Categories
परिसंवाद

 आधार जातीचा जरी असला तरी राजकारण मात्र समग्र परिवर्तनाचेच

-महादेव जानकर
वार्षिकांक – २०११

            मंडल आयोग लागू झाल्यानंतर ओबीसींच्या राजकारणाला खर्‍या अर्थाने चालना मिळत गेली. आतापर्यंत एक जात समूह म्हणून ओबीसींची ओळख नव्हती. मंडल आयोगानंतर ही ओळख प्रस्थापित होऊ लागली. सवर्ण हिंदू अशा या वर्गीकरणात आजवर सर्वच ओबीसी जाती सामावल्या गेल्या होत्या. आपण सवर्ण हिंदू असलो तरी ओबीसी हा गट मागासवर्गीय या श्रेणीतीलच आहे, जातीय उतरंडीत आपले स्थान सन्मानाचे नाही म्हणून उच्च जात वर्गाकडून आपलंही शोषण झालं आहे ही जाणीव ओबीसी जातसमूहात दृढमूल झाली. त्याचबरोबर ब्रिटीश साम्राज्यवादी काळात व स्वातंत्र्यांनंतरही भांडवलशाहीच्या भारतातील विकासाच्या पार्श्वभूमीवर या ओबीसी जातींच्या परंपरागत धंद्याचे साधनही नष्ट होऊ लागले. त्यामुळे एकीकडे परंपरागत धंदे नाहीत तर दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित होत जाणार्‍या भांडवलदारी व्यवस्थेतही आधुनिक शिक्षणाच्या अभावामुळे शिरकाव नाही. या कोंडीतून सुटण्याचा मार्ग मंडल आयोगानंतर ओबीसी जात समूहांना दिसू लागला व त्यातूनच ओबीसीतील विविध जातीसंघटनांच्या राजकीय व्यवहाराला चालना मिळाली. या राजकीय व्यवहारात एकीकडे आपापल्या जातीसमूहाचे संघटन करून त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याची तसेच या जागृत झालेल्या ओबीसी समुहांना धर्मांधांच्या दावणीला बांधत त्यांचा उपयोग प्रतिगाम्यांची शक्ती वाढवण्यासाठी करण्याची प्रवृत्ती काही ओबीसी नेतृत्वात दिसून येते. तर दुसरीकडे आपल्या जात समुहांना प्रागतिक विचारांची ओळख करून देत अखेरीस जाती विनाशाच्या व्यापक लढ्याकडे घेऊन जाण्याची तळमळ असणारे ओबीसी नेतृत्वही दिसून येते. अशा या तळमळीने राजकारण करणार्‍या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे नेतृत्व अग्रभागी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याविरूद्ध कडवी झुंज देत लोकसभेची निवडणूक लढविली. महाराष्ट्रात त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विधानसभेत एक आमदारही आहे. उत्कृष्ट वक्ते असल्याने त्यांच्या सभांना चांगलीच गर्दी असते. अशा या अतिशय साध्या, औपचारिकतेचा लवलेशही नसलेल्या नेत्याबरोबर या परिसंवादाच्या निमित्ताने केलेली मनमोकळी बातचीत,

            सर्वात प्रथम आपण तुमच्या अगदी सुरवातीपासूनच्या काळाबद्दल, अगदी लहानपणापासूनच सुरवात करू…..

            माझा जन्म धनगराच्या कुटुंबात झाला. माझे आईवडील मेंढपाळी करीत गावोगावी फिरत. घर वगैरे नव्हतेच. सातारा जिल्ह्यात वाडे या गावात रानात माझा जन्म झाला. पण वडीलांनी या भटकेपणातही मला शाळेत घातले. पळसावडे या गावात माझे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले आणि पाचवीनंतरचे शिक्षण देवापूर (जि.सातारा) येथे रयत शिक्षण संस्थेत झाले.

त्या काळातील काही वाचन, सामाजिक काम वगैरे…

            तसे काही अभ्यासांच्या पुस्तकांशिवाय फारसे माझे वाचन नव्हते. राजकारण वगैरेबाबत फारशी काही चर्चा करायचो नाही. त्यातले फारसे काही कळायचेही नाही. सातारला नरेंद्र दाभोलकरांची संस्था चालवत असलेल्या मुक्तांगण या वसतीगृहातील विठ्ठल बाबर नावाचा एक मित्र होता. त्याच्याबरोबर अंधश्रद्धांसंबंधी थोडेफार बोलणे व्हायचे तेवढेच.  सातारला असताना मी दाभोलकर सर, आर्डे सर, यांच्याबरोबर वेण्णा तलावाच्या तिकडे बकरे बळीच्या विरोधातील एका कार्यक्रमाला गेलो होतो. तो माझा सार्वजनिक जीवनातील पहिलाच कार्यक्रम होता. पण त्या काळात सामाजिक जाणीव वगैरे नव्हती. त्याकाळात जर काही वाचले असेल तर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक. अभ्यासात तसा मी बरा होतो. मला इंजिनियर व्हायचे होते. बारावीला सायन्स कॉलेज, सातारा येथे प्रवेश घेतला. नंतर सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मला ‘मेरिट’वर प्रवेश मिळाला व मी सांगलीला आलो. मला टाटा ट्रस्टची स्कॉलरशीपही मिळाली. मी वालचंदच्या वसतीगृहात राहावयास लागलो.

मग येथूनच तुमची सामाजिक, राजकीय कामास सुरवात झाली?

            तो पण एक मजेदार किस्सा आहे. व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्याची घोषणा केली आणि देशभर एकच गहजब उडाला. ठिकठिकाणी मंडल आयोगाविरोधात निदर्शने आयोजित केली गेली. सांगलीही त्याला अपवाद नव्हते. आमच्या कॉलेजातील एका प्राध्यापकाने आम्हाला मंडल आयोगाविरोधात भडकाविले. मी त्याबद्दल कोणताच विचार न करता त्या मोर्चात मंडल आयोगाविरोधात घोषणा देत सामील झालो. मंडल आयोग काय आहे वगैरे याचा कोणताही विचार त्यावेळेस मी केलेला नव्हता. आरक्षणविरोधी विचाराने आमचा पूर्ण कब्जा घेतलेला होता. हा मोर्चा संपवून मी खोलीवर आलो. तेथे मला वाघमारे नावाचे आमचे प्राध्यापक भेटले. ते मला म्हणाले, “अरे! तू कसा काय या मंडल आयोगाविरोधी मोर्चात गेलास? तुझ्या जातीला तर मंडल आयोगाच्या शिफारशी लागू आहेत.” मला काहीच कळेना. मी विचारात पडलो. मी आणि प्रसन्न इनामदार एका रूममध्ये राहायचो. शेजारच्या रूममध्ये कांबळे राहायचा. एक  ब्राम्हण, एक दलित आणि एक धनगर असे आम्ही नेहमी एकत्र असायचो. पण आजवर असा जातीनिहाय विचारच केला नव्हता. वाघमारे सरांनी डी.के.खापर्डे यांचे मंडल आयोगावरचे पुस्तक वाचावयास दिले.

इथेच तुम्हाला तुमच्या जातीची जाणीव झाली?

            आजवर असा विचारच केला नव्हता. आहे तसे आयुष्य स्वीकारले होते. मंडल आयोगाच्या घुसळणीनंतर आपल्या जातीचा सर्व अंगांनी विचार करू लागलो. त्यातून धनगरांसारख्या इतर मागासवर्गीय जातीतील शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणा लक्षात यायला लागला. जातीतील प्रस्थापित नेतृत्वाचा संधीसाधूपणा, त्याचबरोबर या राजकीय नेतृत्वाच्या मर्यादा यांची जाणीव होऊ लागली. त्यातून आपल्या जात समूहाला बाहेर काढण्याची गरज पटू लागली. अशा अर्थाने जातीची जाणीव होऊ लागली. मग आणखी एक घटना घडली. मी कॉलेजच्या यु.आर.पदासाठी उभा राहिलो व निवडणुकीत विजयी झालो. पुढे शरद पवारांविरोधात माढा लोकसभा मतदार संघातून मी निवडणुकीला उभा राहिलो. त्या निवडणुकीत चांगली लढत देऊनही पराभूत झालो. पण त्यातून एक धडा मात्र पक्का शिकलो, आपण कितीही चांगले उमेदवार वगैरे असलो तरी आपली जात विसरली जात नाही. दुसरा धडा शिकलो महाराष्ट्रात मराठा राजकारणाला शह द्यावयास हवा. त्यामुळेच बहुसंख्य मराठ्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या काँग्रेसला माझा सुरवातीपासूनच विरोध आहे. त्याचप्रमाणे माझा भाजप संघ यांच्या जातीयवादी धर्मांध राजकारणालाही विरोध आहे. प्रत्येक जातीत व्यवस्थेचा वाहक असतोच. त्यालाच हाताशी धरून मंत्री करायचा आणि  त्या जातीला आपल्या ताब्यात ठेवायचे हे काँग्रेसचे नेहमीचेच धोरण राहिले आहे. पण केवळ जातीतल्या एका प्रस्थापिताला मंत्री करून ती जात सुधारत नाही किंवा केवळ ब्राह्मणांना शिव्या देऊनही जातीत सुधारणा होणार नाही. त्यासाठी समग्र परिवर्तनाची गरज आहे. याबाबत माझा आदर्श राम मनोहर लोहिया आहेत. मग इथूनच सर्व बदलले. जातीचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला राजकारणात उभे राहणे शक्य नाही याची जाणीव झाली. जातीचा उपयोग शिडीसारखा करायचा वर जाण्यासाठी. आधार जातीचा जरी असला तरी राजकारण मात्र जातीच्यापलीकडे जाणारे समग्र परिवर्तनाचेच असले पाहिजे. त्यामुळे जातीच्या आधारावर जरी जात संघटना आज उभ्या राहिलेल्या दिसत असल्या तरी त्या राजकारण समग्र परिवर्तनाचे करतील तर त्या जातीअंताला अखेर पोषकच ठरतील यात काहीच शंका नाही. याच उद्देशाने मी यशवंत सेनेची स्थापना केली. यशवंत सेनेच्या माध्यमातून मी धनगर समाजाचे, तरूणांचे प्रश्न मांडले. त्याचवेळेस मी ठरविले होते आपला राजकीय पक्ष काढायचा. प्रस्थापित धनगर नेतृत्वाने यशवंत सेनेला कधीच पाठींबा दिला नाही पण धनगर तरूणांनी मात्र पाठींबा दिला. आजही धनगरातील प्रस्थापित नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाजूला नाही. मात्र जनतेतून या पक्षाला चांगलाच पाठींबा आहे.

तुमचा कांशिराम यांच्याशी बराच संबंध आला त्या संदर्भात…

            कांशिराम यांच्याबरोबर मी संपूर्ण देशभर भ्रमंती केली.  त्यांनी मला संघटनात्मक बाबतीत खूपच मोलाचे मार्गदर्शन केले. याचा मला पक्ष काढण्याच्या कामी खूपच उपयोग झाला.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबद्दल तुमचे मत काय?

            या विधेयकाला आमचा संपूर्ण पाठींबा आहे. हे विधेयक लवकरात लवकर मंजूर व्हावयास हवे. मागासवर्गीय समाजाने अंधश्रद्धांच्या या जोखडातून मुक्त व्हावयास हवे. असे मला मनापासून वाटते. याबाबत मी नेहमीच प्रयत्न करीत असतो. अहिल्याबाई होळकरांचे अतिशय समर्पक, संघर्षशील व्यक्तीमत्व चितारणारा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते नचिकेत व जयु पटवर्धन यांनी सरकारी सहाय्यातून तयार केला आहे परंतु असे व्यक्तिमत्व परंपरागत व्यक्तिमत्वाला छेदणारे असल्याने सरकार तो चित्रपट प्रदर्शित करायला तयार नाही. मी त्याचे प्रदर्शन व्हावे यासाठी बराच प्रयत्न केला. पण सरकारने तो अद्यापही प्रदर्शित केलेला नाही.

महादेव जानकर

मुलाखत : राजीव देशपांडे