Categories
इतर

प्रतिसाद

ऑक्टोबर - २०११

धर्मद्रोही हे राष्ट्रद्रोहीसुद्धा

            ऑगस्ट 2011 च्या अं.नि.वा.मध्ये ‘खरे धर्मद्रोही’ अग्रलेखात म्हटले आहे की, धर्माची ठेकेदार मंडळीच खरी धर्मद्रोही आहेत. मला तरी ही ठेकेदार मंडळी नुसती धर्मद्रोही वाटत नाहीत तर देशद्रोही वाटतात. कारण ज्या कायद्यानुसार भारताचा कारभार चालतो तो कायदा म्हणजे ‘भारताचे संविधान’ त्यात स्पष्टपणे सांगितले की, ‘भारतातील प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकबुद्धी व सुधारणावाद याचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. धर्माचे ठेकेदार वरील कलमाचा अवमान करीत असल्याने ते धर्मद्रोही बरोबर राष्ट्रद्रोहीसुद्धा ठरतात.

नवनाथ लोंढे, राजगुरूनगर, जि.पुणे.


वार्तापत्रामुळे माझे जीवन बदलले

            मी पंधरा वर्षीय तृतीयपंथी(हिजडा) असून पंधरा वर्षांपूर्वी माझे आई-वडील सलीम व जाबेदा पठाण मला अल्लाहच्या नावाने असेच सोडून देणार होते. परंतु त्यांना अं.नि.वार्तापत्र मिळाले व त्यांचे प्रबोधन होऊन त्यांनी मला पुन्हा बोलावले. सुमारे आठ वर्षांपासून लांब असलेल्या माझ्या आई वडीलांना मी भेटले. वार्तापत्राचे खूप खूप आभार. तसेच कृपया तृतीयपंथांच्या(हिजड्यांच्या) अंधश्रद्धेविषयी एक खास विशेषांक काढावा, ही माझी मनिषा नक्की पूर्ण करा. तसेच मी आपली कार्यकर्ती होऊ शकते का?

रविना पठाण, जुने धुळे.


पालीची माहिती उद्बोधक

            सप्टेंबर अंकातील ‘पाल’ या प्राण्याविषयी माहिती उद्बोधक आहे. या विषयासंबंधी एक सत्यकथा सांगतो. एका घरात सणाकरता काही बासुंदी केली होती. जेवणे होऊन मुले शाळा कॉलेजला तर पुरूष माणसे नोकरी  व्यवसायाला गेली. त्यानंतर घरातील गृहिणीने आपले पान वाढून घेतले आणि उरलेली बासुंदी पानातल्या वाटीत वाढून घेतली. आणि…. तिच्या अंगावर काटाच आला. कारण पातेल्यात तळाशी मेलेली पाल होती. त्यावेळी फोन सर्वत्र नसल्यामुळे विविध ठिकाणी पांगलेल्या कुटुंबियांना हे कळवून उपचार करणेही अशक्य होते. घरात वा शेजारीही असे करणारा कोणी नव्हता. शेवटी त्या महिलेने मनाचा हिय्या करून ‘काय इतरांचे होईल ते माझेही होईल’ असे म्हणून ती बासुंदी पिऊन टाकली, आणि ती स्वस्थ झोपून राहिली. पाल हा प्राणी विषारी नसल्यामुळे कोणालाही काहीही अपाय झाला नाही.                

-शरद अभ्यंकर, वाई, जि.सातारा.


  न्या.रानडे यांचा शतकापूर्वीचा इशारा!

            सार्वजनिक गणेशोत्सवाचे सध्याचे स्वरूप पाहता न्या.रानड्यांनी लोकमान्य टिळकांना दिलेल्या एका इशार्‍याची आठवण होते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली अन् गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याच्या त्यांच्या कृतीवर न्या.रानड्यांनी ‘गणपतीला रस्त्यावर आणू नका’ या शब्दात टीका केली. भले लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सवामागील हेतू त्या काळी कितीही उदात्त असेल, पण त्यातून भविष्यात ज्या समस्या, प्रश्न निर्माण होतील त्याची ‘जाण’ न्या.रानड्यांसारख्या द्रष्ट्या समाजसुधारकाला होती. थोडक्यात ‘धर्माला रस्त्यावर आणणे’ ही कृतीच न्या.रानड्यांना मान्य नव्हती.

            आज सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पाहता न्या.रानड्यांच्या या इशार्‍याची आठवण आल्यावाचून राहत नाही, या 10 दिवसांत होणारे ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, देखाव्यावरून निर्माण होणारे वाद हे मुद्दे आहेतच; पण काही विशिष्ट गणेशोत्सव मंडळांची या 10 दिवसांतील ‘कमाई’ व ‘श्रीमंती’ पाहून मती गुंग होऊन जाते. आता गल्लोगल्ली नवसाला पावणार्‍या गणेशोत्सव मंडळांचे पेव फुटले आहे. एका ‘राजाला’ गेल्या दोन दशकात ‘नवसाला पावणारा’ म्हणून अमाप प्रसिद्धी मिळाली अन् आता प्रत्येक उपनगरात ‘राजा’ तयार होऊ लागला.

            न्या.रानड्यांनीच श्रद्धेची फार सुंदर व्याख्या केली आहे. ‘आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला जागून उत्स्फूर्तपणे केलेली कृती म्हणजे श्रद्धा होय! गणेशोत्सवात नवसाला पावणार्‍या गणपतीपुढे रांगा लावणार्‍यांत सर्वच स्तरातील वयोगटांतील, सुशिक्षित-अशिक्षित लोक असतात. यातील जवळजवळ सर्वचजण आपली विवेकबुद्धी गहाण टाकून हेतूत: या गर्दीत सामील होतात.

            या सर्व पार्श्वभूमीवर 100 वर्षांपूर्वी न्या.रानड्यांनी लोकमान्य टिळकांना दिलेल्या इशार्‍याची पुन:पुन्हा आठवण होते, इतकेच!

पद्माकर कांबळे, मुलुंड, मुंबई