मिलिंद देशमुख हे सध्या महाराष्ट्राचे प्रधान सचिव आहेत. परंतु ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी राज्य पातळीवर समिती निर्माण होण्यापूर्वी पुणे येथे जे काम चालू होते तेव्हापासून संबंधित आहेत. ते राहतात देहू रोडला त्यांचे काम चालते पिंपरी चिंचवड शाखेबरोबर परंतु तरीही गेली 25 वर्षे ते पुणे शहर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही अत्यंत क्रियाशील कार्यकर्ते आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी व्ही.आर.एस.घेतली. आणि आता ते चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.
डोक्यावर भरलेल्या दुधाची बाटली घेऊन सलग 104 कि.मी.चालण्याचा विश्वविक्रम त्यांनी 13 मे 1993 ला पुणे येथे केला. त्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड या नामांकित पुस्तकातही अधिकृतपणे झाली. या विक्रमाला 13 मे 2013 मध्ये बरोबर 20 वर्षे पूर्ण झाली. यासाठी त्या विक्रमाचा द्विदशकपूर्ती सोहळा पिंपरी चिंचवड शाखेने उत्तमप्रकारे साजरा केला. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत साजरा झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड शाखेच्या लौकिकाप्रमाणे उत्तम होते. कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद होता. यामध्ये अर्थातच गेले 20 वर्षांतील मिलिंदच्या संघटनात्मक धडपडीचा मोठा वाटा होता. आलेल्या सर्वांना मिलिंदबद्दल अगत्य आणि मन:पूर्वक जिव्हाळा होता. अनेकांनी मिलिंदबाबतची आपली छोटीखानी मनोगते व्यक्त केली. मिलिंदने या प्रदीर्घ काळात जोपासलेल्या ऋणानुबंधाच्या गाठींची ती साक्ष होती. त्याच्या कन्येने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. मिलिंदची पत्नी बोलली हेही छानच झाले. मिलिंदवर तयार केलेली छोटी चित्रफित दाखवण्यात आली. ते दर्शन भावणारे होते. मिलिंदची मुलाखत घेतली गेली त्यामधून विक्रमाची उजळणी झालीच पण त्या विक्रमामागे चळवळ बळकट करण्याचे जे मानस होते तेही यथोचित उलगडले गेले. मुद्दामहूनच कोणाचाही नामोल्लेख केला नाही. कार्य घरचेच आहे या भावनेने सहभागी झालेल्यांचा ता आनंद सोहळा होता. त्या निमित्ताने व्यक्त झालेली मिलिंदची व संघटनेची भावकी ही त्याच्या विश्वविक्रमाएवढीच सुखावणारी होती.
नितीन राऊत
रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन राऊत यांच्या कन्येचा विवाह सोहळा हा परिवर्तनाचा आनंद सोहळा करण्याची किमया नितीन राऊत त्यांची पत्नी, त्यांचे व्याही आणि अर्थातच मुलगी आणि जावई यांनी करून दाखवली. सिंहाचा वाटा नितीन राऊत यांच्याकडेच जातो.
नोंदणी लग्न स्वागत समारंभाच्या दिवशी सकाळीच पार पडले होते. स्वागत सोहळा साधा परंतु आनंददायी व आशयसंपन्न होता. भपकेबाजपणा टाळूनही त्यात एक देखणेपणा होता. स्वागत समारंभाच्या प्रवेशद्वारापासून ते वेगळेपण येणार्यांना जाणवत होते. प्रवेशद्वाराला क्रांतीज्योती सावित्री फुले यांचे नाव दिलेले होते. प्रवेशद्वाराच्या कमानीच्या दोन्ही बाजूस एकीकडे सावित्रीबाई व दुसरीकडे जोतिराव फुले यांचे फोटो होते. मुख्य स्थळी पोचण्यासाठी बराच मोठा पॅसेज चालून जावे लागत होते. त्यामार्गावर दुतर्फा महाराष्ट्रातील समाजसुधारक, नामवंत साहित्यिक, शास्त्रज्ञ यांचे फोटो होते आणि त्याखाली नेटक्या शब्दात या मान्यवरांच्या कार्याची महती वर्णीली होती. पुढे गेले की, मुख्य स्थळाकडे जाताना छोट्या कमानीचा रस्ता होता. त्या प्रत्येक कमानीवर वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, व्यसनमुक्ती याबाबत मार्गदर्शक ठरणारी वाक्ये होती. त्या पलिकडे ग्रंथप्रदर्शन लावले होते. बहुतेक ग्रंथ समितीच्या विचाराला उठाव देणारे होते. आनंदाची बाब म्हणजे आठ हजार रूपयांची पुस्तके विकली गेली. वधु-वरांच्या स्वागत मंचला परिवर्तनाची सप्तपदी असे नाव देण्यात आले होते त्या मंचाच्या चारी बाजूंनी नेत्रदानाची महती सांगणारी घोषवाक्ये लावली होती. खरे तर विवाह हा लोकमानसात मंगल व शुभ सोहळा मानला जातो. आणि नेत्रदान ही व्यक्ती निधनाच्या दु:खद घटनेनंतर करावयाची बाब आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या होत्या परंतु कोणालाही त्या खटकल्यासारख्या वाटल्या नाहीत. मानसिकता बदलत आहे याचाच तो सुखद प्रत्यय होता. बुवाबाजी विरोधातील मंगेश पाडगावकरांची कविताही ठळकपणे लावली होती. विशेष म्हणजे पूर्व सूचना देऊन आहेर स्वीकारला जात होता आणि ती सर्व रक्कम दुष्काळग्रस्तांच्यासाठी जाणार हे आधीच जाहीर केले होते. विवाहातील खर्चात कपात करून दुष्काळग्रस्तांच्यांसाठी नितीन राऊत यांनी 50 हजार रूपये दिले. आणि या पद्धतीने परिवर्तनाचा आनंद सोहळा कल्पकतेने करणार्या महाराष्ट्र अंनिसच्या एका कार्यकर्त्याला प्रतिवर्षी स्वत:च्या वडिलांच्या नावाने पाच हजार रूपयाचा पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला रूपये 60 हजाराची देणगी घोषित केली. स्वागत समारंभाच्या स्थळावरून बाहेर पडताना स्वागत कमानीच्या मागील बाजूस लावलेली अक्षरे डोळ्यासमोर येत होती. ती होती पाऊले चालती परिवर्तनाची वाट.
आपल्या कृतिशीलतेने ही वाट संपन्न करणार्या मिलिंदचा आणि नितिनचा सर्व चळवळीला जो अभिमान वाटतो तो मी या लेखाद्वारे व्यक्त करत आहे एवढेच.
-डॉ. नरेंद्र दाभोलकर