण अंनिसची गोष्ट लिहाच.” डॉक्टरांनी होकारही दिला, आज मात्र ‘अंनिसची गोष्ट’ तशीच राहिली व ‘अंनिसच्या नेत्याची गोष्ट’ लिहिण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आलीय. एक अस्वस्थ करणारी घालमेल, वेदनेची भावना मनात आहे. कामाचा निर्धारही आहे.
ही गोष्ट खरी आहे की, डॉक्टर संघटनेविषयी, संघटना बांधणीविषयी आमच्याशी खूप चर्चा करायचे, आणि आम्हीदेखील अगदी मोकळेपणाने संघटना या विषयी, डॉक्टरांच्या आवडलेल्या, प्रभावित करून गेलेल्या शैलीविषयी आणि अगदी नावडलेल्या गोष्टी विषयीदेखील डॉक्टरांशी बोलायचो, एका अर्थाने खाजगी नाही पण व्यक्तिगत म्हणता येईल अशा बाबींवरदेखील बोलणे व्हायचे, त्यामुळे एकादा विशिष्ट निर्णय घेताना डॉक्टरांची त्यामागे काय भूमिका होती किंवा त्या घटनेकडे डॉक्टर कसे बघतात? कसा विचार करतात हे समजून घेणे असा आमचे हेतू असायचा. डॉक्टरांशी आमचं हे जे जवळकीचं नातं होतं. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आम्ही(अविनाश, परेश, विनायक) संघटना बांधणी संदर्भात जी चर्चा-विचार-विनिमय करायचो आणि त्यातून काही प्रयोग करायचो त्याचे डॉक्टर नेहमी स्वागत करायचे. आणि संघटनेचे धोरणात्मक निर्णय घेताना त्याला संधी मिळायची.
अर्थात डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातील एक खुबी अशीही होती की, “माझं डॉक्टरांशी अतिशय जवळचं नातं होतं.” अशी आमच्यासारखी भावना असणारे अनेक कार्यकर्तेसंघटनेत आहेत. किंबहुना कमी अधिक प्रमाणात प्रत्येक कार्यकर्त्याला तसे वाटत असावे.
कोणत्याही शासकीय/अशासकीय, देशी-परदेशी अनुदानाशिवाय, देव, धर्म-श्रद्धा या अत्यंत संवेदनशील विषयात पूर्णवेळ कार्यकर्त्याची फार मोठी फळी सोबत नसतांना एखादी संघटना उभी करणं, 25 वर्षं सातत्याने वृद्धिंगत ठेवणं, यामागे किती कठोर आणि सातत्यशील प्रयत्न लागतात; हे कोणीही समजू शकेल.
संघटनेचे सुरवातीचे दिवस हे संघटनेचा विचार, भूमिका महाराष्ट्रभर पोहोचविण्यात गेले. बोटावर मोजता येतील एवढ्याच शाखा, मग संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टरांनी सातत्याने दौरे केले. कार्यकर्ते हेरले, कार्यकर्त्यांच्या क्षमता-कौशल्यांना वाव दिला, त्यांच्या आवडीच्या कामात त्यांना प्रोत्साहन दिले. आणि मग केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक इतिहासात ठळकपणे नोंद व्हावी अशी एक जनचळवळ उभी केली. चमत्कार आणि बुवाबाजीला विरोध येथून सुरू झालेला प्रवास पुढे वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मचिकित्सा, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि मानवतावाद असा व्यापक झाला. अलींळेप ुळींर्हेीीं हिळश्रेीेहिू ळी ाशरपळपसश्रशीी रपव हिळश्रेीेहिू ुळींर्हेीीं रलींळेप ळी ळपलेाश्रिशींश असे म्हटले जाते. म्हणून संघटनेची ओळख डॉक्टरांनी कृती करणारी वैचारिक चळवळ अशी निर्माण केली.
स्वाभाविकपणे चळवळीवर, पर्यायाने कार्यकर्त्यावर डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वाचा खोल प्रभाव आहे. डॉक्टरांचं वागणं, बोलणं, राहणं खरं तर संपूर्ण जगणंच झिरपत झिरपत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं आहे. डॉक्टरांकडे बघत बघत कार्यकर्तेघडत गेले. डॉक्टरांच्या काही गुणवैशिष्ट्यांचा यानिमित्ताने विचार करणे योग्य ठरेल.
डॉक्टरांची राहणी अगदी साधी होती. खादी वापरण्याबाबत त्यांचा कटाक्ष होता. खादी मला येथील श्रमिकांशी जोडते अशी त्यांची भूमिका होती. डॉक्टरांचा साधेपणा ही त्यांच्या ध्येयवादी जीवनातून आलेली सहजता होती. त्याचा दुरान्वयेदेखील प्रदर्शनी वृत्तीचा गंध नव्हता, त्यात साधेपणा होता आणि म्हणून सौंदर्य होते. व्यक्तिगत जीवनात डॉक्टर अत्यंत काटकसरी होते. हीच काटकसर संघटना चालविताना त्यांनी ठेवली. बसचा प्रवास तर अखेरपर्यंत त्यांनी केला. प्रवास सुकर व्हावा म्हणून आप्पासाहेब सा.रे.पाटलांनी त्यांना कार दिली. जेव्हा कार घेऊन जाणे परवडणारे नसेल तेव्हा बस किंवा रेल्वेनेच डॉक्टरांनी प्रवास केला.
कार्यकर्त्यांना त्यांच्यात एका पालकाचं दर्शन घडायचं. कार्यकर्ता जेवला का? झोपणार कुठे? प्रवास कसा करणार आहात? अशा आस्थेवाईकपणे चौकशा डॉक्टर नेहमी करायचे. डॉक्टर कार्यकर्त्यांची किती काळजी घ्यायचे, याचा जेव्हा विचार करतो, तेव्हा काही घटनांची आठवण होते, आम्ही खानदेशातील कार्यकर्तेशनिशिंगणापूरच्या सत्याग्रहासाठी चाळीसगावहून रेल्वेने नगरला जायला निघालो. 7-8 कार्यकर्तेहोतो आम्ही. नगर स्टेशनला रात्री अडीच वाजता पोचलो. तेव्हा पोलिसांच्या फौजफाट्यासह डॉक्टर स्वत:च आम्हाला घ्यायला प्लॅटफॉर्मवर हजर होते. एखाद्या मोठ्या व्ही.आय.पी.ला असावे, अशा संरक्षणात आम्ही डॉक्टरांसोबत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आपल्या अवतीभोवती मशीनगनधारी पोलीस आपले संरक्षण करतात याचा अनुभव आम्हाला सुखावणारा होता, पण त्या सर्व व्यवस्थेमागे डॉक्टरांची काळजी होती. दुसरी घटना नगरमध्ये असतानांच घडलेली. नरेंद्र महाराजाच्या गुंडांनी पुण्याच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली व डांबून ठेवले. हा फोनही डॉक्टरांना रात्री उशीराच आला, डॉक्टर तेव्हाही रात्रभर फोनाफोनी करीत होते, कार्यकर्त्यांच्या काळजीने चिंतीत झाले होते, रात्रभर झोपले नव्हते. तेव्हा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्ताने आम्ही त्यांच्यासोबत होतो. अनेक कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत जीवनात डॉक्टरांनी मदत केली. पण त्याची त्यांनी कधी वाच्यता केली नाही. कार्यकर्तेकौटुंबिक अडचणीपासून तर नोकरीविषयक, व्यावसायिक सर्वच अडचणींपर्यंत सर्वच डॉक्टरांशी शेअर करत. डॉक्टर एक समुपदेशक होते, मार्गदर्शक होते.
हल्ली मोबाईलमुळे, ईमेलमुळे संपर्क करणे फार सोपे झाले आहे. पूर्वी पत्र हेच संघटनेचे पत्रव्यवहाराचे मुख्य साधन होते. फोनही बहुसंख्य कार्यकर्त्यांकडे नसायचा. अत्यंत व्यग्र अशा आपल्या वेळापत्रकात डॉक्टर कार्यकर्त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचे. आजही अनेक कार्यकर्त्यांकडे ती पत्रे जरूर सापडतील. ती पत्रे म्हणजे केवळ तांत्रिक संवाद नव्हता, तर ती प्रेरणादायी असायची. ‘तुझ्यासारखे समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते, हीच खरी संघटनेची ताकद आहे.’ असं एक वाक्य त्यात असायचं. मग हेच वाक्य पुढे वर्षभरासाठी तरी त्या कार्यकर्त्यासाठी उर्जेचं इंजेक्शन असायचं. प्रोत्साहन, प्रेरणेसाठी डॉक्टरांनी कोणतीच संधी दवडली नाही. मान्यवरांजवळ कार्यकर्त्याचा परिचय करून देणं, कार्यकर्त्याने केलेल्या कामाचं कौतुक करणं, अमेरिकेत गेल्यावर तेथून कार्यकर्त्याला फोन करणं, अशा अनेक गोष्टी डॉक्टरांनी जाणीवपूर्वक केल्या.
कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची स्वतंत्र यंत्रणा आपण अजून उभी करू शकलो नाहीत, यावरून डॉक्टर अस्वस्थ व्हायचे. प्रवास कमी करून सातार्याला एक चांगलं प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. (आता हे केंद्र सुरू झालंय) पण कार्यकर्त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकासाची, विवेकी विचारपद्धतीची काही शिबीरे डॉक्टरांनी संयोजित केली. पण कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत अनेकवेळा राज्य परिषदा, मेळावे याच्या निमित्ताने जे विविध मान्यवर वक्ते येत, आपले विचार मांडीत, त्या भाषणांचा वाटाही मोठा आहे. त्यातून कार्यकर्त्यांच्या वैचारिक भरणपोषणाला मदत झाली. एवढी सर्व मान्यवर मंडळी एकाचवेळी उपलब्ध करणं, हेही डॉक्टरांचं कौशल्य होतं. वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे लेखक, विचारवंत, कार्यकर्ते, नेते, राजकीय पुढारी, अभिनेते-अभिनेत्री एकाचवेळी विचारपीठावर बघून डॉक्टरांच्या ताकदीचा अंदाज यायचा. त्या सर्व मान्यवरांच्या बोलण्यातून एक गोष्ट ठळकपणे जाणवायची, डॉक्टरांच्या नेतृत्वाकडे व संघटनेकडे ते मोठ्या आशेने व अपेक्षेने बघायचे. पुरोगामी चळवळींची पिछेहाट होते की काय? अशी परिस्थिती बाहेर आहे, पण अंनिसच्या परिषदेला आल्यावर, तरूण चेहरे पाहिल्यावर त्यांचा आनंद बघण्यासारखा असायचा. पण हे सर्व सहजपणाने घडलेलं नव्हतं. त्यामागे डॉक्टरांची चिकाटी व प्रतिभा होती.

डॉक्टरांना अनेक क्षेत्रे खुणावत होती, अनेक व्यासपीठांवर त्यांनी यावं अशी संबंधितांची अपेक्षा असायची. पण डॉक्टरांनी स्वत:ला त्या सर्व मोहांपासून दूर ठेवले. संघटनेचा प्राधान्यक्रम त्यांनी बदलू दिला नाही. 98 सालच्या सुमारास त्यांनी साधना साप्ताहिकाचं संपादकपद स्वीकारलं. तेव्हा आम्हा अनेकांच्या मनात संमिश्र भावना होत्या. एका बाजूला पुरोगामी विचारांना वाहिलेलं, ऐतिहासिक परंपरा असलेलं व अनेक थोर लोकांनी संपादकपद भुषविलेल्या साप्ताहिकाचे संपादक डॉक्टर झाले होते, त्याचा आनंद आणि संघटनेचा वेळ आता साधनासाठी वापरला जाणार, मग इकडील कामाचं काय? अशी एक शंका मनात ठेवत कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं. पण ज्या कौशल्याने डॉक्टरांनी दोन्ही जबाबदार्या सांभाळल्या, त्याला तोड नाही, दोन्ही जबाबदार्या एकमेकांना पूरक होतील अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली, आणि त्यातही दोघांचं वेगळेपण शाबूत ठेवलं.
अचूक वेळ पाळणं, नियमित व्यायाम करत स्वत:ला फीट ठेवणं, कोणत्याही गोष्टीचे अचूक टायमिंग साधणं, असे काही गुण डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारे होते. त्यांना रेल्वेच्या कंपार्टमेंटमध्येही व्यायाम करतांना आम्ही पाहिलंय. “कार्यकर्त्याला आजारी पडण्याचा अधिकार नाही, कार्यकर्त्याने आजारी पडणे हा सामाजिक गुन्हा आहे” असे डॉक्टर आजारी पडलेल्या कार्यकर्त्याला बजावित, समाजात अंधश्रद्धेशी संबंधित एखादी ठळक घटना घडली की, डॉक्टरांचा त्यावरील लेख तयार आणि तो प्रमुख दैनिकात छापूनही येत असे. याला डॉक्टर ‘चळवळ’ म्हणायचे. आपल्यासंबंधी समाजात काहीही घटना घडली की, त्याची कृतीशील दखल घ्यावी असे डॉक्टर सांगत असत.
एका वैचारिक चळवळीचे डॉक्टर नेते होते. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात अनावश्यक गंभीरता नसायची. नेहमी हसत, खेळत, गप्पा करत, डॉक्टरांचा स्वभाव नर्मविनोदी व मिश्किल होता. याबाबतची एक आठवण सांगाविशी वाटते. वर्धा येथे राज्यकार्यकारिणीची बैठक होती. त्याआधी नुकतेच जादूटोणाविरोधी कायद्यासाठी डॉक्टरांनी 11 दिवस उपोषण केलं होतं. एवढे मोठे उपोषण करूनही कायदा झाला नव्हता. त्यानंतर अनेकांशी डॉक्टरांची प्रथम भेट होती. कार्यकर्तेबैठकीच्या हॉलमध्ये येऊन बसले होते. डॉक्टरांना उपोषणानंतर पहिल्यांदा ऐकणार होते. डॉक्टरांचे आगमन झाले, सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांकडे, डॉक्टरांनी त्या प्रश्नांकित, चिंतातूर नजरा ओळखल्या. ते म्हणाले, “काही चिंता करू नका, माझी तब्येत उत्तम आहे. मी अमेरिकेत राहिलो, तेथे भरपूर खाऊन जे वाढलं, ते येथे आल्यावर उपोेषण करून कमी केलं, बस एवढंच.” या वाक्यानंतर बैठकीत एकदमच हशा पिकला. (डॉक्टरांना अमेरिकास्थित महाराष्ट्र फाऊंडेशनचा दशकातला उत्तम कार्यकर्ता हा 10 लाखाचा पुरस्कार मिळाला होता, त्या निमित्ताने ते काही दिवस अमेरिकेला होते.) वातावरणातील ताण एकदम कमी झाला डॉक्टरांनी नंतर सविस्तर भूमिका विषद केली.
डॉक्टरांनी संघटनेचे चैतन्य सातत्याने जिवंत ठेवले. पुरोगामीत्वाचा दावा करणार्या अनेक चळवळी आपण पाहतो, अनेकदा त्या विशिष्ट जाती समुहाच्या होतात तर काही राजकीय पक्षाच्या विंग म्हणून काम करतात; पण अंनिसला असा शिक्का कोणी मारू शकले नाही. बामणी नेतृत्व म्हणून काहींनी चळवळीला फोडण्याचेही प्रयत्न केलेत. पण अशा सर्व आघातांना संघटनेने सहजपणे टोलवून लावले. डॉक्टरांवरही काही आरोप करण्यात आले पण डॉक्टर कधीच स्पष्टीकरणाच्या भानगडीत पडले नाहीत. आपले काम प्रामाणिकपणे करीत राहा हाच त्यांचा मंत्र होता. चळवळीलाही कालसुसंगत ठेवण्यात यशस्वी झाले.
संघटनेतील नेतृत्वाचे हस्तांतरण ही देखील डॉक्टरांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाची प्रचिती देणारी घटना होती. अविनाश पाटील यांच्याकडे डॉक्टरांनी चळवळीचे नेतृत्व सोपविले. नेतृत्वाच्या स्पर्धेमुळे किंवा वर्षानुवर्षेनेतृत्वाने खुर्चीला चिकटून राहिल्याने अन्य संस्था संघटनात काय होते हे आपणास माहीत आहे. पण नेतृत्वाचे हस्तांतरण हा विषय संघटनेत वादाचा, अविश्वासाचा न होता. तो संघटनेला पुढे नेणारा, समृद्ध करणारा ठरला. याहीबाबतीत डॉक्टरांनी सर्वांनाच जिंकलं होतं.
डॉक्टरांनी आमच्याशी बोलताना संघटनेच्या सुवर्णमहोत्सवाचं स्वप्न रंगवलं होतं आणि आपल्या नेहमीच्याच शैलीत म्हणाले होते की, तुम्ही सर्व समर्थपणे संघटना सांभाळत असणार तेव्हा मी फक्त नव्वदी पार केली असेल. नव्वदी पार केलेले डॉक्टर बघण्याचा आनंद आता मिळणे नाही, पण समर्थपणे संघटना सांभाळण्याचं त्यांचं स्वप्न मात्र नक्कीच पूर्ण होणार यात शंका नाही.
गेल्या वर्षभरातील वाटचालीवर एक नजर टाकली की, लक्षात येतं. सातार्याच्या अभिवादन मेळाव्यापासून सुरू असलेली चळवळीची क्रियाशीलता तसूभरही कमी झालेली नाही. जादूटोणा विरोधी कायद्याची लढाई, जातपंचायतीला मूठमाती अभियान, दाखल गुन्ह्यांचा पाठपुरावा, खुनाच्या तपासाचा पाठपुरावा, जादूटोणाविरोधी कायद्याची जनसंवाद यात्रा, ऑनरकिलींग व दलित अत्याचार विरोधी नगरची परिषद, अंनिस लोक रंगमंच असं सर्व जोशात सुरू आहे. डॉक्टरांच्या खुनाने अनेक आघाड्यांना जन्म दिला आहे. देशभरच काय परदेशातही संघटना पोहोचलीय.
डॉक्टरांच्या जाण्याने आम्ही काय काय गमावलंय? एक तळमळीचा-शिस्तीचा कार्यकर्ता, सजग नेता. एक प्रभावी वक्ता, एक कुशल संघटक, एक विचारवंत, सुजाणपालक, एक ऊर्जास्त्रोत, उत्तम मांडणी करणारा प्रवक्ता, सच्चा मित्र, एक मार्गदर्शक, उत्तम लेखक, सृजनशील, प्रतिभावंत एवढी गुणवैशिष्ट्ये असणारा आणि तरीही अगदी साधा प्रेमळ माणूस आम्ही गमावलाय.
हे सारं कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. याची जाणीव आहे. पण कठोर वास्तव धैर्याने स्वीकारत उभे राहणंही तितकंच आवश्यक आहे, आणि गेल्या वर्षभराच्या वाटचालीतून संघटना उभी राहिलीय. एक व्यक्ती डॉक्टरांना पर्याय होऊ शकत नाही, पण प्रयत्नपूर्वक एका गटाची, समुहाची बांधणी केली की, निश्चितपणे काही घडविता येईल असा विश्वासही या वर्षानं दिलाय. डॉक्टरांनी केलेली पेरणी आता कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने जोमाने वर आलेली आहे. एक वेदना आणि निर्धार घेऊन संघटना कृतिशील आहे.
–परेश शाह, विनायक सावळे