Categories
पुस्तक परिचय

ही वाट तिथून जावी आणि साथ-संगत

एप्रिल - २०१२

ही वाट तिथून जावी – शंकर बळी

‘आदिवासी साहित्य गोडल’ या संस्थेने शंकर बळी यांच्या 52 कवितांचा ‘ही वाट तिथून जावी’ हा काव्यसंग्रह नागपूर येथे झालेल्या आदिवासी साहित्य-संमेलनात प्रकाशित केला. जीवन आनंददायी बनवण्यासाठी कष्टाचं गाणं गुणगुणणार्‍या आई-वडील व सर्वांना हे पुस्तक अर्पण केले आहे. ‘उलगुलान: आदिवासी संस्कृती आणि हक्कांसाठी’ या लेखसंग्रहानंतर अनेक प्रकाशनसंस्थांशी चर्चेच्या व्यर्थ फेर्‍या झाल्यानंतर हा काव्यसंग्रह प्रकाशात आला. शंकर बळी यांनी वय, काळ, आशय या विषयानुसार अविष्कार सादर केला आहे. प्रा.माधव सरकुंडे यांनी या कवितांचा अग्निफुलांना कुरवाळणारी कविता असा समर्पक उल्लेख केला आहे. शंकर बळी यांनी आदिवासींचे निर्मळ जीवन सादर करण्यासाठी ‘गेय’ परंपरेचा आधार घेतला आहे. आदिवासींच्या प्रश्नांसाठी जणू हा शब्द मोर्चा काढला आहे. ग्रामीण वातावरण हा या काव्यलेखनाचा आत्मा आहे. स्वत:ला नाव आणि गाव नाही अशी घोषणा करीत हा कवी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ही प्रेरणा घेऊन रस्त्याने अखंड चालतो आहे. ‘तू सुद्धा आदिवासी बनशील’, ‘एकलव्यसाठी’, ‘मुलाचा एक प्रश्न’, ‘उलगुलान होऊन ये’, ‘बाबा’, ‘तोच बुद्ध झाला’ या कविता जीवनवादी आहेत. ‘लेखणी’च्या साहाय्याने क्रांती करता येईल असा प्रखर आशावाद या कवितांमध्ये आहे. ही वाट नव्या प्रकाशाच्या शोधात आहे. आदिवासी व परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय योगदान देणार्‍या शंकर बळी यांना या कवितांनी जगण्याचं बळ दिलं आहे. हा कवितासंग्रह वाचणार्‍यांनाही हे जगण्याचं बळ देण्याची क्षमता या कविता-संग्रहात आहे.

साथ-संगत

            संतराम व शकुंतला कर्‍हाड अंबाजोगाई (जि.बीड) येथील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. संतराम दौलतराव कर्‍हाड व त्यांच्या पत्नी शकुंतला यांनी ‘साथ-संगत’ या कवितासंग्रहात आपले अनुभव विश्व शब्दबद्ध केले आहे. माजी विद्यार्थी संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असे अनेक व्याप सांभाळणार्‍या कर्‍हाड कुटुंबियांनी आपल्या काव्य लेखनात उत्कट प्रेमाचा झरा टिकवून ठेवला आहे. विरह, प्रेम, विश्वास, निष्ठा अशी प्रेमाची अनेक रूपे कवितेत अवतीर्ण झाली आहेत. ‘वेध’, ‘धिंड’, ‘आदर्श शिक्षक’ या कवितांतून त्यांनी समाज व्यवस्थेतील शोषण, दंभ, भ्रष्टाचार अधोरेखित केला आहे. मानवाच्या उत्कर्षाला प्रयत्नवादच उपयुक्त असा या कवितांचा  सकारात्मक सूर आहे. कर्‍हाड सरांच्या पत्नी सौ.शकुंतला यांची कौटुंबिक व सार्वजनिक जीवनातील प्रभावी साथ-संगत या कविता-संग्रहातही आहे. पूर्ण वेळ गृहिणी म्हणून वावरताना चळवळीत सक्रिय योगदान हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट्य आहे. कर्‍हाड सरांचा काव्यसंग्रह पूर्णत्वाला आणण्यासाठी सौ.शकुंतला कर्‍हाड यांनी ‘चिमणी पिलं’, ‘पत्र’, ‘गोजिरं’, ‘आई’ अशा अनेक कवितांची संगत केली आहे. परस्परांवर जीवापाड प्रेम करणार्‍या पती-पत्नीची ही साथसंगत अशाच प्रकारच्या साथीदारांना भावेल अशी खात्री आहे. अंबाजोगाई येथील सुवर्णभूमी प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सिद्धार्थ तरकसे व गणेश कदम या जोडगोळीने आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे.

संजय थोरात