Categories
चार्वाक कट्टा

व्यंग आणि चित्रे

जून – २०१२

ज्योती : तुम्हा सगळ्यांना काय वाटतं? ते व्यंगचित्र पुस्तकात तसंच राहू द्यावे की काढून टाकावे? मला हो किंवा नाही हे उत्तर हवे. उगाच निरर्थक चर्चा नको.

आशिष : चर्चा न करताच निर्णय घेणे, मला पटत नाही. कारण अशा पद्धतीने निर्णय घ्यायचे झालेत तर संसद बंद करावी लागेल. आणि जो कुणी निवडून येईल त्याला पाच वर्षांसाठी राजा बनवून हवे तसे मोकाट सोडावे लागेल. बहुमत असले तरी चर्चेशिवाय मत व्यक्त करणे चूक आहे.

प्रतिक : तसेही ते मोकाट सुटलेले आहेतच. लोकांची प्रश्नाची चर्चा चालू असताना, विरोधी पक्षनेते आरत्या करत असतात.

शरयू : आणि दांभिकपणा तरी किती की, त्यांच्या मुखपत्रातून रोखठोक मत व्यक्त करणार की, हे काय चालले आहे?

प्रतिक : अगदी हल्लीच त्याच सदरामधून त्यांनी बुवा, बापू कसे बदमाष असतात वगैरे मते मांडली आहेत. पण विधानसभेत मात्र जादूटोणा विरोधी कायदा चर्चेला आला की, त्यांचेच नेते तास-तास विरोधी मुद्दे घोळवत बसतात.

कल्पेश : प्रतिक तू म्हणतोस ते बरोबर आहे पण चर्चा या विषयावर नाही त्यामुळे पुन्हा मुद्द्याकडे येऊ या.

शरयू : आशिष जे म्हणत होता की, चर्चेशिवाय आपली मते मांडायला नको ते बरोबर आहे असे मला वाटते. कारण एकदा का मत व्यक्त केले की, तेच कसे बरोबर? हे पटवून देण्यासाठी आपण जास्त धडपडायला लागतो आणि त्यात विरोधी मुद्द्याकडे कळत-नकळत दुर्लक्ष करायला लागतो.

प्रतिक : मला शरयूचे म्हणणे काही पटत नाही. कारण असा दृष्टिकोन ठेवला तर कोणतीही भूमिका ठामपणे घेताच येणार नाही. कारण मग चमत्कार घडूच शकत नाही ही भूमिका घेताच येणार नाही. किंवा उद्या एखाद्याला मानसिक आजार झाला तर तो भुताने झपाटल्याने झाला की, मेंदूच्या आजाराने झाला ही चर्चा करत बसायचे का?

आशिष : आपण कोणती भूमिका घ्यावी हे फक्त आपण ठरवत नसतो तर समाजाच्या मनोधारणेवरदेखील ते अवलंबून असते. आपली कितीही ठाम भूमिका असली तरी लोकांशी बोलताना त्यांना पटवून द्यावेच लागणार की, आपले म्हणणे का बरोबर आहे ते? म्हणजे चर्चा आलीच!! डॉक्टर आंबेडकरांचे व्यंगचित्र तसेच राहू द्यायचे की नाही ही चर्चा करायची गरज आहे.

शरयू : चर्चा करावी की न करावी यातच बराच वेळ गेला. कोर्टात खटला चालवावा की न चालवावा यासाठी खटला चालवण्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळे चर्चा करूच.

गौतम : मला वाटते प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. स्वत: आंबेडकरांना अशा पद्धतीने वाद व्हावा हे मान्य झाले नसते. व्यंगचित्र छापले जाणे हे कुणाही राजकीय नेत्याच्या कार्यकिर्दीतील नित्याची बाब आहे. त्यामुळे इतका गदारोळ कशाला? या एकाच मुद्द्यावर आपण ही चर्चा थांबवू शकतो.

कल्पेश : एक तर या व्यंगचित्राचा संदर्भ पुरेसा बोलका आहे. राज्यघटना लिहून पूर्ण व्हायला उशीर होत होता. त्यासंदर्भातील ही एक प्रतिक्रिया आहे. एवढेच त्याचे महत्व आहे. त्यामुळे ते छापण्यावरून झुंडशाही करावी हे समर्थनीय नाही.

ज्योती : पण घटना काही एकटे आंबेडकर लिहीत नव्हते. इतर ही या घटना समितीत होते मग फक्त आंबेडकरांनाच गोगलगाई वर बसलेले दाखवावे यात काही चूक वाटत नाही का? आणि माझ्या माहितीप्रमाणे भारताची राज्यघटना सर्वात जलद लिहून झालेली घटना आहे.

प्रतिक : तू पण वेडीच आहेस!! एक तर कार्टून काढले जाते तेव्हा त्यात अतिशयोक्ती असते आणि महत्वाचे म्हणजे टीका शेवटी प्रमुख माणसावरच केली जाणार.

कल्पेश : आणि पुन्हा संदर्भ महत्वाचा आहेच. आज आपल्याला माहीत आहे की, राज्यघटना अमूक काळात लिहून झाली पण जेव्हा ती लिहिली जात होती तेव्हाच्या मन:स्थितीचा विचार करायला हवा. स्वतंत्र होताना लोक उत्तेजित असणार आणि त्यातूनच “स्वातंत्र्य मिळाले पण अजून घटना तयार नाही” म्हणून लोक अधीर असणार. तीन वर्षांचा काळ आपण इतिहासाच्या संदर्भात बघतो तेव्हा छोटा वाटतो पण जेव्हा स्वत: अनुभवतो तेव्हा तो फारच मोठा वाटतो. याच भावनेचे प्रकटीकरण म्हणजे ते व्यंगचित्र आहे. हे देखील लक्षात घ्यायला हवे. उद्या जर अमेरिकेत अब्राहम लिंकनचे व्यंगचित्र छापले तर असा गदारोळ होणार नाही.

ज्योती : पण वर्तमानपत्रात व्यंगचित्र छापले जाणे वेगळे आणि ते पुस्तकात छापणे वेगळे नाही का? वर्तमानपत्रातील व्यंगचित्रे  ही संदर्भ ओसरला की, विसरली जातात. पुस्तकातील व्यंगचित्राबद्दल असे म्हणता येईल का?

गौतम : इतिहासाचे किंवा राज्यशास्त्राचे पुस्तक म्हणजे केवळ घटनांचे किंवा सिद्धांतांचे संग्रहालय नसावे तर त्या काळातील एकूण समाजजीवनाचे, त्यातील अंतर्विरोधाचे, क्रिया-प्रतिक्रियांचे, संघर्षांचे दर्शनही त्याद्वारे व्हायला हवे. व्यंगचित्र हे कमी जागेत स्पष्ट भूमिका मांडू शकणारे साधन आहे. एखाद्या काळातील एखाद्या घटनेवरच्या प्रतिक्रियांचे प्रतिबिंब त्यात पडलेले असू शकते, त्याचा मागोवा घेण्यासाठी ते अतिशय उपयोगी ठरू शकते. ते जिज्ञासू माणसांनी सूज्ञपणे वापरायचे साधन आहे.

आशिष : अमेरिकेत अब्राहम लिंकनचे व्यंगचित्र छापले तर असा गदारोळ होणार नाही. हे कबूल पण अब्राहम लिंकन हे कुणी एका समाजाच्या अस्मितेचे प्रतिक नाहीत. त्यामुळे तो संदर्भ इथे वापरता येणार नाही. भारतीय समाजातील एका घटकाला दुसर्‍या घटकाबद्दल विश्वास वाटत नाही. वाईट म्हणजे हा घटक आर्थिक नसून जात आणि धर्म आहे.

गौतम : आशिष म्हणतो ते मला पटले. व्यंगचित्रावरून झुंडशाही करावी हे मला मान्य नाहीच. एका बाजूला बाबासाहेबांच्या विचाराने चालायचे म्हटले तर व्यंगचित्रावरून वाद घालणे मला पटत नाही. पण कुठेतरी मनात खटकते देखील. ते का खटकते याचे उत्तर मला आशिषने मांडलेल्या मुद्द्यातून मला मिळाले. भारतासारख्या देशात विषमतेमुळे प्रश्नाचे स्वरूपच बिघडते. म्हणजे त्या व्यंगचित्राचा आस्वाद मी घ्यायचा म्हटला तरी मला घेता येत नाही. कारण कदाचित माझ्याशेजारी बसणारा मुलगा, माझा अपमान करण्याच्या हेतूने त्या चित्राचा वापर करू शकतो. सारखा कुणी अपमान करत असेल तर मात्र त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये मग आपण तो हेतू शोधायला लागतो. शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असणार्‍या आजच्या दलित पिढीला कदाचित शोषणाचा सामना करावा लागत नसेल पण वेळोवेळी असे अपमान सहन करावे लागतात.

आशिष : पण आज झुंडशाही केल्याशिवाय कुणी लक्ष देतो का? तुम्ही धरणे धरता, निवेदने देता ते कुणी विचारात घेतात का?

कल्पेश : पण तरीदेखील मला असेच वाटते की, दूरचा विचार करता व्यंगचित्र हटवण्याची भूमिका चुकीची वाटते.

आशिष : पण दूरचा विचार करायचा मक्ता फक्त दलित समाजाने घ्यावा काय?

कल्पेश : या निमित्ताने समाजाच्या मनोवृत्तीवर जो परिणाम होतो तो महत्वाचा आहे. एकदा का झुंडशाहीनेच प्रश्न सोडवायचे म्हटले की, मग हळूहळू जो ताकदवान आहे त्याचेच म्हणणे खरे मानावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आंबेडकरांचे व्यंगचित्र काढून टाकायला मदत करतो या भूमिकेमागे उद्या तुम्ही आमच्या तथाकथीत महामानवावर टीका करायची नाही अशी छुपी अट असू शकते. तुम्ही जातीने ब्राह्मण आहात मग आमच्यावर टीका करायची नाही असे म्हटले तर उद्या हुसेन हा मुस्लीम आहे तो आमच्या देवतांची नग्न चित्रे काढतोच कशी? त्याने हा देश सोडावा. नाही सोडला तर त्याच्यावर हल्ला करू, हा युक्तीवाद देखील मान्य करावा लागेल.

शरयू : कल्पेश आता जे बोलला ते पटते की, प्रत्येक प्रश्नासंदर्भात जर अशा पद्धतीने विचार करायला लागतो तर काहीच ठोस भूमिका घेता येणार नाही.

आशिष : मी पुरेसा सहमत नाही पण हा विषय कितीही चालू शकतो त्यामुळे वेळेचे भान ठेवावे याच कारणाने आपण चर्चा थांबवू या.

संजय सावरकर