Categories
संवाद

अगा, ती भेट अद्याप झाली नाही

जून – २०१३

            माझा जन्म कोकणात नाते या गावी रायगडचे पायथ्याजवळ झाला. प्राथमिक व दुय्यम शिक्षणासाठी जीवनाची 16-17 वर्षे कोकणातील महाड या गावी गेली. त्याकाळी कोकणात वीज, रस्ते, टेलीफोन आदी कोणत्याही सुविधा नव्हत्या. सायंकाळ झाली की सर्व व्यवहार बंद होत असे आणि गप्पांना उत येत असे. त्यामध्ये भीतीयुक्त भूतांच्या व चेटकीणीच्या कथांना सर्वांत जोर असे. भूते माणसासारखी नसतात. त्याची पावले उलटी असतात. चेहरा अक्राळविक्राळ असतो. तीच अवस्था चेटकीणीची असते वगैरे… स्वत:ची बुद्धी चालविण्यास वाव नसे.

            महाड येथील आमच्या घराच्या मागे पत्र्याचा छोटेखानी मांडव होता. तेच आमचे जेवण घर होते. चुलीसमोर बसून आई तांदळाची गरम गरम भाकरी करत असे व खाण्यास देत असे. मांडवाच्या मागे मोकळी जागा होती. तेथेच काथ्याच्या बाजल्यावर (कॉटवर) मी झोपत असे. ते घरातील नातेवाईक अथवा आमचेकडे काम करणारा भिकू तात्या यांना मान्य नसे. मी मात्र एक टॉर्च व जाडजुड काठी ठेवून आरामात ताणून देत असे. रात्री भूतांचा व चेटकीणीचा वावर असता तर  मी म्हणत असे की अशी भूते आली तर मी त्यांचे स्वागत करीन, नमस्कार करून गप्पा मारू या, या भाषेत उत्तर देत असे. आईच्या म्हणण्यानुसार माझ्यावर रेतीचा व खड्यांचा वर्षाव होतो काळजी घे. असा वर्षाव आईला नेहमी ऐकू येत असे. मी मात्र कधीही तो ऐकू शकलो नाही. बाणकोट समोर बागमंडपे या अत्यंत मागासलेल्या गावी आईचे माहेरघर होते. मामांना माझे वागणे चमत्कारीक वाटले. त्यांनी एका ज्योतिषाला सांगून माझी कुंडली बनविली. त्या कुंडलीनुसार माझा राक्षस गण होता आणि राक्षस गण असणारांच्या वाटेला भूते जात नाहीत. मी लहान होतो तसे काही कळत नव्हते. मात्र मला भूताखेतांचा त्रास होणार नाही हे आईने ऐकले होते आणि तिला दिलासाही मिळाला होता.

            खूप महिने गेले व भूताचे दर्शन होत नव्हते. ते घेण्यास मी उत्सुक होतो. तुला भूताना भेटावयाचे असेल तर स्मशानात जा, तिथे भूते भेटतील. एक दिवस निर्धार केला व रात्रीचा मुक्काम स्मशानात घालविण्याचे ठरविले. एका मित्राला विनंती केली पण त्याने चक्क नकार दिला. मोहन तुझे ठीक आहे पण माझी रास देवगण असणाराची आहे. मला त्रास होईल. शेवटी एक मोठी बॅटरी, जाडजुड काठी, खंजीर आदी साहित्य घेऊन भूतांची भेट घेण्याचे ठरविले. रात्री 5-6 तास स्मशानात होतो, पण दर्शन नाही. शेवटी झाडावर भूते रहातात असे समजल्यामुळे झाडावर बॅटरीचा झोत टाकला. मी तुम्हाला भेटायला आलो आहे, पुढे या अशी आरोळी ठोकली. पण कोणीही आले नाही. वार्‍याने कोठे काही वाजले अथवा आवाज झाला तर तिकडे पहात होतो पण भास वगळता काही साध्य झाले नाही. हताश होऊन परत आलो. तुझा दिवस चुकला. अमावस्येला हमखास भूते भेटतील. तो प्रयत्नसुद्धा मी केला. पण भूत दिसेना. या सर्व भाकडकथा आहेत असे सांगून मी भूते पहाण्याचा नाद सोडला. माझे वय 89 आहे. रात्री प्रवासात, खिंडीत कोठेही मला भूत पहावयास मिळाले. नाही. भारत काय ? इंग्लंड, अमेरिकेमध्ये सुद्धा भूते आहेत. काही ग्रथांत भूतांचे वर्णन आहे, पण मला दर्शन झाले नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्ही बुद्धीवाद सोडून किती अंध आहोत हा विचार मला नेहमीच अस्वस्थ करतो. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी अनिस संस्थेच्या वतीने किती मोलाचे कार्य चालविले आहे ते माझ्या लक्षात येते.

            समाज केवळ शिक्षित असून भागत नाही, तो प्रखर बुद्धीवादी व तर्कनिष्ठ असावा, हे माझे मत अधिक पक्के झाले आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे आत्मा मरत नाही तो अमर आहे. कदाचित हा आत्मा असंतुष्ट असल्यास काही उद्योग करीत असावा. अर्थात त्याचा शोध घेणे मला अशक्य आहे. मात्र अंनिसने तेच काम चालविले आहे. त्यांना साथ देण्यातच सर्वांना बलवान समाजाचे दर्शन होऊ शकेल.

            स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे ज्योतिषासारख्या भ्रामक कल्पनांच्या मागे लागू नका. जो बलवान आहे व कोणतेही कष्ट करण्यास तयार आहे तोच आपले भवितव्य घडवू शकतो. म्हणूनच अनिसचा विचार तळागाळापर्यंत जावा असे मला वाटते. इतके प्रयत्न करूनही मला भूताचे दर्शन नाही याचा अर्थबोध आपण घ्यावा हाच आग्रह !

-मोहन धारिया