माणसाच्या जातीनं पोटाच्या स्वार्थातून, मरणाच्या भीतीतून आणि सत्तास्थानी राहण्याच्या ईर्षेतून भयानक आणि विकृत अशा तीन काल्पनिक गोष्टी शोधून काढल्या आणि त्या वास्तवाइतक्या घट्टपणे धरून ठेवल्या, त्या म्हणजे देव, जात आणि धर्म. या तीन अतिशय थोतांड कल्पनांनी माणसांच्या जगाचं अतोनात आणि विदारक असं नुकसान केलं. माणूस फार बेकारपणे आणि बेछूटपणे एकमेकांपासून तोडला.
त्यातल्या जात या कल्पनेबद्दल आपल्याला बोलायचंय. (मी तिला संकल्पना हा शब्द वापरणार नाही. कारण त्या शब्दाला वास्तवाचा काही एक आधार असतो आणि जातीच्या कल्पनेला संकल्पना हा शब्द लावणे हा त्या शब्दाचा अपमान ठरेल.)

माणसाच्या कोणत्याही व्यक्तीगत आणि सामूहिक कृतीच्या किंवा कृत्याच्या मागं अंतिमत: त्याच्या पोटाची भूक असते. माणसांचं जग चालतं ते पोटावर चालतं आणि पोटासाठीच चालतं. जाती हा प्रकार शोधण्यात आला, रूजवण्यात आला आणि त्यांचा मानवी समाजात जो काही भलाबुरा उपयोग झाला, याच्या सुरवातीशी आणि शेवटाशीही पोटच आहे.
जाती म्हणजे माणसांमाणसांतली विभागणी. मानवी समूहाचे तुकडे पाडणं. पृथ्वीवर इतरत्र कुठंही हा जात प्रकार आढळत नाही, पण भारत नावाचा जो प्रदेश आहे, तिथं मात्र जात या प्रकाराचा प्रचंड बुजबुजाट आढळतो. जगाच्या पातळीवर भारताचं दुसरं काही सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे की नाही, माहीत नाही, पण माणसांची जातीय विभागणी हे मात्र फारच भव्य आणि जगातलं एकमेव वैशिष्ट्यच भारताकडं मौजूद आहे. भारतीय माणसांनी फार ठामपणे हे जातवैशिष्ट्य जपलंय, जतन केलंय, त्याचा अभिमानसुद्धा जपलाय आणि गेली तीन साडेतीन हजार वर्षं हा प्रदेश त्या वैशिष्ट्याच्या जीवावरच जगतोय. जातीशिवाय या प्रदेशाला गतीच नाही आणि मानवी समूह म्हणून या जातींमुळंच या प्रदेशाची प्रगतीही नाही.
साधं प्राथामिक ज्ञान असं आहे की, माणसाची अवलाद इथून तिथून एकसारखीच, माणसामाणसाच्या मूलभूत आणि नैसर्गिक जगण्यात अजिबात फरक नाही. आफ्रिकेत एके काळी माणसाच्या जातीनं जन्म घेतला, तेव्हा तिथं माणसं विकसित होताना, बाह्य आकार उकारानंही एकसारखीच होती. मग अन्नाच्या शोधार्थ माणसं आफ्रिकेतून जगभर पांगू लागली आणि पृथ्वीवरच्या निरनिराळ्या परिसरांमध्ये, पर्यावरणांमध्ये आणि वातावरणांमध्ये स्थिरावू लागली, स्थिरावली, तेव्हा तिथल्या तिथल्या परिसरीय पर्यावरणांचे शतकानुशतकांचे परिणाम होऊन, त्या त्या पर्यावरणाला अनुकूल असे, माणसाच्या बाह्य आकार उकारात कमी जास्तपणाचे बदल होत गेले, पण माणूस म्हणून रचना कायमच राहिल्या. नाकाच्या ठिकाणी नाकच राहिलं न् कानाच्या ठिकाणी कानच. सगळं जिथल्या तिथं आणि जसंच्या तसं. पर्यावरणीय उलथापालथींचा परिणाम म्हणून कोणत्या एका प्रदेशातल्या माणसाला शिंगं फुटली न् दुसर्या प्रदेशातल्या माणसाला शेपूट फुटलं असं झालं नाही. माणसं माणसंच राहिली. त्यांच्यातलं प्राणतत्व जगभरच्या माणसांमध्ये एकसारखंच राहिलं. ते आजही तसंच आहे आणि पुढंही कायम तसंच राहणार आहे.
परिसरीय पर्यावरणांनी केलेल्या बाह्य आकारउकारांच्या बदलांना धरून, माणसाच्या जातीनं पहिल्यांदा आपापसात भेद करायला सुरवात केली. हे भेद प्रादेशिक होते न् वांशिक होते. माणसाची अन्नासाठीची स्थलांतरं सुरू होती आणि एका प्रदेशातले स्थिरावलेले लोक, दुसर्या प्रदेशातून स्थलांतर करून येणार्या लोकांना शांत, सहजपणे स्वीकारायला तयार नव्हते. त्यांच्यात भूमीच्या अर्थातच अन्नाच्या मालकीवरून संघर्ष घडू लागले. या संघर्षात वांशिक अस्मिता वापरल्या गेल्या. जिंकलेले लोक स्वत:ला श्रेष्ठ वंशाचे समजू लागले. हारलेले लोकही स्वत:च्या वांशिक जाणिवा कुरवाळतच होते. माणसाच्या इतिहासातला गेल्या वीस हजार वर्षांचा काळ हा भंपक अशा वांशिक संघर्षांचा आहे. खरं तर तो संघर्ष अन्नाचा होता, पण त्याला माणसांनी वांशिक किनार लावली. (आजही जगभर माणसांचे अन्नाचे संघर्ष सुरू आहेत, पण आता संघर्षांना भेदांच्या-मधल्या काळात माणसांनी शोधलेल्या-वेगवेगळ्या किनारी असतात, पण आजही त्यातली एक किनार वांशिक भेदांची असते.)
अन्नाच्या शोधार्थ सुरू असलेल्या स्थलांतरांमधून माणसाला वांशिक आणि प्रादेशिक भेदांचा शोध लागला, मूळचे आणि बाहेरनं आलेले लोक असा खेळ सुरू झाला आणि माणसाला निरनिराळे भेद प्रकार निर्माण करण्याचा विकृत नाद लागला. लत लागली. दुसर्याशी न पटणं, दुसरं माणूस सहन न होणं, दुसर्याशी मतभेद होणं हा या भेदांचा पायाभूत मुद्दा राहिला. तोवर माणूस टोळीबाज झालाच होता. एकट्याच्या ताकदीपेक्षा टोळीची ताकद प्रभावी असते हे माणसाला कळलं होतं. मग आपल्याला सुचलेल्या भेदाची किंवा मतभेदाची टोळी तयार करायची आणि दुसर्यापेक्षा आपलं अस्तित्व वेगळं आहे, श्रेष्ठ आहे असं सिद्ध करायचा प्रयत्न करायचा, त्यासाठी जमेल त्या मार्गांनी आपल्या मताचं वर्चस्व प्रस्थापित करायचं असा खेळ सुरू झाला. मतांचा प्रचार करणं आणि वेळ आली तर लढाई करणं न् मतं पटवायला लावणं असे प्रकार हाताळले जाऊ लागले. यातून धर्म नावाच्या माणसाला माणसापासून वेगळं पाडणार्या कल्पनेचा उदय झाला. टोळीबाजीचा नवा आविष्कार. वंशांनी देव, अद्भुत शक्ती नावाचे प्रकार आणि त्यांची कर्मकांडं-त्या गंडवणुकीवर आयतं आणि बिनकष्टाचं फुकट जगणारे पुरोहित, जादूटोणावाले लोक शोधून ठेवलेच होते. नंतर निघालेल्या धर्मांनी ते देव, अद्भुत शक्ती, पुरोहित वगैरे उचलून स्वत:साठी स्वीकारले. हा गेल्या तीन चार हजार वर्षांचा इतिहास.
गेल्या दोन अडीच हजार वर्षांत टोळीबाजीतून राजेशाही, साम्राज्यं असे प्रकार जगानं अनुभवले आणि गेल्या दीडदोनशे वर्षांत या टोळीबाजीतूनच देश नावाचा प्रकार उदयाला आला. माणसाला माणसापासून अलग पाडणारा हा देश नावाचा भेद आता आता स्थिरावत चाललाय.
आता स्पष्टपणे दाखवायला आणि बोलायला आपल्याकडं भारत नावाचा देश आहे. त्याची स्वत:ची एक समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, कायदाव्यवस्था आहे. आपण लोकशाही स्वीकारली आणि ती नुसती लोकशाही नाही तर किमान कागदोपत्री तरी ती निधर्मी लोकशाही आहे. मी अजून या लोकशाहीचा उल्लेख निर्जातीय लोकशाही असा ऐकलेला नाही, पण निधर्मी म्हणताना, ती निर्जातीय किंवा माणसा-माणसांत भेद करणार्या कोणत्याही भेदांपासून निरपेक्ष आहे, असं अनुस्यूत असावं असं मला वाटतं.
या लोकशाहीनं असं ठरवलेलं आणि असं आश्वासन दिलेलं आहे की, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय म्हणून जगण्याचा समान न्याय, समान हक्क आणि समान अधिकार आहे. ही माझी माहिती खरी असेल तर या देशाचा ‘कायदा’ ज्या दिवशी जन्माला आला, त्या दिवसापासून या देशात असणारं प्रत्येक मानवी डोकं केवळ भारतीय म्हणून जगायला काहीच हरकत नव्हती आणि आज या देशात जेवढी लोकसंख्या आहे, ती केवळ भारतीय म्हणून ओळखली जायलाही हरकत नव्हती. पण तसं काही अजून झालेलं नाही. आणि त्याला कारण-माझ्या माहितीनुसार-आणि ती माहिती चुकीची असू शकते- भारतीय कायद्यानं दिलेलं व्यक्तीस्वातंत्र्य आहे.
आता भारत नावाचा देश आहे, या देशात राहणार्या प्रत्येक माणसाला जगायला तो देश हवासुद्धा आहे, त्या देशानं दिलेला समान न्याय, समान हक्क आणि समान अधिकारसुद्धा प्रत्येकाला हवा आहे, आणि तरीसुद्धा प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्यसुद्धा हवं आहे, यात मला वाटतं एक विरोधाभास आहे. या देशात सामाजिक(आणि आपोआपच राजकीयसुद्धा-आणि सर्व बाबतीत) अनाचार माजवणारी एक गंमत आहे. लोकशाहीत व्यक्तीस्वातंत्र्य गृहीत असलं न् ते अगदीच ‘कायदेशीर’ असलं तरी या व्यक्तीस्वातंत्र्याच्या त्या देशातले नागरिक काय अर्थ घेतात आणि त्याचा वापर कसा करतात, हे पाहणंही महत्वाचं आहे. भारतात व्यक्तीस्वातंत्र्यात आपल्या देशीपणाचा किंवा निखळ भारतीयपणाचा लोपहोतो न् प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्यापुढं भारतीयपणाला काही किंमतच राहत नाही, असं एकूण दिसतं. व्यक्तीस्वातंत्र्याचा मुजोर उपयोग आणि व्यक्तिस्वातंत्र्य स्वत:ला हवं तसं वापरणं हा देशातला बिकट रोग होऊन बसलाय, असं या देशाचं सध्याचं चित्र आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे फारच महत्वाचं मूल्य आहे, पण ते वापरायची नेमकी जाणीव भारतीय म्हणून या भूखंडावर राहणार्या लोकांना आहे असं दिसत नाही किंवा ज्यांना ती जाणीव आहे, असं ते दाखवतात, त्याचा ते गैरवापर करतात असंही दिसतं. तसं नसतं तर, भारतात सर्व नागरिकांचा मिळून भारतीय म्हणून एक एकोपा दिसला असता. सर्वच नागरिक निव्वळ भारतीयच दिसले असते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली भेदाभेदांचा चाललेला एवढा मोठा गलबला इथं दिसला नसता.
भारतात आज भारतीय कुणी आहे का- किंवा असं म्हणूया की, प्रथम क्रमांकाची ओळख म्हणून कोणी भारतीय आहे का हा प्रश्न आहे. भारतीय असण्याआधी इथल्या प्रत्येक नागरिकाला पहिली त्याच्या लिंगाची जाणीव आहे, त्याच्या जाती, पोटजाती, पंथ, संप्रदाय, धर्म यांची जाणीव आहे. मग त्याला स्वत:चा पक्ष, वाद, विचार, गट, श्रद्धास्थान यांची जाणीव आहे. मग त्याला स्वत:ची भाषा प्रदेश, राज्य यांची जाणीव आहे. या सर्व जाणिवांच्या त्याच्या त्याच्या अस्मिता आहे आणि अभिमान आहेत आणि सरते शेवटी आख्या आयुष्यात घावलीच कधी संधी आणि फुरसद तर आपल्याला एक देशसुद्धा आहे याची जाणीव. पण पुन्हा आपल्याला एक देश आहे तर आपण त्याचं काय करायचं किंवा आपण देशासाठी काय करायचं याची मात्र त्याला जाणीव नाही. पण त्याचवेळी मिळालेल्या व्यक्तीस्वातंत्र्यामुळं देश आपल्यासाठी काही करतोय की नाही याबाबतची त्याची जाणीव मात्र कायम जिवंत आणि सजग आहे.
लोकशाहीचाच कायदा असल्यामुळं भारतात लोकशाही चालू असल्याचं दिसतं. किंबहुना असं म्हणता येईल की, इथली राजकीय प्रणाली लोकशाही आराखड्याचं पालन केल्याचं दाखवते म्हणून इथं लोकशाही आहे असं वाटतं. पण समाज जीवनातल्या प्रत्येक मनामनांत लोकशाही जिवंत आहे आणि प्रत्येक नागरिक तिचा देश हेच श्रद्धास्थान मानून उपयोग किंवा अंमल करतोय असं मात्र दिसत नाही. ‘लोकशाही अजून लोकांपर्यंत पोचलीच नाही’ असं एक वाक्य इथल्या वातावरणात अधूनमधून ऐकायला येत असतं. मला ते वाक्य खोटं वाटतं. खरं तर लोकशाही प्रत्येकापर्यंत पोहोचली आहे. फक्त होतंय एवढंच की, प्रत्येक जण तिचा स्वत:ला पाहिजे तसाच अर्थ लावतो आहे किंवा तिला व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वत:ला हवं तसं वाकवायला पाहतो आहे. इथं प्रत्येकाला लोकशाही स्वत:ला वाटते तशीच हवी आहे आणि त्या स्वत:ला वाटण्याच्या केंद्रस्थानी देश ही संकल्पना नाही, तर त्याच्या त्या अस्मितांच्या थोतांड कल्पना आहेत- जाती, धर्म, देव, पंथ, पक्ष इत्यादी- त्याच आहेत.
आज इथल्या नागरिकांना जगायला देश या नावाचा आकार उपलब्ध आहे. त्या आकारात जन्म घेणार्या प्रत्येकानं खरं तर देश म्हणून एकत्वानं जगायला हवं आणि देशाला केंद्रस्थानी ठेवूनच लोकशाहीचा उपभोग घ्यायला हवा. पण ही देशकेंद्री लोकशाही लोक आपल्या मनात, मेंदूत पोहचूच देत नाहीत. कारण लोकशाही तिथं पोहोचेपर्यंत लिंग, जात, धर्म, प्रदेश, भाषा असे असंख्य भेद अडथळ्यासारखे मध्ये उभे आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली ते भेद कायम पक्के ठेवण्याची सोय या देशात उपलब्ध आहे आणि ते भेद जिवंत आहेत, अतिशयच ठाम आहेत म्हणून इथं देशकेंद्री लोकशाहीचा अंमलच व्हायला तयार नाही.
-आणि ज्यांना तो होऊ द्यायचा नाही, त्यांची एक अतिशय भंपक आणि फालतू घोषणा मोठ्या आवाजात इथं सदोदित ऐकू येते- अनेकतामें एकता.
ही घोषणा जोवर जिवंत आहे, तोवर या देशात खरी लोकशाही कधीच नांदणार नाही.
भारत नावाचा आजचा जो आकार आहे, तो अस्तित्वात नव्हता, तेव्हापासून या भूखंडावर जात नावाचं एक काल्पनिक वास्तव अस्तित्वात आहे. जाती कशा पडल्या याच्या खोल इतिहासात आपण सविस्तर जायला नको, पण त्यातले एक दोन मुद्दे इथं हाताशी घ्यायलाच हवेत. त्यातलं एक वाक्य आहे, कर्मावरून म्हणजे कामावरून या भूखंडावर जाती पडल्या. आपल्या भारतीय समाजात एक वाक्य थेट ऐकू येतं की, उत्तर ध्रुवावरून व्हाया इराण भारतात आलेल्या आर्यांनी आणि विशेषत: त्यातल्या ब्राम्हणांनी इथल्या जातीव्यवस्थेची रचना केली. द्रविड, नाग आणि आर्य हे वंश तेव्हा या भूखंडावर राहत होते न् त्यातल्या आर्यांनी द्रविड, नागांशी संघर्ष करून त्याचां धुव्वा उडवला न् मग त्यांच्याशी संकर करून नांदायला सुरवात केली न् ते करतानाच जेतेपणाच्या अधिकारात जातव्यवस्था आखत नेली… या वाक्यातला एक ध्वनिक्षेप असा आहे की, बाकीच्या लोकांनी ती जातव्यवस्था कबूल केली.
द्रविड, नाग आणि आर्य यांच्या एकूण लोकसंख्येत त्यावेळी ब्राह्मण किती असणार? तर मूठभर. या मूठभर लोकांनी भला मोठा समाज स्वत:च्या मतांसमोर वाकवला ही मोठी कमालीची गोष्ट आहे. पुढं भारतात मोगल आले, तेही मूठभरच होते आणि पुढं इंग्रज आले, तेही मूठभरच होते. मूठभर लोक येऊन इथल्या मोठ्या लोकसंख्येला आपल्यासमोर झुकवतात, हा नेहमी घडणारा योगायोग मजेशीरच वाटतो.(यात ब्राम्हणांच्या हातात लेखणी होती, मोगलांच्या हातात तलवार आणि इंग्रजांच्या हातात बंदूक एवढाच किरकोळ फरक.)
आजचा काळ असा आहे की, भारतात जातव्यवस्थेबाबत तीन गट अस्तित्वात आहे असं दिसतं. एक, जातव्यवस्थेचं समर्थन करणारा. दुसरा, जातव्यवस्थेला नावं ठेवणारा आणि विरोध करणारा आणि तिसरा, बहुसंख्य लोकांचा गट, जातव्यवस्था बरी वाईट असं काहीही न म्हणता तिचं मूकपणे भारवहन करणारा. आर्यांनी जातव्यवस्था अंमलात आणली असं म्हटलं न् ती अन्यायकारक, भेदमूलक आहे असं म्हटलं तरी, तिला समजा, तिच्या सुरवातीला आर्यांच्या अत्याचारांना घाबरून त्या वेळच्या समाजानं विरोध नाही केला असं मानलं तरी, मग त्यानंतरच्या हजारो वर्षांतल्या मानवी पिढ्यांनी ती व्यवस्था का धरून ठेवली हा प्रश्न उरतोच. ब्राम्हण चतुर ठरले का जातव्यवस्था कायम टिकवून धरण्यात? की इतरांनाही जातव्यवस्थेची गोडी लागली, म्हणून त्यांनी ती टिकवली?
कर्मावर आधारलेल्या ज्या जाती आहेत, त्यांच्याबाबत एक संशय असा घेता येऊ शकतो की, त्यांनी जाती का टिकवून धरल्या असाव्यात? तर त्यांच्या जातीच्या वाट्याला जे कर्म आलं, त्यावर त्यांची पिढ्या न् पिढ्यांची मक्तेदारी निर्माण झाली. आपल्या कर्मात, जगण्याच्या धंद्यात दुसरी कुठली जात स्पर्धक होणार नाही याची जातव्यवस्थेमुळं त्यांना हमी मिळाली असावी. पण या हमीतही दुसरा एक संशय येतो की, ती त्यांची जगण्याची मजबुरी असावी, लाचारी असावी. जगायला दुसरा काही पर्यायच नसल्यामुळं त्यांनी वाट्याला आलेल्या जाती धरून ठेवल्या असाव्यात.
द्रविड आणि नागांमध्ये जातव्यवस्था नव्हती म्हणतात. पण तिनही वंशांचा संकर होताना द्रविड आणि नागांना आर्यांच्या जातव्यवस्थेत वेगवेगळ्या जातीय तुकड्यांमध्ये विभागण्यात आलं किंवा द्रविड आणि नागांनी स्वत:च्याही जाती सुरू केल्या. आज ज्यांना मागासवर्गीय जाती म्हणून ओळखलं जातं, त्या आर्य, द्रविड आणि नागांच्या मिश्रणाच्या जाती आहेत. ज्यांना इतर मागासवर्गीय म्हटलं जातं त्या आर्यांच्या जाती आहेत. भटकेविमुक्त म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या द्रविड जाती आहेत आणि आदिवासी म्हणून ओळखलं जातं त्या नाग जाती आहेत. अर्थात काही जातींमध्ये तिन्हींचं मिश्रण असणारच.
या जाती कधीही समान आणि समतल नव्हत्या. त्यांच्यात वरून खालपर्यंत अशीच उतरंड होती न् ती आजही आहे. देशातले जातव्यवस्थेचे काही समर्थक म्हणत असतात की, जातव्यवस्था कधी मरू नये आणि ती मरणारही नाहीच, फक्त तिच्याच खालचं-वरचं असं काही नसावं, तर त्या एकमेकींच्या बरोबरीच्या असाव्यात, सर्वांना समान न्याय असावा… असली भंपक विधानं करणारे बहुश: वरच्या म्हणवल्या जाणार्या जातीतले असतात आणि समाजवादाच्या खोट्या चेहर्यानं ते बोलत असतात. समान न्याय हा त्यांना राजकीय पातळीवर देणं अभिप्रेत असतं. (अर्थात तिथंही ते लोकसंख्येच्या किंवा द्वेषाच्या बळावर इतरांना पुसू न देण्याचं राजकारण करतच असतात.) पण सामाजिक पातळीवर किंवा मानवी पातळीवर समान न्याय देणं त्यांना अभिप्रेत नसतं. आणि समान न्याय म्हणजे नेमकं काय आणि तो कशाकशात, कसा कसा देणार हे मात्र ते कधीच सांगत नाहीत. कारण तशा व्याख्याच त्यांच्याकडं तयार नसतात. पण मोघमपणे असं लक्षात येतं की, ते समान न्याय म्हणजे रोटी व्यवहार करायला तयार आहेत, एकमेकांशी शिवताशिवत करणार नाहीत, वाटल्यास बैठकीत बरोबरीला बसू द्यायला तयार आहेत, राजकीय पदंसुद्धा वाटायला काही प्रमाणात तयार आहेत, पण बेटी व्यवहार करायला मात्र तयार नाहीत. ते शक्यच नाही. कारण त्यात जातीय योनिशुचिता धोक्यात येईल. स्त्रियांचे देह हे जातींचे वाहक आहेत असं त्यांना वाटतं आणि ते दुसर्या जातींच्या स्पर्शानं बाटतील असं त्यांचं मत असतं. जात जर बरोबरीच्या नात्यानं स्त्रियांचं आदानप्रदान करू लागल्या तर जातव्यवस्था, जातीचं रक्त धोक्यात येईल असं त्यांना वाटतं. खरं तर भारतीय कुटुंबव्यवस्थेत पुरूषाची किंवा नवर्याची जी जात तीच त्याच्या कुटुंबाची आणि वंशाची जात असं गृहीत असताना, तरीही त्यांना आपल्या स्त्रिया दुसर्या जातींना खुलेपणानं देणं नको असतं. त्यांची जातीय अस्मिता दुखावते. (इथं स्त्रियांचं स्वातंत्र्य किती गोत्यात आणि जातीय कोंडवाड्यात आहे आणि स्त्रियांकडं कसं वस्तूरूप बघितलं जातं ते लक्षात येतं.)
खालच्या म्हणवल्या जाणार्या जाती आहेत, त्यातले काही जण जातीअंताचा लढा खेळत असतात आणि समान न्यायाची भाषा करत असतात, पण त्यांचीही भूमिका वरच्यांपेक्षा वेगळी नसते. त्यांनाही अन्न, सामाजिक आणि राजकीय बैठकी यांच्यात बरोबरी हवी असते. बेटीव्यवहारात दुसर्या जातीच्या स्त्रिया आपल्यात आल्या तर चालतील असंही असतं, पण आपल्या स्त्रिया दुसर्या जातीत देण्याची तयारी नसते. त्यांचीही जातीय अस्मिता स्त्रियांच्या देहात अडकलेली असते. स्त्रियांकडं पाहण्याचा वस्तूरूपी दृष्टिकोन त्यांचाही वरच्या म्हणवल्या जाणार्या जातींसारखाच असतो. जातींच्या ठरलेल्या धंद्यांत शिरण्याचे आणि अतिक्रमण करण्याचे प्रयोग मधून मधून घडतात. पण तेही आपल्या जातीला बाट लागणार नाही न् कुणी आपल्याला त्या जातीत ढकलणार नाही याची दक्षता घेत. उदाहरणार्थ, एखादा ब्राम्हण चपलांचं दुकान काढील, ब्राह्मण मुली लावणीवर नृत्य करतील, पण म्हणून स्वत:ला तो चांभार किंवा कोल्हाटी म्हणवून घेणार नाहीत. ब्राह्मण रापी घेऊन चपला सांधत बसणार नाही किंवा ढोराची कातडी सोडून ती कमवत बसणार नाही. किंवा मांगाच्या धंद्यातल्या दोर्या वळत बसणार नाही. किंवा कुठला महार पूजा सांगतोय आणि देवळाच्या गाभार्यात विधी करतो असं दिसणार नाही.
दुसर्या जातींची कर्मं करण्याची ढोंगं किंवा शेलकी पैसेवाली उदाहरणं दिसतात, पण आजही जातींची कामं त्या त्या जातींचीच आहेत. त्या कामांच्या आपापल्या अस्मिताही आहेत. त्या अस्मितांमध्ये दुसर्यानं ढवळाढवळ केलेली चालत नाही. अस्मिता दुखावतात. जाती बाटतात. यात कसला समान न्याय आणि बरोबरी येणार? मला इथं भंगी या जातीची आठवण येते. भंगी या जातीचं काम भंगी या जातीशिवाय करायला दुसरं कुणीही तयार नाही. जातव्यवस्था संपवली पाहिजे म्हणणारे, जाती समतल बरोबरीला आल्या पाहिजे म्हणणारे आणि जातीअंत करू पाहणारे व्यवसाय म्हणून फार अभिमानानं आणि निरलसपणे भंगीकाम करू शकतील का हा प्रश्न आहे. (अर्थात त्यात खूप पैसा मिळतो असं झालं तर शक्यता वेगळ्या. पण त्यातही ती सुलभ शौचालंय काढतील. झाडूटोपली किती जण हातात घेतील हा प्रश्नच.)
थोडा भडक वाटेल असा विचार मांडतो. मला वाटतं, भारतीय घटनेनं या देशातल्या नागरिकांचं किमान जात आणि धर्मस्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट करायला हवं होतं. किमान जात आणि धर्माच्या नावानं काहीही वेगळं वागवलं जाणार नाही न् भारतीय नागरिकत्वासमोर जात, धर्म या गोष्टींना अजिबात थारा किंवा किंमत नाही असं सांगायला हवं होतं. घटना जातस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य देत बसली आणि देशाचे नागरिक ती स्वातंत्र्यं उराशी कवटाळून देश तर विसरलीच, पण या देशातले बाकीचेही नागरिक आपल्याप्रमाणेच माणसाच्या औलादी आहेत आणि त्यांनाही या पृथ्वीवर आपल्याप्रमाणेच, आपल्याएवढाच जगण्याचा अधिकार आहे, हे निर्लज्जपणे विसरली. कागदोपत्री सगळे नागरिक समान आहेत असं म्हटलं गेलं, फौजदारी कायद्यांसमोर सर्व जण समानही केले गेले, पण जगण्याच्या स्वातंत्र्यात जाती, धर्म यांच्या स्वातंत्र्याच्या फटी ठेवल्या गेल्या. या फटी पुढं काय विक्राळ रूप धारण करणार आहेत आणि हा देश जातीधर्मात किती फाटणार आहे याचं भान घटनेला जणू आलं नाही.
आज जातधर्मांच्या स्वातंत्र्याच्या फटींच्या कधीच बुजवता येणार नाहीत असं वाटणार्या भव्य दर्या झाल्या आहेत. आणि घटना बनवणारांनी सामाजिक न्याय, एकोपा, समता यांची स्वप्नं पाहिली असतील त्यांच्या चिंध्या झाल्या आहेत. लोकशाहीच्या नावाखाली देशातल्या जातीजातींमध्ये सर्वच पातळ्यांची, सर्व प्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ लोकशाही म्हणजे काय ते समजून घेण्याचा अवकाश इथल्या लोकांनी घेतला आणि हळूहळू जसजसं ते कळू लागलं, तसतसं सुबुद्ध आणि देशी नागरिक बनण्याऐवजी लोकांनी आपापल्या जातीय, धार्मिक अशा थिताल अस्मितांची पिकं काढायला सुरवात केली. उघड बोलायचं तर लोकांनी लोकशाहीचा आपल्यापुरता आणि केवळ आपल्यासाठीच लावला. आदिम काळापासून माणसाला टोळ्यांनी जगायची सवय आहेच. लोकशाहीतसुद्धा ही अंगात भिनलेली टोळीबाजी उफाळून आली आणि लोकशाही ओरबाडणं हे एकट्यादुकट्याचं काम नसून, त्यासाठी टोळी केली तर तिचं ओरबाडणं अतिशय शिस्तशीर करता येतं, हे लक्षात घेऊन लोक स्वत:ला हवी तशी लोकशाही लुटू लागले. टोळीबाजी करायला आधीपासून जाती, धर्म होतेच. इथं त्यांच्या जिवावर आपापल्या टोळ्या करणं सहज शक्य होतं, सोपं होतं. त्या टोळ्या मग भराभरा पक्क्या केल्या गेल्या आणि स्वातंत्र्यानंतर वीस पंचवीस वर्षांतच लोकशाहीतले आमचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजेत, हा देश आमच्यासाठी काही करणार आहे की नाही अशा जातीय, धार्मिक घोषणांना ऊत आला.
आज देशातल्या प्रत्येक जातीचा फणा उभारलेला आहे आणि प्रत्येक फणा लोकशाहीला डंख मारण्याची धमकी सहज देतो आहे. वर्तमानात देशातली हालत बघितली तर स्पष्ट दिसतं, की, इथली प्रत्येक जात अगदी आवर्जून टाहो फोडताना दिसतेय. आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे… देशाभरात लोकशाहीच्या घुमटाखाली फक्त तेवढाच टाहो चहूबाजूंनी ऐकू येतो आहे… मोठी विनोदी स्थिती आहे. प्रत्येक जातीचं आक्रोशून म्हणणं आहे की, आमच्या जातीवर अन्याय होतोय आणि आम्हाला न्याय पाहिजे. अन्याय होत नाही म्हणणारी एकही जात आज या देशात मौजूद नाही. अन्याय… अन्याय… लोकशाहीचा पार बेकार खिमा.
आणि साहजिकच सर्व जातींमध्ये अन्यायाची बोंब मारणारी तीव्र, जहाल, जीवघेणी स्पर्धा.
एवढी वर्षं भारतीय लोकांनी जाती बाळगल्या, त्यातल्या सर्वांनी त्या आपल्या धंद्याची मक्तेदारी आणि आपल्या धंद्यात कुणी येऊ शकणर नाही याची तजवीज म्हणून जाती घट्ट धरून ठेवल्या. जातीव्यवस्थेमुळं आम्हाला अन्याय सोसावा लागला असं म्हणणार्याही थोड्या जाती होत्याच तेव्हाही, पण लोकशाही आली आणि देशातल्या सर्वच जातींना ‘अन्याय अन्याय’ नावाचा खेळ खेळायची संधी मिळाली. एके काळी जातीच्या जीवावरच लोक जातीची कर्मं करून पोट भरायचे. लोकशाहीत जातीची कर्मं केली पाहिजेत असं बंधन नाही राहिलं, पण तरीही नव्यानं जाती पोटार्थी लाभांसाठी उपयोगी पडू लागल्या. भारतीय लोकांना लोकशाहीतसुद्धा जातींचा नवाच धंदा सापडून गेला. टोळी एकवटा आणि बेधडक नागरिक म्हणून नव्हे, तर जातीच्या नावावर थेट आपले हक्क मागा.
आज हा देश जातस्वार्थावर जगतो. सर्व नागरिक एक, भारतीय, या भावनेला या देशात आज कुणीही नाही. एका बाजूला देशात समता, एकत्व, एकता आली पाहिजे अशा औपचारिक, ढोंगाड्या, सरकारी गप्पा मारायच्या.(तशा गप्पा हाणत राहायचं बंधन घटनेनं घातलंय) दुसर्या बाजूला आपापलं जातीचं दुकान उघडून बसायचं. दुसर्या जातींशी स्पर्धा करायची. जातीजातींनी एकमेकींच्या तंगड्या खेचायच्या. जातींचे आधार घेऊन समाजातली वेगवेगळी क्षेत्रं ताब्यात घ्यायची, त्या क्षेत्रांमध्ये आपापल्या जातींचे वर्चस्व प्रस्थापित करायचा प्रयत्न करायचा. भारतातलं एकही सार्वजनिक क्षेत्र असं नाही जिथं जातीजातींमध्ये वर्चस्वाचा छुपा, उघड संघर्ष चालू नाही. सर्व जाती आता लोकशाहीच्या धंद्यात आकंठ गुंतलेल्या आहेत.
इथली समाजव्यवस्था पुन्हा एकदा नव्या, आधुनिक आणि खास करून लोकशाही पद्धतीनं आता जातींच्याच जिवावर उभी आहे. इथली राज्यव्यवस्थाही त्या जातपद्धतीच्या समाजव्यवस्थेचं भरण, पोषण, पालन करणारी आहे. जात हाच आता भारतीय समाजव्यवस्थेचा आणि राज्यवस्थेचा कणा आहे. आणि त्या कण्याची भूमिका आता एवढी भयंकर टणक झाली आहे की, तो कणा काढून घेतला तर कदाचित जणू भारतीय लोकशाही कोसळून पडेल. कदाचित जणू देशच कोसळून पडेल.
आज अखंड भारतीय समाज नावाची काही एक व्यवस्थाच या देशात उभी नाही. नागरिक लोकसंख्येनं इथं खूप आहेत, पण त्यात केवळ, निखळ भारतीय कुणीच नाही. जात, धर्म यांच्या वाढलेल्या प्रचंड दबावात भारतीय ही ओळख प्रत्येक नागरिकांची हरवून गेली आहे. आणि या चिरफाळ्यांचा प्रचंड गदारोळ आणि अनाचारसुद्धा इथं चालू आहे. कोणत्याही एका माणसाला इथं दुसर्या माणसाबद्दल माणूस म्हणून किंमत वाटत नाही. प्रत्येक माणसाची ओळख इथं जात आहे आणि मूल्यसुद्धा जात आहे. आणि जातींना हात लावण्याची धमक आता कुणातच राहिलेली नाही. अगदी घटनेतसुद्धा नाही. कुणी थोडंही काही बोला कुठल्याही जातीबद्दल, त्याचा टोळीबाज भडका उडालाच समजा.
भारत आज जातींच्या भयंकर विदारक आणि जहाल ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे.
प्रत्येक भारतीयाच्या मनात आज दुसर्या जातींबद्दल प्रचंड घृणा, द्वेष, तिरस्कार, हेवा, राग याच भावना आहेत. टोळीबाजी करता येते लोकशाहीच्या जिवावर म्हणून, प्रत्येक माणसाला आपल्या जातीचा अभिमान वाटतो. पण प्रत्येक माणसाच्या मनात दुसरी कोणतीही जात ही शिवीसारखी आणि घृणास्पद शब्दासारखी आहे. उघडपणे कुणी सहसा एकमेकांच्या जातींबद्दल वाईटवंगाळ बोलत नाही, पण खाजगीत, आपल्या जातीच्या कंपूत कुणीही दुसर्या जातीबद्दल चांगलं काही बोलत नाही. आणि असं भारतातल्या सगळ्या नागरिकांचं आहे. कुठल्याही एका जातीबद्दल दुसर्या जातीची माणसं आदरपूर्वक खाजगीत बोलतायंत असं घडत नाही. त्यांचा सरळ सरळ शिव्यांसारखा उद्धार आणि दुसर्या जातींबद्दल गलिच्छतेची किळसवाणी भावना. तोंडावर जातींनी एकमेकांना नावं ठेवायची नाहीत, ही लोकशाही माय आणि तिच्या कायद्यांची कृपा. पण खाजगीत लोकशाहीचं तोंड काळं. मनांमध्ये ठासून द्वेष भरलेला.
दुसरी गोष्ट जाती एकमेकींना जरा घाबरून आणि बिचकूनही राहतात. प्रत्येक जात दुसर्या जातीकडं संशयानं पाहते की, ही जात आपले लोकशाहीचे हक्क तर हिरावून घेणार नाही ना? आणि आजकाल तर प्रत्येक जातीला आपण मागास आहोत, याचा टाहो फोडायची घाई. सामाजिक प्रतिष्ठा म्हणून प्रत्येक जात दुसरीपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजणार. प्रत्येक जातीला स्वत:च्या इतरांपेक्षा वेगळं असण्याचा न् महान असण्याचा अभिमान. पण तरीही जातीजातींच्या स्पर्धेत एकमेकींपेक्षा आमची हालत कशी वाईट आहे आणि आम्ही कसे पिछडे आहोत हे सांगायची त्वरा. तिचं कारण मिळणार्या विविध सवलती. लाभाच्या पोळ्या बळकावण्यासाठी प्रत्येक जात कागदोपत्री मागास ठरायला एका पायावर तयार. आणि त्याला कारण, भारतीय राजकीय व्यवस्था जातनिकषावर इथल्या नागरिकांना देत असलेली वेगवेगळी वागणूक. त्यातून जात असेल तुमच्याकडं तर जगण्याचे लाभ मिळतील, अशी स्वातंत्र्यानंतर बसवली गेलेली व्यवस्था. लाभ मग राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक, इत्यादी इत्यादी आणि तीच जातीजातींमध्ये लागलेली बिकट स्पर्धा.
आणि हीच स्पर्धा लावून धरण्यासाठी म्हणून मग जे जे व्यासपीठ जातीय कारणासाठी वापरता येईल, ते ते वापरायचं. आपल्या जातीचं बळ एकवटून धरण्यासाठी, इतरांना आपल्या जातीचं बळ दाखवून देण्यासाठी, क्षेत्र कुठलंही असो, त्या प्रत्येक क्षेत्राच्या व्यासपीठासाठी जातीय आकार तयार करायचा. जातीय संघटना तयार करायच्या. जातीय सभा भरवायच्या, जातीय संमेलनं भरवायची. अगदी सरकारी नोकरी, व्यवसाय यातसुद्धा उघड किंवा जातीय गटतट तयार करायचे जातीजातींच्या भयानक स्पर्धेत टिकायचं तर आपल्या जातीशिवाय तुम्हाला दुसरा इलाज नाही, गती नाही न् सद्गती नाही असं प्रत्येक नागारिकांच्या मनावर दबवायचं, ठसवायचं. त्याला दुसर्या जातींची भीती दाखवून स्वत:च्या जातीशी घट्ट व्हायला लावायचं. साहित्य जातींचं, कला जातींच्या, सांस्कृतिक कार्यक्रम जातींचे आणि सगळं काही जातींचं, इथपर्यंत हे सगळं नीच पातळीला उतरलंय. अजून निसर्गाकडून मिळणारे फुकटचे श्वास जातीय विभागण्यांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सामील झाले नाहीत हे नशीब. बाकी सब कुछ जातीय.
अशा अवस्थेत कसलं बोडक्याचं समाज परिवर्तन आणि कसला एकोपा? हे शब्दच, आता विकलांग आणि अनाथ आहेत या देशात. इथं हा सर्वत्र भरून राहिलेला सर्व प्रकारचा जातीय नंगानाच जोवर चालू आहे, तोवर कसल्याही प्रकारचा एकोपा आणि कसल्याही प्रकारचं आदर्श समाज परिवर्तन इथं अजिबात शक्य नाही. शक्यच नाही.
कायद्यानं असेल, सामाजिकतेनं असेल, भावनाशीलतेनं असेल, कसंही असेल, या देशातली जातव्यवस्था पूर्ण खलास केल्याशिवाय हा देश एकसलग, अखंड देश म्हणून कधीच उभा राहणार नाही आणि सुखीसुद्धा कधीच होणार नाही.
इथल्या लोकांच्या कागदोपत्रांवरच्या नोंदीतले जात, धर्माचे उल्लेख पूर्णपणे रद्द केल्याशिवाय आणि तिथं केवळ भारतीय लिहायची सक्ती केल्याशिवाय आणि लोकशाहीतलं जातस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य पूर्णपणे काढून टाकल्याशिवाय या देशाला देश म्हणून कधीच अर्थ येणार नाही.
नाही तर आजचा जातीय बेबनाव आणि अनाचार कायम चालत राहणार आणि त्याचं भविष्य आणखी भयावह, विकृत असणार हे अतिशय नागडं सत्य आहे. जय भारत!
– राजन खान
(लेखक प्रसिद्ध कादंबरीकार, कथालेखक व वाचन चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)