अंनिसच्या अलिबाग शाखेने यावर्षी काहीतरी नवीन आणि समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे ठरले आणि लक्षात आले. सावित्रीच्या भूमिका जगणार्या अनेक महिलांना अकाली वैधव्याला सामोरे जावे लागते आणि नंतरच या सावित्रीचा संसार संघर्ष सुरू होतो. अशा महिलांच्या संघर्षाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा, या विचाराने कार्यक्रम ठरला आणि तयारी सुरू झाली. स्थानिक पेपरला बातमी दिली. अनेक मान्यवरांनी बातमी वाचून कार्यक्रमाला सदिच्छा दिल्या.
महिलांची निवड, सन्मान कोणत्या पद्धतीने करायचा, कुणाच्या हस्ते आणि नुकताच ज्यांना मानाचा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ मिळाला, त्या ठाण्याच्या अंनिस कार्यकर्त्या वंदनाताई शिंदे यांनी आमच्या आमंत्रणाला मान देऊन येण्याचे कबूल केले. कार्यक्रमाची तारीख 28 जून 2018, वेळ दुपारी 3 ते 6 आणि ठिकाण अंनिसच्या कार्यकर्त्या सुप्रिया जेधे यांच्या टेरेसवर. कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी तीनला सर्व कार्यकर्त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जमल्या. आमंत्रित महिलाही आपल्या आप्तेष्टांसह गोळा झाल्या. पावसाने दमदार हजेरी लावली. जमलेल्या महिला पाहून वंदनाताईंमधील कार्यकर्ती जागी झाली आणि त्यांनी त्यांच्या दमदार आवाजात तीन गाणी महिलांसमोर सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील नमनगीताने झाली. शाखाध्यक्षा शुभांगी जोगळेकर यांनी पाहुण्या वंदनाताई शिंदे यांचे स्वागत करून त्यांच्या कामाची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर प्रा. विभा कांबळे यांनी प्रास्ताविक केले. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘अकाली वैधव्य आल्यानंतर महिलेला जो संघर्ष करावा लागतो, तो वटपौर्णिमेच्या एका दिवसाच्या पूजेने संपत नाही. बर्याचदा अशा महिलांचे तेव्हा शिक्षण अपुरे असते, नवरा व्यसनी असतो आणि कुटुंब माहेर/सासर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असते. त्यावेळी महिलांना जो संघर्ष करावा लागतो, त्याला तोड नाही. वैधव्यामुळे साजशृंगाराला मुकावे लागते. धार्मिक विधीत, समाजात स्थान, मानसन्मान मिळत नाही. साधी अंबाड्यात फूल खोवण्याची किंवा गजरा माळण्याची हौसही मनाला मुरड घालून पतीनिधनामुळे घालावी लागते. संसार मात्र पुरुष बनून सावरायला लागते. गावगुंडांना सामोरे जाताना दमछाक ओढून घ्यावी “वाटेवरती काच गं, जपून पाऊल तू उचल गं” या आणि अशा समस्यांतून तिचे आयुष्य घडते, कधी ती निर्विकार बनते, कधी स्वयंसिद्धा; तर कधी अबलाच राहते. या महिलांच्या कष्टाची, धडपडीची नोंद घेऊन त्यांची मनं दु:ख बोलून मोकळी व्हावीत आणि आमची दखल घेणारे कुणीतरी आहे, हे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसावे म्हणून केलेला हा एक लहानसा प्रयत्न.
महिलांचा परिचय करून देताना कार्यकर्त्या निर्मला फुलगावकर म्हणाल्या, “वटपौर्णिमेचे व्रत करूनही अकाली वैधव्य आलेली महिला संघर्ष करत जिद्द, कष्ट, मेहनतीच्या जोरावर आपले आयुष्य जगत असते, मुलांना शिक्षण देऊन मोठे करत असते. अशा महिलांच्या जगण्याला, संघर्षाला शब्दांचे माध्यम देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”
यानिमित्त पुढील महिलांचा सन्मान केला गेला. 1) सरोज पांडुरंग नाईक 2) मानसी विजय उपाध्ये 3) नीलम नितीन म्हात्रे 4) सुनंदा वि. मोकल 5) रेश्मा जाधव 6) शकुंतला गायकवाड 7) वंदना पंडित 8) उज्ज्वला उमेश वर्तक 9) अनुराधा म. जोशी 10) अमिता पां. काप, थळे प्रत्येक महिलेस कापडी पर्स, पुस्तक, ट्रॉफी व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले गेले. प्रमुख पाहुण्या वंदनाताई शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना अनेक महिलांना जुने दिवस आठवून भावना अनावर झाल्या. आमचा संघर्ष शब्दांत मांडण्याची संधी आम्हाला मिळाली, असे मानसी उपाध्ये म्हणाल्या. सायकल आणि शिलाई मशीन यांच्या आधाराने मी जगण्यासाठी संघर्ष करत होते, त्याच माझ्या देवी ठरल्या, असे आराधना जोशींनी सांगितले. खडतर परिस्थितीत सासर आणि माहेर दोन्ही नातेवाईक दुरावले, असे नीलम म्हात्रे म्हणाल्या. नवर्याच्या दारूच्या व्यसनामुळे मला आज मोलकरणीचे काम करावे लागत आहे. ‘व्यसनी नवरा नको गं बाई,’ असे उद्गार सरोज नाईक यांनी काढले. हा सन्मान माझ्या एकटीचा नसून माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी-ज्यांनी आर्थिक मदत केली, त्या सर्वांचा आहे, असे वंदना पंडित म्हणाल्या. आमचीही दखल कुणीतरी घेतंय हे पाहून बरे वाटले, असं उद्गार सुनंदा मोकल यांनी आभार व्यक्त करताना काढले.
कार्यक्रमाच्या पाहुण्या आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, आपण जे-जे करतो किंवा करणार आहोत, त्यावर योग्य विचार करायला शिका. उपवासाचा खरा अर्थ जाणून घ्या, का, कसे, कधी अशा शंका स्वत:ला विचारा. प्रत्येक घटनेला कार्यकारणभाव असतो, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जिद्द, मेहनत, चिकाटी सोडू नका. परिस्थितीला सकारात्मक विचाराने सामोरे जा. यश तुमच्या मागे येईल. अलिबाग शाखेने हा वेगळा कार्यक्रम करून एक चांगला उपक्रम राबविला, याचेही त्यांनी कौतुक केले. शाखेच्या उपाध्यक्षा सुरेखा पाटील यांनी आभार मानले. जमलेल्या महिलांना खाऊ व चहाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
–श्रीमती निर्मला दिनकर फुलगावकर, अलिबाग