‘अध्यात्मिक बुवाबाजी’ ह्या विषयावर लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या अग्रलेखाबद्दल जाहीर अभिनंदन! प्रबोधनासाठी हे संपादकीय अत्यंत मूलगामी वाटल्याने आम्ही ते लोकसत्ताच्या सौजन्याने पुनर्मुद्रित करीत आहोत.
माणूस नावाचे यंत्र कधीच आणि कुणालाच कळले नाही आणि कळणारही नाही. त्याचे सगळे ‘स्पेअर पार्टस’ आणि त्या ‘स्पेअर पार्टस’चे आजार विकार कळले तरी मन नावाचा न दिसणारा अवयव आणि स्वभाव नावाची त्या अवयवाची वृत्ती याचा थांग मात्र कुणालाच लागत नाही. म्हणूनच सगळ्या गोष्टींवर औषध आहे, परंतु स्वभावाला औषध नाही. माणसाचे दृष्यमान असलेले अवयव आणि स्वभावापायी आलेली सुखदु:खे यांच्यामुळे त्याचे मन कुठेतरी शरण जाते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, ज्यांवर आपले नियंत्रण नाही, त्या गोष्टी जर आपल्याला अनुकूल अशा घडवून आणायच्या असतील तर त्यासाठी कुणाच्या तरी शक्तीवर, चमत्कारांवर विश्वास ठेवून माणूस त्याला शरण जातो. अशा मानसिक आधाराच्या गरजेपोटीच त्याने कधीतरी देवाचा शोध लावला. परंतु देवाला प्रत्यक्ष भेटणे अथवा आपले गार्हाणे सांगणे शक्य नसते. या मर्यादेवर मात करण्यासाठी मग माणसांच्या वतीने देवांशी संवाद साधू शकतील अशा ‘मिडिएटर्स’ची, माध्यम म्हणून काम करू शकेल अशा व्यक्तींची, गरज निर्माण झाली. अर्थातच या व्यक्तींकडे देवांशी संपर्क साधण्याची किंवा त्याच्या वतीने गोष्टी अनुकूल घडवून आणण्याची काही तरी शक्ती असणे आवश्यक होते. नाहीतर मग सामान्य माणूस आणि असे ‘देवदूत’ यांच्यात फरक तरी काय राहिला असता? केवळ जगाचे भले व्हावे, लोकांचे कल्याण व्हावे म्हणून भक्तीचा मार्ग दाखविणारे, ऐहिक सुखदु:खाचा विसर पडण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग दाखविणारे अनेक संत या भूमीत होऊन गेले आहेत. चमत्कार आणि इच्छापूर्ती या गोष्टी कायम वादाचा विषय राहिल्या आहेत. त्यामुळे या संतांनी केलेले, अथवा त्यांच्या नावाने सांगितले जाणारे चमत्कार आपण जर सोडून दिले तर त्यांनी स्वत:च्या या शक्तीचा कधी बाजार मांडला नाही. ‘देव भावाचा भुकेला’ म्हणत लोकांना सन्मार्ग दाखविणार्या संतांपासून तर करोडो रूपयांची माया जमविणार्या फाईव्ह स्टार बाबांपर्यंतचा प्रवास या संकल्पनेने केला आहे. माणसाच्या वृत्ती जशा बदलत गेल्या, त्याच्या गरजा जशा बदलत गेल्या आणि भक्तीची सांगड व्यवहाराशी घालण्याची ‘हुशारी’ त्याच्याकडे जशी आली तसे संतांचे रूपांतर देवदूताऐवजी एजंटात झाले. आज सगळीकडे सुळसुळाट आहे तो अशा ‘काम करून देतो’ म्हणणार्या आध्यात्मिक एजंटांचा. याला काही अपवाद असतील असे म्हणावे लागते, परंतु तसे अपवाद मिळणेही फारच अवघड आहे. काळाच्या ओघात बाबा-बापू-बुवांचे रूप आणि त्यांचे व्यवहार यातही खूप बदल झाले आहेत. आधीच्या संतांचे आयुष्य म्हणजे केवळ ‘नामाचा वेव्हार’ असे. आताच्या संतांचे व्यवहार पाहिले तर देवालाही आपल्या या ‘भक्तांच्या’ वैभवाचा हेवा वाटेल. अध्यात्मिक म्हणजे सर्वसामान्यांना जीवनाविषयी जी आसक्ती वाटते त्या आसक्तीपासून मुक्ती, सर्वसामान्य माणसे रागलोभ यांना बळी पडतात, अशा भावनांच्या पलीकडे जाणे म्हणजे अध्यात्म, धनसंचयामुळे, व्यवस्थेविषयी मोह निर्माण होतो, हितसंबंध तयार होतात आणि हा आपला, तो परका असा भेदभाव केला जातो, त्यामुळे अध्यात्माचे सर्वात मोठे आणि प्रमुख लक्षण कोणते असेल तर संपत्ती संचयापासून मुक्ती. या पार्श्वभूमीवर आजच्या बहुतांश बाबा, बुवा, महाराज आणि बापूंकडे पाहिले तर काय दिसते? त्यांनी अध्यात्माचा धंदा केला आहे. मोठमोठ्या संस्था स्थापन करायच्या, लोकांच्या सेवेसाठी काही गोष्टी निवडक गरिबांना फुकट उपलब्ध करून द्यायच्या आणि त्याच्या नावाखाली आपले साम्राज्य विस्तारत न्यायचे. एखादे बाबा हजारो एकर शेती खरेदी करतात, एखादे बाबा आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करतात तर एखादे बाबा रोगाचा धंदा करतात. जगण्याची कला शिकविणारे स्वत:च्या जगण्याची सोय करण्याची कलाच खरेतर लोकांसमोर सादर करीत असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किंवा संत गाडगेबाबा यांचा अधिकार कितीतरी मोठा होता. त्यांनी कधी आपले देव्हारे माजविले नाहीत आणि आपले ट्रस्ट स्थापन करून देणग्या गोळा केल्या नाहीत. गाडगेबाबा तर माणसाच्या कर्मातच त्याचा देव आहे म्हणून सांगत. पंढरपूरला जाऊन आलेल्या एका भक्ताला त्यांनी एकदा विचारले, ‘आला का जाऊन पंढरीले? मंग तुले इचारलं का इटोबानं का, बाबा भाकर खाल्ली का? नाई इचारलं ना? मंग कायले जातं पंढरपुराले?’ अशा राष्ट्रसंतांची आजच्या भारताला गरज उरलेली नाही असे दिसते. हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ करा म्हणून सांगणारे गाडगेबाबा आता फक्त स्वच्छता अभियानाच्या नावातच शिल्लक आहेत आणि आयुष्याचा उपभोग घेऊन अध्यात्माला नवा अर्थ देणारे नवे महाराज आता सर्वत्र बोकाळले आहेत. राजकारण्यांच्या आश्रयाला जाऊन स्वत:चे प्रस्थ वाढवून घेणारी एक ‘राजकीय बाबांची’ जमात तर इंदिरा गांधींच्या जमान्यापासूनच नावारूपाला आली, तिचा आता खूपच विस्तार झाला आहे. आता प्रत्येक राजकारण्याला एक स्वतंत्र बाबा असतो आणि शिवाय सगळ्यांचे काही कॉमन बाबा असतातच. हे बाबा राजकारण्यांचा काळा पैसा गुंतविण्यापासून अनेक कामात त्यांना मदत करीत असतात. अशा बाबांच्या भक्तांची संख्या प्रचंड असते आणि शिवाय श्रद्धा नामक एक मोठी अडचण असते. त्यामुळे अशा बाबांच्या चौकश्या होऊ शकत नाहीत, त्यांच्या व्यवहारांचे ऑडिटही होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीने ‘मला अमुक बाबांचा असा असा अनुभव आला’ असा दावा जर केला तर त्याचे खरे-खोटेपण तपासता येत नाही. अशा चमत्कारांचा प्रसार झाला की, बाबांची गाडी जोरात पळू लागते. फूटपाथवरील विक्रेते अनेकदा एक ट्रिक करतात. ग्राहक म्हणून आपलीच काही माणसे उभी करतात. त्यांनी खरेदी केली की, त्यांचे पाहून इतर लोकही मग खरेदी करतात. हीच युक्ती बाबामंडळी मोठ्या प्रमाणावर राबवित असतात. काही नामवंत मंडळींना पैसे मोजून भक्त किंवा अनुयायी म्हणून उभे केले जाते आणि त्यांना पाहून मग सामान्य माणसे गर्दी करू लागतात. ज्यांच्याकडे पैसा नसतो त्यांना पैसा हवा असतो, ज्यांना एखाद्या आजाराने छळले त्यांना त्या आजाराशी लढण्यासाठी आधार हवा असतो, ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांना मनाची शांती हवी असते. यापैकी अनेक गोष्टींचे मूळ माणसाच्या स्वभावातच असते, त्यामुळे त्याची उत्तरेही त्याच्याकडेच असतात. परंतु कधी मनाच्या कमकुवतपणामुळे तर कधी परिस्थितीने गांजून तो कुणालातरी शरण जातो आणि सामान्य माणसाच्या या कमजोरीवरच अनेक बाबा-बुवांची दुकाने जोरात चालत आहेत. या बाबांनी जर चांगुलपणाचे उपदेश केले असते आणि त्यांचा उपदेश मनावर घेऊन लोकांनी चांगले वर्तन केले असते तर भारतात सगळीकडे एकमेकांविषयीच्या सद्भावनांचे पीकच आले असते. कारण हजारो बाबा, त्यांचे करोडो अनुयायी आणि त्यांची लाखोंनी प्रवचने रोज होत असतात. परंतु असे काहीही होत नाही. बाबा महाराजांची संख्या मात्र वाढत राहते आणि त्यांच्या संस्थांची श्रीमंती देशाच्या विकासदरापेक्षाही जास्त वेगाने धावत असते. मोह आणि ऐहिक सुखावर मात करण्याचा मार्ग दाखविणार्या बाबांच्या लाखो करोडो रूपयांच्या संपत्तीचा वारस कोण यावर चर्चा होते आणि पुढच्या सेकंदाला काय होणार आहे याचीही खात्री जिथे कोणी देऊ शकत नाही तिथे, अमूक दिवशी बाबांचा नवा अवतार जन्म घेणार आहे असे छातीठोकपणे सांगितले जाते. देश आणि राज्याची जबाबदारी सांभाळण्याऐवजी पदांचा वापर करून राज्याला कंगाल करणारे, स्वत:च्या तुंबड्या भरणारे लोक भरल्या गळ्याने श्रद्धांजली वाहतात, तेव्हा बाबांनी या लोकांना आपले कर्तव्य नीट पार पाडण्याची आज्ञा का केली नाही, असा प्रश्न पडतो. खरेतर अण्णा हजारेंनी फार दूर न जाता, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या योगायोगाच्या श्रीमंतीची चौकशी करण्याचा संकल्प केला असता तरी खूप काही झाले असते. भक्तांच्या समस्यांवर स्वत:च्या ऐश्वर्याचे इमले उभारणारे बाबा आज भारतावर राज्य करीत आहेत. बघावे तिकडे मोठमोठे मंडप टाकलेले आणि भक्तांची तोबा गर्दी उसळलेली, तरीही या देशातून राग, लोभ, मत्सराची हकालपट्टी होत नाही, समाज सुखी समाधानी झाला असेही दिसत नाही. मग हे सगळे अध्यात्म जाते कुठे? समर्थ रामदासांनी चमत्कार दाखविणार्या गुरूंच्या बाबतीत ‘ऐसे गुरू अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे….’ असा सल्ला देऊन ठेवला आहे. तो सल्ला पाळायची आता वेळ आली आहे.
‘दै.लोकसत्ता’वरून साभार