Rationalism ह्या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ आहे आपले विचार, मत, समजुती आणि आपली कृती, वर्तणूक ह्या गोष्टी धार्मिक श्रद्धा, धर्मग्रंथ, धर्मगुरू किंवा थोर व्यक्ती व भावना ह्यांच्या आधारे न स्वीकारता त्या reason च्या आधारावर स्वीकारण्याची सवय किंवा तत्व.
मानवामध्ये सत्य-असत्य, चांगले-वाईट, चूक-बरोबर, न्याय-अन्याय इत्यादीमध्ये भेद ओळखण्याची शक्ती आहे त्यास आपण reasonning power (तर्कशुद्ध विचार करण्याची शक्ती) म्हणतो. Rationalism चा अर्थ स्पष्ट करण्याचा सुलभ उपाय म्हणजे ठशरीेपच्या विरूद्ध कोणत्या गोष्टी आहेत ते पाहणे.
Reason चा पहिला विरोध आहे श्रद्धेला-धर्मश्रद्धेला-धर्मग्रंथांना जे सत्य असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. कोणतेही विधान सत्य आहे ह्याची खात्री त्या विधानाला कितपत वैज्ञानिक पुरावा आहे, हे करून करावी. ज्याच्या विरूद्ध पुरावा आहे ते विधान असत्य मानावे आणि त्याचा त्याग करावा. धार्मिक गोष्टींना (उदा.चमत्कार, मृत्यूनंतरचे जीवन किंवा पुनरागमन-जसे येशू ख्रिस्ताचे, पुनर्जन्म, प्रार्थनेचे सामर्थ्य इ.इ.) reason चा आधार मिळत नसल्याने अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. Reason चा दुसरा विरोध षशशश्रळपस किंवा भावना यांना आहे असे म्हटले जाते. मानवी जीवनात भावनांचे महत्व फार आहे हे reason नाकारीत नाही. ती फक्त एवढेच म्हणते, की भावना हे आचार-विचारांचे नियामक तत्त्व होऊ शकत नाही. भावनांना आपल्या विचारांचे-जीवनाचे स्वामित्व देणे योग्य नाही. क्रोध, भय, प्रेम इत्यादी भावनांना आवरणारी शक्ती म्हणजे reasoning power. केव्हा कोणत्या भावनेला वाव द्यायचा ह्याचा निर्णय reason ने घ्यावा. पेरियारच्या मतानुसार दयाळूपणा, इच्छा, प्रेम, वासना, मैत्री, लैंगिक आकर्षण, सेक्सची आवड-नावड इत्यादी गोष्टी व्यक्तीच्या खाजगी बाबी आहेत. ह्या गोष्टींबद्दल चर्चा करू नये किंवा त्या कुणी कुणावर लादू नयेत, किंवा त्याबद्दल तिसर्या व्यक्तीने काही ठरवू नये. प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार, वृत्तीनुसार व त्याला वाटणार्या समाधानानुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.
reason चा तिसरा विरोध आहे चुकीच्या वर्तणुकीला अयोग्य कृतीला. चोरी, हिंसा, खून, शोषण, अन्याय, अत्याचार, कर्मकांड-रूढी-परंपरा ह्या नुसार केलेली कर्मे इत्यादी गोष्टींना reason चा विरोध आहे. परंपरेने प्रस्थापित झालेली सांस्कृतिक मूल्ये rationalist ना स्वीकारणीय वाटत नाहीत. जी मूल्ये स्वीकारणीय वाटतात, ज्या नैतिक परिमाणाप्रमाणे ते जगतात व जी नैतिक परिमाणे (moral standards) दुसर्याच्या पसंतीस उतरताना ती reason वर आधारीत असली पाहिजेत. एखादी कृती चांगली की वाईट याचा निर्णय त्याचा अंतिम परिमाण विचारात घेऊन घेतला जावा. अशा कृतींचा मानवीय गरजा भागविण्यात कितपत सहभाग आहे किंवा सर्वसाधारण सुख (happiness) व आनंदी जीवनाची पातळी(well-being) वाढते आहे की नाही हे ठरवून निर्णय घेतला जावा. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त हित पाहून आपली कृती ठरवावी.
rationalism चे हे तत्व आज जे प्रस्थापित झाले आहे, त्यामागे बराचसा इतिहास आहे. आधुनिक विज्ञानाच्या जन्मानंतर(16 व 17 वे शतक) हळूहळू ही तत्वे प्रस्थापित झालेली आहेत. ही तत्वे प्रस्थापित होण्यामागे बर्याच तत्वज्ञांचा, सुधारकांचा व वैज्ञानिकांचा हिस्सा आहे. rationalism च्या विचारधारेचे दोन प्रमुख काळ इतिहासात होऊन गेले. 18 व्या शतकातला इंग्लंड आणि फ्रान्समधला काळ व 19 व्या शतकातील सुरवातीचा जर्मनमधील काळ. आधुनिक विज्ञानांच्या अभ्यासाला खरी सुरवात 16 व्या शतकात झाली; 17 व्या शतकात ती रूजली. याच काळात अनेक विचारवंत सत्य शोधण्याच्या पद्धतीचा विचार करू लागले. ख्रिश्चन धर्माचा पगडा युरोपमध्ये जबरदस्त होता. पारंपारिक ख्रिश्चन जग हे अविवेकी(irrational) आहे ह्या निष्कर्षापर्यंत काही विचारवंत आले. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी पूर्वीच्या आधारभूत ग्रंथांचा आश्रय घेतला जात असे. फ्रान्सिस बेकन(1561-1626) ह्याने वैज्ञानिक तपासणीतून ह्या आधारभूत मानल्या गेलेल्या ग्रंथांना वगळले व प्रयोगातून निष्कर्ष काढण्याची पद्धत शोधून काढली. रेने देकार्त(1596-1650) ह्या तत्ववेत्त्याने तत्वज्ञानात आधारभूत मानल्या गेलेल्या ग्रंथास वगळून reason ला महत्व दिले. त्या काळी बुद्धीवंतामध्ये सर्वसाधारण प्रवृत्ती अशी होती की, धर्मगुरू, धार्मिक ग्रंथ, मूलभूत मानले गेलेले इतर संदर्भग्रंथ यांच्या जागी reason ची स्थापना करणे. 18 व्या शतकाच्या सुरवातीला ‘निसर्ग हा नियमबद्ध आहे आणि यातील व्यवहार हे नियमानुसार यांत्रिकी पद्धतीने चालतात’ ह्या रेने देकार्त व आयझॅक न्यूटन(1642-1727) यांनी पूर्वी काढलेल्या निष्कर्षाला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली. याचा परिणाम म्हणून चमत्कार म्हणजे ‘निसर्गात अतिनैसर्गिक शक्तीने केलेला हस्तक्षेप’ ही कल्पना विचारी माणसांना स्वीकारणे कठीण होऊ लागले. नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरण निसर्गनियमांनी देता येते, तर हाच नियम धर्माचा उगम, धार्मिक ग्रंथातील लिखाण आणि चर्च यांनाही का लावण्यात येऊ नये? rationalist ना वाटले की, होय, याही क्षेत्रात निसर्गनियमाद्वारे स्पष्टीकरण मिळवले पाहिजे. ईश्वराने प्रेषितापुढे ज्ञान प्रगट केले असून त्याच्या शब्दाचा श्रद्धेने स्वीकार केला पाहिजे, ही पूर्वीची कल्पना मागे पडली आणि प्रत्येक गोष्टीची reason च्या साहाय्याने शहानिशा करून तिला पटेल अशाच गोष्टी स्वीकारणीय आहेत, ही कल्पना हळूहळू प्रस्थापित झाली. नैसर्गिक घटनांचे कारणांनी स्पष्टीकरण करणे ही मानवाने आतापर्यंतच्या इतिहासात मिळवलेली मोठीच झेप होती. धार्मिक ग्रंथात सांगितलेल्या आधारभूत मानल्या गेलेल्या गोष्टींना rationalist लोकांचा विरोध होता. परंतु निसर्गातील घटनांमध्ये ईश्वर हस्तक्षेप करीत नसला तरी सृष्टीचा निर्माता व सृष्टीमध्ये नियमबद्धता ठेवणारा म्हणून त्यांचा ईश्वरावर विश्वास होता. असे मत असणार्यामध्ये इंग्लंडमधील जॉन टोलंड(1670-1722-christianity not mysterious) आणि मॅथ्यू टींडल(1657-1733; बायबलमधील चमत्कार आणि गुढता नाकारली.) तर फ्रान्समध्ये व्होल्टेअर(1694-1778) हे rationalist होते. परंतु त्यांचा ईश्वरविषयीचा विश्वास थोड्याच काळात नाहीसा झाला. ब्रिटनमध्ये डेव्हिड ह्युम (1711-1776) आणि फ्रान्समध्ये पॉल हेन्री हॉलबाख(1723-1789) ह्यांनी ईश्वरावरील श्रद्धेला reason चा आधार मिळत नाही असा युक्तीवाद केला. होलबाख ह्याने 1770 मध्ये ‘system of Nature’ हा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व नाकारले. इंग्लंडमध्ये 18 व्या शतकात reason ने सर्व गोष्टीकडे पाहाण्याचे तत्व इतक्या घट्टपणे रूजले की, ईश्वराचा अभ्यास करणारे देखील आपला युक्तिवाद श्रद्धेच्या ऐवजी reason ने करू लागले. reason ने युक्तिवाद करण्याच्या या प्रक्रियेमुळे सामान्य लोकांमध्ये असलेल्या चेटुकविद्येसारख्या विषयावरही त्याचा बदल जाणवला. सुशिक्षित व विचारी लोकांमध्ये असलेली चेटकिणीबद्दलची समजूत नाहीशी व्हायला लागली. अनेक चेटकिणींना चेटकीण समजून जाळण्यात येत असे. फ्रान्स आणि हॉलंडमध्येही चेटकिणीवरचा विश्वास कमी व्हायला लागला. आधुनिक विज्ञान आणि आधुनिक तत्वज्ञानामध्ये जसजशी सुधारणा होऊ लागली तसतशी लोकांमधील या प्रकारच्या अंधश्रद्धा कमी व्हायला लागल्या. 17 व्या शतकातील इंग्लिश विचारवंत थॉमस हॉब्ज(1588-1679) ह्याने rationalist विचाराला चालना दिली. त्याने नितीला धर्मापासून वेगळे केले. फ्रान्समध्ये दिदेरो(1713-1784) याने पहिल्या विश्वकोशाची(Encyclopedia) रचना केली. त्या काळातील सर्व विचारवंतांनी विश्वकोष लिहिण्यात आपले योगदान दिले. ज्ञानाचे वर्गीकरण केले. अंधश्रद्धा आणि ज्ञान यात फरक केला. दिदेरोला 17 पुस्तकांचा संच लिहिण्यास व संपादित करण्यास (1751-1772) 21 वर्षे लागली. (मजकूरांसाठी 14 वर्षे व नंतर चित्रे व पुरवणी मजकूर जोडण्यासाठी 7 वर्षे). rationalism हा अर्थ 18 व्या शतकात फ्रान्समध्ये विश्वकोषकार म्हणून प्रसिद्ध पावलेल्या तत्वज्ञानाच्या लिखाणात व्यक्त झाला. ह्या तत्वज्ञांपैकी व्होल्टेर, दिदेरो, एलेंबर्ट आणि होलबाख हे प्रमुख असून ते सर्व स्थूलमानाने जडवादी, विज्ञानवादी आणि श्रद्धाविरोधी होते.
दुसरी rationalism ची लाट 19 व्या शतकाच्या सुरवातीला जर्मनीमध्ये आली. या चळवळीमध्ये अग्रभागी होते जॉर्ज हेगेल(1770-1831). हेगेलच्या प्रभावाखाली काही विचारवंतांच्या संघांनी बायबलवर जोरदार टिका केली. डेव्हीड स्ट्रॉस(1808-1874;- The Life of Jesus, critically examined-3 volumes) व फर्डीनंड बाऊर(1792-1860;- Paul-Apostle of Jesus Christ; History of Christian Church- 5 volumes) ह्यांनी बायबलमधील नैसर्गिक घटनांचे व्यवस्थित स्पष्टीकरण करून त्या पुराणकथा आहेत हे दाखवून दिले. ह्यामुळे ख्रिश्चन जगतात एकच खळबळ उडाली. कारण बायबलमधील घटना म्हणजे ऐतिहासिक सत्य मानले जायचे. स्ट्रॉसच्या विचारधारेला पुढे अशीच चालना मिळत गेली आणि लुडवी फ्युईरबाख(1804-1872-Essence of Christianity) ह्यांनी सांगितले की, ईश्वराची कल्पना ही माणसाच्या इच्छेतून आणि गरजेतून निर्माण झालेली आहे. ‘मनुष्याची उत्पत्ती ही ईश्वराने केली आहे’ या बायबलमधील कल्पनेला rationalist नी टीका केली होती. ह्या टीकेला डार्विनच्या Origin of Species या 1859 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाने बळकटी मिळाली. पृथ्वीवरील माणसाच्या उत्पत्तीचे कारण ईश्वर नसून तो इतर लहान लहान पेशींपासून उत्क्रांत होत होत बनला आहे, असे त्याचे नैसर्गिक स्पष्टीकरण मिळाले. जेरेमी बेंटम(1748-1832) व जॉन स्टुअर्ट मिल (1806-1873) ह्यांनी Ethical rationalism चा पाया रचला. ही तत्वे ‘उपयोगितावाद’ या नावाने तत्त्वज्ञानात प्रसिद्ध आहेत. 19 व्या शतकाच्या अखेरीस व 20 व्या शतकाच्या सुरवातीस rationalism हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जाऊ लागला. आजचे rationalist जेव्हा reason चा वापर दैनंदिन जीवनात करावा असे म्हणतात, तेव्हा त्यांचा विरोध व्यक्तीसापेक्षता, गूढवाद, अधिकारी व्यक्ती(धर्मगुरू, बुवा-बाबा-माता ह्यांनी सांगितलेले उपदेा-प्रवचन), धर्मग्रंथात सांगितलेले ज्ञान, रूढी-परंपरा व धर्मश्रद्धांना असतो. आपल्या समजुती आपले विचार हे पुराव्यावर (evidence) आधारलेले पाहिजेत. ते व्यक्तीचे पूर्वग्रह, भावना इच्छा किंवा परंपरा-रूढी, धर्मश्रद्धा यावर आधारलेले नसावेत असा rationalist चा आग्रह असतो. आपले कर्तव्य काय आहे व आपल्या कृतीचा अंतिम परिणाम जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख साधण्यात आहे का, हे पाहून आपली कृती व वर्तणूक ठरवावी. rational मनुष्य न्यायनिष्ठ व वैज्ञानिक दृष्टी असलेला असतो.
–टी.बी. खिलारे