Categories
चळवळ

अमावस्येच्या रात्री गडहिंग्लज अंनिसची स्मशान सहल

जून – २०१५

भूत, प्रेत, आत्मे, प्रेतात्मे, चेटूक, करणी, मूठ मारणे, भानामती, देवी अंगात येणे, देवीचा कोप होणे, बाहेरची बाधा होणे, गुप्तधनाची लालसा बाळगणे अशा प्रकारच्या अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजात वाढताना दिसत आहेत. एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानाची नेत्रदीपक प्रगती झाली असताना दुसरीकडे असंख्य अशा अंधश्रद्धेच्या लाटा समाजामध्ये पसरताना आपल्याला पहावयास मिळतात. यापैकी अमावास्येच्या रात्री स्मशानामध्ये, गावच्या गावंदरीमध्ये, गावच्या खिंडीतील वडाच्या झाडाखाली हमखास भुते नाचतात. भुताची पालखी रात्री बारा वाजता जाते. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये आपणांस ऐकावयास मिळतात. याला छेद देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडहिंग्लजच्या वतीने शनिवार दि.18/04/2015 या अमावास्येच्या रात्री ऐनापूर, ता.गडहिंग्लज येथे स्मशान सहलीचे आयोजन केले होते.

सुरवातीस स्मशानाची संपूर्ण स्वच्छता अंनिसचे कार्यकर्तेव मौजे ऐनापूर गावचे सुपुत्र अ‍ॅड. दिग्विजय कुराडे व त्यांचे सहकारी यांनी केली. सर्व कार्यकर्तेठीक आठ वाजता हिण्यकेशी नदीच्या काठावर वसलेल्या ऐनापूर गावच्या स्मशानभुमीत हजर झाले. प्रारंभी शाहीर सदानंद शिंदे व त्यांचे सहकारी आणि अंनिस कार्यकर्त्यांनी चळवळीची विविध गाणी शाहीरी ढंगात, ढोलकीच्या तालात गायीली. सर्पमित्र मेहबुब सनदी यांनी छानपैकी पिठले भात तयार केला. बाळासाहेब मुल्ला यांनी स्मशानसहलीबद्दलची माहिती कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना दिली. त्यानंतर अंनिसचे कार्यकर्तेव ग्रामस्थ यांनी स्मशानभुमीमध्ये बसून भोजनाचा आस्वाद घेतला. अंनिसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा.पी.एम.भोईटे यांनी चमत्काराची विविध प्रात्यक्षिके दाखवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये पाण्याचा दिवा पेटविणे, मंत्राने अग्नी पेटविणे, हवेतून सोन्याची चेन काढणे, कागदावर भूत उमटविणे, उदबत्तीची गिरकी नजरेची फिरकी इ.चमत्कार स्पष्टीकरणासह करून दाखविले. त्याचबरोबर चमत्कार सिद्ध करणार्‍यास अंनिसचे 21 लाख रूपयांचे बक्षीस असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रा.अनिल मगर व मेहबुब सनदी यांनी सापाविषयी समज आणि गैरसमज याबद्दल माहिती दिली.

बाळासाहेब मुल्ला, गणपतराव पाटोळे यांनी चळवळीची गाणी गायीली. शेवटी प्रा. पी. डी. पाटील यांनी आभार मानले. रात्री एक वाजता कार्यक्रमाचा समारोप केला.

या आगळ्या वेगळ्या उपक्रमात जिल्हाध्यक्ष प्रा.पी.एम.भोईटे तालुकाध्यक्ष पा.ल.करंबळकर गुरूजी, कार्याध्यक्ष डॉ. तिबिले, डॉ. एस. के. नेर्ले, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, तानाजी कुरळे, प्रा. बी. डी. पाटील, शिवाजी पाटील, अशोक मोहिते, शाहीर सदानंद शिंदे, प्रा. अनिल मगर, मेहबुब सनदी, बाळासाहेब मुल्ला, प्रा. अशोक बाबर, प्रा. कमलाकर गणपतराव पाटोळे, बाळासाहेब वालीकर, सकाळचे पत्रकार अवधूत पाटील, लोकमतचे वार्ताहर प्रकाश चोथे, उत्तम पालेकर, प्रा. तानाजा चौगुले, प्रा. प्रताप पाटील, रणजीत कांबळे, बाळू चौगुले, अजित पाटील, गणपती कुंभार, सतिश देसाई, विष्णू साळगावकर, लहु दड्डीकर, विष्णू परीट, बाळू ढगे, एकनाथ दड्डीकर, अनिकेत शेडेकर, दिपक कुराडे, अभिमन्यू दड्डीकर, ऐनापूरचे सरपंच सुर्याजी मोहिते, सदस्य मुक्तार मकानदार इ. कार्यकर्ते हजर होते. या उपक्रमास प्रा. अनिल कुराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रा. प्रकाश भोईटे, गडहिंग्लज