Categories
संपादकीय

खरे धर्मद्रोही

ऑगस्ट - २०११

येत्या पावसाळी अधिवेशनात ‘जादूटोणा व दुष्टप्रथा विरोधी कायदा’ करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करणार आहे. या कायद्याचा श्रद्धा, अंधश्रद्धा व धर्म विरोध याच्याशी काहीही संबंध नाही. ज्याला मॅजिक रेमीडीज् म्हटले जाते. त्या अघोरी प्रथांना प्रतिबंध बसावा असे या कायद्याचे स्वरूप आहे. पण हा प्रस्तावित कायदा धर्मविरोधी षड्यंत्र आहे व या षड्यंत्राला अंनिस ही धर्मद्रोही संघटना पुढे रेटीत आहे असा तद्दन खोटा आक्षेप तथाकथीत धर्माचे ठेकेदार घेत आहेत. तशा धादांत खोट्या प्रसाराची राळ पावसाळी अधिवेशनापूर्वी उठविण्याचे त्यांचे प्रयत्न चालू झालेत. राजकीय नेत्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्नही ही मंडळी करीत आहेत. समाजात रूढ असणार्‍या कुप्रथा जाव्यात याला विरोध करण्याचे धाडस ही मंडळी करतात तरी कशी? धर्माचा मुख्य हेतु नैतिक मूल्यांची जपणूक हा असेल तर जादूटोणा विरोधी कायद्याला विरोध करणारी ही मंडळी खरी धर्मद्रोही आहेत असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

            भूत काढण्याच्या नावाखाली मनोरूग्ण व्यक्तीला चटके देणे व काठीने मारहाण करणे हा धर्म आहे काय? चेटकीण किंवा भुताळी समजून स्त्रियांना वाळीत टाकणे व काही वेळा त्यांना ठार करणे हा धर्म आहे? पैशाचा पाऊस पाडण्याच्या लोभापायी, एखाद्या कुटुंबाची जंगलात नेऊन हत्या करणे हा धर्म आहे? धर्माच्या नावाखाली शोषण व अत्याचार करणार्‍या या कुप्रथा चालू रहाव्यात असे धर्माच्या ठेकेदारांना वाटते काय?

            खर्‍या नीतीधर्माचा उदय होण्यापूर्वी प्राचीन समाजात यातूविद्या नावाचा प्रकार सुरू होता. शेतात मानवी रक्त शिंपडले तर पीक उत्तम येते असे मानणे म्हणजे यातुक्रिया याला कृष्णयातु किंवा काळी विद्या म्हणतात. अशा यातुक्रिया आजही विविध समाजगटात प्रचलीत आहेत. नरबळी ही अशीच एक यातुक्रिया. नरबळीचे प्रकार महाराष्ट्रात व देशपातळीवर भारतात अधूनमधून घडतच असतात.

            मानवाला नैसर्गिक घडामोडीचा खरा कार्यकारणभाव जेव्हा माहीत नव्हता त्या काळात निर्माण झालेले यातुक्रियेचे हे अघोरी प्रकार विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला तरी समाजात टिकून रहावेत असे तथाकथीत धर्मवाद्यांना वाटते काय? त्यांना तसे वाटत असेल तर ही मंडळी खरी धर्मद्रोही मानावी लागतील.

            मंत्रतंत्र, जादूटोणा, भुताटकी या गोष्टी काळी विद्या म्हणून नीती-धर्मात त्याज्य मानायला हव्या. या दुष्टप्रथांना सुसंस्कृत समाजात थारा नाही. पण मग बुवाबाजी करणार्‍या मंडळींची चलती बंद होईल ना! त्यांच्या हितसंबंधांना बाधा येईल. त्यांची दुकाने बंद होतील. म्हणून या चोरांच्या उलट्या बोंबा सुरू झाल्यात.

            काळ्या विद्येचे समर्थन करणारे काही पंथ महाराष्ट्रात कार्यरत आहेत. ही मंडळी मंत्रतंत्राचे समर्थन करतात. भुताचे अस्तित्व मानतात. मांत्रिकांनी अध्यात्मवाद्यावर अदृश्यपणे हल्ला केला असा प्रचार करतात. या पंथातील लोक स्वत:ला धर्मरक्षक म्हणवतात व धर्माच्या नावाखाली धर्माचा काळाबाजार करतात. त्यांना जादूटोणा विरोधी कायदा नको आहे. म्हणून त्यांनी या कायद्याच्या विरोधात गरळ ओकायचा धंदा गेली अनेक वर्षे चालू ठेवला आहे. त्यांना साथ मिळते आहे ती धर्माच्या नावावर राजकारण करू पहाणार्‍या मंडळींची.

            महाराष्ट्रातील सद्याचे काँग्रेस पक्षाचे सरकार हे सेक्युलर आहे. धर्म ही खाजगी बाब आहे. प्रत्येकाने आपली श्रद्धा बाळगावी पण सार्वजनिक हिताला तिलांजली देऊन नव्हे. मी देवाच्या दर्शनाला जाताना देव माझे रक्षण करील ही श्रद्धा मी यात्रेला जाताना कॉलर्‍याची लस टोचून घेणार नाही असे नाही म्हणू शकत. तद्वत एखादा मांत्रिक मी भूत उतरवतो म्हणून एखाद्या भोळ्या माणसाचा जीव घेत असेल तर तो गुन्हाच होतो. म्हणून धार्मिक काय व दुष्टपणा कोणता याचा निर्णय सार्वजनिक बाबतीत घ्यावाच लागतो व दुष्टपणा रोखण्यासाठी कायदा करावा लागतो. सती जाणे ही माझी धर्मश्रद्धा आहे असे म्हणून एखादी भारतीय स्त्री आज सती जाण्यास सिद्ध झाली तर ती धर्मश्रद्धा स्वीकारायची काय? उद्या तथाकथीत धर्माचे ठेकेदार सत्तेवर आले तर सतीची चाल पुन्हा चालू करण्यास मागेपुढे पहाणार नाहीत.

            महाराष्ट्र सरकारला आम्ही आवाहन करतो की, ही धर्माची ठेकेदार मंडळी खरी धर्मद्रोही आहेत. अंनिस सारख्या मानवता व करूणा या मुल्यांना जपणार्‍या संघटनांना ते लक्ष्य करीत आहेत. त्यांना भीक न घालता जादूटोणा विरोधी कायदा या सरकारने ताबडतोब करावा व दुष्ट प्रथांना बळी पडणार्‍यांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडावे.