प्रयत्नांती परमेश्वर हे देखील कष्टप्रद असते. त्या मानाने जादू, मंत्र–तंत्र, पूजापाठ, उपास, उपासना सारे सोपे असते. दरिद्री, नाडलेल्या जीवाला वास्तवाकडून काहीच आशा नसतात. झटपट प्रश्न सोडविण्याची खात्री देणार्या विनाकष्ट भाग्य उजळविणार्या, गुप्तधन शोधून देण्याचा दावा करणार्या अवास्तव अंधश्रद्धा दारिद्य्राने त्रस्त, थकलेल्या (आणि श्रीमंतीने मस्त माजलेल्या) मनांना विलक्षण भुरळ घालतात. स्वतःचा विचार करताना अघोरी प्रकारांची भीती वाटते, इतरांविरुध्द असे अघोरी उपाय वापरायला काडीमात्र वाईट वाटत नाही. स्वार्थासाठी प्राणी–पक्षी, निसर्ग, निर्जीव–सजीव सार्यांना लुटायला मारायला माणसांना काहीच वाटत नाही. कुंभमेळ्यात जसे आजारी, अपंग, निरुपयोगी वृध्द, मतिमंद, विधवा या सार्यांना ‘हरवून’ नातेवाईक ‘मोकळे’ होतात तसे ! प्राण्यांच्या बळीबद्दल जसे विशेष काही वाटत नाही; तसेच गुप्तधनाच्या लोभापुढे नरबळीसारखे भयंकर कृत्य करायला कुणाला काही वाटत नाही.
पैसा जवळजवळ सर्व खरेदी-विक्रीचे माध्यम असल्याने जीवनात; विशेषतः आजच्या आपल्या जीवनात पैशास अनन्यसाधारण महत्त्व आहेच. दुःखे, कष्ट कमी करण्यासाठी पैसा उपयोगी ठरतो आणि मग अपार दुःखे स्वीकारीत, सुखे नाकारीत पैसे मिळविण्यासाठी माणसे कष्ट करीत राहतात. प्रयत्न व हुशारी एकत्र आल्यास पैसे भरपूर मिळतात. त्यात झटपट, कमी कष्टात अतिरिक्त नफा मिळविण्याची नशा मिसळली की, इतरांबाबत बेपर्वाई येते व माणसे शोषक, फसवी, घातक बनू लागतात.
जगण्यासाठी नीतिमत्ता आधार ठरते ती सामान्य माणसाला! शोषणावर आधारित श्रीमंतीसाठी व्यवहारात नीतिमत्ता बाजूला ठेवावी लागते; प्रसंगी निगरगट्ट, कठोर, क्रूरही व्हावे लागते. हे शतकानुशतके चालले आहे. पण गेल्या 20 वर्षांच्या चंगळवादाच्या वावटळीत मूल्ये हरवली. जेव्हा प्रयत्नाने पैसा मिळविणे जिकिरीचे होते, हवे तितके जमविता येत नाही, तशी संधी मिळत नाही, सर्व मार्ग खुंटतात, दिशा चुकतात, तेव्हा माणसे पैसे मिळविण्याचे शॉर्टकट्स शोधतात. कायद्यामुळे चोरी, दरोडे, लूट यावर निर्बंध येतात; मग मार्ग उरतो गूढविद्येचा, मंत्र-तंत्राचा, नरबळीचा! म्हणून मग माणसाच्या जगात झटकन बिनाकष्टाने संपत्ती मिळवायचा एक जगन्मान्य मार्ग वापरला जातो तो म्हणजे तांत्रिक, मांत्रिक, जादूविद्येने संपत्ती मिळविणे. माणूस अडाणी असो की बुद्धिमान, असंस्कृत असो की सुसंस्कृत, त्याला गूढ अंधश्रद्धा, जादू-तंत्र-यातु-विद्येचे विलक्षण आकर्षण असते. युगानुयुगे हे आकर्षण जनमानसात अवैज्ञानिक विचार प्रसाराने दृढ केले गेले आहे.
काहीही विचारले की, विज्ञान कार्यकारणभाव शोधते. वस्तुनिष्ठ आकलन मांडते, नेमके काय किती खरे ते सांगते. यात निरीक्षण, अनुमान, आकलन, प्रयोग, पुनःप्रत्यय व तात्कालीक सत्यशोधन असते, म्हणजे एवढे कष्ट घ्यावे लागतात. साध्या सरळ माणसाला यात काहीच आकर्षक वाटत नाही. प्रयत्नांती परमेश्वर हे देखील कष्टप्रद असते. त्या मानाने जादू, मंत्र-तंत्र, पूजापाठ, उपास, उपासना सारे सोपे असते. दरिद्री, नाडलेल्या जीवाला वास्तवाकडून काहीच आशा नसतात. झटपट प्रश्न सोडविण्याची खात्री देणार्या विनाकष्ट भाग्य उजळविणार्या, गुप्तधन शोधून देण्याचा दावा करणार्या अवास्तव अंधश्रद्धा दारिद्य्राने त्रस्त, थकलेल्या (आणि श्रीमंतीने मस्त माजलेल्या) मनांना विलक्षण भुरळ घालतात. स्वतःचा विचार करताना अघोरी प्रकारांची भीती वाटते, इतरांविरुध्द असे अघोरी उपाय वापरायला काडीमात्र वाईट वाटत नाही. स्वार्थासाठी प्राणी-पक्षी, निसर्ग, निर्जीव-सजीव सार्यांना लुटायला मारायला माणसांना काहीच वाटत नाही. कुंभमेळ्यात जसे आजारी, अपंग, निरुपयोगी वृध्द, मतिमंद, विधवा या सार्यांना ‘हरवून’ नातेवाईक ‘मोकळे’ होतात तसे ! प्राण्यांच्या बळीबद्दल जसे विशेष काही वाटत नाही; तसेच गुप्तधनाच्या लोभापुढे नरबळीसारखे भयंकर कृत्य करायला कुणाला काही वाटत नाही. स्वत:साठी आप्त मारले तर या अंधश्रद्ध क्रूरकर्म्यांपैकी कुणीही कुरुक्षेत्रावरील अर्जुनाइतके भांबावत नाही. तिथेही त्या संहाराला उद्युक्त करणारा, प्रोत्साहन देणारा मांत्रिक-तांत्रिक सज्ज असतोच. त्यात शोषून घ्यावे असे काहीच जिच्यापाशी उरलेले नाही, अशा वृद्ध आईचा बळी घेणे तिच्या स्वार्थांध मुलांना व्यावहारिक (?) वाटले असेल. शक्य तो परके माणूस बळीसाठी वापरले जाते. पण अंधश्रद्धेपोटी होणार्या हत्येत हा विधिनिषेध नसतो. ही माणसे बेभान नसतात, उलट त्यांची कृत्ये लपून-छपून, फसवून नीट डाव आखून होत असतात. ते संतापातील उतावीळ कृत्य नसते, तो जाणून-बुजून केलेला खून असतो. गावावरचे संकट टळावे म्हणून या देशात स्त्रियांना चेटकिणी, डाकिणी ठरवून त्यांची नग्नावस्थेत धिंड काढली जाते, सामूहिक बलात्कार केले जातात, तुकडे करून जाळले जाते. 1990 ते 2000 मध्ये या देशात असे जवळजवळ 1700 तर 2012 मध्ये 117 गुन्हे नोंदविले गेले. शिक्षण, आर्थिक सुधारणा, विज्ञानप्रसार, कायदा व सुव्यवस्था या सार्यांना पुरून उरत ही भीषण अंधश्रद्ध कृत्ये चालूच आहेत. या पलिकडे कर्मकांडे, पूजापाठ, मंत्रजप याविषयी अशास्त्रीय प्रचार धर्म व अध्यात्माच्या नावाखाली सर्वत्र प्रच्छन्न चालू आहे.
अंधश्रद्धा मनातील सारासार विवेकाला, संवेदनशीलतेला, माणुसकीला बधीर करतात. नाती-गोती, प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य यांना स्वार्थ नष्ट करतो. माणसे अमानुष होतात आणि हत्याकांड घडते. यातील काही माणसे विकृत व्यक्तिमत्त्वाची, मनोविकारग्रस्त, वा व्यसनी असतीलही. पण बरीचशी लोभापायी, सूडापोटी आंधळी झालेली असतात. भीषण हत्याकांड नसेल; पण सर्वसामान्य माणसांच्या घरातसुद्धा माणसे क्षुद्र स्वार्थापोटी घरातील जिवंत माता-पित्यांचा, मुला-बाळांचा, पती-पत्नीचा छळ करीत त्यांना जिवंतपणीच नरकयातना भोगावयास लावतात. लैंगिक छळ, हुंडाबळी, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार हे कुठल्या निरोगी प्रगत समाजाचे लक्षण आहे? चंगळवादात विवेक हरवलेल्या माणसांकडून हिंसा घडल्यास त्यात आश्चर्य ते काय वाटावे?
काही प्रमुख सूत्रे आपण सर्वांनी लक्षात घेतलेली बरी.
1. जगात कुठेही भुते-खेते, पिशाच, भटकता अतृप्त आत्मा असे काहीही नाही.
2. कुठलाही बळीविधी मंत्र, तंत्र, जादूटोणा, प्रार्थना याने संपत्ती मिळत नसते.
3. कुठल्याही अघोरी, अमानुष कृत्यांना धर्म व अध्यात्माचा अजिबात पाठिंबा नाही.
4. स्वार्थापोटी अशी अघोरी कृत्ये करणे बेकायदेशीर व दंडनीय आहे.
5. अशा अघोरी कृत्याने संपत्ती मिळवून देण्याचा दावा करणारे गुंड व बदमाष आहेत. त्यांच्या तावडीत सापडून आपली फसवणूक करून घेऊ नये. उलट अशा बदमाषांना पोलिसांच्या मदतीने न्यायासनासमोर उभे केले पाहिजे.
प्रबोधन, संघर्ष व संविधानाचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे विवेकी समाजनिर्मितीचे काम निश्चितच जिकिरीचे आहे. कारण ही मूल्ये रुजविण्यासाठी समाजात जगण्याची, तगण्याची, कष्टाच्या योग्य मोबदल्याची, योग्य संधीची आश्वासक भूमी हवी. स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची शिंपण हवी. वैज्ञानिक दृष्टिकोनाची आरोग्यदायी किरणे हवीत. शोषणमुक्त पर्यावरण हवे. कायदा व सुव्यवस्थेची राखण हवी. प्रयत्नपूर्वक असा विवेकी समाज उभारला तर उद्याच्या समाजात अघोराला स्थान नसेल. आज हे स्वप्नरंजन वाटेल. पण आम्हा विवेकनिष्ठ कार्यकर्त्यांना हे स्वप्न वास्तवात उतरवण्याचे प्रयत्न करण्यातच जीवनाचे साफल्य सापडले आहे.