Categories
प्रासंगिक

आताचे खरे कावडिया!

सप्टेंबर - २०१८

विनोद दुआ के साथ

(जन मन धन की बात या ‘दि वायर’ पुरस्कृत मालिकेसाठी निर्भीड पत्रकार विनोद दुआ यांनी कावडियांच्या हिंस्र मानसिकतेविषयी केलेली टिप्पणी. त्यांच्याच शब्दात…)

आजकाल कावडियांच्या संदर्भात चर्चा होत आहे. कारण शेकडो-हजारो वर्षापूर्वींची असलेली ही प्रथा, गेल्या 30 वर्षांत त्याला कशाप्रकारे विकृत स्वरूप आलेले आहे म्हणून ही चर्चा होत असावी. या कावडियांच्या मध्ये गोरक्षक व झुंडशाही करणारी मंडळी घुसलेली असून पुढील निवडणुकीतील मतदान केंद्रांचे व्यवस्थापन या मंडळींच्या हातात असणार आहे, ही एक भयंकर व धोकादायक स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा याची दखल घेत ताशेरे ओढलेले आहेत. ज्या काही घटना – विशेषकरून उत्तर प्रदेशमधील घटना- घडत आहेत, त्या न्यायालयाला बिलकुल मंजूर नाहीत. याची जबाबदारी कुणाकडे जात आहे, हे आपल्याला माहीत असेलच.

80 च्या दशकाच्या शेवटीशेवटी या विकृतीला सुरुवात झाली. त्या अगोदर आम्ही असले काही बघितलेले नव्हते. त्यावेळी अशा प्रकारचे कावडियासुद्धा नव्हते. आता यांना एक गणवेश दिल्यासारखे झाले आहे. भगव्या रंगाचा बर्म्युडा, भगव्या रंगाचा टी शर्ट व डोक्याला भगवे मुंडासे व त्यांच्या बरोबर एक ट्रक. हे सर्व पाहता या सर्व गोष्टींचे इतक्या व्यापक प्रमाणात व्यवस्थापन केल्याचे जाणवते. या ट्रकमध्ये डीजेची यंत्रणा असते. ठिकठिकाणचे व्हिडिओ चित्रीकरण बघितल्यास त्यात दारू पिणारे, चिलीम फुंकणारे आणि रस्त्यावर गुंडागर्दी व छेडछाड करणारे, हातात बेस बॉलची बॅट घेऊन मालमत्ता फोडणारे दिसतील. हे काय चालले आहे?

कावडियांकडून हे अपेक्षित नव्हते. कावडियांची ही यात्रा प्रारंभापासून श्रद्धा व भक्तिपूर्ण दिसत होती; परंतु आता गुंडांच्या गर्दीमुळे खर्‍याखुर्‍या कावडियांचे नाव बदनाम होत आहे. ही एक पुरातन तीर्थयात्रेची प्रथा असून यात भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्याचा उद्देश होता, असे समजले जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील हरिद्वार, गंगोत्री व गुरुमुख ते बिहारमधील सुलतानगंजपर्यंत चालत चालत जाते व त्यानंतर वैजनाथला पोचते. लाखोंच्या संख्येने कावडिया यात भाग घेतात. गंगाजल घेऊन शेकडो किलोमीटर्स चालत जातात. एका निर्दिष्ट दिवशी किंवा त्याच्या आसपास जवळच्या शंकराच्या देवळात जाऊन अभिषेक करतात. मीरतमधील पुरमहादेव व अघोरनाथ देवळं भरपूर प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे बनारस येथील काशिविश्वनाथ व झारखंड येथील वैजनाथ ही देवळंसुद्धा जगप्रसिद्ध आहेत. सुलतानगंज व वैजनाथ येधे गंगाजल कावडीतून आणले जाते. श्रावणबाळाने आपल्या माता-पित्यांना घेऊन गेल्याप्रमाणे एका बांबूच्या दोन्ही बाजूला पाण्याची घागर बांधून कावड तयार केली जाते व तिला खांद्यावर ठेवून चालत जाण्याची ही पद्धत आहे.

5 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज्ञेनुसार 14 लाख रुपये खर्च करून या कावडियांच्या यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली; मात्र यात्रेवर करडी नजर ठेवण्यासाठी हे पैसे मंजूर करण्यात आले आहेत, असे शासनाने याचे समर्थन केले असले, तरी खुद्द मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसून खालच्या कावडियांना हात हलवून अभिनंदन करत होते व रस्त्यावरील कावडिये वर बघून त्यांना प्रतिसाद देत होते. त्या किंवा दुसर्‍या हेलिकॉप्टरमध्ये मीरत झोनचे एडीजी, प्रशांतकुमार पूर्ण पोलीसी गणवेश व डोक्यावर मेक्सिकन हॅट घालून गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत होते. प्रशांतकुमार यांनी नंतर ही स्वागत करण्याची एक पद्धत असून ही आमची पुरातन परंपरा आहे असे निवेदन दिले. हे काही पहिल्यांदाच घडत आहे, असेही नाही. अशा प्रकारे पोलीस व शासकीय अधिकारी सणामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत असतात.

8 ऑगस्ट रोजी कावडियांनी दिल्ली येथील मोतीनगरमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या कार्सची मोडतोड केल्याचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यासंबंधात 26 वर्षांच्या एकमेव तरुणाला अटक केले असून त्याचे नाव आहे राम बिल्ला. हा बिल्ला एक अट्टल चोर असून त्याच्यावर अनेक खटले भरलेले आहेत. यात भक्ती कुठून आली, हे कळत नाही.

माझे एक मित्र नदीम यांच्या मते ज्याप्रकारे उत्तर प्रदेशचे पोलीस व सरकार कावडियांच्यावर पुष्पवृष्टी करत होते त्यावरून भविष्यकाळातील शासनांची वाट मोकळी झाली. मग ते सरकार समाजवाद्यांचे की काँग्रेसचे किंवा बहुजनसमाजांचे असू दे, ते शासन भविष्यकाळात आपापल्या कार्यकर्त्यांवर गुलाब पाकळ्यांची पुष्पवृष्टी करतच राहील. त्याचप्रमाणे ईदच्या दिवशी मशिदीवर वा ख्रिसमसच्या वेळी चर्चवर व गुरुद्वारावरसुद्धा हेलिकॉप्टरमध्ये बसून पूर्ण गणवेश घालून पोलीस अधिकारी पुष्पवृष्टी करतील, भंडारा उधळतील किंवा भजनही म्हणतील. असे काही झाल्यास वर्तमानपत्रात ‘वर्दीतले भक्त’ म्हणून बातम्या झळकतील.

कावडियांचा हा सण खरे पाहता फार साधा, सरळ व श्रद्धा-भक्तीचा होता. आम्ही डाक कावडबद्दल फार ऐकत होतो. यात सुलतानगंजमधून 24 तासात 100 किलोमीटर्स न थांबता कावड घेऊन जातात व देवगड येथील जगप्रसिद्ध देवळातील शंकराच्या पिंडीवर गंगाजल ओतून अभिषेक करतात. यावेळी कावडिया रस्त्यात कुठेही न थांबता चालतात. कावडिया विश्रांतीसाठी कुठेही बसत नाहीत किंवा उभे राहत नाहीत. चालतच राहायचे. वाटेत जेवण नाही; फक्त पाणी वा फळ. डीजे नाही, चिलीम नाही वा दारू नाही. कावडियाला टॉयलेटला जायचे असल्यास कावड जमिनीला न टेकवता दुसर्‍याच्या खांद्यावर ठेवायची व चालतच राहायचे. नंतर सगळे काही आवरून पुन्हा कावड स्वतःच्या खांद्यावर घ्यायची. ही एक साधना आहे. तपस्या आहे, आवाज नाही, गाजावाजा नाही, 24 तास शंकराचे ध्यान. पायी-पायी पाणी घेऊन पुढेपुढे चालत चालत जायचे. हीच खरी कावडी यात्रा आहे. हे सर्व शरीराच्या आतून यायला हवे. असे करणारेच शंकराचे खरे भक्त असे मानले जाते. बेस बॉलची बॅट घेऊन वाटेतील कार्सची तोडफोड करणारे, चरस ओढणारे, गांजा पिणारे, चिलीम ओढणारे डीजेच्या तालात हिडीस नाच करणारे, वाटेत येणार्‍याला मारहाण करणारे खरे कावडिया नव्हेत.

पुराणातील गोष्टीप्रमाणे खरा कावडिया रामायणातील रावण होता, किंवा त्यापूर्वीचा परशुराम होता. कुणीही का असे ना, आजच्या कावडियाचे स्वरूप पाहता यापूर्वी असे काही नव्हते, हे लक्षात येईल. आज आपण या यात्रेत गोरक्षक, लिंचिंग करणारे, तोडफोड करणारे यांना पाहतो. 2019 च्या निवडणुकीतील ‘बूथ मॅनेज’ करणार्‍यांना पाहत आहोत. यातील बहुतेक जण बेकार आहेत. गल्लीतल्या वर्दीतील पोलीसांकडून मार खाणारे या यात्रेच्या निमित्ताने स्वतःला ताकदवान समजून घेतात व नंतर आपापल्या बिळात गुपचूप लपून बसतात. हेच आताचे खरे कावडिया!

– मराठी अनुवाद : प्रभाकर नानावटी