Categories
अभिवादन

पडद्यामागचा कार्यकर्ता – वैजनाथ कोरे

वार्षिकांक - २०१९

वैजनाथ कोरे हे सुरुवातीपासून युवक क्रांती दल, राष्ट्रसेवा दल, ‘महाअंनिस’साठी वेळ देत असत. पण सर्वांत जास्त वेळ ते ‘महाअंनिस’ला देत असत. त्याचबरोबर ‘महाअंनिस’ला त्यांनी फार मोठी मदत केलेली आहे, आणि तीही सातत्याने. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वतीने त्यांना ‘आधारस्तंभ’ म्हणून अनेक वेळेला गौरविले होते.

‘महाअंनिस’च्या लातूर शहर शाखेचे अध्यक्ष वैजनाथ केरबा कोरे यांचे शुक्रवार, दि. 11 /10/2019 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचं जेवढं नुकसान झाले; किंबहुना तेवढेच नुकसान महाराष्ट्र अंनिसचेही झाले आहे. आपल्या चळवळीमध्ये अध्यक्ष हे सन्मानाचे पद आहे. त्यांनी प्रत्यक्ष कामात वेळ दिला नाही तरी चालते. मात्र त्यांच्या नावाचा चळवळीला अप्रत्यक्षपणे फायदा होतो; परंतु वैजनाथ कोरे हे अपवादात्मक शहराध्यक्ष होते. ते कार्याध्यक्ष किंवा तरुण कार्यकर्त्यांपेक्षा अधिक काम करीत होते. अंनिसचा विचार त्यांच्या रक्तात, हाडामांसात भिनलेला होता. चळवळीला सर्वांत जास्त वेळ देणारे, देणग्या व जाहिराती जमा करणारे, वार्तापत्राचे वर्गणीदार करणारे, आंतरजातीय विवाहाच्या व्यवस्थेमध्ये पुढाकार घेणारे ते एक बिनीचे कार्यकर्ते होते. वक्तशीरपणा, निगर्वी, त्यागी, प्रामाणिक, चळवळीसाठी झोकून देऊन तन-मन-धनाची वेळ देऊन जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणारे ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं. कार्यकर्ता म्हणून जे-जे गुण अंगी असायला हवे, ते ते सर्व गुण कोरे सरांच्या अंगी होते. असे ध्येयवेडे कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया फार अवघड आहे. एक हजार कार्यकर्त्यांवर प्रबोधन प्रशिक्षणाद्वारे प्रक्रिया सुरू केली, तर त्यातून एखादाच कार्यकर्ता घडू शकतो आणि असा घडलेला कार्यकर्ता जाणं म्हणजे चळवळीची फार मोठी हानी होत असते, असे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, वैजनाथ कोरे हे असे परिपूर्ण सर्वगुणसंपन्न कार्यकर्ते होते.

लातूर शहर महाअंनिसची दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहू महाविद्यालयात साप्ताहिक बैठक असते. वैजनाथ कोरे हे बहुतांश बैठकांना सर्वांच्या अगोदर हजर राहायचे. त्याप्रमाणे शुक्रवार, दि. 11/10/2019 रोजी ते साप्ताहिक बैठकीला उपस्थित होते. चर्चेत सहभाग घेतला. बैठक सायंकाळी 7.15 वाजता संपताच सर्वांना त्यांनी चहा पाजला. सर्व कार्यकर्ते आपापल्या घरी गेले. कोरे सरांचा दररोज सायंकाळी क्रीडा संकुलामध्ये वॉकिंग करण्याचा नित्यनेम होता. ते बैठक संपवून क्रीडा संकुलावर गेले. तिथल्या नियमाप्रमाणे गाडी बाहेर रोडवर लावून क्रीडा संकुलामध्ये पायी चालत गेले. दररोज त्यांचा एक पाच-सात जणांचा ग्रुप असतो. पण त्यादिवशी नेमके कोणीही आले नव्हते. त्यांनी एक राऊंड मारून परत चालत गेटकडे निघाले व गेटच्या 15 ते 20 फूट अगोदरच ते चालत-चालतच रस्त्यावर कोसळले. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराने ज्याठिकाणी कोसळले, तेथेच त्यांचा जीव गेला म्हणून जाहीर केले. परंतु कुटुंबीयावर एकदम आघात होऊ नये म्हणून त्या रात्री उशिरापर्यंत गुप्तता पाळली. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू आहेत, आपण यावे, असा निरोप सर्व नातेवाईकांना दिला. दुसर्‍या दिवशी दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैजनाथ कोरे हे सुरुवातीपासून युवक क्रांती दल, राष्ट्रसेवा दल, ‘महाअंनिस’साठी वेळ देत असत. पण सर्वांत जास्त वेळ ते ‘महाअंनिस’ला देत असत. पुरोगामी परिवर्तनवादी संस्था, संघटना पक्षकार्यकर्ते यांच्यात त्यांचे जवळिकतेचे नाते जोपासले होते. त्यांनी आपलं घर नळदुर्ग, सेवालय हासेगाव, वंचित विकास संस्था, बहुजन हिताय वसतिगृह, लातूर यांना; त्याचबरोबर ‘महाअंनिस’ला त्यांनी फार मोठी मदत केलेली आहे, आणि तीही सातत्याने. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने त्यांना ‘आधारस्तंभ’ म्हणून अनेक वेळेला गौरविले होते. ते बांधकाम व्यावसायिक संघटनेचे काही काळ अध्यक्ष होते. अहिल्यादेवी होळकर वधू-वर सूचक मंडळाचे पदाधिकारी होते. ‘युक्रांद’च्या चळवळीत असताना लातुरात त्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता. आणीबाणीच्या काळात ते एकोणीस महिने नाशिक रोडच्या जेलमध्ये कैदी होते. याबाबत त्यांनी कुठेही गाजावाजा केलेला नाही. ते प्रसिद्धीपासून दूर राहून ‘पडद्या’मागील किंवा ‘नॉन रिवॉर्डिंग’ जॉब करण्यात त्यांचा रस असायचा.

वैजनाथ कोरे शिस्तीच्या बाबतीत ते अत्यंत कठोर, पण तेवढेच मृदु स्वभावाचे, सर्वांशी जवळचे नाते जोडणारे, मित्र, कार्यकर्ते व समविचारी समव्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी सतत भेटी व चर्चा यांचे सातत्य ठेवायचे. त्यांनी एम.आय.डी.सी.मध्ये एक एकर शेती घेतली. तेथे बोअरला खूप पाणी लागले. त्यावर सर्व प्रकारची फळझाडे, भाज्या, ज्वारी, गहू ते घ्यायचे; पण फार कमी उत्पन्न घरी जायचे. ते मित्र कार्यकर्त्यांना घरी नेऊन देत असत. हुरडा पार्टीचे आयोजन करायचे. लातूरला पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न होता. सांगलीहून रेल्वेने पाणी मागवावे लागले. त्यावेळी कोरे सरांच्या बोअरला भरपूर पाणी होते. तेव्हा मी व अनेक कार्यकर्ते यांनी फोन केला की, पाण्याची गाडी पाठवून पाणी पुरवायचे, तेही पूर्णत: मोफत. अगदी डिझेलचेही पैसे घ्यायचे नाहीत. असा दिलदार स्वभावाचा कार्यकर्ता गेल्याने सर्वांच्या मनाला हुरहूर लागून राहिली.

वैजनाथ कोरे यांना सार्वजनिक आदरांजली व्यक्त करण्यासाठी दि.18/10/2019 रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्यात प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी राजर्षी शाहू व शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने कॉ. डॉ. विठ्ठल मोरे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रामराव गवळी पत्रकारांच्या वतीने, प्राचार्य मधुकर मंडे लोकलढा, हम लोग लहू शक्ती आणि बहुजन क्रांती दल, श्रावणकुमार चिद्री आर्य समाज, रुक्साना मुल्ला राज्य महिला सहभाग, बबिता वाकड, पांडुरंग देडे राष्ट्र सेवादल, रामकुमार रायवाडीकर कष्टकरी सभा, नजिउल्ला शेख प्राथमिक शिक्षक संघटना, सतीश सातपुते जिवलग फौंडेशन, बाबा हलकुडे, अनिल दरेकर, लातूर जिल्हा अंनिस, दिलीप आरळीकर, ‘युक्रांद’ व राज्य मिश्र विवाह विभाग, माधव बावगे, यांनी महाअंनिस राज्य कार्यकारिणीच्या वतीने आदरांजली व्यक्त केली.