Categories
विशेष

अक्षय उर्जेचा स्त्रोत

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

स्थळ – पिंपरी चिंचवड प्राधिकरण, दिवस – 4 जून 2004, वेळ रात्रीचे अकरा-साडे अकरा.

या दिवशी याच वेळी मी आणि माझे साथी सहकारी रवींद्र बोर्लीकर एका अति भयानक अशा प्रसंगाला सामोरे गेलो. आज या घटनेला दहा वर्षे उलटून गेली. पण आजही आठवते ती काळरात्र….

6 जून 2004 रोजी आमच्या भागात वाल्हेकरवाडी येथे स्वत: धर्मराज म्हणून घेणार्‍या नरेंद्र महाराजाचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्याच्या संदर्भात पिंपरी चिंचवड शखेतर्फे जनजागृती करणारी भीत्तीपत्रके लावायचे ठरले होते. मी त्यावेळेस शाखेचा कार्याध्यक्ष होतो. भीत्तीपत्रके लावण्यासाठी मी आणि बोर्लीकर जेवण करून बाहेर पडलो. निगडीतील एका चौकात पत्रके लावत असताना नरेंद्र महाराजांचे भक्त-अनुयायी म्हणवणार्‍या सहा-सात जणांनी आम्हा दोघांना घेरले. कॉलरला धरून जबरदस्तीने मोटर सायकलवर बसवून वाल्हेकरवाडीला नेले. तेथील एका दुकानात नेले. नंतर दुकानाचे शटर बंद करून आमच्या अंगावरील कपडे काढून पहाटे तीन-साडेतीन पर्यंत जबरदस्त मारहाण केली. मोठ्या कात्रीची पाती, किती तरी वेळा गळ्याजवळ आणून ‘मारू का’ म्हणून धमकावलेही. तोंडाने गलिच्छ शिव्यांचा भडिमारही चालू होता. त्यानंतर आम्ही कसे सुटलो ती एक मोठी कथा आहे.

त्याचवेळी समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक अहमदनगरला चालू होती. तसं बघितलं तर मी समितीत नवीनच होतो. नरेंद्र महाराजांच्या माणसांनी आम्हाला पळवून नेले असे समजल्यावर माझ्या पत्नीने रात्री साडेबारा-एक ला डॉक्टर दाभोलकरांना फोन लावून घडलेला प्रकार सांगितला. एवढ्या रात्री डॉक्टरांनी गृहमंत्री, पोलीस कमिशनर यांना फोन लावून तपासाची विनंती केली. रात्रभर डॉक्टर सर्वांशी संपर्क साधत होते. सतत माहिती घेत होते.

कार्यकारिणीची बैठक संपल्यावर दुसर्‍या दिवशी डॉक्टर तडक अहमदनगरहून आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी आहे. अत्यंत आपुलकीने चौकशी करून घरातल्यांना धीर दिला. त्यांच्याशी संवाद साधला. त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना घटनेची इत्यंभूत माहिती दिली. निषेध सभाही घेण्यात आल्या.

डॉक्टरांनी आपल्या साथी कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम केले. डॉक्टर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असा आश्वस्त विश्वास कायमच कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण करण्यात डॉक्टर कमालीचे यशस्वी ठरले. त्यामुळे कार्यकर्ते निर्धास्त असत. केवळ समितीच्या कामासंदर्भातच नाही. तर कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत जीवनात घडणार्‍या चांगल्या-वाईट घटनांविषयीची ही पूर्ण माहिती डॉक्टरांना असे. कार्यकर्ता लहान मोठा असा कधीही त्यांनी भेदभाव केलेला मला आढळा नाही. डॉक्टरांची शाबासकीची थाप पाठीवर पडली की, कार्यकर्त्यंना भरून पावल्यासारखे वाटत असे.

कठीण प्रसंगातही डॉक्टर कधीच विचलित होत नसत. महाराष्ट्रात किती तरी कार्यकर्त्यांवर कठीण प्रसंग आले. कोणाच्या घरावर दगडफेक झाली, तर चारपाचशेच्या जमावाने कार्यकर्त्यांना घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. नक्षलवादाचे आरोप झाले. सभा उधळल्या गेल्या. स्वत: डॉक्टरांवर हल्ले झाले. परदेशातून पैसा मिळतो असा आरोपही केला गेला. न्यायालयात त्यांच्यावर खटलेही दाखल केले गेले. पण डॉक्टर कधीच या गोष्टींमुळे डगमगले नाही की, घाबरले नाही. कायम आश्वासक राहिले.

किती तरी वेळा मी साधनामध्ये डॉक्टरांना भेटावयास जात असे. वर नमूद केलेल्या घटनांचा, प्रसंगाचा ताण कधीच त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नसे. मी अनेक वेळा त्यांना विचारायचो पण डॉक्टरा हे सारे तुम्हाला जमते कसे? डॉक्टर फक्त हसण्यावारी माझे म्हणणे नेत असत.

डॉक्टर म्हणजे एक अक्षय उर्जेचा स्त्रोत आणि आशावादाचा अखंड वाहणारा झरा! अनेकदा मनात निराशा दाटून आली की, मी डॉक्टरांना फोन करीत असे. “डॉक्टर येऊ का हो दहा पंधरा मिनिटे भेटायला?” ते म्हणत, “या की!” मग त्यांच्याशी गप्पा मारल्या की, आमची बॅटरी परत रिचार्ज….

आज डॉक्टर गेल्यावर उरी ही खंत कायमच आहे. डॉक्टरांना मी काहीच देऊ शकलो नाही. पण डॉक्टरांनी मात्र भरभरून सकारात्मकता दिली. भविष्यात त्याच वाटेने चालण्याचा माझा अट्टाहास राहील.

अरविंद पाखले