Categories
स्पेशल रिपोर्ट

स्त्री सन्मानाचा लढा : शबरीमला

वार्षिकांक - २०१९

10 ते 50 वयाच्या महिलांना मासिक पाळी येते, त्यामुळे त्या अपवित्र आहेत. शिवाय अय्यप्पा ब्रह्मचारी आहे; तेव्हा शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देता येणार नाही, असे महिला प्रवेशबंदीचे समर्थन करणार्‍या पुरोहितांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आणि 2018 साली महिलांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाले. स्त्रीपुरुष विषमतेविरोधातली लढाई धर्मक्षेत्रातून न्यायक्षेत्रात आली आणि तिने राजकीय क्षेत्रही व्यापले.

कोर्टाच्या या निर्णयानंतर धर्मांधांनी देशभर हिंसक गदारोळ केला. यावरून स्त्रियांचा मंदिरप्रवेश हा प्रश्न आपल्या समाजात किती स्फोटक आहे, हे समजून येते. या संदर्भात डॉ. प्रमोद दुर्गा आणि राहुल थोरात यांनी प्रत्यक्ष मंदिरस्थळी जाऊन शबरीमला तीर्थस्थळाची सर्वांगीण चिकित्सा करणारा लेख लिहिला आहे. तो निश्चितच वाचकांना केवळ नवीन माहिती देईल, असे नव्हे तर आपल्या पुढील आव्हानांची जाणीवही करून देईल.

तेराशे किलोमीटरचा रेल्वे प्रवास करून आम्ही केरळमधील कोट्टायम या जिल्ह्याच्या गावी 25 ऑक्टोबरच्या पहाटे पोचलो. आमच्या स्वागताला ‘केरळा युक्तिवादी संघम’चे पूर्णवेळ कार्यकर्ते एम. नटराजन उपस्थित होते. ‘केरळा युक्तिवादी संघम’ ही संघटना महाराष्ट्र अंनिससारखेच काम केरळमध्ये करीत असते. हॉटेलमध्ये जाऊन आम्ही फ्रेश होईपर्यंत युक्तिवादी संघमचे राज्य उपाध्यक्ष डी. सुकुमारनही तिरुअंनतपुरमहून आले. त्यांना आम्ही केरळ भेटीचा उद्देश सांगितला. शबरीमाला मंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मंदिर भेटीदरम्यान तुम्ही आमच्यासोबत यावे, अशी विनंती केली. त्यांनी ती लगेच मान्यही केली.

शबरीमला मंदिराला भेट देण्याअगोदर कोट्टायम येथील महात्मा गांधी युनिव्हर्सिटीचे सचिव आणि मलार्या या आदिवासी समाजाचे अभ्यासक प्रा. सजीव यांची भेट घेतली. त्यांनी शबरीमाला डोंगरावरील अय्यप्पा मंदिरावर संशोधन करून ‘शबरीमला अय्यप्पन मलार्या दैवम’ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. अय्यप्पा मंदिराच्या प्राचीन इतिहासाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली.

अयप्पा स्वामींचे मंदिर वर्षभर उघडे नसते. दिवाळीत दोन दिवस हे मंदिर उघडणार असल्याने आम्ही शनिवार, दि. 26 ऑक्टोबरला भल्या पहाटे कोट्टायम सोडले. आणि शबरीमला डोंगराकडे आमचा प्रवास सुरू झाला. आमच्या सोबत युक्तिवादी संघटनेचे कार्यकर्ते सुकुमारनही होते.

शबरीमला डोंगर

अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर ज्या शबरीमला डोंगरावर आहे, तो डोंगर व आजूबाजूचे सर्व जंगल हे आज ‘पेरियार टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट’चा भाग आहे. या प्रवासाचा सत्तर टक्के प्रवास हा जंगलातून होतो. जाण्यासाठी पक्के रस्ते आहेत; पण आजूबाजूला घनदाट जंगल आहे. जंगलातूनच पंबा नदीपर्यंतचा प्रवास करावा लागतो. प्रवासात जाताना हत्ती व वाघ यांसारख्या प्राण्यांपासून सावध राहण्याचे फलक रस्त्यावर पाहायला मिळतात.

शबरीमला हा एक सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगर आहे. ‘मला’ या मल्याळी शब्दाचा अर्थ ‘डोंगर’ असा आहे. ‘शबरी’ ही एक आदिवासी समाजातील संत बाई होऊन गेली. तिच्या नावाने या डोंगराला ‘शबरीमला’ असे नाव पडले आहे. अयप्पा स्वामींच्या मंदिराच्या मार्गावरच शबरीचे मंदिरसुध्दा लागते. इतर सतरा व हा एक अशा एकूण अठरा डोंगरांचा हा प्रदेश आहे. प्रत्येक डोंगराला एक नाव आहे. शबरीमला, कलकीमला, निल्लकलमला, करीमला, नागमला, कुद्दमबरमला, गौंडमला अशी इतर जवळच्या काही डोंगरांची आदिवासी संस्कृतीची नावं आहेत.

खडतर यात्रा

शबरीमला डोंगरावर चढून अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेणे, हा एकूण यात्रेतील एक रोमांचकारी प्रवास आहे. शबरीमला डोंगराची उंची समुद्रसपाटीपासून जवळपास दीड हजार फूट आहे. पंबा नदीपासून डोंगरावर मंदिराजवळ जाणे हा प्रवास चार किलोमीटरचा आहे. 4000 पायर्‍या चढून मंदिरापर्यंत जाता येते. हा डोंगर चढणे हे अतिशय कठीण काम आहे. हा डोंगर इमारतीच्या जिन्यापेक्षा दीडपट अधिक सरळ असून याच्या पायर्‍या चढणे हे अत्यंत कठीण काम असते. करोडो लोक हा डोंगर दरवर्षी चढत असतात. तरुण माणूससुध्दा हा डोंगर चढताना जवळपास वीस ते पंचवीस वेळा विश्रांती घेतो. म्हणजे प्रत्येक 50 ते 60 पावलं डोंगरावर चढाई केली की, माणूस बसतोच. या डोंगराची चढाई किती अवघड आहे, हे यावरून लक्षात येईल.

डोंगर चढताना अनेक भाविकांचा मृत्यू

डोंगरावर चढाई करण्याच्या दरम्यान धाप लागून अनेक भक्तांना त्रास होतो म्हणून सरकारने डोंगरावर तीन ठिकाणी कार्डिऑलॉजी सेंटर सुरू केली आहेत. येथील वैद्यकीय कर्मचार्‍यांबरोबर आम्ही चर्चा केली. त्यांनी सांगितले की, “हा अवघड डोंगर चढताना वर्षाला जवळपास 300 ते 500 माणसांना हृदयाशी संबंधित त्रास होतात आणि जवळपास 20 ते 25 लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो.” त्यामुळे ‘थकवा आल्यास डोंगर चढू नका,’ अशा सूचना देवस्थान बोर्डाने जागोजागी लिहिल्या आहेत.

हा डोंगर चढताना सर्व भाविक अय्यप्पा स्वामींच्या घोषणा देत असतात. सर्व मार्गांत ‘स्वामी अय्यप्पा : अयप्पा स्वामी’,‘स्वामी सरणम्’,‘अय्यप्पा सरणम्’,‘नाग सरणम्’,‘राजा सरणम्’ अशा घोषणांचा दणदणाट असतो. प्रवास सुरू होताना या घोषणा अधिक जोराने व उत्साहाने दिल्या जातात; पण याच घोषणांचा जोर डोंगर चढताना प्रवास जसा पुढे होईल, तसा ओसरतो.

शबरीमला डोंगर चढू शकत नाहीत, अशांसाठी डोलीसेवा उपलब्ध आहे. एका माणसाला तीन ते चार किलोमीटरचे अंतर घेऊन जाण्यासाठी डोलीसेवक तीन हजारांपासून पाच हजारांपर्यंत शुल्क आकारतात. हे डोलीसेवक किंवा पालखीचे भोई समाजातील खालच्या स्तराचे किंवा मलार्या या आदिवासी समाजाचे असतात. आदिवासी अभ्यासक प्रा. सजीव यांच्या मतानुसार अय्यप्पा स्वामींचे हे मंदिर एकेकाळी आदिवासी समाजाचे मंदिर होते; पण वैदिक आर्यांनी यावर कब्जा केला आणि जे आदिवासी या मंदिराचे व्यवस्थापक होते, ते डोलीसेवक म्हणून आज काम करीत आहेत.

शबरीमला डोंगर चढताना मध्यंतरी चहा व नाष्ट्याचे स्टॉल लागलेले असतात, तर काही तरुणांनी लोकांना मदत करण्यासाठी स्टॉल उघडलेेले आहेत. भक्तांना पाणी आणि सरबत देणे, असे उपक्रम या तरुणांच्या कडून केले जातात. याला देवस्थान बोडार्र्ची मदत असते, हे आम्हाला एका तरुणाने सांगितले.

वाटेत शबरीमलाचे एक मंदिर लागते. ही शबरीमला म्हणजे प्रा. सजीव यांनी सांगितल्याप्रमणे एक आदिवासी नायक होती. यांच्या नावाने या डोंगराला ‘शबरीमला’असे नाव पडले आहे. या शबरीचा संबंध नंतर आर्य संस्कृतीशी जोडून रामाच्या कथेतील हीच ती शबरी असा उल्ल्लेख विकीपीडियावर आहे.

बाण खोचण्याची परंपरा

वाटेत बर्‍याच ठिकाणी लाकडाचे बाण विकत मिळतात. हे लाकडाचे बाण विकत घ्यायचे व बाजूला असलेल्या एका नारळ फोडण्याच्या ठिकाणी खिडकीत खोवायचे, अशी प्रथा आहे. अय्यप्पा स्वामींच्या युध्दकलेच्या बाबतीत आठवण म्हणून हे केले जाते. बर्‍याच ठिकाणी हे बाण खोवलेले आम्हाला दिसले. संपूर्ण प्रवासात माकडांचा वावर हा इतर मंदिरांच्या सारखाच इथेही आहे आणि विशेष म्हणजे इथे डुकरांचा वावर सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. अगदी मंदिर परिसरात मुख्य मंदिराच्या आजूबाजूला डुक्कर व माकडे फिरताना दिसतात. जानेवारी 2018 च्या यात्रेत एका डुकराने भाविकांच्या वर हल्ला केला होता.

पवित्र पंबा नदीत कपड्यांचे विसर्जन

शबरीमला डोंगरावर चढण्याचा प्रवास पंबा नदीपासून होतो. शबरीमला डोंगराच्या पायथ्यापासून ही नदी वाहते. पंबा नदीच्या काठी बरीच छोटी-मोठी हॉटेल्स आहेत व एक मोठा मंडप आहे. या मंडपापर्यंत वय 10 ते 50 या वयोगटातील स्त्रियांना प्रवेश आहे.

पंबा नदीकाठी होणारे विधी व धार्मिक कार्य यात बर्‍याच गोष्टी केल्या जातात. लोक सुरुवातीला इथे येऊन पंबा नदीमध्ये अंघोळ करतात. अंघोळ करण्याअगोदर पूजेला सुरुवात होते. विधी करणारे भटजी इथे उपलब्ध असतात. ते तुम्हाला बोलवत असतात. विधी करून पंबा नदीमध्ये अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यानंतर अंगावरील काळी किंवा निळी लुंगी पाण्यातच टाकली जाते. अंगावरील कपडे नदीत टाकले जातात. यामधून नदीचे मोठे प्रदूषण होत असते. आम्ही गेलो, तेव्हा यात्रेचा प्रमुख दिवस नव्हता. अय्यप्पा स्वामींच्या वार्षिक उत्सवाचे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी हे महत्त्वाचे दिवस असतात. मकर संक्रांतीला यात्रेचा शेवटचा दिवस असतो, नंतर हे मंदिर बंद केले जाते. आमच्यासमोरच शेकडो लुंग्या पाण्यात तरंगत होत्या व जवळच एक बंधारा बांधला होता, तिथे या लुंग्या साचल्या होत्या.

कपड्यांचा लिलाव

शबरीमला डोंगराकडे जाताना वाटेत शेकडो डिजिटल फलक सरकारने लावले आहेत, ज्यावर हा संदेश लिहिला आहे की, पंबा नदीत काही टाकू नये. नदी प्रदूषित करू नका. सरकारनेच नदी प्रदूषित न करण्याचे आवाहन केले आहे; पण जेव्हा आम्ही सुकुमारन यांच्याकडे चौकशी केली की, पाण्यात टाकलेल्या या कपड्यांचे काय होते? तेव्हा आम्हाला कळाले की, सरकार दरवर्षी या कपड्यांचा लिलाव करते. नदीतील कपडे लिलाव करून विकले जातात. जवळपास पन्नास लाख रुपयांचा दरवर्षीचा हा लिलाव देवस्थान बोर्डाच्या वतीने केला जातो. एका बाजूला सरकार प्रदूषण न करण्याचे आवाहन करते, तर दुसर्‍या बाजूला या कपड्यांतून सरकारचे देवस्थान बोर्ड पैसे मिळवते.

काळा ड्रेस कोड

शबरीमला डोंगरावरील अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला जाताना स्त्रिया व पुरुष काळे कपडे परिधान करतात. पुरुषांना काळी लुंगी परिधान करावी लागते. तसेच केरळमधील भक्त निळे कपडेही परिधान करतात. सध्या भगव्याची चलती असल्यामुळे काही दिवसांपासून भगव्या रंगाच्या कपड्यालासुद्धा मान्यता मिळाली आहे. काळा, निळा व भगवा या रंगांचेच कपडे का घालतात? याची आम्ही अनेक भक्तांच्याकडे विचारणा केली, पण कोणीही याचे धार्मिक कारण सांगू शकले नाहीत. परंपरा आहे म्हणून आम्ही घालतो, असे बर्‍याच भक्तांनी उत्तर दिले. आम्ही तिघांनीही निळ्या रंगाची लुंगी व शर्ट घालूनच डोंगरावर चढाई सुरू केली.

डोक्यावर शिदाची ‘इरिमुडी’

पंबा नदीमध्ये अंघोळ केल्यानंतर डोक्यावर शिदा घेऊन डोंगर चढला जातो. या शिद्याच्या गाठोड्याला ‘इरिमुडी’ म्हणतात. यामध्ये चिरमुरे, हळद, उदबत्ती, कापूर, नारळ, तूप, तांदूळ, गुलाबपाणी व इतर पदार्थ असतात. शबरीमला डोंगरावर जाणार्‍या भाविकांच्या डोक्यावर ‘इरिमुडी’ची दोन छोटी गठुळी असतात, ती याच पदार्थ व वस्तूंची. तिथे अशी मान्यता आहे की, डोक्यावर हे असल्याशिवाय डोंगरावर चढायचे नाही. प्रत्येक भाविक ‘इरिमुडी’ डोक्यावर घेतोच घेतो. याशिवाय, मंदिराजवळ जाताच येत नसल्यामुळे आम्हीसुध्दा ही ‘इरिमुडी’ आमच्या डोक्यावर घेतली होती.

याची सुध्दा एक कथा आहे. पंदालम राजा जेव्हा या अय्यप्पाच्या दर्शनासाठी डोंगरावर आला, तेव्हा त्याने अशाच प्रकारच्या वस्तू आपल्या सोबत आणल्या होत्या. काही भांडीसुध्दा घेऊन हे लोक आले होते. त्यावेळचा प्रवास हा नक्कीच चार-दोन तासांचा नसणार आहे. कित्येक दिवस लागत असतील अयप्पा स्वामींच्या मंदिराजवळ जाण्यासाठी. वाटेत खायला पदार्थ असावेत, म्हणून ही प्रथा चालू झाली. पूर्वी लोक हातात आगीच्या मशाली घेऊन हा डोंगर चढत होते, तेव्हा आपल्या अन्नासाठी याची गरज असेलही; पण आज हे सर्व पदार्थ मंदिराजवळ नेऊन त्यांची पूजा केली जाते.

तूप वाहण्याची प्रथा

अय्यप्पा स्वामींना तुपाने अंघोळ घातली जाते. यासाठी प्रत्येक भाविक 100 ते 1000 मिलिलिटरपर्यर्ंत तूप डोंगरावर घेऊन येतात. या तुपाचा प्रचंड साठा दरवर्षी गोळा होतो. हे तूप नारळात भरून आणले जाते. नारळाच्या छिद्रामधून हे तूप नारळात भरले जाते. एक भाविक एक नारळ किंवा दहा नारळापर्यंत तूप घेऊन येतो. मंदिराजवळ आले की, हे नारळ फोडून हे तूप एका भांड्यात काढले जाते. दर्शनाला गेल्यावर हे तुपाचे भांडे दारात उभा असलेल्या पुजार्‍यांच्या कडे दिले जाते. मंदिराच्या बाहेर एका खड्ड्यात हेे नारळ टाकले जातात. याची मोठी आग या खड्ड्यात निर्माण झालेली दिसते. यामधून लाखो लिटर तूप गोळा होते, असे सुकुमारन यांनी सांगितले. नंतर हेच तूप परत देवस्थान समितीच्या वतीने लिलाव करून विकले जाते, असे सुकुमारन यांनी सांगितले. एक माणूस जवळपास 100 मिलिलिटर ते 1 लिटर तूप वाहतो. नारळाच्या वाट्या भरभरून हे तूप ओतले जाते. लाखो, करोडो रुपयांचे हे तूप तिथे वाहिले जाते.

‘मलार्या’ आदिवासी समाजाचे अभ्यासक डॉ. सजीव यांनी सांगितले की, “आदिवासी मंदिराचे कारभारी होते, तेव्हा तुपाने आंघोळ घालण्याची किंवा तूप वाहण्याची प्रथा नव्हती, तर आदिवासी लोक मध वाहत होते किंवा मधाची आंघोळ घालत असत. त्यांच्या मते, या मंदिराचे ब्राह्मणीकरण झाल्यानंतर अशा प्रथा चालू झाल्या आहेत.”

अय्यप्पांच्या प्रेमिकेचे मंदिर

अय्यप्पा स्वामी हे ब्रह्मचारी देव समजले जातात; पण त्यांच्याबरोबर आपला विवाह व्हावा, असे वाटणारी एक स्त्री होती. तिचे नाव मल्लिकापुरुथम्मा देवी. ही महिषासुराची बहीण होती. अय्यपांनी तिला पापातून मुक्त करून आपल्या मंदिराजवळ राहायला सांगितले, अशी लोककथा केरळमध्ये आहे, असे सुकुमारन यांनी सांगितले. मल्लिकापुरुथम्मा या देवीचे पण एक मंदिर अय्यप्पा स्वामींच्या मंदिर परिसरात आहे. या देवीला अय्यप्पा यांच्याबरोबर लग्न करायचे होते; पण अय्यप्पा स्वामी यांनी तिला सांगितले की, ‘शबरीमध्ये ज्या वर्षी नवीन भक्त येणार नाही, त्या वर्षी मी तुझ्याशी लग्न करेन.’ पण असे झाले नाही आणि त्यांचे लग्नही होऊ शकले नाही. शबरीमला मंदिराच्या आवारात मल्लिकापुरुथम्मा यांचे एक मंदिर आहे. भक्त शबरीमला डोंगरावर ज्या वस्तू घेऊन येतात, त्यामध्ये एक गुलाबपाण्याची बाटली घेतली जाते. हे पाणी या मंदिराच्या परिसरात शिंपडले जाते. 10 ते 50 या वयोगटातील स्त्रियांना ‘मल्लिकापुरुथम्मा’ म्हटले जाते, ज्यांना या मंदिरात प्रवेश नाही.

अय्यप्पांचा मुस्लिम शिष्य वावर स्वामी

वावर किंवा बाबर स्वामी यांचे एक मंदिर अय्यप्पा स्वामी यांच्या मंदिराच्या परिसरात आहे. त्याबरोबरच शबरीमला डोंगराकडे जाताना मध्येच शबरीमलापासून 20 किलोमीटरवर एरुमला नावाचे एक गाव लागते. त्या गावात वावर स्वामी यांच्या नावाने एक वावर मशीद आहे. शबरीमलाला जाणारा प्रत्येक भाविक या मशीद परिसरात जातो. तिथे वावर स्वामी यांचे दर्शन घेतो. मशीद परिसरात नारळ फोडण्याची जागा आहे, तिथे नारळ फोडला जातो आणि मग भक्त पुढे जातात.

वावर स्वामी यांचे अय्यप्पांशी दोन प्रकारे नाते सांगितले जाते. वावर हे मुस्लिम गुरू होते. ते अरेबियामधून मुस्लिम धर्माचा प्रसार करण्यासाठी केरळमध्ये आले; पण त्यांच्यावर अयप्पा स्वामींचा प्रभाव पडला आणि ते इथेच त्यांचे शिष्य म्हणून राहिले. दुसरी कथा सांगितली जाते ती अशी की, वावर हे आक्रमक म्हणून आले; पण अय्यप्पा यांच्याशी झालेल्या युध्दात त्यांचा पराभव झाला आणि अय्यप्पा यांच्या कार्याने प्रभावित झाले आणि इथेच थांबले.

अय्यप्पा यांच्या वेगवेगळ्या जन्मकथा

अय्यप्पा स्वामी कोण आहेत, याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. एक प्रचलित कथा सांगितली जाते की, पंदलमचा राजा राजशेखर एकदा जंगलात फिरायला गेले होते. त्यांना एक लहान मुल रडताना दिसले. ते त्यांनी घरी आणले व आपल्या राजवाड्यात आपल्या स्वत:च्या मुलांसारखा त्याचा सांभाळ केला. राजा राजशेखर यांनासुध्दा मूल नव्हते. त्यामुळे त्यांनी या मुलाला आपल्या पुत्राचा दर्जा दिला. नंतर राजा राजशेखर यांना स्वत:चे मूल झाले. मग पंदलमच्या राणी यांनी अय्यप्पा यांना सावत्र वागणूक द्यायला सुरुवात केली. एकदा राणी आजारी होत्या. राजवैद्यांनी त्यांना औषध म्हणून वाघाचे दूध घ्यायला सांगितले. मग राणीने अय्यप्पा स्वामी यांना वाघाचे दूध आणायला जंगलात पाठवले. यामागे हेतू हा पण होता की, अय्यप्पा यांचे जंगलात बरे-वाईट व्हावे व आपला मुलगा राजा व्हावा; पण अय्यप्पा स्वामी जंगलातून वाघाचे दूधच नाही, तर वाघसुध्दा घेऊन आले, म्हणूनच अय्यप्पा स्वामींचे चित्र सर्वत्र वाघावर बसलेले असते.

अय्यप्पा स्वामींची दुसरी जन्मकथा सांगितली जाते, ती म्हणजे त्यांंचा जन्म विष्णू व शिव यांंच्यापासून झाला. मा. सुप्रीम कोर्टात ‘त्रावणकोर देवास्वम बोर्ड’च्या वतीने हीच कथा सांगितली आहे. त्यानुसार या देवाचा जन्म दोन पुरुषांपासून झाला असल्याने स्त्रियांचा संबंधच कुठे येत नाही, असे मानण्यात आले आहे. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव हे भगवान विष्णू यांनी घेतलेल्या मोहिनी रुपावर मोहीत झाले आणि या दोघांच्या संबंधातून अय्यप्पांचा जन्म झाला. ‘विकीपीडिया’ किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पाहिले तर या कथेचा संदर्भ मिळतो. शिव आणि विष्णू यांच्यापासून निर्माण झालेला पुत्र म्हणून अय्याप्पांना ‘हरिहर पुत्र’ म्हणूनही ओळखतात. याशिवाय त्यांना अय्यप्पन, शास्ता, मणिकंठा या नावाने दक्षिण भारतात ओळखतात.

अय्यप्पा आदिवासींचा नायक

‘मलार्या’ आदिवासी समाजाचे संशोधक डॉ. सजीव यांना वरील दोन्ही तर्क मान्य नाहीत. ते म्हणतात की, ‘अय्यप्पा’हे आदिवासी समाजातील एक कर्तृत्ववान पुरुष आहेत. त्यांचा जन्म विष्णू व शिव यांच्यापासून झाला नाही. दोन पुरुषांच्या पासून एका नवीन जीवाचा जन्म कसा होईल? त्यांना हे मान्य नाही. त्यांच्यानुसार अय्यप्पा स्वामी यांच्या वडिलांचे नाव ‘कंदन’ व आईचे नाव ‘करुथनमला’ असे आहे. अय्यप्पा यांचे दुसरे नाव ‘मणिकंदन’ आहे. ‘मनी’ म्हणजे छोटे आणि ‘कंदन’ म्हणजे त्यांचे वडील. ‘मणिकंदन’ म्हणजे ‘छोटे कंदन’ असा अर्थ होतो. डोंगर चढताना अयप्पा स्वामींच्या नावाने जयजयकार केला जातो व वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात. त्यात ‘मनीकंदन शरणम्’अशीही एक घोषणा आजही दिली जाते, असे प्रा. सजीव यांचे मत आहे. तसेच त्यांचे असेही म्हणणे आहे की, ‘अय्यप्पा’या शब्दाचा अर्थही ‘वडिलकीचा’ असा आहे. अयप्पा यांनी आपल्या कार्यकाळात प्रजाहिताच्या एवढ्या गोष्टी केल्या की, त्यांना अयप्पा म्हणजे वडील किंवा बाप या अर्थाने लोक बोलवायला लागले. तुमच्या महाराष्ट्रात जे महत्त्व शिवाजी महाराजांना आहे, तेच महत्त्व केरळच्या ‘मलार्या’ या आदिवासी समाजात अय्यप्पा यांना आहे. नंतरच्या काळात अयप्पा स्वामी या आदिवासी देवाचे किंवा राजाचे ब्राह्मणीकरण किंवा वैदिकीकरण झाले आहे. गेल्या हजार एक वर्षांत आर्य ब्राह्मण वैदिक संस्कृतीच्या समर्थकांनी या आदिवासी संस्कृतीच्या देवत्वाचे हिंदूकरण केले, असे प्रा. सजीव यांचे मत आहे.

मंदिर आदिवासींच्या ताब्यात देण्याची मागणी

पंदालमच्या राजांनीच या मंदिराचे मुख्य तंत्री किंवा मंदिराचे ब्राह्मण म्हणून ‘थजमोन मडोमम’ या कुटुंबाला नेमले. आजही याच कुटुंबाकडे या मंदिराच्या पौरोहित्याचा अधिकार आहे. प्रा. सजीव यांचे म्हणणे आहे की, अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर व ‘त्या’ अठरा डोंगरांच्या भागातील आदिवासी संस्कृती ही एक प्राचीन भारतीय ‘मलार्या’ आदिवासी संस्कृती आहे. अय्यप्पा स्वामींच्या मंदिराला अठरा पायर्‍या आहेत. या अठरा पायर्‍या म्हणजे अठरा डोंगरांतील आदिवासींच्या किंवा अठरा डोंगरांच्या प्रतीक आहेत. अयप्पा मंदिराची रचना, तेथील पूजापध्दती आणि सर्वच विधी आदिवासी समाजाच्या चाली-रीतींशी मिळते-जुळते आहेत. ‘मलार्या’ या आदिवासी समाजात आजही असंख्य लोकांची नावं अय्यप्पा असतात. प्रत्येक घराच्या वंशात एकतरी अय्यप्पा नावाचा माणूस आहेच; पण मंदिराचे मुख्य तांत्रिक असलेल्या ब्राह्मण कुटुंबात एकाही माणसाचे अय्यप्पा असे नाव नाही किंवा त्यांच्या कोणत्याही पूर्वजाचे अय्यप्पा असे नाव नाही, असे प्रा. सजीव यांचे मत आहे. याचा कोणत्याही धर्माशी काही संबंध नाही. ‘मलार्या’ संस्कृतीचाच भाग आहे. या मंदिराची मालकी अगोदर होती तशी आदिवासी समाजाला मिळावी, अशी मागणी ते लवकरच त्यांच्या समाजाच्या वतीने करणार आहेत व या मागणीचा दावा केरळ उच्च न्यायालयात ते ‘मलार्या’ आदिवासी समाजाच्या वतीने दाखल करणार आहेत. त्यांना असा विश्वास आहे की, त्यांच्या समाजाकडे एवढे पुरावे आहेत की आम्ही तो दावा सहज जिंकू. आमच्याशी चर्चा करताना सुध्दा त्यांनी बरीच कागदपत्रं व जंगलातील इतर ठिकाणचे काही अवशेष व मूर्ती यांचे फोटो आम्हाला दाखवले. शबरीमला जंगलात प्रवास करताना बर्‍याच ठिकाणी मलारिया आदिवासी समाजाचे लोक आजही जंगलात राहताना दिसतात.

अय्यप्पा आणि बौद्ध संस्कृती

नटराजन हे केरळमधील ‘युक्तिवादी’ संघाचे कार्यकर्ते आणि दलित अभ्यासक आहेत. त्यांच्या मते, आजही या जंगलात बौध्द लेणी आहेत आणि शबरीमला डोंगरावरील अय्यप्पा स्वामींचे मंदिर हा सुध्दा एक बौध्द स्तूपच होता; पण नंतरच्या काळात याचे हिंदूकरण झाले आहे. त्यांच्या मते, मंदिराची बरीचशी रचना ही बौध्द लेण्यासारखी आहे. बरेच संशोधक व अभ्यासकांचे हेच मत आहे की, हे मंदिर बौध्द मंदिराचा भाग आहे. अय्यप्पासाठी वापरले जाणारे ‘शास्ता’ हे नाव बौद्ध संस्कृतीत आढळते. बौद्ध स्तुपास ‘शास्तालय’ही याबाबतीत बरेचसेे लेख व काही अभ्यासकांचे ब्लॉग इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

मकर ज्योतीचा चमत्कार मंदिराचे महात्म्य वाढविण्यासाठी

अय्यप्पा स्वामींचे मंदिर वर्षभर तसे बंदच असते. हे मंदिर मल्याळी कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी; याशिवाय, नोव्हेंबरपासून ते जानेवारीतील मकर संक्रांतीपर्यंत उघडे असते. साधारणतः हा सण प्रत्येक वर्षी जानेवारीच्या 14 तारखेला येतो. हा यात्रेचा शेवटचा दिवस असतो. याच काळात भक्त कडक असा 41 दिवसांचा उपवास करतात. यादिवशी भक्तांचे खास आकर्षण असते, ते मकर ज्योतीचे दर्शन. अशी मान्यता आहे की, मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सातच्या दरम्यान देवाची आरती झाल्यानंतर शबरीमला डोंगररांगांच्या मध्ये ‘पोन्नांबलमेडू’ या जवळच असलेल्या डोंगरावर एक ज्योत पेटते. या ज्योतीच्या वेगवेगळ्या कथा आहेत. ही ज्योत पहिल्यांदा परशुरामांनी पेटवली, अशी एक समजूत आहे. तर ‘मलार्या’ या आदिवासी समाजाचे अभ्यासक प्रा. सजीव यांचे मत आहे की, ही ज्योत आदिवासी पेटवत होते. अगदी शंभरएक वर्षांपर्यंत ही ज्योत आदिवासी पेटवत असत. अय्यप्पा यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पालकांना सांगितले की, मी वर्षातून एकदा तुम्हाला भेटायला येईन. म्हणून आदिवासी लोक मकर संक्रांतीला अय्यप्पा स्वामींची पूजा करण्यासाठी ‘पोन्नांबलमेडू’ डोंगरावर ज्योत पेटवतात. आदिवासी कथेनुसार, अय्यप्पा यांच्या जन्माचे स्थान पोन्नांबलमेडू डोंगर हाच आहे. त्यांचे बालपण याच डोंगरावर गेले. ही ज्योत आपोआप पेटते, अशी सध्या अंधश्रध्दा आहे. ही ज्योत पाहण्यासाठी लाखो लोक इथं जमतात. करोडो लोक यादिवशी या डोंगरावर असतात. ‘तेहलका’ या मासिकाने दिलेल्या आकडेवारीनुसार या तीन-चार दिवसांत जवळपास 3 कोटी लोक शबरीमलाला भेट देतात.

चेंगराचेंगरीत शेकडो लोक ठार

मकर ज्योतीच्या उत्सवादरम्यान वेगवेगळे अपघात होऊन बरेच भाविक ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 2011 च्या यात्रेदरम्यान मोठा अपघात होऊन जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या अगोदर 1999 मध्ये डोंगरावरील चेंगराचेंगरीत 52 आणि 1952 मध्ये 66 भाविक वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू पावल्याचा नोंदी आहेत.

मकर ज्योती आपोआप पेटते व हा एक दैवी चमत्कार आहे, ही इथली अंधश्रध्दा खर्‍या अर्थाने लोकांना आकर्षित करते. या चमत्कारामुळे हे मंदिर देशभर प्रसिद्ध झाले आहे. केरळमधील लोकांना याचे फारसे आकर्षण नाही; पण आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटकमधील लाखो लोक ही मकर ज्योती बघायला दरवर्षी जमतात.

ज्योत कशी पेटते?

गेल्या तीसएक वर्षांत या ज्योतीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. केरळमधील युक्तिवादी संघटना ही ‘मअंनिस’सारखीच अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या सुकुमारन व इतर कार्यकर्त्यांनी 1982 सालीच या ज्योतीचे वैज्ञानिक सत्य उघड केले आहे.

1981 साली सुकुमारन व सहकार्‍यांनी ही ज्योत नेमकी कशी पेटते व काय होते, याचा कसून शोध घेतला. सुकुमारन व त्यांचे सहकारी 1981 साली जंगलात ज्योत जिथे पेटते, त्या परिसरात 13 व 14 जानेवारीला गेले. एवढ्यात त्यांना तिथे फॉरेस्ट खात्याची एक जीप दिसली. ती जीप ज्योत जिथे पेटते, तिकडे चालली होती. त्यानंतर त्यांना पोलीस खाते व केरळ इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे लोकही भेटले. त्यांच्याबरोबर देवस्थान बोर्डाचे काही लोक होते. सुकुमारन त्यामध्ये सहभागी झाले. हे सर्व लोक ज्योत जिथे पेटते, तिथे गेले.

‘इलेस्ट्रेटेड विकली’ या मासिकाने 1987 मध्ये ही ज्योत मानवनिर्मित कशी आहे, याची कथा छापली आहे. यानुसार जिथे ज्योत पेटते, त्या ठिकाणी एक सिमेंटचा कठडा आहे. हा कठडा देवस्थान बोर्डनेच तयार केला आहे, असे ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात छापले आहे. या कठड्यावर ही ज्योत पेटते. एका अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यात पहिल्यांदा चिखल भरला जातो. मग त्यावर जवळपास दहा किलो कापूर टाकला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता या कापुराला आग लावली जाते. मग एक माणूस हे भांडे डोक्यावर घेतो व खाली ठेवतो. असे तीन वेळा केले जाते. मग ही आग खाली ठेवून त्यावर मोठी भिजलेली पोती झाकली जातात. तीन वेळा ही ज्योत दिसते. करोडो लोक मंदिर परिसरात यावेळी हात जोडून उभे असतात. देवाच्या ज्योतीचे दर्शन झाले म्हणून त्यांचे मन भारावून जाते. या ज्योतीचे अय्यप्पा मंदिरापासूनचे हवेतील अंतर जवळपास दहा किलोमीटर असते.

युक्तिवादी कार्यकर्त्यांनी दुसरी ज्योत पेटविली

1982 साली सुकुमारन यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत एक वेगळी शक्कल लढवली. 14 जानेवारीला मंदिरातील आरती झाल्यावर मंदिराची ज्योत पेटणारच होती. त्यांनी आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला जवळपासच्या डोंगरांमध्ये इतर काही ठिकाणी तशाच ज्योती पेटवल्या. 13 जानेवारी 1982 साली एक नाही तर 12 ज्योती डोंगरामध्ये पेटल्या. एका वेळी 12 ज्योती पेटल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले. त्यामुळे 14 जानेवारीच्या ज्योतीचे आकर्षण संपले. सगळीकडे एकच कल्लोळ पसरला. स्थानिक व राष्ट्रीय वर्तमानपत्रांत याच्या बातम्या झळकल्या. ‘ऑल इंडिया रेडिओ’ने सुध्दा याचे रिपोर्टिंंग केले. ‘हिंदू’सारख्या प्रतिष्ठित दैनिकाने याची बातमी केली व नामांकित इंग्रजी मासिकात यावर लेख आले. त्यामुळे लोकांचे बरेच प्रबोधन झाले. यानंतर युक्तिवादी संघटना व केरळमधील इतर पुरोगामी संघटना यांनी केरळमध्ये यावर बरेच प्रबोधन केले. याचा परिणाम असा झाला की, आज केरळमधील भाविक ही मकरज्योत पाहायला अत्यंत कमी असतात. 1983 साली सुध्दा सुकुमारन व त्यांच्या सहकार्‍यांनी पुन्हा डोंगरात ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला; पण पोलीस, भक्तांनी त्यांना मारहाण केली. ही मारहाण एवढी भयंकर होती की, सुकुमारन हे 3 महिने दवाखान्यात अ‍ॅडमीट होते.

युक्तिवादी संघटनेने मकर ज्योतीचे सत्य काय आहे, याचा जवळपास 30 ते 40 वर्षे पाठपुरावा केला आहे, लोकांचे प्रबोधन केले आहे. याचे चांगले फलित त्यांना 2008 साली मिळाले आहे. केरळ सरकार व देवस्थान बोर्डाने सन 2007 नंतर वेगवेगळ्या ठिकाणी हे जाहीर केले आहे की, ही ज्योत म्हणजे एक चमत्कार नसून ही ज्योत मानवनिर्मित आहे. सरकार व देवस्थान बोर्डानेच हे जाहीर करणे, हे युक्तिवादी संघटनेच्या कामाचे यश आहे. 1988 साली ‘इंडियन एक्सप्रेस’या वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या एका बातमीनुसार प्रभाकरण पिल्लई हे जन्मभर शबरीमलाला जाणारे एक भाविक आहेत. त्यांनी सांगितले की, ‘मी लहानपणापसून भरपूर वेळा इथे आलो आहे; पण मकर ज्योतीचे चमत्कार म्हणून कोणाला आकर्षण नव्हते. सर्वांना हे माहीत होते की, ही ज्योत डोंगरावरील आदिवासी पेटवतात. नंतर केरळ सरकारच्या विद्युुत विभागाकडून एका प्रोजेक्ट अंतर्गत येथील आदिवासी हे ठिकाण सोडून गेले आणि नंतर ही ज्योत इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे लोक पेटवायला लागले. नंतरच्या काळात याला चमत्काराचे स्वरूप मिळाले.’

त्रावणकोर देवस्थान बोर्डाचे न्यायालयात शपथपत्र ज्योत मानवनिर्मितच

2011 साली जवळपास तीन लाख भाविक मकरज्योतीचे दर्शन घेऊन डोंगर उतरत असताना एक जीप लोकांच्यात घुसली. यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 200 भाविक ठार झाले. ठार झालेले सर्व भाविक तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील होते. याची केस केरळ उच्च न्यायालयात दाखल झाली. अपघाताची चौकशी करताना उच्च न्यायालयाने ज्योतीच्या चौकशीचे आदेश दिले व देवस्थान बोर्डाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले. याबाबत देवस्थान बोर्डाने न्यायालयात लेखी शपथपत्र दिले आहे की, ही ज्योत मानवनिर्मित आहे. याची बातमी ‘इंडिया टुडे’या मासिकाने दिली आहे. तसेच ‘द हिंदू’या दैनिकात दि. 21 जानेवारी 2011 रोजी राधाकृष्णन कूटटूर यांचा एक लेख प्रसिध्द झाला आहे. त्यानुसार देवस्थान बोर्डाचे त्यावेळचे अध्यक्ष राजगोपाल नायर यांनी न्यायालयाला सांगितले आहे की, ही ज्योत मानवनिर्मित आहे; तसेच पंदालम राजवाडा समितीचे अधिकारी पी. रामवर्मा राजा यांनी ‘द हिंदू’ या दैनिकाला पत्र लिहून कळवले आहे की, ही ज्योत मानवनिर्मित आहे. अयप्पा मंदिरातील मुख्य तंत्री म्हणजे मंदिराचे पुजारी कंदारारू माहेश्वरू यांचे असे मत आहे की, आदिवासी लोक जंगलात राहत होते, त्यावेळी ते देवाची पूजा म्हणून ते राहत असलेल्या डोंगरावरून ही ज्योत पेटवायचे. नंतर आदिवासींनी जंगल सोडले. अय्यप्पा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. विजयकुमार यांचेही असेच मत आहे की, ही ज्योत मानवनिर्मित आहे. डी. विजयकुमार; तसेच नायर समाज सेवा संघाचे सचिव जी. सुकुमारन यांचे असे मत आहे की, ही ज्योत म्हणजे देवाची केली जाणारी दीपपूजा किंवा दीप आराधना आहे व पूर्वी ही ज्योत आदिवासी निर्माण करीत असत. त्यामुळे ही ज्योत पेटणे म्हणजे एक धार्मिक कार्यक्रम आहे, असे या सर्वांचे मत आहे.

स्त्रियांना मंदिरप्रवेशास बंदी परंपरा निराधार

शबरीमला डोंगरावरील अय्यप्पा स्वामी यांच्या मंदिरात स्त्रियांना मंदिरप्रवेश नसणे याला फारसा इतिहास नाही. बरेच वेगवेगळे संदर्भ बर्‍याच लोकांच्याकडे आहेत. मुळात हे मंदिर नेमके हिंदू परंपरेचे, बौध्द परंपरेचे की आदिवासी संस्कृतीचा भाग आहे, हे नेमकेपणाने कायदेशीर सिध्द होत नाही. अजून तशी यावर कायदेशीर तपासणी झालेली नाही; पण हा एक संदर्भ असू शकतो.

या मंदिरात स्त्रियांना कधीपासून प्रवेश नाही, याची नेमकी माहिती नाही; पण वेगवेगळे तर्क आहेत. हिंदू परंपरेला मानणार्‍या लोकांचे असे म्हणणे आहे की, या मंदिरात स्त्रियांना प्रवेश पहिल्यापासून नाही. आदिवासी समाजाचे अभ्यासक डॉ. संजीव यांचे म्हणणे असे आहे की, आदिवासी समाजाकडे मंदिराचे प्रशासकीय व पूजेचे काम होते, तेव्हा अशी स्त्री बंदीची प्रथा नव्हती. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे; तसेच हा आमच्या मागणीचाच एक भाग आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

पूर्वी मंदिरात स्त्रिया जात होत्या!

अय्यप्पा स्वामी यांच्या मंदिरात स्त्रिया जात होत्या, याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. त्रावणकोर देवस्थान बोर्डाने न्यायालयात एका अ‍ॅफिडेव्हिटमध्ये असे लिहून दिले आहे की, या मंदिरात स्त्रिया जात होत्या. सुप्रीम कोर्टानेसुध्दा यावर भाष्य केले आहे. सुप्रीम कोर्टात सुध्दा जेवढी शपथपत्रं दाखल झाली आहेत, त्यावरून हाच निष्कर्ष निघतो की, या मंदिरात या अगोदर स्त्रिया गेल्या आहेत. डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांतील उत्सवाचे दिवस सोडून इतर दिवशी या मंदिरात स्त्रिया जाण्याचे संदर्भ सापडतात.

1939 साली पंदालमच्या राजाने सहकुटुंब या मंदिरात प्रवेश केला होता, याची नोंद आहे. त्या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या राणीसाहेब होत्या, याचाही उल्लेख आहे. त्यानंतर 1990 साली त्रावणकोर देवस्थान बोर्डाच्या आयुक्त मा. चंद्रिका यांनी आपल्या नातीचा भात भरवण्याचा कार्यक्रमसुध्दा अय्यप्पा स्वामी यांच्या मंदिरात केला होता. त्यावेळी त्यांच्या मुलीचे वय 22 वर्षांचे होते. याबद्दलचे शपथपत्र त्यांनी सुप्रीम कोर्टात दिले आहे. 29 सप्टेंबर 2018 रोजीच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये हा फोटो आला आहे. हा फोटो काढलेल्या ए. पी. जॉय यांची फोटो काढल्यानंतरची गोष्टसुध्दा मोठी गमतीदार आहे. त्यांना मा. चंद्रिका यांनी विनंती केली की, हा फोटो तुम्ही प्रसिध्द करू नका; पण त्यांनी नकार दिला आणि मी हा फोटो प्रसिध्द करणार, असे सांगितले. ते राहत होते, त्या रुममध्ये एक माणूस 50,000 रुपये घेऊन आला. हा फोटो न देण्याची किंमत होती 50,000 रुपये; पण ए. पी. जॉय यांनी तो फोटो वर्तमानपत्रांना दिला आणि दुसर्‍या दिवशी हा फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द झाला. त्यानंतर मग एक वाचक हा फोटो घेऊन न्यायालयात गेला. अशी या फोटोची कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने छापली आहे. मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात या फोटोचा संदर्भ घेण्यात आला आहे.

भात भरवण्याच्या प्रथेवेळी महिलांचा प्रवेश

केरळमध्ये नवीन जन्माला आलेल्या मुलाला अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात नेऊन अन्नप्राशन संस्कार केला जातो. पहिला घास भरवला जातो, तो पण भाताचा घास भरवण्याची प्रथा आहे. याला भात भरवण्याची प्रथा म्हणतात. यासाठी बाळाच्या आईला तिथेपर्यंत जाणे आवश्यकच आहे. 1990 साली केरळ देवस्थान बोर्डाच्या आयुक्तांच्या नातीचा भात भरवण्याचा कार्यक्रम इथे झाला होता. त्यावेळी त्या बाळाची आई आणि इतर स्त्री नातेवाईक तिथे उपस्थित होते. याच्या विरोधी याचिकेचा निकाल देतानाच 1992 साली केरळ उच्च न्यायालयाने 10 ते 50 या वयोगटातील स्त्रियांना मंदिरात प्रवेशबंदी केली होती.

मंदिर प्रवेशाची न्यायालयीन लढाई

अय्यप्पा स्वामींचे हे मंदिर पहिल्यांदा प्रसिध्द होतेच; पण 2018 मध्ये हे मंदिर आणखी प्रसिध्दीच्या व चर्चेच्या झोतात आले. याला कारण होते, भारताच्या मा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. वय वर्षे10 ते 50 या वयोगटातील स्त्रियांना या मंदिरात प्रवेश दिला जात नाही. यावर ‘इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन’यांची याचिका सुप्रीम कोर्टात होती. यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाकारता येणार नाही व हे समानतेच्या तत्त्वाच्या विरोधी आहे, हे आपल्या निर्णयात सांगितले व या मंदिरात स्त्रियांना प्रवेश खुला केला.

केरळ सरकारने 1965 साली हिंदू सार्वजनिक मंदिर व पूजा ठिकाणं प्रवेश कायदा पास केला आहे. या कायद्यातील नियम 3 ब ने अयप्पा स्वामी यांच्या मंदिरात स्त्रियांना जाण्यास बंदी केली आहे. ही प्रथा तशीच चालू होती. या नियमाने भारतीय घटनेचे कलम 14, कलम 15 – 1, 15-2 ब आणि कलम 25 याला बाधा येत असून हा कायदा घटनेतील मूलभूत अधिकाराच्या विरोधी आहेत, अशी जनहित याचिका 2006 साली मा. सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. याच याचिकेचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिला आहे.

पण या अगोदर 1990 साली अशीच याचिका केरळ उच्च न्यायालयात दाखल झाली होती; पण केरळ उच्च न्यायालयाने स्त्रियांना मंदिर प्रवेशबंदी करणारा कायदा योग्य ठरवून प्रवेशावर बंदी घातली होती.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्तींच्या टिप्पणी

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. न्यायमूर्ती दीपक मिश्रा, मा. न्यायमूर्ती फली नरिमन आणि मा. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यांनी त्यांच्या निर्णयात अतिशय उद्बोधक चर्चा केलेली दिसते. त्यांनी असे म्हटले आहे की, “मूल्यं ही फक्त कागदावरच अधिक राहिली आहेत. देवत्वाच्या शोधामध्ये आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये स्त्रियांना आपल्या देशात नेहमी दुय्यम वागणूक देण्यात आली आहे. देवाची पूजा करण्याचा अधिकार लिंगभेदावर आधारित असू शकत नाही. एका बाजूला स्त्रीला देवी म्हणून पुजायचे आणि दुसर्‍या बाजूला त्यांच्यावर भक्ती करण्याच्या बाबतीत कठोर नियम करायचे, हा दुतोंडी कारभार आपण बंद करायला हवा. कोणतीही श्रध्दा आणि धर्म भेदभाव निर्माण करत नाही, तर पुरुषसत्ताक कर्मकांड स्त्रियांना दुय्यम वागणूक देताना दिसतात.”

सर्वोच्च न्यायालयातील काही युक्तिवाद

28 सप्टेंबर 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांना मंदिरप्रवेशाचा अधिकार देताना स्त्रियांना प्रवेश देऊ नये यासाठी दिलेल्या प्रमुख कारणांना नकार दिला आहे. स्त्रियांना प्रवेश देऊ नये, यासाठी प्रवेशाच्या विरोधी असणार्‍या लोकांनी दिलेली कारणं फारच शोचनीय आणि कोणत्याही विवेकी माणसाला न पटणारी आहेत.

त्यापैकी एक कारण हे होते की, अय्यप्पा स्वामींचे मंदिर आणि त्यांची सगळी परंपरा एका स्वतंत्र धर्मसंप्रदायाचा भाग आहे. या सर्व प्रथा आणि परंपरा ‘अय्यप्पा धर्माचा’ भाग आहेत आणि या सर्व गोष्टी एका वेगळ्या धर्मसंप्रदायाचा भाग असल्याने घटनेच्या 26 व्या कलमानुसार कोणत्याही धर्मसंप्रदायाला आपल्या प्रथा आणि परंपरांनुसार जगण्याचा मूलभूत अधिकार असल्याने यात कोणालाही राज्य घटनेनुसार ढवळाढवळ करता येणार नाही; पण मा. सर्वोच्च न्यायालयाने अय्यप्पा स्वामी व तेथील प्रथांना वेगळा धर्म, पंथ मानण्यास नकार दिला असून याला हिंदू धर्माचाच भाग मानले आहे आणि हिंदू धर्माच्या लोकांना असलेले सर्व अधिकार स्त्रियांनाही गृहित धरून ही स्त्रीबंदी उठवली आहे. घटनेच्या 26 व्या कलमानुसार अय्यप्पा स्वामींच्या भक्तांना वेगळा धर्मसंप्रदाय, अशी मान्यता देण्यात मा. सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

दुसरे कारण होते की, अय्यप्पा स्वामी हे स्वतः जन्मभर ब्रह्मचारी राहिले असून त्यांनी मोठी तपश्चर्या केली होती. अय्यप्पा यांनी ब्रह्मचर्य पाळले होते. त्यामुळे वय 10 ते 50 या वयोगटातील स्त्रियांना प्रवेश नसण्याची मोठी परंपरा, मान्यता आणि श्रध्दा आहे, तरी त्याचे पालन व्हावे. पंदलम राजांनी अयप्पांचे मंदिर हे कायम ब्रह्मचारी देव म्हणूनच बांधले आहे. अयप्पा स्वामींच्या मंदिरात 41 दिवसांचा उपवास आणि ब्रह्मचर्य पाळलेले भक्तच येतात. त्यामुळे इथे स्त्रियांना प्रवेश नसावा, असाही सूर होता. वर मासिक पाळीतील स्त्रियांच्या बाबतीत आणखीच आक्षेप घेतले होते. असे ब्रह्मचर्य पाळल्यामुळेच मन आणि शरीराची शुध्दता पाळली जाते, असे कोर्टाला दिलेल्या कागदपत्रांत म्हटले आहे. सर्व भौतिक सुखांच्या पासून लांब जाऊन आध्यात्मिक पातळी गाठता येते. जो भाविक असा 41 दिवसांचा उपवास करतो, तो स्वत:ला आपल्यापासून सर्व स्त्रियांना लांब ठेवतो; अगदी त्याची बायको, मुले आणि आईपासून सुध्दा तो स्वत:ला लांब ठेवतो. कोणतेही व्यसन करत नाही आणि स्वत:ला एका वेगळ्या ठिकाणी ठेवतो. स्वत:चे अन्न स्वत: तयार करतो. दिवसातून दोनदा अंघोळ करतो. दिवसातून एकदाच अन्न घेतो आणि अनवाणी चालतो. असा कडक 41 दिवसांचा उपवास करून भाविक इथे येतात. त्यामुळे स्त्रियांना इथे प्रवेश दिला तर अय्यप्पांच्या भक्तांचा राज्य घटनेचा 25 एक नुसार त्यांच्या धर्म जगण्याचा, विश्वास ठेवण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार बाधित होईल. त्यामुळे इथे स्त्रियांना प्रवेश देऊ नये.

यावर, स्त्रीमुळे कोणताही धर्म बाधित होण्याचे काही कारण नाही, असा निर्णय मा. सुप्रीम कोर्टाने देऊन हा मुद्दा निकाली काढला आहे. स्त्रीला मंदिरात प्रवेश नाकारायचा, हा हिंदू धर्माचा भाग नाही. त्यामुळे ही प्रथा धार्मिक आहे आणि धर्माचा अतिशय विशेष भाग असल्याने तो बदलता येणार नाही, असे नाही. तसेच वय 10 ते 50 या वयोगटातील स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला, म्हणून कोणतीही सार्वजनिक नैतिकता, आरोग्य किंवा शांतता धोक्यात येणार नाही.

अय्यप्पा धर्म असा वेगळा काही तरी एक संप्रदाय आहे, हे मानण्यास मा. न्यायालयाने नकार दिला असून तो हिंदू धर्माचाच भाग मानला आहे. मासिक पाळीच्या काळातील स्त्रीमुळे कोणतीही नैतिकता किंवा शुध्दता भंग होत नाही, असाही निष्कर्ष दिला आहे. स्त्री, पुरुष वेगळे आहेत आणि त्यात काहीतरी भेद आहे, हे तत्त्व हिंदू धर्माचा भाग नाही. सर्वांत महत्त्वाचे राज्य घटनेने स्त्रियांना समान मानलेले आहे आणि हा त्यांचा मूलभूत अधिकार धर्म, परंपरा, संप्रदाय, संस्कृती, श्रध्दा आणि ब्रह्मचर्याच्या नावाखाली हिरावून घेता येणार नाही, अशी मतं मा. न्यायालयाने नोंदवली आहेत. मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसणे, ही एक अपवादात्मक व प्राचीन परंपरा आहे, हे सुध्दा मा. न्यायालयाने मान्य केले नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मा. न्यायालयाने कर्मकांडं बदलतात आणि त्यामुळे कोणता धर्म संपत नाही किंवा धर्माच्या मूळ गाभ्यावर काही परिणाम होत नाही, असे मत मांडले आहे.

स्त्रीबंदीच्या समर्थकांनी; आणि विशेषकरून या मंदिराच्या तंत्री म्हणजे पौरोहित्य करणार्‍यांनी मा. सुप्रीम कोर्टात हे सांगितले की, धर्माच्या परंपरेनुसार आणि आयुर्वेदानुसार मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना आरामाची गरज असते आणि शारीरिकद़ृष्ट्या अशुध्द असतात. त्यामुळे त्या 41 दिवसांच्या उपवासाचे पवित्र काम करू शकत नाहीत आणि ही धर्मातील एक जुनी सर्वत्र पाळली जाणारी गोष्ट असल्यामुळे तिला धार्मिक परंपरेचा आणि श्रध्देचा आधार मिळावा. मासिक पाळीच्या काळात स्त्रिया अशुध्द असतात. इतर भाविकांचे ब्रह्मचर्य भ्रष्ट होऊ नये आणि त्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून स्त्रियांना प्रवेश नसावा, असा दावा करण्यात आला. मंदिराच्या अठरा पायर्‍या चढताना देवाला वाहण्यासाठी ज्या पवित्र वस्तू आणल्या जातात, त्यांची पवित्रता सुध्दा भ्रष्ट होऊ नये म्हणून स्त्री बंदी आहे, असाही एक मुद्दा मांडण्यात आला. नैतिकतेचे रक्षण झाले पाहिजे, अशी घटनेचीच अपेक्षा असल्याने ही प्रथा म्हणजे धार्मिक नैतिकतेचाच भाग आहे, त्यामुळे याचे रक्षण होणे आवश्यक आहे. आणखी एक विचित्र मुद्दा यात पुरोहितांनी मांडला होता, तो म्हणजे ज्या वेळी देवाची भक्तिभावाने आराधना केली जाते, प्रार्थना केली जाते, देवाला हाक मारली जाते, त्यावेळी मंदिर परिसरात स्त्रिया असतील तर ती आराधना, हाक आणि प्रार्थना देव ऐकणार नाहीत आणि भक्ताची अडचण दूर व्हायला मदत होणार नाही, म्हणजे देव हाकेला ओ देतीलच, असे नाही. ते पुरोहितांच्या हातात नाही. याला त्यांनी ‘देवप्रसन्नम्’असा शब्द वापरला आहे, म्हणजे मंदिर परिसरात स्त्रिया असतील तर देव प्रसन्न होणार नाहीत, असे त्यांना म्हणायचे होते.

हे सर्व मुद्दे मा. सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहेत. स्त्रियांना मंदिरात प्रवेश न देणे हे त्यांच्या धार्मिक उपासनेच्या अधिकाराचे हनन आहे आणि हे मान्य करता येणार नाही, असे म्हटले आहे. मंदिरात प्रवेश करणे आणि देवाची पूजा करणे, हा प्रत्येक हिंदूचा त्याच्या जात, प्रांत आणि लिंगभेदाचा विचार न करता अधिकार आहे. नैतिकता ही एखाद्या व्यक्तीला, समूहाला किंवा धर्मगटाला काय वाटते, यावर ठरू शकत नाही; तर घटनात्मक नैतिकतेला उच्च मानले गेले पाहिजे. त्यामुळे स्त्रियांना प्रवेश न देणे हे घटनात्मक नैतिकतेच्या विरोधी आहे. घटनात्मक नैतिकता ही माणसात भेद करणारी असणार नाही. व्यक्तीचा सन्मान हा समूहाच्या नैतिकतेपेक्षा गौण असू शकत नाही. समानता या घटनेच्या मूल्याच्या विरोधी ही परंपरा आहे.

मा. सुप्रीम कोर्टाचा 450 पानांचा हा निर्णय वाचताना बर्‍याच वेळा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘आम्हीच खरे धार्मिक’ या व्याख्यानाची आठवण होते ती याचमुळे. नीतिमान आणि विवेकी समाजनिर्मिती, हेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अंतिम ध्येय असल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या लिखाणात वारंवार मांडले आहे आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात हेच म्हटले आहे की, स्त्रियांना कोणताही भेदभाव न करता मंदिरात प्रवेश मिळावा, हीच धार्मिक आणि घटनात्मक विवेक आणि नीतिमत्ता आहे.

सुप्रीम कोर्टाने कोणत्या गोष्टी नाकारल्या?

मा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाहिला तर आपल्याला लक्षात येते की, मा. कोर्टाने धार्मिक श्रध्दांत हस्तक्षेप केलेला नाही, तर श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक स्पष्ट केला आहे. कोणत्या गोष्टी धार्मिक असू शकतात आणि कोणत्या गोष्टी धार्मिक असू शकत नाहीत, याची चर्चा सुप्रीम कोर्टाने केली आहे. मा. कोर्टाने स्त्रियांना मंदिरात प्रवेश देताना नेमक्या कोणत्या गोष्टी नाकारल्या, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आपल्या घरातील स्त्रिया आपल्या सहचारिणी म्हणजे आपली आई, बहीण, मुलगी, बायको या अशुध्द आहेत, ही गोष्ट सुप्रीम कोर्टाने नाकारलेली आहे. मासिक पाळीच्या काळात त्या अशुध्द आणि अपवित्र असतात. आपली आई, बहीण, बायको आणि मुलगी या अनैतिक गोष्टींचे मूळ आहेत. त्या कोणाचे तरी ब्रह्मचर्य नष्ट करतील, त्या वासनेचे मूळ आहेत. समाजातील अनैतिकतेचे मूळ आपल्या घरातील स्त्रिया आहेत, महिलांसंबंधी या सर्व गोष्टी कोर्टाने नाकारल्या आहेत. आपल्या घरातील आपल्या सर्व सहचारिणी या अशुध्दतेचे मूळ आहेत, हा विचारच अनैतिक आणि अविवेकी आहे, असे आपल्याला वाटत नाही का? या सर्व गोष्टी नाकारणे म्हणजे आपला धर्म बुडणार, धर्माचे अस्तित्व संपणार, धर्माची ओळख नष्ट होणार, आपली श्रध्दा, आस्था, परंपरा, संस्कृती आणि विश्वास या गोष्टी आता इतिहासजमा होणार, असे होऊ शकते का? याचा आपण शांततेने आणि विवेकाने विचार करायला पाहिजे.

मा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे आपली आई, बहीण, मुलगी आणि बायको यांचा तो माणूस म्हणून झालेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. मा. सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की, स्त्री अशुध्द आणि अपवित्र असते. असे होत नाही. त्या तशा असू शकत नाहीत. त्या तेवढ्याच माणूस आहेत, जेवढे आपण सर्व पुरुष माणूस आहोत. त्यांच्या सर्व शारीरिक क्रिया आपल्याएवढ्याच नैसर्गिक आणि सहज आहेत. त्याला शुध्द-अशुध्दतेची कोणतीही मोजपट्टी लावणे, हे कायद्यात, शास्त्रात, विज्ञानात, धर्मात, परंपरेत आणि संस्कृतीत कुठेच बसत नाही. आस्थेच्या आणि श्रध्देच्या नावाखाली अविवेकी विचार करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचे आपण स्वागतच केले पाहिजे.

सावित्रीच्या दोन लेकींचा मंदिरप्रवेश

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केरळमधील प्रा. बिंदू अम्मिणी आणि कणकदुर्गा या दोन महिलांनी पोलीस बंदोबस्तात अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात प्रवेश केला. त्यामुळे केरळमधील सामाजिक वातावरण तापले. या दोन महिलांना आम्हाला भेटायचे होते. मंदिर प्रवेशाबाबत त्यांचे अनुभव ऐकायचे होते. म्हणून आम्ही प्रा. बिंदू यांच्याशी संपर्क केला. त्यांनी आम्हाला कोझीकोड या जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यास सांगितले.

कोट्टायमपासून आठ तासांचा रेल्वे प्रवास करून आम्ही दोघे कोझीकोडला पोचलो. 400 वर्षांपूर्वी कोझीकोडच्या समुद्रकिनार्‍यावर वास्को-द-गामाने पहिले पाऊल टाकले होते आणि भारताचा शोध लावला होता. कोझीकोड येथे आमचे स्वागत केरळा युक्तिवादी संघमचे ज्येष्ठ कार्यकर्ते टी. पी. मणी यांनी केले. त्यांच्यासोबत आम्ही कोट्टायम सेंट्रल टाऊन हॉल येथे गेलो. तेथेच मुलाखतीसाठी प्रा. बिंदू आम्हास भेटणार होत्या.

मुलाखतीची सुरुवात करण्याआधी आम्ही या धाडसी कृतीबद्दल प्रा. बिंदू यांचे महाराष्ट्र अंनिसच्या वतीने अभिनंदन केले. त्यांना महाराष्ट्र अंनिसने शनी शिंगणापूर येथे महिलांना मंदिर प्रवेश देण्याबद्दल केलेल्या आंदोलनाची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर मुलाखतीस सुरुवात झाली.

राज्यघटनेच्या समानतेच्या तत्त्वाची अंमलबजावणी करण्यासाठी माझा मंदिरप्रवेश अ‍ॅड. बिंदू

मॅडम, आपल्या विषयी थोडक्यात जाणून घ्यायला आम्हास आवडेल

माझे शिक्षण एलएल. एम. झाले असून मी कोझीकोड शासकीय विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. माझा आंतरजातीय विवाह झाला असून माझे पतीही चळवळीतील कार्यकर्ते आहेत. मी पूर्वी कम्युनिस्ट पक्षात काम करीत होते. पण काही कारणाने मी ते सोडून सध्या दलित चळवळीत सक्रिय झाली आहे.

मंदिरप्रवेशामागची आपली नेमकी काय भूमिका होती?

मी विद्यार्थी दशेपासून चळवळीत कार्यरत असणारी कार्यकर्ती आहे. घटनेतील समानतेच्या हक्काची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मी मानते. म्हणूनच मी शबरीमला डोंगरावरील अय्यप्पा मंदिरात प्रवेश केला. माझे असे म्हणणे आहे की, अय्यप्पा मंदिर हे मुळात हिंदू मंदिर नाही, तर त्या भागातील मलार्या आदिवासी समाजाचे ते एक मंदिर आहे आणि अय्यप्पा स्वामी हे सुद्धा आदिवासी देवच आहेत. काही शतकापूर्वी या मंदिराचे ब्राह्मणीकरण झाले. या मंदिरात आदिवासी परंपरेनुसार स्त्रियांना मंदिर प्रवेश आहेच.

माझ्या मंदिरप्रवेश करण्यामागची दोन कारणे आहेत. एक भारतीय राज्यघटनेची आणि समानतेच्या तत्त्वाची अंमलबजावणी करणे आणि दुसरे म्हणजे या मंदिराच्या खर्‍या आदिवासी परंपरेत स्त्रियांना प्रवेश होताच त्या खर्‍या आदिवासी परंपरांच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा मी मंदिरात प्रवेश केला.

तुम्ही प्रत्यक्ष मंदिरात कसा प्रवेश केला?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी असे घोषित केले की, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास केरळचे राज्य सरकार कटिबद्ध आहे. ज्या महिला अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छितात त्यांना पोलीस संरक्षणात मंदिर प्रवेश दिला जाईल.

त्यानंतर मी व कणकदुर्गा दि. 24 डिसेंबरला तडक पोलीस स्टेशनला हजर होऊन पोलिसांना सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या व मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा. आम्हाला मंदिरात घेऊन चला. पण पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला समजावण्यासाठी चार तास घालविले. पण आम्ही दोघी आमच्या निर्णयावर ठाम होतो. आम्ही दोन महिला मंदिर प्रवेश करणार ही बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरली. हजारो भक्त डोंगरावर जमा झाले. त्यांनी आमची वाट रोखून धरली. एवढ्या मोठ्या भक्तांच्या समोर पोलिसांचे काही चालले नाही. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन मंदिरापासून लांब सोडले. हा आमचा पहिला प्रयत्न फसला.

त्यानंतर तुम्ही काय केले?

मी आणि कणकदुर्गाने अशी शपथ घेतली होती की, काहीही करून मंदिरात प्रवेश घ्यायचाच त्याशिवाय परत घराकडे जायचे नाही. आमच्या मंदिरप्रवेशाच्या बातमीमुळे केरळमधील सामाजिक वातावरण अधिकच चिघळले. त्यामुळे आमच्या दोघींच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे आम्ही केरळ राज्यातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही कर्नाटकातील कोडगू या गावी जाऊन आठ दिवस राहिलो.

एवढ्या प्रचंड विरोधातही तुम्ही मंदिरप्रवेश कसा केला?

कोडगूवरून स्पेशल टॅक्सीने रात्रभर प्रवास करून दि. 3 जानेवारी 2019 च्या पहाटे आम्ही पुन्हा मंदिराजवळ पोचलो. 3 जानेवारीच्या पहाटे पोलिसांनी आम्हा दोघींना गुप्तपणे व्ही.आय.पी. मार्गाने अय्यप्पा मंदिरापर्यंत पोचविले आणि आम्ही दोघींनी अय्यप्पा स्वामीचे दर्शन घेतले. दर्शनाच्या वेळी रांगेतील सर्वसामान्य भक्तांनी आम्हास अजिबात विरोध केला नाही. उलट आम्हास पिण्यासाठी पाणी दिले.

30 वर्षे न्यायालयीन लढाई लढून मिळविलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही दोघींनी केली.

तुमच्या मंदिरप्रवेशानंतर तुम्हाला काय विरोध झाला?

अय्यप्पा मंदिरात प्रवेश केल्यानंतर मला समाजातील कट्टरवादी लोकांच्या टिकेला सामोरे जावे लागले. पोलिसांनी काही काळ मला संरक्षण दिले. परंतु नंतर ते मी नाकारले. सोशल मीडियावरून मला प्रचंड प्रमाणात ‘ट्रोल’ करण्यात आले. माझे अश्लील फोटो सोशल मीडियात पसरविण्यात आले. अगदी काही पोर्न साईटवरही माझे फोटो क्रॉप करण्यात आले. माझा फोन नंबरही त्यासोबत देण्यात आला. विरोधकांनी माझे चारित्र्यहनन मोठ्या प्रमाणात केले, जेणेकरून विरोधकांना हे दाखवायचे होते की, ही एक अपवित्र बाई आहे आणि हिच्यामुळे मंदिर अपवित्र झाले आहे. या सर्व गोष्टींचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला. कोणाचेही निनावी फोन, फोनवर अश्लील मेसेज येणे, आपले फोटो वाईट अवस्थेत ट्रोल झाल्याचे पाहणे हे अत्यंत त्रासदायक होते. मन आणि भावना हेलावून आणि पिळवटून टाकणारे होते. माझा ‘ट्रोल’ होण्याचा अनुभव फारच वाईट आहे. काही अनुभव तर फारच विदारक आहेत. जे मी सांगू शकणार नाही आणि तुम्ही छापू शकणार नाहीत.

पण या काळात माझ्या पतीने आणि कुटुंबाने आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी मला खूपच सहकार्य केले. माझ्या सोशलमीडियातील बदनामीविरुद्ध मी पोलिसांत तक्रार केली; परंतु पोलिसांनी त्याची म्हणावी तितकी दखल घेतली नाही.

मंदिरप्रवेशानंतर आता तुमची काय भूमिका आहे?

आपण काहीतरी चुकीचे केले, उगाच या भानगडीत पडलो, असे वाटत नाही. जे केले त्याचा सार्थ अभिमान वाटतो. हे कुणीतरी करणे आवश्यक होते. आमच्या या मंदिर प्रवेशामुळे भविष्यात स्त्रियांना धार्मिक बाबतीत समानतेची वागणूक मिळेल. स्त्री असणे ही एक अस्पृश्यता आहेच; पण अस्पृश्य समाजातील स्त्री असणं हे त्याहून भयानक आहे. तुम्हाला माणूस म्हणून जगताच येऊ नये, अशी व्यवस्था केलेली आहे. या देशातील लोकांना माणूस म्हणून ओळख ही राज्यघटनेने निर्माण करून दिलेली आहे. त्याची अंमलबजावणी करणे, हे प्रत्येक भारतीयाचे काम आहे, असे मी मानते आणि भविष्यात परत हे करण्याची संधी मिळाली, तर नक्की परत एकदा मंदिरात जाईन.

प्रा. बिंदूच्या या निर्धाराला आम्ही सलाम करून आम्ही अंगडीपुरम या गावाकडे बसने प्रवास सुरू केला. या गावातच मंदिर प्रवेश केलेली दुसरी महिला राहते. तिचे नाव कणकदुर्गा. अंगडीपुरम हे गाव मल्लपुरम या जिल्ह्याच्या ठिकाणी येते. हा जिल्हा म्हणजे केरळमधील सोन्याचे आगार आहे. येथील अनेक लोक गल्फ देशामध्ये नोकरी करतात.

चार तासांच्या बस प्रवासानंतर आम्ही दोघे अंगडीपुरमला पोचलो. बस स्टॉपवर आम्हाला नेण्यासाठी कणकदुर्गाच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस अधिकारी आले होते. त्यांना आम्ही भेटीचा उद्देश सांगितला. ते आम्हाला कणकदुर्गाच्या घरी घेऊन गेले. एका छोट्या निसर्गरम्य टेकडीवर कणकदुर्गाचा टुमदार बंगला आहे. आमच्या रिक्षाचा आवाज ऐकून कणकदुर्गा बाहेर गेट उघडण्यासाठी आल्या. त्यांनी आमचे हसत स्वागत केले. चहापान झाल्यानंतर मुलाखतीस सुरुवात झाली.

माझ्या मंदिरप्रवेशानंतर कुटुंब आणि समाजाकडून माझा छळ कणकदुर्गा

कणकदुर्गा मॅडम, तुमच्याविषयी थोडं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल

माझे शिक्षण बी.कॉम. झाले असून मी केरळ सरकारच्या रेशनिंग विभागात नोकरी करते. मला दोन मुलं आहेत. माझे पती हे सरकारच्या बांधकाम विभागात आर्किटेक्टर आहेत.

मी लहानपणापासूनच धार्मिक आहे. देवावर माझा विश्वास आहे आणि आजही मी सर्व धार्मिक गोष्टीमध्ये सहभाग घेते. माझे सासर आणि माहेर दोन्हीकडेही धार्मिक वातावरण आहे. केरळमधील उच्च अशा नायर समाजाचे आम्ही आहोत. आमच्या घरात आजही सोवळे-ओवळे पाळले जाते. सर्व धार्मिक विधी, कर्मकांडे केली जातात.

तुम्ही धार्मिक विचारांच्या असूनही मंदिरप्रवेशाचा निर्णय का घेतला?

माझे वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे माझ्यामध्ये थोडा सुधारणावादी विचार रुजला आहे. मी जरी धार्मिक असले तरी मला धर्माचे नाव घेऊन आज सुरू असलेल्या अनिष्ट प्रथा, परंपरा मला पटत नाहीत. माझ्या माहेरच्या घरात तर पूर्वी दलितांना प्रवेश नव्हता. पण हे मला लहानपणी पटायचे नाही. पण मी या बाबतीत काही बोलू शकत नव्हते.

स्त्रियांच्या मासिक पाळीला अपवित्र मानून त्यांना मंदिर प्रवेश नाकारणे मला अजिबात मान्य नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मला खूप आनंद झाला. या निर्णयाची अंमलबजावणी कोणीतरी केली पाहिजे, असे मनोमन वाटू लागले.

आपण मंदिरप्रवेशाच्या आंदोलनात कशा सहभागी झालात?

मी रोजचे ठरलेले जीवन जगत असताना 2018 साली सुप्रीम कोर्टाचा अय्यप्पा स्वामी यांच्या मंदिरात स्त्रियांनाही प्रवेश द्यावा, हा निर्णय आला. हा निर्णय आल्यावर केरळचे सामाजिक जीवन ढवळून निघाले. माझ्याही मनात वेगवेगळे विचार येत होते. फेसबुक आणि इतर सोशल मीडियामध्ये मी इतर लोकांची मतं जाणून घेत होते. पण मी सुरुवातीपासून एक केले होते की, आपली मतं कुठेही व्यक्त केली नव्हती; फक्त इतरांची मतं मी वाचत होते.

डाव्या चळवळीतील श्रेयस या तरुण कार्यकर्त्याने ‘केरळ रिनेसान्स गो टू शबरीमला’ या नावाचे ‘नवोधन केरलम शबरीमला’ हे फेसबुक पेज चालू केले होते. मी हे फेसबुक पेज वाचायला आणि ’फॉलो’ करायला सुरुवात केली. त्यातनूच याच विचारांचा असलेला एक व्हॉट्सअ‍ॅप गु्रप मी ‘जॉईन’ केला. हे करत असताना मी सासरी एकही गोष्ट सांगितली नाही. माझ्या पतींपासूनसुध्दा हे सगळे लपवून ठेवले होते. कारण ते खूपच धार्मिक कर्मकांड करणारे आहेत.

यातच ‘मनीथी’ या तमिळनाडूतील एका पुरोगामी विचारांच्या महिलांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला आणि अयशस्वी झाला. मग असाच प्रयत्न आणखी होणार आहे, हे मला या व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर समजले. या व्हॉट्सअ‍ॅप गु्रपमधील जेवढे लोक होते, त्यांचे हे वैशिष्ट्य की यातील सर्व लोक केरळच्या विविध भागातील होते आणि यातील एकही माणूस दुसर्‍या माणसाला आपल्या आयुष्यात कधी भेटला नव्हता. कोणी कोणाला ओळखत नव्हते. पण अय्यप्पा स्वामी मंदिरात स्त्रियांचा मंदिर प्रवेश झाला पाहिजे आणि यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, या निश्चयाने भारावलेले हे लोक होते.

या ग्रुपमधील 5 महिला अय्यप्पा स्वामी मंदिरात प्रवेश करण्यास तयार झाल्या. त्यांची एक मीटिंग त्रिशूरचे डॉ. प्रसाद यांच्या घरी बोलवली. त्या मीटिंगला मी गेले होते. या पाच महिलांपैकी तीन महिलांनी या आंदोलनातून अचानक माघार घेतली. त्यामुळे मी आणि प्रा. बिंदू या दोघीच अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी गेलो. दि. 3 जानेवारीला पोलीस बंदोबस्तात आम्ही अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात प्रवेश करून अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले.

मंदिरप्रवेशानंतर तुमचा कुटुंबाकडून आणि समाजाकडून प्रचंड छळ झाला, असे आम्ही ऐकले आहे, हे खरे आहे का?

मंदिरप्रवेशानंतर बिंदू आणि मला वेगळ्याच सामाजिक संघर्षाला सामोर जावे लागले. त्यात प्रा. बिंदू यांना त्यांच्या समाजाकडून आणि कुटुंबाकडून थोडी कमी झळ सोसावी लागली. मला मात्र याबाबतीत कोणीच सवलत दिली नाही. मंदिर प्रवेशानंतर मी घरी गेल्यानंतर माझ्या सासूने मला प्रचंड मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर मी कोर्टात जाऊन घराचा ताबा मिळविला. कोर्टाने घराचा ताबा दिल्यानंतर माझ्या सासरकडचे सर्व लोक या घरातून बाहेर गेले. त्यांनी गावातच एक घर भाड्याने घेऊन वेगळा संसार सुरू केला. माझे पती, माझी दोन मुलं मला सोडून गेली. सासरकडच्या लोकांनी मला प्रचंड त्रास दिला, माझा अपमान केला. माझ्या पतीने माझ्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले, ते माझ्या दोन्ही लहान मुलांनाही भेटू देत नाहीत. मार्च 2019 पासून मी आपल्या दोन मुलांना भेटू शकले नाही. मी एकटीच या घरात पोलीस संरक्षणात राहते. आजूबाजूला आमच्या नायर समाजाची मोठी वस्ती आहे. पण शेजारचे लोकही माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या पतीने स्वत:हून माझ्या विरोधात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. कायदेशीरपणे त्यांना मला सोडून द्यायचे आहे.

सासरची ही अवस्था तर माहेरीही असेच आहे. माझा एक भाऊ माझ्याशी बोलत नाही. त्याने मला माहेरी येऊ नको, असे सांगितले आहे. भावाच्या दबावामुळे आईनेही माझ्याशी बोलणे टाळले आहे. माझा एक दुसरा भाऊ कोर्टात लिपीक म्हणून काम करतो, तो थोडा पुरोगामी विचारांचा आहे. तो तेवढा माझ्याशी संवाद ठेवून आहे. पण त्यालाही मला माहेरी बोलावण्याचे धाडस होत नाही. माझे कम्युनिस्ट विचारांचे वडील सध्या हयात नाहीत. नाहीतर त्यांनी याप्रसंगी मला खूप आधार दिला असता.

सासरच्या मंडळींनी माझ्याशी संबंध तोडल्यामुळे त्यांना समाजात खूप मोठा मान मिळतो. माझ्यासारख्या धर्मबुडव्या महिलेला सजा केल्याचे त्यांना हे बक्षीस आहे. माझा नायर समाजही माझ्या पूर्ण विरोधात आहे. या विरोधामुळे मला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. मी सध्या पोलीस संरक्षणात जीवन व्यतित करीत आहे.

तुमच्या विरोधातील काही अनुभव सांगाल का?

आमचे अंगडीपुरम हे गाव मंदिराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. माझ्या घराजवळच एक मोठे मंदिर आहे. या मंदिरासमोरून मी जाताना पंडित आले तर ते मंत्र पुटपुटतात, रस्ता बदलतात. एकदा तर एक पंडित मी समोर आल्यानंतर माझ्याकडे बघून थुंकला.

कट्टरतावादी लोकांनी माझे फोटो काही राजकीय नेत्यांसोबत क्रॉप करून सोशल मीडियात टाकले. माझे काही राजकीय नेत्यांबरोबर अनैतिक संबंध आहेत, असे मेसेज फिरविले. हरएक प्रकारे माझी बदनामी आणि छळ चालू झाला. वेगवेगळ्या फोन नंबर्सवरून अश्लील फोन व मेसेज येत होते, हे सत्र सहा महिने सुरू होते. माझ्या भावाने यातील काही गोष्टी बंद केल्या.

काही चांगले अनुभव सांगा

मला काही चांगले अनुभवसुद्धा आले. माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनी मला खूपच सहकार्य केले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी माझे कोणतेही नुकसान केले नाही, मला कसलाही त्रास दिला नाही. त्यामुळे मी आजही नोकरी करू शकते.

माझ्या नायर समाजातील महिला कुठे दिसल्या तर माझ्याशी बोलत नाहीत, जवळ येत नाहीत; पण लांबूनच हाताचा अंगठा उभा करून ‘वेल डन’ असा मेसेज देतात. एस. टी. तून प्रवास करताना मी कणकदुर्गा आहे, हे कळल्यावर काही स्त्रिया उठून दुसरीकडे बसतात, तर काही तरुण मुली हातात हात देतात. माझ्या कामाचे कौतुक करतात. अनेक कॉलेज तरुणी माझ्यासोबत सेल्फी घेतात. या तरुणींना माझ्यासोबत फोटो घ्यावासा वाटला म्हणजे मी काहीही चुकीचे केले नाही, तर आपण एक आदर्श कृती केली आहे, असे मला वाटते.

केरळमधील एक सुप्रसिद्ध लेखिका लक्ष्मी राजीव यांनी शबरीमलावर एक पुस्तक लिहिले, त्यावेळी त्या पुस्तक प्रकाशन समारंभास मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने मला अनेक समविचारी मित्र-मैत्रिणी मिळाल्या, त्याच मला आधार देतात. याच मैत्रिणी आता माझे नवीन कुटुंबीय झाल्या आहेत.

आपण केलेल्या या मंदिर प्रवेशाचा आपणास पश्चात्ताप होतो का?

अजिबात नाही, मंदिर प्रवेशाच्या निर्णय मी अत्यंत विचारपूर्वक घेतला होता. या निर्णयामागे माझे पती व कुटुंब उभे राहणार नाही, याची मला जाणीव होती. पण मंदिर प्रवेशानंतर एवढा मोठा कुटुंबाकडून आणि समाजाकडून विरोध होईल, असे वाटले नव्हते. यामुळे मला मोठी कौटुंबिक किंमत चुकवावी लागली. परंतु माझ्या मंदिर प्रवेशामुळे केरळातल्या स्त्री चळवळींना आता अधिक गती आलीय. मी मंदिर प्रवेशाची केलेली कृती कायदेशीर, घटनात्मक आणि धार्मिकसुद्धा आहे, असे मला वाटते.

यानिमित्ताने माझ्या पुरोगामी विचारांच्या वडिलांचा थोडासा कृतिशील वारसा मी चालविला, याचा मला अभिमान वाटतो.

कणकदुर्गांशी संवाद साधून आम्ही भारवून गेलो. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीमाई फुलेंनी धर्मांधांच्या शिव्या आणि शेणगोळे सहन केल्याची आठवण झाली. कोणीतरी पायातील दगड झाल्याशिवाय समतेची इमारत उभी राहू शकत नाही, हे खरे. प्रा. बिंदू आणि कणकदुर्गा यांचा समतेच्या इमारतीच्या पायात भक्कम सहभाग आहे, याची नोंद इतिहास घेईल.

छापता छापता

आम्ही शबरीमला मंदिराला भेट देऊन आल्यानंतर परवाच पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रवेशाच्या विरोधात दाखल झालेल्या फेरयाचिकावर निर्णय दिला. जुन्या निर्णयाचा अधिक अभ्यास करण्यासाठी हे प्रकरण सात सदस्यांच्या खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय झाला. आजच्या आधुनिक युगात भारतात महिलांना मंदिरात प्रवेश द्यायचा की नाही, या गोष्टीवर न्यायालयात लढाई लढावी लागते, हे भारतात आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दर्शविणारे आहे, असे वाटते.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘ही लढाई दशकांची नाही, तर शतकांची आहे!’

या अवघड लढाईत आपल्या सर्वांची साथ असावी.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना आम्हास राजकीय किंमत चुकवावी लागली. – कॉ. पी. के. चित्रभानू

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून केरळचे राजकीय वातावरण तापले. सध्याच्या कम्युनिस्ट सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. दोन महिलांना पोलीस बंदोबस्त देऊन त्यांचा मंदिरप्रवेश घडवला. त्यानंतर अय्यप्पा भक्तांनी आपल्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले. नायर सोशल सर्व्हिस (एन.एस.एस.) ही संघटना या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली. केरळमध्ये नायर समाजाचे राजकारण, अर्थकारण यावर वर्चस्व आहे. ब्राह्मण समाजानंतर हाच समाज येथे पुढारलेला आहे. या मंदिर प्रवेशाविरोधात लाखो महिलांना रस्त्यावर उतरवून सरकारचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनाविषयी केरळच्या राज्य शासनाची आणि कम्युनिस्ट पक्षाची काय भूमिका होती, हे जाणून घेण्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे स्टेट कमिटी मेंबर अ‍ॅड. पी. के. चित्रभानू यांची आम्ही भेट घेतली. अ‍ॅड. चित्रभानू हे कोट्टायम येथील सुप्रसिद्ध वकील आहेत. त्यांचा डाव्या पुरोगामी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असतो. या आंदोलनाविषयी अधिक माहिती देताना अ‍ॅड. चित्रभानू म्हणाले की, “अय्यप्पा स्वामींच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना आम्ही जबरदस्त राजकीय किंमत चुकविली आहे. मंदिरातील महिला प्रवेशाच्या बाबतीत आमच्या पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मक राहिली आहे. त्यामुळे आम्ही महिलांना मंदिरात प्रवेश द्यावा, या बाजूचेच होतो.”

शबरीमला आंदोलनादरम्यान विरोधकांनी आम्हाला ‘नास्तिकांचे सरकार’ म्हणून हिणवले. आम्ही हिंदूविरोधी आहोत, असा अपप्रचार न करता, आम्ही नास्तिक आहोत, असा प्रचार विरोधकांनी चाणाक्षपणे केला, त्यामुळे केरळमधील मुस्लिम व ख्रिश्चन मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे लोकसभेला डाव्या पक्षाचे उमेदवार पडले. या आंदोलनामुळे आम्हाला मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली. पण आम्ही डगमगलो नाही. विरोधकांच्या अपप्रचाराचा आणि महिलांच्या सन्मानाचा मुद्दा आम्ही वर्षभर लावून धरला. महिलांना मंदिरप्रवेश द्यावा म्हणून संपूर्ण केरळ राज्यात अभूतपूर्व अशी महिलांची मानवी साखळी उभी केली. त्यामुळे मंदिर प्रवेशाच्या बाजूनेही केरळमधील महिला वर्ग आहे, असा संदेश देशभर गेला.

परवाच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत डाव्या पक्षाचा आमदार शबरीमला परिसरातील मतदारसंघातून निवडून आला. त्यामुळे आम्हाला असे वाटते की, लोकांना आता समजले आहे की, शबरीमला मंदिर प्रवेश आंदोलन या विषयाला राजकीय रंग देऊन लोकांच्या भावना भडकावल्या गेल्या. आमच्या डाव्या सरकारविरोधात भ्रम निर्माण केला होता तो या पोटनिवडणुकीतील विजयातून दूर झाला.

मंदिरप्रवेशाच्या समर्थनार्थ अभूतपूर्व मानवी साखळी

शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलांच्या विरोधात धार्मिक संघटनांनी हजारो महिलांना रस्त्यावर उतरविले. महिलांच्या विरोधात महिलाच असे चित्र निर्माण केले.

सुप्रीम कोर्टाच्या या सुधारणावादी निर्णयामागे केरळमधील महिला वर्ग आहे, असा संदेश देणे जरुरीचे होते. म्हणून केरळमधील डाव्या जनसंघटनांनी ‘केरळ प्रबोधन चळवळ’ या नावाची एक चळवळ सुरू केली. यामध्ये डावे पक्ष, दलित संघटना आणि समाजातील सर्व स्तरांतील लोक सहभागी झाले होते. स्त्रिया, सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, कॉलेजचे विद्यार्थी आणि काही ठिकाणी परदेशातून आलेले पर्यटक सुध्दा सहभागी झाले होते. ही मानवी साखळी जवळपास सहाशे वीस किलोमीटर लांब होती. कासारगोड या उत्तरेतील गावापासून केरळची राजधानी तिरुअनंतपुरमपर्यंत ही मानवी साखळी होती. माणसाला लागून माणूस उभा होता. यामध्ये स्त्रियांची संख्याच प्रचंड होती. या सर्वांची एकच मागणी होती मा. न्यायालयाने स्त्रियांच्यावरून मासिक पाळीचा हा कलंक हटवलेला आहे. त्याचा सन्मान सर्वांनी करून स्त्रियांना मंदिरात प्रवेश द्यावा. ‘लिंगभेद नष्ट करा’, ‘स्त्री माणूस आहे’, ‘बहिष्कार आणि असमानतेच्या विरोधी केरळ’, ‘पुरुषसत्ताक समाजाचा निषेध असो’ अशा अर्थाचे पोस्टर यात सहभागी झालेल्या स्त्रियांनी आपल्या हातात घेतले होते. जवळपास तीस लाख स्त्रिया या मानवी साखळीमध्ये सहभागी झाल्याचा अंदाज आहे. ही मानवी साखळी उभा करण्यामध्ये स्थानिक राज्य सरकारच्या पक्षाच्या वेगवेगळ्या जनसंघटनांचा सक्रिय सहभाग होता. या मानवी साखळीचा परिणाम केरळमधील समाजमनावर झाला आणि लोक विचार करू लागले. सर्वसामान्य लोकांचे मतपरिवर्तन सुरू झाले. सुरुवातीला असलेला विरोध नंतर कमी होऊ लागला, असे चित्र निर्माण झाले.