Categories
चिंतन

धर्मसत्ता व राजसत्ता यांचे खरे स्वरूपनकलीच : विवेक हाच खरा पर्याय

मार्च - २०१२

            आजचे जग हे अतिशय तणावाचे जग आहे. त्याची चिंता वाढत आहे. दु:ख पीडा त्याला झोपू देत नाही. आणि याचे कारण मात्र त्याला कुठे सापडत नाही. मग हे जीवन तसेच पुढे ढकलण्यासाठी तुम्ही स्वप्ने बघू लागता. ती तुम्हाला क्षणिक सांत्वन देतात. सर्वसामान्य माणसाला स्वप्नाची गरज भासते. कारण हे जीवन वास्तवात अतिशय असमाधानी, विद्रुप आहे. स्वप्ने तुम्हाला वास्तव सुंदर आहे असे दर्शवितात, स्वप्ने तुम्हाला वेडे होण्यापासून वाचवतात. या स्वप्नाचा फायदा धर्मपुरोहित घेतात. ते तुमच्यापुढे धर्म उभा करतात.

            धर्म तुम्हाला दु:खपीडेतून सांत्वन देण्यासाठी थातूरमातूर कारणे देतो. तुमच्यासमोर मायावी दुनिया उभी करतो. ख्रिस्ती धर्म म्हणतो, तुमच्या दु:खपीडेला कारण तुमच्या आदिमातापित्याचे देवाज्ञा भंगाचे पाप आहे, हिंदू धर्म म्हणतो, तुमचे पूर्व जन्मातील कर्म तुमच्या दु:खपीडेला कारण आहे. बुद्ध धर्म म्हणतो, तुमच्या वासना तुमच्या दु:खाला कारणीभूत आहेत. मनुष्य म्हणतो, हे ठीक आहे. माझ्या दु:खपीडेला मी तर कारणीभूत नाही. कुणी दुसराच आहे. परमात्मासुद्धा माझ्या दु:खाला कारणीभूत नाही. माझे नशीबात सुख नाही. दु:ख हे मला क्रमप्राप्त आहे.

            सर्वच धर्म तुमच्या स्वप्नामुळे निर्मित झालेले तुमच्या सांत्वनाचे कल्पित मार्ग आहेत. ते तुमच्यापुढे तुमच्या दु:खपीडेची कारणे ठेवतात आणि तुमच्या सांत्वनासाठी स्वर्गसुखाची कल्पना तुमच्या माथी मारतात. तुम्हाला हास्याची, आनंदाची, अप्सरांची, दुधामधाच्या व मदिरेच्या नद्यांची स्वप्ने बघायला शिकवतात. अफूची गोळी देऊन तुम्हाला ते बेहोश करतात. तुमच्या वेदना थोडावेळ शमवतात.

            धर्म आणि धर्मगुरू माणसाला नकली सांत्वन देतात. धर्म व धर्मगुरू तुमच्या दु:खपीडेचा लाभ उठवतात. तुमच्यावर सत्ता चालविण्यासाठी त्यांचा ते उपयोग करतात.

            राजकारण्यांना धर्माची व धर्मगुरूंची गरज भासते. कारण सर्वात जास्त ते दु:खपीडेत व तणावात असतात. सत्यसाईबाबांच्या पायाशी त्यांना लोटांगण घालावेच लागते. त्या वेड्या अडॉल्फ हिटलरला सुद्धा धर्मगुरूच्या आशिर्वादाची गरज भासत होती. जर धर्मगुरू नसता तर अडॉल्फ हिटलरला आशिर्वाद कोणी दिला असता? जर्मनीतील ख्रिस्ती महाधर्मगुरूंने हिटलारला आशिर्वाद दिला. “तू युद्धात विजयी होशील.” चर्चिलला इंग्लंडमधील ख्रिस्ती महाधर्मगुरूने आशिर्वाद दिला, “तू जिंकशील.” खुद्द पोप महाशयांनी बेनिटो मुसोलिनीला आशिर्वाद दिला, “तुझा विजय निश्चित आहे.” आणि यात कुणाला विरोधाभास आढळला नाही. पोपमहाशयांनी मुसोलिनीला आशिर्वाद देण्याहून गत्यंतरच नव्हते. नाहीतर मुसोलिनीने त्यांना व्हॅटिकनमधून हद्दपार केले असते. आणि दुसरा कोणी जो मुसोलिनीला आशिर्वाद द्यायला तयार असेल त्याला त्या जागी बसवले असते. बेनिटो मुसोलिनी सत्तापिपासू हुकूमशहा होता पण तसे म्हणण्याचे धाडस पोपमहाशयांना झाले नाही. उलट त्यांनी म्हटले, “बेनिटो मुसोलिनी अतिशय प्रज्ञावंत व बुद्धिमान माणूस आहे. लोकशाहीचा पुरस्कर्ता आणि मानवतावादी पुरूष आहे.”

            आणि आश्चर्य असे की, बेनिटो मुसोलिनीला लोकांनी सत्तेवरून खेचून भर चौकात फाशी दिल्यानंतर तेच पोपमहाशय म्हणाले, “हा सत्तापिपासून हुकूमशहा महाभयंकर सैतान होता.”

            धर्म आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये असलेले ते सूत कसे कुणाच्या लक्षात येत नाही? राज्यकर्त्यांनी व धर्मांनी लोकांना मूर्ख बनवले आहे. धर्म परमात्म्याकडून राज्यकर्त्यांना सर्टिफिकेट मिळवून देतात. ही व्यक्ती राष्ट्रपती व्हायला पात्र आहे. ही व्यक्ती पंतप्रधान व्हायला योग्य आहे. अर्थातच राज्यकर्त्यांना अशा आशिवार्दाची धर्माकडून आवश्यकता असते. निवडणूक आली की, उमेदवार साधू संत महंताकडे पाया पडून आशिर्वाद मागायला जातात. याला कारण हे की, लोक धर्माचे ऐकतात. त्यांना वाटते, धर्म पक्षपाती नसतो. त्यांना राजकारणाशी काही कर्तव्य नसते. ते राजकारणापलिकडे असतात.

            पण खरी गोष्ट अशी की, धर्म व राजकारणी हातात हात घालून देशाचे राजकारण करतात. दोघेही लोकांना नकली सांत्वन देण्याचे काम करतात. धर्म लोकांना स्वर्गसुखाचे खोटे आश्वासन देतात तर राज्यकर्ते लोकांना संपन्न राष्ट्राचे खोटे आश्वासन देतात. धर्माकडे धार्मिक सत्ता असते तर राज्यकर्त्यांकडे राजकीय सत्ता असते. राज्यकर्ते धर्माला संरक्षण देतात तर धर्मकर्ते राज्यकर्त्यांना आशिर्वाद देतात.दोघेही जनसामान्यांची पिळवणूक करतात त्यांना लुबाडतात.

            धर्म तुम्हाला सुवर्ण जीवनाची स्वप्ने दाखवतो. मृत्यूनंतर स्वर्गीय नंदनवनाचे स्वप्न, पुनर्जन्माचे स्वप्न. तेव्हा या भौतिक जगातील जीवनाविषयी चिंता करायचे कारणच काय? ही एक छोटी गोष्ट आहे. काय फरक पडतो? लाखो करोडो अब्ज प्रकाशवर्षाच्या कालखंडात फक्त सत्तर वर्षाचे तुमचे वय. काय फरक पडणार आहे?

            म्हणूनच धर्म लोकांना सांगतो, “70 वर्षांची गणती करू नका. ही दु:खपीडा लवकरच निघून जाईल आणि तुम्ही जर संघर्ष न करता ही दु:खपीडा सहन कराल तर भावी जीवन मृत्यूपलिकडचे जीवन तुम्हाला सार्वकालिक सुख देईल.

            राज्यकर्ते दुसरे तुम्हाला वेगळे काय सांगतात? ते सुद्धा तुम्हाला भावी संपन्न राष्ट्राची स्वप्ने दाखवतात. आम्हाला निवडून द्या. तुमची महागाई नष्ट होईल, रस्त्यावरचे खड्डे बुजतील, गुंडशाही मिटून जाईल, देश भ्रष्टाचार मुक्त होईल, आतंक संपेल. सुवर्णयुग येईल.

            आज सर्व विकसित देशाकडे मोठ्या संख्येने अण्वस्त्र आहेत. इतकी अण्वस्त्र आहेत की, आजच्या घडीला सद्याच्या पृथ्वीइतक्या सात पृथ्वी ही अण्वस्त्रे नष्ट करू शकतात. याचा अर्थ हर एक मनुष्याला सात वेळा नष्ट करू शकतील इतकी अण्वस्त्रे उपलब्ध आहेत. एवढ्या अण्वस्त्रांची गरजच काय मुळी. एक धमाका पुरे आहे. पण राज्यकर्ते कुठलाही धोका देऊ इच्छित नाहीत. त्याचे चेहरे सर्व मुखवटाधारी असतात. ते बोलतात एक मात्र करतात वेगळे. अशा लोकांच्या हातात अण्वस्त्रे आहेत. कुणी सद्दाम हुसेन, कुणी ओसामा लादेन सारखा चक्रम राजकारणी पुनरूत्थित होऊन कळ दाबेल व अखिल मानवजात या भूमीवरून नष्ट करून शकेल.

            लक्षात असू द्या, वैयक्तिकपणे माणसाने फार मोठे गुन्हे केलेले नाहीत पण नेहमी जमावाने अतिशय महान गुन्हे केले आहेत. कारण जमावामध्ये वैयक्तिक जबाबदारीची जाणीव व्यक्तीला होत नाही. “जे घडते त्याला मी जबाबदार नाही. जमाव जबाबदार आहे” असे तो म्हणतो. त्याला वाटते की मी फक्त जमावात आहे. मी काही एक गुन्हा करीत नाही. पण वैयक्तिकपणे काही चुकीचे करायचे असेल तर तो दहावेळा विचार करेल. तू हे काय करतोस? हे बरोबर आहे काय? हे तुझ्या सद्सद्विवेकबुद्धीला धरून आहे काय? एक ना हजार प्रश्न निर्माण होतील पण जमावात तुम्ही हरवून जाता. तुम्ही त्या जमावाचे भाग होता हे कुणाला शोधून सापडणार नाही. केवळ धर्मगुरूच नव्हे, बुद्धिमान तत्वज्ञ देखील राजकारण्यांचे समर्थन करतात.

            जर्मनी हा सर्वात बुद्धिमान व उच्चशिक्षित देश आहे. या देशाने जगाला नोबेल प्राईझ विजेचे महान कवी, चित्रपती, वैज्ञानिक, तत्वज्ञानी दिले. हरएक क्षेत्रात जर्मनीचे योगदान असीमित आहे. थोर तत्त्वज्ञ हेगेल, फ्युअरबक, कान्ट, मार्कस्, फ्रॉईड, आईन्स्टाईन यांचा हा देश पण एखाद्याला असे आश्चर्य वाटेल की महान देश अडॉल्फ हिटलरच्या सत्तेखाली कसा आला? हिटलर तर ठार वेडा व चक्रम माणूस होता. पण काय घडले? मार्टिन हेडगर हा आधुनिक जगातील सर्वश्रेष्ठ असा तत्त्वज्ञ होता. त्याने अडॉल्फ हिटलरला पाठींबा दर्शविला. सर्व जग चकीत झाले.

            मार्टिन हेडगर हा अचाट बुद्धिमत्तेचा तत्त्वज्ञ होता. इतर तत्त्वज्ञ त्याच्या 100 मैल मागे होते. सात्र, मार्सेल, जाल्पर यापैकी कुणाशीदेखील त्याची तुलना होऊ शकत नव्हती. पण त्याने हिटलरला पाठींबा दर्शविला. परंतु जेव्हा जर्मनी युद्धात हरली तेव्हा हिटलरने आत्महत्या केली. आणि मग हेडगरचे डोळे उघडले. तो आपल्या स्वप्नातून जागा झाला आणि म्हणाला, “हिटलर हा केवळ वेडा होता. मी त्याला पाठींबा दिला हे तर त्याच्याहून वेडेपणाचे झाले.”

            हिटलरसारख्या राज्यकर्त्यांनी व धर्माने मनुष्याला जगण्यासाठी कल्पनाविलास दिला, जीवन सुसह्य करण्यासाठी कल्पित विश्व आणि कल्पित परमात्मा मनुष्यासमोर ठेवला परंतु आता हे सर्व तुटून आणि मोडून पडले आहे. कल्पित विश्व आणि कल्पित परमात्मा भंगून गेला आहे. आता सांत्वनासाठी पाहायचे तरी कुणाकडे म्हणून ही दु:खपीडा माणूस भोगीत आहे.

            परंतु ही सर्व परिस्थिती बदलता येऊ शकते. तुम्ही जुन्या पारंपारिक व धर्माने तुमच्या माथी मारलेल्या अंधश्रद्धा सोडून द्या, परमात्म्याला दूर सारा, स्वर्ग व नरक या कल्पना टाकून द्या, भावी जीवनातील प्रतिफळाचा विचार करू नका. तुम्हाला तुमच्या दु:खपीडेतून मुक्त करण्यासाठी कुणी तारणहार येणार आहे ही कल्पना मनातून साफ नाहीशी करा.

            तुमच्या दु:खपीडेला कुणी तरी जबाबदार आहे हा विचार सोडून द्या. कुणीतरी तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ सांगेल अशी खोटी आशा धरू नका. दु:खपीडा दूर करायची असेल तर स्वत: विवेकात शिरा, विज्ञानात शिरा आणि चिंतनात शिरा, ते तुम्हाला पीडामुक्त करतील. धर्म नव्हे.

फा. हिलरी फर्नांडीस, मुक्तीसागर प्रबोधन केंद्र उत्तन, पोष्ट नवघर, भाईंदर (पश्चिम) जि. ठाणे.