महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दहिसर शाखेतर्फे ‘महालक्ष्मी’ मधील ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’ या ठिकाणी अंध मुला-मुलींसाठी जोडीदाराची विवेकी निवड संवादशाळा पार पडली. ‘आजपर्यंत महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांमधून 101 संवादशाळा आम्ही घेतल्या आहेत; पण अंध मुलांसोबत संवादशाळा घेतानाचा हा पहिलाच प्रयोग होता’ असे या उपक्रमाच्या संयोजक निशा फडतरे यांनी सांगितले.
लग्न विषयाला धरून ‘माईंड मॅप’ची गेम घेऊन त्यावर आवश्यक-अनावश्यक या मुद्द्यांवर चर्चा घेतली. या विषयावर कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे बसून चर्चा करणे गरजेचे आहे, हे या खेळातून सांगण्यात आले. जोडीदाराची विवेकी निवड का? कशी? आणि लिंगभाव या वेगवेगळ्या विषयांवर गाणी, खेळ आणि केस स्टडी यांच्या माध्यमातून विषय पोचवला गेला. अॅक्टिव्हिटीचे वर्णन करून सर्वांसमोर एक चित्र तयार करणे आणि त्यावर सर्वांशी संवाद साधणे हे खूपच वेगळेपण या संवादशाळेत होते आणि इतकी प्रचंड आकलन क्षमता आम्हाला यावेळी अनुभवायला मिळाली, ज्याने आम्ही खूपच भारावून गेलो, असे या उपक्रमाचे दुसरे संयोजक सचिन थिटे यांनी सांगितले.
अचानक तरुण वयातच अंधत्व आल्यामुळे लग्न हा विषय तसा थांबलेलाच असताना लग्न या विषयांकडे नव्याने पाहण्याची दृष्टी आम्हाला मिळाली असे यातील सहभागी सांगत होते. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्रम आता आणखी वेगवेगळ्या गटासमोर जातोय. अनेक तरुणाई ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयांकडे गांभीर्याने पाहू लागलीय, ही खरं तर खूप कौतुकाची बाब आहे.