Categories
पशुबळी

हेरे येथील शेकडो वर्षांची पशुबळींची क्रूर प्रथा बंद पडली

जून – २०११

कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात हेरे नावाचे सुमारे 2000 वस्तीचे गाव आहे. सावंत-भोसले या जहागिरदाराचे हे गाव. या गावाला लागून सावंत-भोसले या घराण्याची स्मशानभूमी आहे. त्यामध्ये माटेकराचे छोटे मंदिर आहे व त्यामध्ये शिवाची पिंड आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या आधीच्या रात्री येथे मोठी जत्रा भरते. या जत्रेत रात्री 10 वाजल्यापासून पहाटेपर्यंत शेकडो बकरी व हजारो कोंबडी यांचा बळी दिला जातो. या बळीचा प्रकार अत्यंत क्रूर व निर्दयी असा आहे. बकर्‍यांचे पाय व कोंबड्यांचे पाय पकडून खाली डोकी करून त्यांना दगडावर जोरात आपटले जाते. व रक्त न सांडता या प्राण्यांचे जीव घेतले जातात. हा प्रकार अत्यंत भयानक असतो. त्यानंतर या बकर्‍या व कोंबड्यांना कापून मटण केले जाते व नारळाची अर्धी कवटी भरून मटण प्रसाद म्हणून प्रत्येकास वाटले जाते. येथे मटण शिजविण्याचा व जेवण वाढण्याचा प्रकार नाही.

            संत गाडगेबाबांच्या काळात आबाजी पेंटर नावाचे कीर्तनकार हेरे येथे होते. बकरी, कोंबड्यांचा बळी देणे हे पाप असल्याचे ते किर्तनामधून सांगत असत. त्यांनी एकदा गाडगेबाबांना हेरे येथे बोलाविले होते. गाडगे महाराज बेळगावहून हेरे येथे येऊन गेले. लोकांना त्यांनी साफ-सफाईचे व स्वच्छतेचे धडे दिले. दगडाच्या देवाला नवस बोलणे व त्याला बकरी, कोंबडी देणे पापकर्म असल्याचे लोकांना सांगितले. माटेकराला पशुबळी देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र ती वेळ यात्रेची नव्हती. गाडगेबाबांच्या उपदेशांचा कोणताही परिणाम लोकांवर आणि या अनिष्ट प्रथेच्या पाठीशी असणार्‍या प्रमुखावर झाला नाही. प्रथा चालूच राहिली. मध्यंतरी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारच्या विरोधात आवाज उठवून ही प्रथा बंद पाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. अशा प्रकारे अंधश्रद्धेचा हा खेळ वर्षानुवर्षे बिनदिक्कतपणे सुरूच राहिला.

            यावर्षी मात्र या अघोरी प्रथेविरूद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गडहिंग्लज व जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूर यांनी पुढाकार घेतला. अंनिसचे प्रा.पी.एम.भोईटे व प्रा.पी.डी.पाटील यांनी चंदगड येथे जाऊन या प्रकाराची सखोल माहिती घेतली. या कामी चंदगडचे पुरोगामी कार्यकर्ते प्रा.एन.एस.पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. समितीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. 1 एप्रिल 2011 रोजी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदन देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा.पी.एम.भोईटे, प्रा.पी.डी.पाटील, प्रा.एन.एस.पाटील (चंदगड), तानाजी कुरळे, डी.के.देसाई, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ.अलका भोईटे, उपाध्यक्षा सुवर्णलता गोईलकर इत्यादी कार्यकर्ते हजर होते. निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी ही बाब गांभिर्याने घेऊन चंदगडचे तहसिलदार शिवाजीराव तळपे यांना यात्रेच्या प्रमुख आयोजकांना नोटीसा काढण्याच्या व पोलीस कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तहसिलदारांनी लगेचच पावले उचलली, 3 एप्रिलला रात्री पशुबळीचा कार्यक्रम होता. त्याच दिवशी दुपारी चंदगडचे पोलीस निरिक्षक जाधव यांनी त्यांना संपूर्ण सहकार्य केले. हेरे येथील माटेकर यात्रेच्या प्रमुख संयोजकांनी क्रूरपणे बकरी, कोंबड्यांचा बळी देण्याचा प्रकार बंद केला जाईल असे लेखी हमीपत्र तहसीलदार यांना दिले. 3 एप्रिलला रात्री यात्रेच्या ठिकाणी स्वत: तहसिलदार शिवाजीराव तळपे आणि पोलिस निरिक्षक जाधव पोलीस बंदोबस्तासह हजर राहिले. क्रूरपणे पशूबळी दिले जाणार नाहीत यावर त्यांनी जातीने नजर ठेवली. संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरणही केले. अशा प्रकारे शेकडो वर्षे चालत आलेली पशबुळींची क्रूर प्रथा चालू वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गडहिंग्लज व जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूर यांच्या पुढाकाराने बंद पडली.

-प्रा.पी.एम.भोईटे, गडहिंग्लज, जि.कोल्हापूर.