Categories
पुस्तक परिचय

चकवा देणारा चंद्रप्रकाश

जून – २०१३

डॉ. अलका कुलकर्णी यांची साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेली कादंबरी ‘चकवा’ हा नवा अध्याय अधिक तन्मयतेने चितारते हा एक सुखद संकेत आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमधले एक धगधगते वास्तव कादंबरीच्या माध्यमातून धिटाईने मांडले जाणे क्रमप्राप्त होते. एका कथेची आवश्यकता आणि त्यासोबतचे विचारव्यूह मांडत असताना ही कादंबरी एकाच वेळी ज्या नाना विद्याशाखांना स्पर्श करते त्यात मुख्यत्वेकरून राजकारण, अर्थकारण, समाजकारण, मानवविज्ञान, पर्यावरण, संस्कृती, लोकमानस यासारख्या विषयांचा समावेश होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याची अद्भूत किमया यशस्वीपणे साध्य करणारी ही कादंबरी खरं तर 2010 साली मधुकर वर्तक संपादित ‘गंधाली’ या दीपावली विशेषांकातून प्रकाशित झाली. स्वतंत्रपणे आज ती साधना प्रकाशनाने प्रकाशित केल्यामुळे या प्रश्नावर विचार करणार्‍या मान्यवरांसाठी ही कादंबरी एक संदर्भ कोश ठरणार आहे.

            एकाच वेळी ही कादंबरी राजकारणाचे धागेदोरे आपल्या आर्थिक जीवनशैलीशी कसे समांतर चालणारे आहेत याचा विचार मांडते. इथे चित्रीत झालेले राजकारण पाड्यांवरले, गावातले, गल्लीतले जरी असले तरी ते एकूणच आपल्या जगण्याच्या आदिबंधाशी निगडित असे आहे. आपला राजा आपण निवडतो याची निरगाठ सोडवताना म्हणूनच तर कादंबरीची नायिका सेवलीबाई ठामपणे म्हणते, “आपण सरकार निवडतोच कुठं? आपण तर गुमान गावचा कारभारी सांगलं तथं फुली उमटवतोय नाय का?” या प्रश्नचिन्हातच आपल्या राजकीय व्यवस्थेचं उत्तर दडलेलं आहे.

            ‘चकवा’च्या माध्यमातून लेखिकेने आदिवासी संस्कृतीचं चित्रण केलं आहे ते कमालीचे मर्मस्पर्शी आहे. बाहेरगावच्या माणसांना आपल्या गावची कुठलीही खबरबात कळू द्यायची नाही हा गावचा अलिखित नियम. डाकीण कुणीही असू शकते. खरी डाकीण पाहिजे त्या माणसाचं रूप घेऊ शकते. अघोरी विद्या हे तिचं धन असतं. पाहिजे त्याला ती नजरेने मारू शकते. तिला मंत्र अवगत असतो. ती गावाला त्रास देत रहाते. कुणालाही, केव्हाही, कसंही खतम करायची शक्ती असते तिच्यात. जन्म देण्याबरोबरच जन्म हिरावून घेण्याचा अधिकारही असतो ना तिच्यात. ही माहिती भोवळ आणणारी आहे.

            या कादंबरीची नायिका सेवलीबाई तिचा नवरा एमता आणि तिची कन्या सोनिया यांच्या भावविश्वासोबत चालणार्‍या या कथेत एमताच्या निमित्ताने भगभगत्या जखमेची लेखिकेने घेतलेली नोंद खूपच भावगर्भ आणि मर्मस्पर्शी अशी आहे.

            एमताचं प्रेत सापडायला मुळी तीन दिवस लागले होते. कीडे, मुंग्या आणि गिधाडं यांनी आपापला वाटा शोधल्यानंतर कुणा माणसानंही आपला वाटा उचलला होता काय? याचं उत्तर कधीच मिळणार नाही. एमताच्या निधनानंतर हे वर्णन आपल्या काळजाला पीळ पाडणारे आहे. “पूर्ण रिती झालेली सेवली. एमताची बसायची जागा, त्याचं आवडतं ताट, त्याचं पागोटं टांगलेलं असे ती रिकामी खुंटी.” सृष्टीचं चक्र अव्याहतपणे चालतच राहणारं. चार दिवस सुखाचे तर चार दिवस दु:खाचे. हा तर सृष्टीचा नियम. दु:खानं ही माणसं हतबल होत होती. स्वत:ची सारी जबाबदारी झटकून कुण्या बिचार्‍या बायच्या माथी कलंक लावीत होती. माणसांच्या दुनियेतला हा धडधडीत अन्याय पाहून निंबही शहारले. पळसाची तांबडीलाल फुलं जणू लाल लाल जिभा काढून सोनियाला वाकुल्या दाखवत होती. पंचांच्या समोर त्यांच्या इभ्रतीसारखी उभी ठाकून ‘मले बोलायचं आहे’ असं ठासून सांगणारी आणि जीव तोडून ‘मी डाकीण नाही’ असं बजावणारी सेवली बाई या कादंबरीतून भेटते हे लेखिकेचे फार मोठे यश आहे. एखाद्या गुपितासारखी. निंबाखाली बसत सेवलीनं आकाशाकडे पाहिलं. स्वच्छ, निरभ्र आकाश तिला खुणावू लागलं, जणू तिला जगण्याचा अर्थ त्यात सापडणार होता. आकाशाकडे बघत-बघत तिला उमज आली. ती एकटी थोडीच होती?

            कांदबरीच्या थकवणार्‍या भावजगतात पराभूत सोनियाचे वर्णन वाचत असतानाच ज्यावेळी आपण अंतिम पर्वात प्रवेश करतो तेव्हा आपल्या मनाला एक स्वच्छ आकाशाचं दर्शन घडतं आणि मला वाटतं हेच लेखिकेचं बळ आहे. शाबूत बुद्धी असलेल्या सेवली बाईला वनवास संपण्याची आशा आहे. तिची सोनियाबाई तिला एका नव्या दुनियेत नेणार आहे. आयुष्यभर ज्या सेवलीला चंद्रप्रकाश चकवा देत राहिला तो तिच्या मनाला उजेडाच्या ओंजळीत नेचो. या उजेडाला मी सलाम करतो.

-प्राचार्य डॉ. विश्वास पाटील

पुस्तकाचे नाव : चकवा
लेखिका : डॉ. अलका कुलकर्णी
प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे
पत्ता : 431, शनिवार पेठ, पुणे - 30
किंमत : 100/- रूपये