Categories
अभिवादन

अं.नि.स.चे हितचिंतक शांताराम शिंदे यांचे निधन

ऑगस्ट - २०१२

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे येथील क्रियाशील कार्यकर्त्या वंदनाताई शिंदे यांचे पती शांताराम शिंदे यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. शिंदे काका यांच्यावर प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचा मोठा पगडा होता. पत्नी वंदनाताई यांना अंनिसचे काम करण्यात त्यांनी पूर्ण मोकळीक दिली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी वंदनाताई यांना चारचाकी वाहन व ड्रायव्हर देऊन चळवळीचे कार्य अधिक गतीमान करण्यास मदत केली.  त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील गीतांची व्यावसायिक डी.व्ही.डी. बाजारात आणली होती. तसेच ‘येड्या गावाच्या नावाने’ हे व्यावसायिक नाटक अंधश्रद्धा निर्मूलन विषय घेऊन रंगभूमीवर आणले. शिंदे काका यांचा हाऊसकिपींग व नाट्यनिर्मिती हा व्यवसाय होता. शिंदे काकांचे वाचनही अफाट व सर्वांगीण होते. घरामध्ये त्यांचे स्वत:चे पाच हजार पुस्तकांचे ग्रंथालय होते. अं.नि.वार्तापत्रातील एखादा लेख आवडल्यास लगेच वार्तापत्रास फोन करून ते आपली प्रतिक्रिया नोंदवित असत.  शिंदे काकांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृतदेहाचे त्वचादान व देहदान करून शिंदे कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अंनिस चळवळीस भक्कम पाठींबा देणारा शिंदे काकांच्यासारखा हितचिंतक आज आपल्यात नाही. याचे आम्हास मनस्वी दु:ख होते.

            शिंदे कुटुंबियांच्या दु:खात अंनिस परिवार सहभागी आहे.

– राहुल थोरात