Categories
अभिवादन

शहीद डॉ.दाभोलकरांचे विचारधन सातासमुद्रापल्याड नेणार्‍या – सुमन ओक

वार्षिकांक - २०१९

डॉ. दाभोलकरांच्या बहुतेक लेखांचा व भाषणांचा अनुवाद सुमन ओक यांनी केला. त्यातूनच डॉक्टरांचा परिचय अमराठी वाचकांना होऊ शकला. डॉक्टरांच्या लेखात व भाषणात अस्सल मराठी शब्दांची व मराठी समाजातील, संतवाङ्मयातील उदाहरणांची रेलचेल असे. मराठी भाषेच्या सौंदर्याला धक्का न लावता इतर भाषांत अनुवाद करत असताना फार मोठी कसरत करावी लागते. परंतु सुमन ओक यांना मात्र या गोष्टी सहजपणे जमत असत. त्यांच्या इंग्रजीतील अफाट वाचनामुळे नेमके शब्द त्यांना सापडत होते.

पुरोगामी, विवेकवादी व मानवतावादी विचारांना प्राधान्य देणार्‍या सुमन ओक (1929-2019) यांचे 25 ऑक्टोबर रोजी निधन झाल्याच्या बातमीने मन हेलावले. त्यांच्या आठवणीने मन सुन्न झाले. आपल्या चळवळीच्या एका खंद्या पुरस्कर्तीला आपण आज मुकत आहोत, याची जाणीव झाली. इंग्रजीतून मराठीत वा मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना सोप्या-सोप्या शब्दांत व मूळ लेखाच्या आशयाला कुठलाही धक्का न लावता वाचकांपर्यंत लेख पोचवण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती. मृदु स्वभाव व कुठल्याही प्रकारचा डामडौल नसलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व यांच्यामुळे आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वावरताना त्या कधीच परक्या वाटल्या नाहीत.

मानवेंद्र रॉय यांनी स्थापन केलेल्या ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ संघटनेच्या सभासद असताना जस्टीस आर. ए. जहागीरदार, जस्टीस व्ही. एम. तारकुंडे, जी. जी. पारीख, इंदुमती पारीख, म. कृ. सामंत, नारायण देसाई यांसारख्या प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी पुरोगाम्यांच्या बरोबर त्यांनी काम केले. विवेकवादी विचारांचा त्यांनी प्रसार केला, भरपूर लेखन केले, विवेकवादावरील अनेक विषय हाताळले. 70च्या दशकात रॅशनॅलिस्ट चळवळ जोरात होती. समविचारी संघटनांना आर्थिक बळ देत कार्यप्रवृत्त करणे, संघटनेतील कार्यकर्त्यांचे मनोबल टिकविणे, त्यांच्यात उत्साह निर्माण करणे, ही त्या काळाची गरज होती. सुमन ओक यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ही गरज ओळखून अनेकांना कार्यप्रवृत्त केले. रॅशनॅलिस्ट कार्यकर्त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्रीस्वातंत्र्य, अंधश्रद्धामुक्त जीवनपद्धती, दैववादाला नकार आदी प्रकारच्या मूल्यांवर विश्वास असल्यामुळे त्यांनी स्वतःचेच नव्हे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही जीवन जगण्याची एक वेगळी दृष्टी दिली. कार्यकारणभाव तपासूनच निर्णय घेण्याचे आत्मबल दिले.

सामाजिक कार्य करण्याच्या तीव्र तळमळीमुळे शक्य तिथे व शक्य तितक्या संधी सुमन ओक शोधत असत. त्यामुळे निवृत्तीनंतर त्या पुण्यात आल्या-आल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर काम करण्याचे ठरविले. या समितीच्या कार्यात त्यांच्या अंगभूत इंग्रजी व मराठीतील लेखन करण्याच्या कौशल्यांना व त्यांनी विश्वास ठेवलेल्या मूल्यगुणांना वाव देणारे पोषक वातावरण होते. त्यामुळे त्या आयुष्याच्या शेवटपर्यंत समितीसाठी कार्य करत राहिल्या.

त्यांना समितीच्या स्त्रीस्वातंत्र्याविषयीच्या धोरणाचे अतिशय कौतुक वाटत होते. त्यांनीच ‘लोकसत्ते’साठी लिहिलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे, “…कारण स्त्रिया त्यांच्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीमुळे, गुदमरून टाकणार्‍या वातावरणामुळे अंधश्रद्धांना जास्त सहजपणे बळी पडतात; एवढंच नव्हे, तर अंधश्रद्धेचे त्यांच्यावर झालेले संस्कार त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात; कित्येक वेळा त्या पार पाडीत असलेल्या पूजाअर्चा, कर्मकांडे निरर्थक आहेत, वेळ-पैसा-मेहनत यांचा अपव्यय त्यामध्ये होतो, हे पटूनसुद्धा त्यांना यातून बाहेर पडता येत नाही. स्त्रियांचं प्रबोधन हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातील मोठा हिस्सा होता.”

अजून एका लेखात स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचे विश्लेषण करत असताना माणसाला आपली बुद्धी गहाण ठेवायला उद्युक्त करणं, हा अंधश्रद्धेचा खरा धोका आहे. त्यातून शोषण करणार्‍यांना रान मोकळं सापडतं आणि स्त्रियांच्या बाबतीत तर स्वतःची बुद्धी वापरणं, हा जणू गुन्हाच मानला जात असल्याने त्यांचं शोषण फारच सुलभ असतं. परंपरागत धार्मिक-सांस्कृतिक संस्कारातून व्रतवैकल्यं आणि कर्मकांडं मोठ्या कसोशीने पाळणं म्हणजे आपली ‘महान’ संस्कृती जपणं, हे जसं केवळ स्त्रियांचंच कर्तव्य मानलं जातं, तसंच त्यामागच्या भाकडकथा खर्‍या मानून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचविणं, हेही स्त्रियांचं कर्तव्यच आहे, असं स्त्रियाही मानतात. कुटुंब, समाज, धर्म या सर्वच बाबतीत स्त्रीला दुय्यम स्थान असतं, असे लिहिलेले आहे.

स्त्रियांच्या या मनोवृत्तीला त्यांनी सर्व धर्मांना आरोपीच्या कठड्यात उभे केले आहे. स्त्रियांच्या अशा अवहेलनेला सर्वच धर्म जबाबदार आहेत. ख्रिश्चन धर्मानुसार ‘अ‍ॅडम’ या पुरुषाच्या बरगडीतून देवाने स्त्री जन्माला घातली. कशासाठी? ‘अ‍ॅडम’च्या करमणुकीसाठी आणि या ‘ईव्ह’नामक स्त्रीने काय उद्योग केला, तर ज्ञानाचे फळ पुरुषाला चाखायला लावले. या प्रथम पापाचं फळ सार्‍या मानवजातीला युगानुयुगे भोगावे लागत आहे. इतर धर्मांना स्त्रीच्या जन्माची अशी अफलातून (!) कल्पना सुचली नाही; पण स्त्रीचं गौणत्व आणि पुरुषाचा तिच्यावरील अधिकार मात्र सर्व धर्मांनी ठासून प्रतिपादित केलेला आहे. पत्नीच्या हातून भाकरी करपली तर तिला पतीने सोडचिठ्ठी द्यावी, अशी सोय ज्यू धर्माने करून दिलेली आहे. मुस्लिम धर्माने सामान्य पुरुषास चार बायका करण्याचा, बायकोला तोंडी ‘तलाक’ देण्याचा आणि हैदराबादच्या निझामासारख्यांना ‘जनाना’ बाळगून शेकडो स्त्रियांना कोंडवाड्यात ठेवण्याचा अधिकार दिला आहे. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर दोष स्त्रीचाच समजून तिलाच शिक्षा फर्मावली जाते. उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम सासर्‍याने आपल्या सुनेवर बलात्कार केला म्हणून तिने तक्रार केली, तर तिथल्या मौलवीने न्याय दिला – सुनेने सासर्‍याशी निकाह लावावा! (मौलवी सासर्‍याचा मित्र असावा.) दिगंबर जैनांमध्ये स्त्रीला मोक्षाचा अधिकार नाही. गौतम बुद्धांनी स्त्रियांना प्रवेश दिल्यामुळे त्यांच्या चिरकाल धर्माचे आयुष्य खाडकन् 500 वर्षांवर आल्याचे जाणवले. हिंदूधर्मीय आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये गार्गी-मैत्रेयींसारख्या ज्ञानी स्त्रिया होऊन गेल्याचे मोठ्या अभिमानाने सांगतात. प्रत्यक्षात स्त्रियांना धर्माने पुरातन काळापासून ज्ञानापासून वंचित ठेवले आहे.

सुमन ओक यांना लेखनांसाठी कुठलेही विषय वर्ज्य नव्हते. चित्पावनांच्या श्रेष्ठत्वाचा भांडाफोड वा सण-समारंभांच्या भाकडकथांपासून अणुशक्तीच्या भयानकतेपर्यंत कुठल्याही लहान- मोठ्या विषयावर त्या लिहित असत. प्रत्येक लेखनामागे त्यांनी त्यासाठी घेतलेले श्रम, अभ्यास व विषयांच्याबद्दलची त्यांची सम्यक दृष्टी जाणवत असे. त्यांनी लिहिलेले अणुऊर्जा आणि अणुकरार, फुकुशिमाचा धडा, तुळजापूर घोटाळ्यात गोंधळ, जैवतंत्रज्ञानाचा व्यापारी वापर, भारतातील प्राचीन विज्ञान, सत्यनारायण पूजा इत्यादी लेख वाचत असताना हे प्रकर्षाने जाणवते. व्ही. एम. तारकुंडे, बी. प्रेमानंद, जस्टीस आर. ए. जहागीरदार, डी. डी. कोसंबी, नारायण देसाई इत्यादींची त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रेही वाचनीय आहेत. मदर टेरेसांबद्दलच्या लेखातील संतपदातील छक्के-पंजे व मदर टेरेसा यांना मिळालेल्या संतपदाचा फोलपणा हे अत्यंत वाचनीय होते.

शिक्षणशास्त्राच्या त्या प्राध्यापिका म्हणून ‘एसएनडीटी’ विद्यापीठात काम करत होत्या, त्यावेळी त्यांनी भारतीय शिक्षण धोरणाविषयी व विशेषकरून महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेविषयी काही अभ्यासपूर्ण पुस्तकं/पुस्तिका प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टसाठीसुद्धा ‘सायकलीच्या शोधाची कथा’, ‘पहिला शिक्षक’ अशा काही पुस्तिका लिहिल्या होत्या. ‘सणांचे कूळ व उत्सवांचे मूळ’ सारखी त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचताना त्यांनी मनात आणले असते, तर त्या एक प्रथितयश लेखिका झाल्या असत्या, असे वाटू लागते. परंतु त्यांनी ‘विवेकवादा’सारख्या विषयावर वाहून चिकित्सकपणे लेखन करण्याची न मळलेली वाट धरल्यामुळे पुरोगामी संघटनांच्या वर्तुळातच त्यांना लोकप्रियता लाभली. पुस्तक/लेख लिहिताना सुमन ओक पूर्णपणे हरवून जात होत्या व त्यात त्यांना आनंद मिळत होता.

इंग्रजीतही त्यांनी विपुल लेखन केले होते. टेलिव्हिजन व मूल्ये, धार्मिकता व मानवी दुःख, कर्मसिद्धांत, बाबा-बुवांचे आध्यात्मिक बाजार, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाचे सामाजीकरण इत्यादी प्रकारच्या लेखांमुळे इंग्रजी वाचकांना अशा प्रकारच्या विषयाबद्दलची वेगळी बाजू कळू शकली. त्या लिहित असलेल्या लेखांमध्ये वाचकांना नवे काहीतरी दिले पाहिजे, ही दृष्टी होती. त्यामुळे वाचक नेहमीच अंतर्मुख होऊन लेखिका नेमके काय सांगू इच्छिते, याचा विचार करत असत.

मराठीत त्यांनी लिहिलेल्या ‘सणांचे कूळ व उत्सवांचे मूळ’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादसुद्धा सुमन ओक यांनी केला होता. या इंग्रजी पुस्तकातील लेख स्वतंत्रपणे वाचत असताना इंग्रजी वाचकाला याचा मराठीतून अनुवाद केला आहे, अशी पुसटशीसुद्धा शंका येणार नाही, इतक्या बेमालूमपणे अनुवाद करण्याची त्यांची शैली होती. नारायण देसाई यांच्या ‘बुद्ध माझा सांगाति’ या पुस्तकाच्या सुंदर इंग्रजी अनुवादामुळे इंग्रजी वाचकांना बुद्ध नव्याने कळला, असे म्हणावेसे वाटते. सदाशिव आठवले यांच्या चार्वाकवरील पुस्तकाचा व विशेषकरून लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रस्तावनेचा अनुवाद वाचत असतानासुद्धा अनुवादकांनी वापरलेले अचूक शब्द, वाक्य वाचत असताना रसभंग होणार नाही, यासाठी घेतलेली काळजी, यांना दाद द्यावीशी वाटते. यज्ञेश्वर निगळे यांच्या ‘अंधश्रद्धा ः एक विवेकनिष्ठ विवेचन’ या पुस्तकाचा सुमन ओक यांनी केलेला इंग्रजी अनुवाद वाचत असतानासुद्धा आपण मूळ इंग्रजी पुस्तकच वाचत आहोत की काय, असा भास होतो. अरविंद पाखले यांच्या वास्तुशास्त्रावरील मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवादसुद्धा अतिशय वाचनीय आहे.

डॉ. दाभोलकरांच्या बहुतेक लेखांचा व भाषणांचा अनुवाद सुमन ओक यांनी केला. त्यातूनच डॉक्टरांचा परिचय अमराठी वाचकांना होऊ शकला. डॉक्टरांच्या लेखात व भाषणात अस्सल मराठी शब्दांची व मराठी समाजातील, संतवाङ्मयातील उदाहरणांची रेलचेल असे. मराठी भाषेच्या सौंदर्याला धक्का न लावता इतर भाषांत अनुवाद करत असताना फार मोठी कसरत करावी लागते. परंतु सुमन ओक यांना मात्र या गोष्टी सहजपणे जमत असत. त्यांच्या इंग्रजीतील अफाट वाचनामुळे नेमके शब्द त्यांना सापडत होते. ‘अंनिस’च्या ‘थॉट अँड अ‍ॅक्शन’ या ई-त्रैमासिकातील डॉ. दाभोलकर यांचे लेख वाचत असताना याची प्रचीती येते. जॉन क्वॅक या जर्मन संशोधकाचे ‘डिस-एंचँटिंग इंडिया’ या पुस्तकाचा मराठी वाचकांसाठी केलेला स्वैर अनुवाद वाचत असतानासुद्धा हाच अनुभव वाचकांना येतो. ‘अंनिस’च्या संकेतस्थळावरील ’अंनिस’शी संबंधित अंधश्रद्धा, वास्तुशास्त्र, फलजोतिष, दैववाद, पशुहत्या, बुवाबाजी, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विषयांवरील इंग्रजी टिप्पणींचा मराठीत अनुवाद सुमन ओक यांनीच केला होता. त्याचप्रमाणे पॉल कुर्ट्झ यांच्या सायन्स अँड रिलिजन यातील लेखांचा स्वैर रूपांतर करून विज्ञान व धर्म हे ‘अंनिवा’तील सदर वाचकांना नक्कीच आठवत असेल.

डॉ. दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनामागील सैद्धांतिक बैठक, समितीची वाटचाल, समितीने केलेला संघर्ष इत्यादींचा पुढील पिढीच्या मार्गदर्शनासाठी दस्तावेज स्वरुपातील ‘तिमिरातून तेजाकडे’ या तीन भागातील एक बृहत् ग्रंथ लिहून काढला. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केल्यास जगभरातील पुरोगामी व विवेकवादी विचारवंतांना समितीचे विचार व कार्य यांचा परिचय होईल, असे डॉक्टरांना व इतर कार्यकर्त्यांना वाटत होते. चार-पाचशे पानांच्या या पुस्तकाचा नेमका अऩुवाद करणे, हे आव्हान सुमन ओक यांनी स्वीकारले. क्षीण होत असलेल्या प्रकृतीची तमा न बाळगता काही महिन्यांतच हे काम पूर्ण केले व डॉक्टरांच्या हातात हस्ताक्षर प्रत सुपूर्द केली. परंतु डॉक्टरांच्या मृत्यूनंतरच ‘ए केस फॉर रिजन’ या नावाने ‘अमेझॉन’तर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले व मोठ्या प्रमाणात त्याचा खपही होत आहे. सुमन ओक यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे शक्य झाले. याबद्दल समिती ऋणी राहील. सुमन ओक यांनी या अनुवादासाठी मिळालेली सर्व रक्कम समितीला देणगी म्हणून दिली.

समितीतर्फे सुमन ओक यांचा आगरकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांची ग्रंथसंपदा ‘अंनिवा’ला देणगी म्हणून दिली.

सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सैन्यातील कॅप्टन लक्ष्मी यांच्या मृत्यूनंतर सुमन ओक यांनी एका मासिकासाठी मृत्युलेख लिहिला होता. कॅप्टन लक्ष्मी यांच्या युद्धभूमीतील शौर्यापेक्षा मृत्यूनंतर त्यांनी देहदान करण्याची व्यक्त केलेली अपेक्षा, याबद्दलच सुमन ओक यांनी विस्तृतपणे त्यात लिहिले होते व कौतुकही केले होते. त्यानिमित्ताने भारतीय रूढी, परंपरा, पुराणकथा इत्यादींचा त्यांनी अभ्यास केला व स्वतःचेही देहदान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांचा मुलगा अरविंद ओक व कुटुंबीयाने सुमन ओक यांचा मृतदेह पुण्यातील ‘आर्मड् फोर्स मेडिकल कॉलेज’ला दान म्हणून दिला.

या प्रकारे आयुष्यभर व आयुष्याच्या शेवटीसुद्धा त्या विवेकवादीच राहिल्या.

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!