सूर्य आणि चंद्राचा लपंडाव सूर्यग्रहणाच्या रूपाने आपणाला चांगलाच परिचीत झालेला आहे. त्याचा अनुभव वारंवार आपण प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने पाहून घेत असतो. तसाच काहीसा लपंडावाचा प्रकार बुध आणि शुक्र हे दोन ग्रह सूर्याबरोबर खेळत असतात. अर्थात हा लपंडाव दुर्मिळ असतो आणि तो पाहण्याची संधी दवडून चालणार नाही. सध्या सायंकाळच्या वेळेस पश्चिम क्षितीजावर अत्यंत ठळक चांदणीच्या रूपात लक्ष वेधून घेणारा आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र दि.6 जून 2012 रोजी सकाळी अवकाशात एक अनोखा नजराणा पाहण्याची संधी आपणाला देणार आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 40 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत जवळपास सात तासापर्यंत सूर्य, शुक्र आणि पृथ्वी यांच्यामद्ये हे नाट्य अधिक्रमणाच्या रूपाने रंगणार आहे. संपूर्ण भारतातून दिवसा उजेडी आकाशात दिसणारे हे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी यानिमित्ताने आपणाला मिळणार आहे.
बुध आणि शुक्र हे पृथ्वीच्या आतील ग्रह असल्याने त्यांना अंर्तग्रह म्हणतात. सूर्याभोवती फिरत असताना जर सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये बुध अथवा शुक्र हे ग्रह आले तर त्याला बुधाचं अथवा शुक्राचं अधिक्रमण म्हणतात. दि.6 जून 2012 रोजी शुक्र हा ग्रह सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येणार आहे. त्यामुळे याला शुक्राचं अधिक्रमण म्हणतात. शुक्र हा पृथ्वीपासून फार लांब आहे(सरासरी जवळपास 4.5 कोटी किलोमीटर) पृथ्वीवरून पाहताना शुक्राचा कोनिय व्यास 30 सेकंद आहे तर सूर्याचा कोनीय व्यास 32 मिनिटे आहे. त्यामुळे शुक्र सूर्याला कधीच झाकू शकत नाही. शुक्राचा एक काळा ठिपका सूर्याच्या बिंबावरून गेल्याचे जाणवते. हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच आहे.
दुर्बिणीच्या शोधानंतर शुक्राची आजपर्यंत फक्त सात अधिक्रमणे, सन 1631, 1639, 1761, 1769, 1874, 1882, 2004 अखेर झालेली आहेत. विसाव्या शतकात एकही अधिक्रमण झालेले नाही. 2012 नंतर डिसेंबर 2117 व डिसेंबर 2125 रोजी अधिक्रमण होणार आहेत. शुक्राची सूर्याभोवती फिरण्याची पातळी ही पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरणार्या पातळीबरोबर(आयनिकवृत्त) 3.5 अंशाचा कोन करते. त्यामुळे शुक्राचे अधिक्रमण होण्यासाठी दोन अटींची पूर्तता होणे गरजेचे असते.
1. शुक्र आपल्या भ्रमणकक्षेच्या उर्ध्व अथवा अध:संपात बिंदूपाशी असावा लागतो.
2. त्याचवेळी शुक्राची पृथ्वीबरोबर अंतर्युती होणे आवश्यक असते.
दि. 7 जून व 9 डिसेंबर या दिवशी पृथ्वी शुक्राच्या उर्ध्व आणि अध:संपात बिंदूपाशी येते. त्यामुळे जवळपास या दोन दिवशीच अधिक्रमण दिसते. शुक्राच्या उर्ध्व अथवा अध:संपात बिंदूपाशी पृथ्वीचा मार्ग 4 अंशांपेक्षा जास्त असेल तर अधिक्रमण होत नाही. गणिती माध्यमाद्वारे अधिक्रमणांची वारंवारता ठरवता येते. दर 8 वर्षांनी किंवा 152 वर्षांच्या कालावधीनंतर शुक्राची तीच तीच अधिक्रमणे पुन्हा पुन्हा दिसायला हवीत. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही. दोन अधिक्रमणामध्ये 8 वर्षांचा कालावधी आला तर 121.5 किंवा 105.5 वर्षांनी पुन्हा 8 वर्षांचा कालावधी येतो. पहिलं अधिकृत अधिक्रमण पाहण्याचा मान सन 1639 रोजी जेरेमीह होरॉक्स या इंग्रज खगोलतज्ज्ञाकडे जातो. त्याने सूर्य ते पृथ्वी अंतर अंदाजे वर्तवले(जवळपास 14 कोटी 85 लाख किलोमीटर). एडमंड हॅलेने 1677 च्या अधिक्रमणाचा अभ्यास करून असे अनुमान काढले की, सूर्य ते पृथ्वी अंतर आपणाला मोजता येईल व त्याने सूर्याचा कोनीय व्यास 45 मिनिटे एवढा मोजला. सूर्य ते पृथ्वी अंतरालाच एक खगोलीय एकक म्हणतात. आता रडार यंत्रणेवरून अंतर मोजणे सहज साध्य झालेलं आहे.
प्रत्येक वेळेस हे पाहून काय उपयोग असा प्रश्न बर्याच वेळेला खगोलीय घटनांच्या बाबतीत होतो. चंद्रावरचे खड्डे बघून मला काय फायदा? शनीची कडी बघून काय होणार आहे? सूर्यग्रहण पाहून मला काय फायदा? अधिक्रमण पाहून काय पैसे मिळणार आहेत काय? असले निरर्थक प्रश्न निर्माण करणार्याला तुझा समाजाला काय उपयोग? असे म्हणावेसे वाटते. मुलांना शालेय वयातच खगोलीय घटनांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर ते पुढेही प्रश्न विचारण्याच्या भानगडीमध्ये पडतच नाहीत. आणि मुलांची जिज्ञासा मारून टाकली जाते. माहिती जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळेच आज मानव विकासाच्या टप्प्यावर आलेला आहे हे दुर्लक्षून चालणार नाही.
सूर्यग्रहणासारखा पंचांगामध्ये अधिक्रमणाचा उल्लेख येत नाही. कारण हा उघड्या डोळ्यांनी दिसणारा अविष्कार नाही. त्यामुळे धार्मिक क्षेत्राने अधिकृतरित्या यामध्ये सध्या तरी कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही. कालांतराने ते येणार हे पण तितकंच खरं. पंचांगामध्ये वैज्ञानिक माहिती असते अशी दर्पोक्ती करणार्या तथाकथितांनी याची दखल घ्यावी. अर्थात पंचांगातील वैज्ञानिक माहिती ही काही दाते, साळगावकर, रूईकर यांची नसते तर ती भारतीय सौर कॅलेंडर या वैज्ञानिकांनी निर्माण केलेल्या दिनदर्शिकेतून घेतलेली असते. अशा माहितीचा फक्त पंचांगवाल्यांना गैरवापर करायचा असतो म्हणून ते ती घेतात एवढंच….
पूर्व आशिया आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातून सुरवातीपासून शेवटपर्यंत अधिक्रमण पाहता येईल तर उत्तर व मध्य अमेरिका आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेतून अधिक्रमण सुरू असतानाचे दृश्य फक्त सूर्य मावळतानाच दिसणार आहे. युरोप, पश्चिम व मध्य आशिया, पूर्व आफ्रिका व पश्चिम ऑस्ट्रेलियातील लोकांना सूर्य उगवाताना फक्त अधिक्रमण सुटतानाचा लाभ घेता येणार आहे. भारतामध्ये मात्र शुक्राचं अधिक्रमण सुरवातीपासून सुटेपर्यंत अनुभवता येईल. फक्त सुर्योदयापूर्वीचा काही काळ अधिक्रमणाचा लाभ घेता येणार नाही. प्रत्येक ठिकाणच्या अक्षांशामुळे 2 ते 3 मिनिटांचा फरक वेळेमध्ये पडण्याची शक्यता आहे.

शुक्राचा सूर्याला प्रथम स्पर्श पहाटे 3 वाजून 40 मिनिटे द्वितीय स्पर्श पहाटे 3 वाजून 58 मिनिटे शुक्र सूर्याच्या बरोबर मध्यभागी येणे सकाळी 7 वाजता तृतीय स्पर्श सकाळी 10 वाजून 2 मिनिटे चतुर्थ स्पर्श सकाळी 10 वाजून 30 मिनिटे
शुक्राचं अधिक्रमण पाहताना घ्यावयाची काळजी
सूर्याकडे कधीही उघड्या डोळ्याने पाहू नये. कारण सूर्याकडून येणारे किरण अतिशय तीव्र असतात व सदर किरणामध्ये हानीकारक असणारे अतिनील किरण असतात. ग्रहण अथवा अधिक्रमणाच्या वेळेस आपण जाणिवपूर्वक सूर्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सदर किरण डोळ्यावर पडले तर डोळा निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही काळजी घेऊन हा अविष्कार पाहणे योग्य ठरेल.
1.सूर्याची प्रतिमा आरशाच्या साहाय्याने भिंतीवर पाडून अधिक्रमण पाहणे उत्तम.
2. एक चौकोनी पुठ्याचा बॉक्स करणे व त्याच्या वरील व खालील बाजूस छोटे छिद्र पाडले की, पीन होल कॅमेरा तयार होतो. त्याच्या साहाय्याने प्रतिमा भिंतीवर पाडता येते.
3. शास्त्रीयदृष्ट्या तयार केलेल्या सौर चष्म्यातून पाहणे. चष्म्यातून एकसलगपणे न पाहता थांबून थांबून पाहणे. सौर चष्म्यामध्ये मायलर फिल्म वापरलेली असते. ती सूर्य किरणांची तीव्रता एक पटींनी कमी करते. त्यामुळे डोळ्यांचा धोका कमी होतो.
4. दुर्बिण अथवा द्विनेत्रीचा अजिबात उपयोग करू नये. डोळे निकामी होण्याची 100 टक्के शक्यता. सोलर फिल्टर वापरून पाहिलं तर चालेल.
5. दुधाळ काच, एक्स रे फिल्म, रंगीत फिल्म, कॅमेरा रोल यांचा पाहण्यासाठी अजिबात वापर करू नका.
–प्रा.डॉ.नितीन शिंदे