तू डाकीण आहेस, माझ्या मुलाला मंत्र-तंत्राने आजारी पाडलंस… तुला मी राहू देणार नाही… अशी धमकी देत सुकलाल पावराने स्वत:च्या सख्ख्या भावजयीचा चिकीबाईचा डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून निर्घृण खून केला. ही घटना जुन्या पुरातन काळाची नसून ज्या दिवशी जगभर ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे जागतिक प्रेमदिवस साजरा केला जात होता, त्याच 14 फेबु्रवारीला महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीबहुल धडगाव तालुक्याच्या गावालगतच्या वडफळी गावात घडली. एक 53 वर्षीय प्रौढ महिला डाकीण या अंधश्रद्धेने पछाडलेल्या मानसिकतेची बळी ठरली. जगात महाशक्तीची स्वप्ने पाहणार्या भारतीय समाजाला आत्मचिंतन करायला भाग पाडणार्या या घटनेने अजूनही आपले पाय अंधश्रद्धेच्या गर्तेत किती खोलवर रुजले आहेत, याची जाणीव करून दिली. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता यापासून आपण किती कोसो दूर आहोत, हे चित्रही अधिक स्पष्ट झाले.
या घटनेचा तपशील असा- नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा हे दोन तालुके 100 टक्के आदिवासी तालुके आहेत. यातील धडगाव या तालुक्याच्या गावाच्या पूर्वेकडे दोन किलोमीटर अंतरावर, म्हणजे अगदी गावालगतच वडफळी हे गाव आहे. या गावात चिकीबाई ही महिला आपले पती, मुलगा, सून आणि नातवंडांसोबत गेली अनेक वर्षे राहत होती. घरची परिस्थिती बरी. पती उदयसिंग मकडू पावरा हे जिल्हा बँकेत शिपाई पदावर नोकरीला. मुलगा एकच सुनील, एस.वाय.बी.ए.पर्यंत शिक्षण करून आता शेती करतोय. त्याचाही विवाह झालेला. ज्योती, बायशी आणि आरती अशा तीन मुली.. तिघींचीही लग्नं होऊन त्या त्यांच्या गावी सुखाने नांदत आहेत. नोकरीला असलेला पती, घरी शेती करणारा मुलगा, सून आणि नातवंडे असा सुखी परिवार, आदिवासी भागातील दारिद्य्र पाहता, हे कुटूंब म्हणजे सुखी कुटूंब.
शेजारीच उदयसिंग यांचा लहान भाऊ सुकलाल पावरा राहते. ती शेती करते. त्यांचे आणि उदयसिंग यांचे कौटुंबिक नाते अतिशय चांगले. त्यातल्या त्यात दीर आणि भावजयीचे संबंध अतिशय चांगले. आर्थिक अडचण असताना अनेकदा पती उदयसिंग यांना न सांगता चिकीबाई दीर सुकलालला मदत करीत होती. सण-समारंभ, सुख-दु:ख या सर्वांत दोन्ही कुटुंबांत स्नेह होता.
दीर सुकलालचा मुलगा जेलसिंग हा शेजारच्या जिल्ह्याच्या ठिकाणी धुळे येथे दहावीत शिकतो. 9 फेब्रुवारीला त्याच्या मित्रांनी त्याला घरी आणले. त्याच्या मानसिकतेत बदल झाला होता. तो असंबद्ध बडबड करीत होता. त्याची नजर बदललेली होती. माझ्या पोटात कोणीतरी हाडे टाकलीत, मी मरून जाईन असे तो म्हणत होता. शाळेत दहावीच्या पूर्वपरिक्षेचे पेपर झाले होते. त्यातील एका पेपरमध्ये त्याने माझी चूक झाली. मला माफ करा असे लिहिले. डोक्यात अनामिक ताण घेऊन आणि मनात भीती घेऊन आलेल्या जेलसिंगला बघून कुटूंब अस्वस्थ झाले. न जेवणारा, न झोपणारा आणि अनाकलनीय बडबड करणार्या जेलसिंगला काय झाले? लक्षणावरून हा एक मानसिक आजार आहे; पण आदिवासी भागात मात्र हा आजार नूसन ही बाधा आहे. बाहेरची बाधा, असा गैरसमज आहे. एखाद्या डाकीण असलेल्या महिलेने मंत्र मारून मुलाला आजारी केले. हा पक्का गैरसमज. अशावेळी गावात काही अनुभवी नागरिक एकत्र बसून कोणत्या बुडवूकडे म्हणजे मांत्रिकाकडे जावे हे ठरवतात. आजारी जेलसिंगच्या अंगावरून ज्वारीचे दाणे ओवाळून ती पुडी मांत्रिकाकडे नेतात. त्या मूठभर दाण्यांना बघून, त्यातील एक-एक दाणा बाजूला करीत मांत्रिक बाधेचे कारण सांगतो. मग ठरले. धडगाव तालुक्यातीलच निगदी नावाच्या गावातील मांत्रिकाकडे जाण्याचा निर्णय झाला. यासाठी पाड्यावरील प्रत्येक घरातून एकाने येणे आवश्यक असते. ज्या घरातील व्यक्ती म्हणजे पुरुष सोबत मांत्रिकाकडे आला नाही, तर त्याच कुटुंबातील स्त्री डाकीण आहे, असा संशय घेण्यात येतो; मग सर्वच जातात. एकूण 52 सदस्य हे निगदी गावी मांत्रिकाकडे गेल्याची माहिती आम्हाला मयत चिकिबाईच्या मुलाने दिली. दरम्यान मुलगा हा मानसिक रुग्ण आहे, हे गावातील स्थानिक प्राथमिक शिक्षकाने सांगितले आणि मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्याला धुळे येथेच मानसोपचार तज्ज्ञाकडेही नेण्यात आले. औषधोपचार झाले. खरे तर नीट व नियमितपणे औषधोपचाराने जेलसिंग बराही झाला असता; पण अंधश्रद्ध मानसिकतेने पछाडलेल्या सुकलालला यामागील तथाकथित बाधेचे कारण शोधणे आवश्यक वाटत होते. कोणत्या महिलेने मंत्र-तंत्र करून माझ्या मुलाची अशी बिकट स्थिती केली, तिला मी सोडणार नाही, अशी जाहीर बडबडही त्याने केली.
बुडवूकडे गेल्यावर आलेल्या 52 लोकांनी मुलाच्या आजारपणामागचं कारण सांग आणि त्याला बरं कर, अशी याचना केली. नेेहमीप्रमाणे बुडवूने डाकीणमंत्राने जेलसिंगला बाधित केलंय असं सांगितलं. नाव फोडू का? असाही आत्मविश्वास दाखविला. हे ऐकून सुकलालची शंका आता त्याच्या दृष्टीने खरी ठरली. घरी आल्यावर आधी भावाच्या सुनेवर म्हणजे सुनीलच्या पत्नीवर बायणीबाईवर डाकीण असल्याचा आरोप केला; पण नंतर मात्र हा आरोप भावजय चिकीबाईवर केला. दारू पिऊन चिकीबाईला मारण्याची धमकी देऊ लागला. तू डाकीण आहेस, माझ्या मुलावर मंत्र-तंत्र केला, तुला मी सोडणार नाही, असे जाहीर सांगू लागला. व्यसन करून बडबड करणारा सुकलाल असे भयानक काही करेल, असे कधी चिकीबाई किंवा भाऊ उदयसिंग यांना वाटले नव्हते.
अगदी शेजारीच राहणार्या सुकलालच्या घरी 14 फेबु्रवारीला घरातून रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून चिकीबाई, सून बायणीबाई, मुलगा सुनील आणि काही लोक धावत-पळत घरात आले. मुलगा खाटेवर होता. मुलाच्या तब्येतीची चौकशी करू लागले, दारू पिऊन मनात भयंकर राग धरून असलेल्या सुकलालने खाटेचं लाकूड हातावर घेऊन ‘चिकीबाईवर तू डाकीण आहेत, माझ्या मुलावर मंत्र-तंत्र केलास,’ असे म्हणत जोराने वार केला. चिकीबाई तेथेच खाली कोसळली. सुकलालला सुनीलने, बायणीबाईने आवरण्याचा प्रयत्न केला, त्यांना न जुमानता पुन्हा डोक्यात वार केले. चिकीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तेथेच गतप्राण झाली. गाडी मागवून चिकीबाईला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आयुष्यभर कष्ट करून आता सुखी जीवन जगणार्या चिकीबाईचा अंधश्रद्ध मानसिकतेने बळी घेतला. ज्या सुकलालला अडीअडचणीत मदत केली, सुख-दु:खात साथ दिली, त्यानेच घात केला. एक कुटुंबच उद्ध्वस्त केलं.
9 ते 14 फेबु्रवारी अशा केवळ सहा दिवसांत हे सारं घडलं. सहा दिवसांत होत्याचं नव्हतं झालं. तुम्ही धडगावला जर आलात, तर आधुनिक झाल्याची खूण सांगणार्या अनेक बाबी तुम्हाला दिसतील. मोबाईलपासून ते नव्या पद्धतीच्या जीन्स पँटपर्यंत. नवी हेअरस्टाईल ते नव्या वाहनांपर्यंत; पण हा बदल वरवरचा झाला. आतला मेंदू मात्र तसाच राहिला. अंधश्रद्धेने पछाडलेला. मध्युयगीन मानसिकतेतला. नवी दृष्टी, नवा विचार न स्वीकारणारा, चिकित्सा नाकारणारा. वर्ष 2003 ते 2010 अशी सतत पाच वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने व्यापक प्रबोधनाची मोहीम आपण राबविली. नंदुरबार जिल्ह्याचे प्रशासन, विविध समााजिक संस्था, संघटना यांच्या सहभागाने भारतात कुठेही न राबवली गेली, अशी विविधांगी प्रबोधनाची साखळी संघटनेने तयार केली. शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पाडासेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी, ‘महसूल’चे अधिकारी कर्मचारी, गावातील पोलीस पाटील, महाविद्यालयीन युवक-युवती अशा सर्व प्रमुख समाजघटकांचे आपण प्रशिक्षण घेतले. विविध नवनव्या कल्पना लढवत कार्यक्रमांचे सातत्य ठेवले. शेकडो महिलांना डाकीण ठरवणार्या मांत्रिकाचा चंपालाल महाराजाचा भांडाफोड केला. आता हा विषय आपण बर्यापैकी कमी केला, असा आमचा विश्वास होता. एखाद्या सामाजिक अंधश्रद्धेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीची एक नवी पद्धत आपण यानिमित्ताने विकसित केली, असे आम्ही सांगत होतो; पण या घटनेने आम्हीही सुन्न झालो. आपण शोधलेले उत्तर हे अपूर्ण आहे, असे वाटू लागले. या विषयात अजून खूप काही करणे बाकी आहे, याची जाणीव झाली.
जेव्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. केशव पावरा यांच्यासह बाधित कुटुंबाला प्रत्यक्ष आम्ही भेट दिली, तेव्हा कुटुंबाची वेदना ऐकणं भयंकर अस्वस्थ करणारं होतं. डाकीण जेव्हा मंत्र शिकते, तेव्हा पहिला प्रयोग हा घरातीलच कुणावर करते, असा समज आहे. म्हणून बहुधा घरातीलच, जवळच्या नात्यातीलच महिलांना डाकीण ठरवतात. याच्याही पुढचा भयानक असा भ्रम म्हणजे डाकीण असलेली स्त्री आपल्या मुलींना हा मंत्र शिकवून जाते. त्यामुळे चिकीबाईच्या तिनही मुली खूप ताणात आहेत. आम्हाला आमच्या गावातही आता डाकीण ठरवले जाईल, अशी त्यांना भीती आहे. आम्ही यापुढे कसे जगू? असा निरूत्तर करणारा प्रशन त्या आपल्याला विचारतात. हा प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यात भीती, दहशत, चिंता, मदतीची आस असे अनेक भाव दिसतात. त्याला आपणाकडे ठोस उत्तर नसतं. ‘ताई, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुम्हाला मदत करू,’ असे आपण सांगत असतो; पण हे उत्तर त्यांचं रक्षण करण्यात असमर्थ ठरणारं आहे, याची आपल्याला कल्पना असते. याने आपण अधिकच हतबल होतो. त्याच दिवशी धडगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. भादंवि कलम 302 सह जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला. फरार झालेल्या आरोपी सुकलालला अटक करण्यात आलीय. सध्या तो पोलीस कस्टडीत आहे. त्याने गुन्हा कबूल केलाय. या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी पुरावे असल्याने गुन्हा सिद्ध होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस उपनिरीक्षक दहिफडे याचा तपास करीत आहेत. प्रत्यक्षदर्शीचे जबाब घेणे, अन्य तपशील गोळा करणे आदी कामे पोलीस ठाण्याकडून सुरू आहेत.
पोलीस ठाण्यात जाऊन अधिकार्यांची भेट घेतली. वरील माहिती मिळाली; पण डाकीण ठरवणारा मांत्रिक मात्र अजूनही पोलीस रेकॉर्डवर नाही. सखोल चौकशी करून मांत्रिकाचा शोध घ्यावा, त्यालाही सहआरोपी करावे, अशी आपण मागणी केलीय. पुरावे मिळाल्यास ही मागणी नक्की पूर्ण करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. तसेच चिकीबाईच्या मुलींनाही पुढे डाकीण ठरवून त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या गावच्या पोलीस पाटलांना याबाबत अवगत करावे, अशीही मागणी आपण केलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलंय. पुढील काळात पोलीस अधिकार्यांसह वडफळी गावात जाऊन यापुढे कोणत्याही मांत्रिकाकडे न जाण्याबाबत गावकर्यांना पटवून तसा संकल्प घेण्याबाबत एक बैठक बोलावण्याचाही निर्णय घेण्यात आलाय.
संघटना म्हणून आक्रमक प्रबोधनाची मोहीम पुन्हा सुरू करण्याचा आपण संकल्प सोडलाय. विशेषत: आदिवासी भागातील युवक आणि युवतींना सोबत घेऊन या डाकीण प्रथेच्या विरोधात त्यांनाच उभे करण्याचा यापुढे प्रयत्न असेल. पुन्हा जिल्हा प्रशासन, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि आरोग्य व शिक्षण या दोन विभागांचा सहभाग आवर्जून त्यात घेण्यात येईल. व्यसन आणि मानसिक आजारांबाबतचे अज्ञान हा प्रश्नही सार्वत्रिकच आहे. डोक्यात वार केला, तेव्हा सुकलाल हा दारूच्या नशेत होता, तेव्हा पुढील प्रबोधनात व्यसन आणि मानसिक आजारांबाबत नेमके प्रबोधन केले जाईल. मुळाच व्यसन हाच एक मानसिक आजार आहे, याची प्रभावी मांडणी सातत्याने समाजासमोर करण्याची तीव्र गरज आहे.
2002 साली धडगाव तालुक्यातीलच केलीबाई पटले या वृद्ध महिलेचा डाकीण ठरवून खून झाला होता आणि मग संघटनेने या प्रश्नाला वाचा फोडली. 17 वर्षांनी पुन्हा आपण तेथेच येऊन थांबलो की काय, असे वाटावे अशी स्थिती आहे; पण निराश न होता, आपण पुन्हा जोमाने कामाला लागू या. ज्या समाजात स्त्री ही मुक्त आणि स्वतंत्र असेल, मानव म्हणून मान्यता असेल आणि डाकीण म्हणून हिणवली जाणार नाही, संपवली जाणार नाही अशा समाजाच्या निर्माणासाठी कटिबद्ध होऊ या.
लेखक संपर्क : 9403259226