निसर्गावर विज्ञानाच्या सामर्थ्याने मात करीत असतानाच प्रदूषणाचा नवा राक्षस उभा राहिला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये पावसाचे पाणी साठल्याने हाहा:कार उडाला. वातावरण गरम होऊन धु्रव प्रदेशातील बर्फ वितळले तर त्याखाली अनेक शहरं गडप होतील असे शास्त्रज्ञ सूचित करीत आहेत.
निसर्गाच्या प्रदूषणाबरोबरच जात व धर्म यांच्या नावाखाली मानवी समाजाच्या मनाचे प्रदूषण उफाळून आलेले दिसते. गुजरातमधील धार्मिक दंगल, अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील अतिरेक्यांचा हल्ला, भारतात बुवाबाबांचे फोफावलेले पीक या धार्मिक प्रदूषणाचा मुकाबला कसा करावयाचा? निसर्ग, विज्ञान व धर्म यांचा केंद्रबिंदू मानव हवा. यासाठी विवेकावर आधारित नवा मानवता धर्म वाढला पाहिजे. निसर्ग व मानवी व्यवहारातील प्रदूषण हा या लेखाचा विषय आहे.
मानव व निसर्ग
कवी कुसुमाग्रजांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ नावाची छान कविता लिहिली आहे. या कवितेत पृथ्वी सूर्याभोवती फिरत रहाण्याचे कारण वर्णिले आहे.
युगामागूनी चालली किती युगे ही
करावी किती भास्करा तुझी वंचना
किती काळ कक्षेत राहू तुझ्या मी
कितींदा करू प्रीतीची याचना
पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, सागर, पर्वत विविध प्राणी पक्षी, वृक्ष आणि वेली या सर्वांचा मिळून निसर्ग बनतो. या निसर्गात विविध प्रकारच्या घडामोडी घडत असतात. सूर्य दररोज पूर्वेला उगवतो, धु्रव तारा उत्तरेलाच दिसतो. ठराविक काळाने समुद्राला भरती-ओहोटी येते. या झाल्या नित्यनेमाने घडणार्या घटना. पण काही घटना आकस्मिक घडतात. आकाशात धुमकेतू दिसणे, त्सुनामी लाटांचा प्रलय, एखाद्या रोगाची साथ या झाल्या आकस्मिक घटना.
पृथ्वीवर उत्क्रांत झालेला मानव निसर्गातील या घटनाकडे कुतुहलाने पहातो. त्यांच्या कारणांचा शोध घेतो. प्रसंगी निसर्गाशी संघर्षही करतो. यातून मानव आणि निसर्गा यांच्यातील परस्पर क्रिया प्रतिक्रियांचे घटनाचक्र चालू रहाते.
वर वर्णन केलेली कुसुमाग्रजाची कविता ही मानव व निसर्ग यांच्यामधील संबंधाचा काव्यात्मक(कलात्मक) दृष्टिकोन म्हणता येईल. सकाळी पूर्वेला लाल रंग येतो, इंद्रधनुष्याचा गोफ अवकाशात का विणला जातो अशा घटनांचे स्पष्टीकरण देताना निसर्गावर मानवी भावनाचे रोपण कवी करतात. त्यातून निसर्ग काव्य जन्माला येते. सकाळी गवतावर दव का पडते? तर रजनी राणी स्मितवदनाने माहेरी जात, म्हणून चंद्रमा करू लागला नभी अश्रूपात.
दंव म्हणजे रजनी राणीच्या(रात्र) विरहामुळे चंद्र सख्याच्या डोळ्यातून स्त्रवलेले अश्रू.
वरील ओळी बालकवी ठोंबरे यांच्या कवितेतील आहेत. त्यांच्या काव्यात निसर्ग बोलतो, हसतो, गातो, रडतो आणि रूसतो देखील. ना.धो.महानोर यांच्या कवितांत देखील निसर्ग असाच डोलतो आणि फुलतो. प्रख्यात इंग्लिश कवी वर्डस्वर्थ यांच्या काव्यातील निसर्ग असाच भावूक आहे.
माणूस भावूक असतो. त्याचे भावजीवन समृद्ध करण्यासाठी निसर्गाकडे पहाण्याचा हा सौंदर्यवादी दृष्टिकोन आवश्यकही आहे. पण निसर्गाकडे भावात्मक दृष्टीने पहात असताना माणसानी एक मोठी चूकही केली आणि त्याचे परिणाम आपणास भोगावे लागले. हा मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण एका ऐतिहासिक घटकेडे वळू या. आयझॅक, अॅसिमॉव्ह या जगप्रसिद्ध, अमेरिकन विज्ञान लेखकाच्या विज्ञान इतिहासाच्या ग्रंथात या घटनेचा उल्लेख आहे.
आकाशातील वीज एखाद्या घरावर कोसळणे ही परमेश्वरी योजना असल्यामुळे तिच्यात ढवळाढवळ करणे हा पाखंडीपणा होय असे सतराव्या शतकापर्यंत समजले जात होते. ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी युरोपमध्ये जनमानसावर अशा समजुतींचा मोठा पगडा बसविला होता. चर्चवर वीज पडणार नाही कारण तेथे परमेश्वराचे(येशूचे) वास्तव्य असते अशी लोकांची श्रद्धा होती. पण कोणत्याही घरावर पडणार्या विजेचा म्हणजेच निसर्गाचा शाप 1753 साली उलटविला गेला.
बेंजामिन फ्रँकलीन या वैज्ञानिकाने, पतंगाचा प्रयोग करून असे दाखवून दिले की, निसर्गातील विद्युत व प्रयोगशाळेतील कृत्रिम विद्युत यांच्यात फरक नाही. 1753 साली या शोधाचा आधार घेऊन त्याचे विद्युतनिवारक हे उपकरण तयार केले. असे विद्युत निवारक, घराचे विजेपासून रक्षण करतात हे लोकांना पटू लागले. त्यांची त्याचा वापर सुरू केला. पण अशा साधनाचा वापर करणे हा परमेश्वराच्या इच्छेचा अवमान होय अशी हाकाटी धर्मगुरूंनी सुरू केली.
1755 साली लिस्बन शहरात प्रचंड भूकंप झाला आणि धर्मगुरूंनी जल्लोष करून लोकांना सांगावयास सुरवात केली की, देवाज्ञा धुडकावली, विद्युत उपकरण वापरले म्हणून देवाने भूकंपातून राग व्यक्त केला. लोक संभ्रमात पडले. धर्मगुरूंचे मानायचे की विज्ञानवेत्त्यांचे?
या प्रश्नाचे उत्तर आणखी एका घटनेमुळे मिळाले. इटलीतील ब्रेसिया नावाच्या गावी ही घटना घडली. सॅन नाझारो नावाच्या चर्चवर वीज पडली. चर्चच्या तळघरात शंभर टन गंधकाची दारू साठवून ठेवली होती. गावातील तमाम जनता निर्धास्त होती. पवित्र चर्चवर वीज पडली तरी काहीही घडणार नाही असे लोकांचे पक्के मत होते.
पण चर्चवर वीज पडलीच. भयंकर स्फोट झाला. जवळजवळ 20 टक्के गाव बेचिराख झाले. 3000 गावकरी तत्काळ मृत्यूमुखी पडले.
ज्या चर्चमध्ये देवबाप्पा आहे त्यांच्याच अंगावर वीज पडलीच कशी?
निसर्गाच्या नियमाला देव बाप्पा आवरू शकत नाही. म्हणून पुराच्या तडाख्यात मंदिरे नष्ट होतात. आणि कोणा परमपूज्याच्या पायाला पुराच्या पाण्याचा स्पर्श होताच पूर ओसरत नाही. (ते व त्यांचे शिष्य तसा दावा करतात)
निसर्गातील घटना हा निसर्गाचा वा देवाचा शाप अशी भीतीची प्रतिक्रिया धर्मातून निर्माण झाली. खोटी भीती आणि खोटी आशा यातून धार्मिक कर्मकांड निर्माण झाले. निसर्गाला आम्ही आवरू शकतो आणि तुमचे भौतिक प्रश्न सोडवू शकतो अशी बतावणी करणारे देवाचे दलाल निर्माण झाले.
निसर्ग आणि आपण यांच्या संबंधाबाबत दोन नवे दृष्टिकोन वरील घटनेतून स्पष्ट होतात. निसर्गाकडे पहाण्याचा धार्मिक दृष्टिकोन व निसर्गाला समजावून घेणारा वैज्ञानिक दृष्टिकोन.
धर्म आणि निसर्ग
कडाडणारी वीज, महापुराचे थैमान, पिकावरील रोग, महामारीचे संकट आदी घटनांकडे विज्ञानपूर्व कालातील लोक भयचकित नजरेने पहात असणार. त्यातूनच अगम्य अशा निसर्ग शक्तींची व विविध देव देवतांची त्याने कल्पना केली असणार. श्री.म.माटे ‘विज्ञान बोधा’च्या प्रस्तावनेत लिहितात, ‘चंद्राला ग्रहण लागले की ही रानटी माणसे एकत्र येत. जाळ पेटवून त्याच्याभोवती नाचत आणि ओरडत. त्यांच्या ओरडण्याला व नाचण्याला तर्काचा आधार होता. जंगलातील हिंस्त्र पशू जोरात गलका केल्याने पळून जातो हे त्यांना माहीत होते. मग चंद्राला गिळणार्या राक्षसाला पळवून लावायचे असेल तर जोरात ओरडले पाहिजे. हा कार्यकारणभाव त्यांच्या काळात त्यांच्या ज्ञानाशी तसा सुसंगतच होता. पण ही मंडळी यापेक्षा आणखी काही विधी करत. आपल्या मेलेल्या पूर्वजांचा दात व डोक्याच्या केसाचा पुंजका ते जाळात टाकत. यामुळे तो चंद्राला गिळणारा राक्षस घाबरेल व पळून जाईल, असे त्यांना वाटे. माटे लिहितात दात आगीत टाकल्याने राक्षस घाबरेल हे या मंडळींना कसे सुचले? अशा अज्ञानमूलक कार्यकारणभावाने मानवी इतिहास खच्चून भरला आहे.’
बळी दिलेल्या व्यक्तीचे रक्त पिकावर शिंपडले की, पीक भरघोस येईल, असा समज एकेकाळी होता. बेडूक पाटावर ठेवायचा, पाट एकाच्या डोक्यावर द्यायचा व त्याच्या अंगावर पाणी ओतत गावभर फिरले की, पाऊस पडतो अशी समजूत आजही प्रचलित आहे. आपले कल्याण व्हावे यासाठीचे व शत्रूचा नायनाट व्हावा यासाठीचे विधी माणसांनी निर्माण केले. याना यातुविद्या म्हणतात. निसर्गात विविध प्रकारच्या अदृश्य देवता, पिशाच्च शक्ती असतात अशी प्राचीन मानवाची समजूत होती. त्यांना प्रसन्न करणारे हे विधी होत.
धर्मातील मनोकामना पूर्ण करणारे विविध प्रकारचे विधी व कर्मकांडे यांचे मूळ या यातुविधीत आहे. विज्ञान पूर्वकालातील ही विविध कर्मकांडे ज्या अदृश्य शक्तीच्या समजुतीवर आधारीत आहेत त्या शक्ती पुराव्याने सिद्ध होत नाहीत, हे वैज्ञानिक ज्ञानाने आपणास कळून आले आहे. धार्मिक कर्मकांडामागील कार्यकारणभाव, भावनिष्ठ आहे. घरावर कोसळणारी वीज हा देवाचा कोप आहे, कुष्ठरोग पूर्वजन्मीचे पापामुळे होतो. मरीआईच्या अवकृपेने पटकीची साथ येते ह्या व अशा अनेक अंधविश्वासाचा आधार धर्म व यातुक्रिया आहे.
निसर्गातील घटना मानवासाठी घडत नसतात. सूर्य, चंद्र मानवासाठी प्रकाशत नाहीत ह्या सत्याचे ज्ञान मानवाला उशीरा झाले. निसर्ग नियमबद्ध आहे व माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू नाही हे विज्ञानातून समजलेले सत्य आहे. मानवी आकांक्षा व भावभावना, मानवाचे नैतिक व अनैतिक वर्तन या बाबतीत निसर्ग तटस्थ आहे. हा मुद्दा नीट समजून घ्यायला हवा.
निसर्गाचे न-नैतिक स्वरूप
एकदा दोन गृहस्थ अलेक्झांडर बादशहाच्या दरबारात न्याय मागण्यासाठी आले. त्यापैकी एकाने आपले घर दुसर्याला विकले होते. ते जुने घर पाडून नवीन घर बांधतेवेळी पाया खोदताना त्याला द्रव्याचा हंडा सापडला. गृहस्थ प्रामाणिक व नीतीमान होता. तो मूळ मालकाला तो हंडा देऊ लागला. ‘मी फक्त घर व जमीन विकत घेतली आहे. हा हंडा मला नको’ त्यावर मूळ मालक म्हणाला, ‘ज्या दिवशी घर व जागा तुला विकली त्या क्षणी सर्व काहीच तुझेच झाले. हा हंडा तूच घे.’
अलेक्झांडरने दोघांचा युक्तीवाद शांतपणे ऐकून घेतला व त्या हंड्यातील द्रव्य आपल्या तिजोरीत जमा करण्याची सेवकाला आशा केली. त्यावर त्यातील दुसरा गृहस्थ उद्गारला. ‘महाराज, ह्या द्रव्यावर तुमचा हक्क नाही. तुम्ही नीतीने वागला नाही. तुमच्या राज्यावर सूर्य प्रकाशतोच कसा?’
अलेक्झांडर अनितीमान म्हणून त्याच्या राज्यावर सूर्याने प्रकाश देऊ नये असे त्या गृहस्थाचे मत. बिचारा सूर्य हे करू शकत नाही. कारण सर्वत्र प्रकाश देणे हाच त्याचा(निसर्गाचा) नियम आहे. हा नियम सूर्य तोडू शकत नाही.
हजारो वर्षे झाली. सूर्य पूर्वेलाच उगवतो आहे. चंद्राला कला होत आहेत. पूर्वेला सकाळी लालच रंग येतो. पृथ्वीवरून आकाश निळेच दिसते. निसर्ग नियमबद्ध आहे. न्यूटन हा धार्मिक होता पण त्याने जे गतीचे नियम शोधले त्या नियमात परमेश्वर हस्तक्षेप करीत नाही हे त्याचे ठाम मत होते.
वैज्ञानिक दृष्टिकोन
विस्मयाने थक्क होऊन निसर्गातील घटनाकडे पहात असताना निसर्गाबद्दल मानवाला विलक्षण दरारा वाटला. भीतीमुळे त्याच्यात शरणभाव निर्माण झाला. निसर्गातील घडामोडीच्या पाठीमागे अव्यक्त सूत्रधार आहे अशी त्याने कल्पना केली. या कल्पना शक्तीतून त्याने पर्जन्य-देवता, अग्नीदेवता, पिशाच्च शक्ती व आकाशातील बापाची निर्मिती केली. पण हे घडत असताना आणखी वेगळ्या दृष्टिकोनाने माणूस निसर्गाकडे पहात होता. आपल्या पूर्वजाच्या कल्पना तपासून पारखून घेण्याची चिकित्सक दृष्टी त्याला प्रगत मेंदूमुळे लाभली होती. निसर्ग घटनाकडे भयचकित नजरेने न पहाता जरा धिटाईने तपास करण्याची, तर्कातून अनुमान काढण्याची, पडताळून पहाण्याची शक्ती मानवाला लाभली आहे. माणूस हा शंकेखोर प्राणी आहे. शंका ही ज्ञानाची जननी आहे. या चिकित्सक दृष्टिकोनातून धर्मकल्पनाबद्दल शंका येण्यास सुरूवात झाली. युरोप खंडात बायबलमधील धर्मकल्पनाबद्दल गॅलिलिओने शंका उपस्थित केल्या. कारणही तसे प्रामाणिक होते.
माणूस ह्या विश्वाचा केंद्रबिंदू आहे. चंद्र, सूर्य, तारे हे आकाशातील अमर गोल आहेत, ते मानवाला प्रकाश देण्यासाठी निर्माण झालेत, त्यांचा पृष्ठभाग मोत्यासारखा गुळगुळीत आहे, आकाशस्थ गोलांची निर्मिती देवाने केल्यामुळे त्याची संख्या कायम आहे. त्यात वाढ, घट वा बदल होत नाही. निसर्गाबद्दल बायबलप्रणित या कल्पना गॅलिलिओने तपासल्या.
गॅलिलिओने आपण स्वत: तयार केलेल्या दुर्बिणीतून चंद्राकडे पाहिले. त्याला चंद्रावर उंचवटे व खळगे दिसू लागले. सूर्यावर काळे डाग असल्याचे त्याच्या लक्षात आले. आणि जेथे तारकांची गर्दी आहे तेथे दुर्बिण रोखल्यास नवीन तारे दिसायला लागले. गॅलिलिओच्या निरीक्षणातून धार्मिक सत्याला धक्का बसला. कोपर्निकस, केप्लर व न्यूटन यांच्या संशोधनातून पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू नाही हे सिद्ध झाले. धुमकेतूचे आगमन कधी होईल याचे भाकित करणे शक्य झाले. जेव्हा गरीब मरतात तेव्हा धुमकेतू दिसत नाही पण धुमकेतुचे आगमन हे राजघराण्यावरील संकटाची सूचना आहे असे शेक्सपिअरने लिहून ठेवले होते. पण धुमकेतू हा एकाएकी आकाशात येत नाही, त्याला स्वत:चा मार्गक्रम आहे, तो ठराविक वेळीच दिसेल हे गणिताने सिद्ध झाले.
कोपर्निकस ते न्यूटन प्रणीत संशोधनातून निसर्गाची रहस्ये मानवी बुद्धीच्या आवाक्यात आली. कुतूहल, निरीक्षण, तर्क, अनुमान पुन्हा पडताळणी या पद्धतीने निसर्ग तपासता येतो ही विज्ञानाची सत्यशोधनाची रीत आहे. निसर्गाचे ज्ञान हे निरीक्षण-परीक्षण व प्रयोगांती मिळते असे मानणे हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा युरोप खंडात अंमल सुरू झाला त्याला 500 वर्षे होऊन गेली. अलिबाबाच्या गुहेची कळ सापडली आणि निसर्गाच्या ज्ञानाची लयलूट सुरू झाली. गती, प्रकाश, विद्युत, चुंबक, पदार्थाचे अंतरंग, मानवी शरीररचना, प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्या वर्तनाचे, रचनेचे नियम मानवाने हस्तगत केले. हीच वैज्ञानिक क्रांती. आता ह्या क्रांतीने जगभर आपला अंमल सुरू केला आहे.

तंत्र विज्ञानाची घोडदौड
निसर्गाचे स्वरूप, चलनवलन याचे नियम समजू लागल्यावर निसर्गाचा मानवाच्या विकासासाठी वापर वेगाने सुरू झाला. यासाठी तंत्रज्ञानाची निर्मिती झाली. तंत्रज्ञानाचे नेमके स्वरूप काय आहे?
उंचावरून समुद्रसपाटीकडे वहाणे हा पाण्याचा गुणधर्म. गुरूत्वाकर्षणाचा नियम इथे लागू पडतो. उंचावरची वस्तू खाली पडते. ती याच नियमानुसार. तंत्रज्ञानाने गुरूत्वाकर्षणावर मात करून पाण्याला उंचावर नेले. माणसाला विमानाद्वारे हवेत उंचावर जाणे शक्य झाले. निसर्ग नियमानुसार मानवाला पाण्यावरून चालता येत नाही. समुद्र तळाला संचार करता येत नाही. आगबोट व पाणबुडीमुळे हेही शक्य झाले. अशा रितीने माणसाने निसर्गावर विजय मिळविला.
विल्यम हार्वे याने हृदय हे पंप आहे हे दाखवून दिल्यावर व व्हेसॅलियस याने शरीररचनेचा अभ्यास केल्यानंतर शरीरशास्त्र वेगाने विकसित झाले. सूक्ष्मदर्शकातून जंतूचा शोध लागला आणि देवी, कॉलरा यासारख्या आजारावर मात करणे शक्य झाले. कुष्ठरोग हा देवाचा कोप ही कल्पना गळून पडली आणि कुष्ठरोगाच्या जंतूवर नियंत्रण आणून तो बरा करणे शक्य झाले. बाबा आमटे यांच्या आनंदवनात असे शेकडो कुष्ठरोगी या आजारातून मुक्त झालेत.
तंत्रविज्ञानाने निसर्ग व मानव यांच्या संबंधाला एक नवा आशय दिला. पूजा करून, प्रार्थना करून निसर्ग प्रसन्न होत नाही. निसर्गाला समजावून घेऊन ज्ञानमार्गाने व तंत्राने मानवी विकास साध्य करता येतो हाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आशय आहे.
विज्ञानसृष्टी आणि विज्ञानदृष्टी
निसर्ग नियमांच्या ज्ञानातून मानवाने निसर्गाला आपल्या सेवेत जुंपले खरे; परंतु निसर्गाकडे पहाण्याचा दृष्टिकोन पूर्णत: बदलला नाही. विविध प्रकारच्या देवदेवता, पिशाच्चे, चेटूक, चकवा(Gods, Demons and Spirit) यांचे अस्तित्व शक्य नाही, ह्याबाबत तो अजूनही संभ्रमात आहे. परिणामत: विविध प्रकारच्या अंधश्रद्धा गळून पडल्या नाहीत. बुवाबाजी व बनवेगिरी चालूच आहे. निसर्गाचा नियम सांगतो की, शून्यातून वस्तूची निर्मिती करता येत नाही. पण हवेत हात फिरवून सोन्याची साखळी निर्माण करणार्या महाभागाचे वर्चस्व राजकीय मंडळी देखील मान्य करतात. शून्यातून ऊर्जा निर्माण होत नाही. पण घरातील कपडे आपोआप पेटतात असे सांगणारे महाभाग, हे भानामती करणीने घडले असे समजतात. गुप्तधन मिळविण्यासाठी अजूनही नरबळी दिले जातात. सातारा जिल्ह्यातील कलेढोण गावच्या शिवाजी माळी याने गुप्तधनाची अभिलाषा असणार्या कुटुंबातील स्त्रियांना नग्नपूजा करायला लावली. मंत्रसामर्थ्याने मुलगा देतो अशी भुरळ पाडून श्रद्धानंद नावाच्या महाराजाने शाकिरा नामक तरूणीला जिवंत गाडले. तिची 50 कोटींची संपत्ती हडप करण्यासाठी त्याने हे कृत्य केले. शाकिरा ही खलीली नामक एका भारतीय राजदूताची पत्नी होती. अंधविश्वासाला गरीब आणि अडाणी लोकच फसतात हा भ्रम आहे. अदृश्य शक्तीवरचा विश्वास ही एक सर्वव्यापी मानसिकता आहे. म्हणून अंधश्रद्धा पण सर्वव्यापी आहे. तिचे स्वरूप पिसाळलेल्या कुत्र्यासारखे आहे. ती कुणाचाही चावा घेते.
शेते हिरवीगार झाली. घरात विजेचा लख्ख प्रकाश आला. शारीरिक आजारावर मात करता येणे शक्य झाले. कुष्ठरोग, कॉलरा, प्लेग यावर नियंत्रण आले. पण मनातील अंधार काही दूर झाला नाही. खरी विज्ञान साक्षरता हाच यावरचा प्रभावी उपाय आहे. विज्ञान शिक्षण म्हणजे विज्ञान साक्षरता नव्हे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चिकित्सक दृष्टीने निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विज्ञानदृष्टी.
अंधविश्वास हे धर्माच्या क्षेत्रातील प्रदूषण आहे. या प्रदूषणावर वैज्ञानिक दृष्टीने मात करणे हा प्रभावी उपाय आहे.
नव्या समस्या
तंत्रज्ञानाने साधनसंपत्ती निर्माण केली खरी पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून नैसर्गिक साधन संपत्तीची लयलूट सुरू झाली. विवेकाचा वापर न होता श्रीमंत बापाच्या उधळ्या पोराप्रमाणे निसर्गाला ओरबाडण्याची स्पर्धा सुरू झाली. त्यातून काही नवे प्रश्न निर्माण झालेत.
इतर प्राणी व पक्षी निसर्ग नियमांना आव्हान देत नाहीत. मात्र टिकून राहण्यासाठी ते निसर्गानुरूप स्वत:त बदल करतात. हिरव्या गवतात राहणारा साप हिरवा होतो. पर्यावरण आणि निसर्ग यांना इतर प्राणी प्रदूषित करीत नाही. माणूस मात्र विज्ञानाचा अतिरेकी वापर करून अवघ्या निसर्गाचे संतुलन बिघडवू लागला आहे. विज्ञानाच्या वापराला जशी गोड फळे लागली तशी निसर्ग विषमय होण्याचे कडू फळही लागले. चांगल्या बरोबर वाईटही आले. याचा अलिकडील पुरावा म्हणजे मुंबईत प्लॅस्टिक कचर्यामुळे घडलेले भीषण पूराचे संकट. प्लॅस्टिक प्रदूषण हे तसे सौम्य संकट आहे. याहूनही भयानक आपत्ती येऊ शकतात.
वातावरणाच्या प्रदूषणामुळे हरीतगृह परिणामाने (Green House Effect) नवे संकट येण्याचा धोका वाढलाय. ओझोनच्या थराला छिद्र पडलंय. पृथ्वीचे तापमान वाढत चाललंय. परिणामी बर्फाचे सागर वितळू लागतील व समुद्र किनार्यावरची शहरे पाण्याखाली जातील.
पाण्याच्या प्रदूषणामुळे काविळीसारखे आजार उग्र रूप धारण करतील. तंत्रज्ञानामुळे उद्भवणार्या नव्या समस्यांवर मात करायची असेल तर विज्ञानाला विवेकाची साथ हवी.
निसर्ग आणि आपण
एक गोष्ट खरी आहे. निसर्ग वाचला तर आपण वाचू. पृथ्वी एकच आहे. इथले पाणी, जमीन व हवा एकदा का विषमय झाली तर निसर्गही मरेल व मानव जातही विनाशाकडे वाटचाल करेल. निसर्गाची पूजा करून विषमय निसर्गाला सावरता येणार नाही. मग यावर उपाय काय?
उपग्रह हवेत पण गांधीजीही हवेत!
टॉफलर या समाजशास्त्रज्ञाने लिहिलेले थर्ड वेव्ह(Third Wave) हे पुस्तक जगभर गाजले. या ग्रंथात ‘Gandhi with Satellite’ या शीर्षकाचे एक प्रकरण आहे. शोषक तंत्रविज्ञानाला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक व संगणक प्रणालीद्वारे छोट्या छोट्या उद्योगाचे जाळे जगाच्या कानाकोपर्यात कार्यरत करता येईल. याचा एक सुपरिणाम घडेल. उद्योगांचे मोठ्या शहरातून झालेले केंद्रीकरण थांबविता येईल. गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार छोटे छोटे उद्योग खेड्याच्या पातळीवर सुरू करता येतील. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व संगणक उपयोगात आणता येईल. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले की, निसर्गाचे प्रदूषण थांबेल.
भविष्यकाळ
कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर पहिले एकपेशी जीव समुद्रात निर्माण झाले. त्यांच्यात हळूहळू बदल होत सरपटणारे प्राणी, पक्षी विकास पावले. वीस लाख वर्षांपूर्वी मानव सदृश्य दोन पायावर चालणारा एप उत्क्रांत झाला.
निसर्गाने जीवन संघर्षात तगून राहण्यासाठी वाघाला तीक्ष्ण नखे दिली, हरणाला चपळ पाय दिले. मांजराला अंधार भेदणारे डोळे दिले. हत्तीला ताकद दिली. पण निसर्गात एकाएकी बदल झाला तर स्वत:त बदल करू न शकणारे प्राणी नष्टही झाले डायनोसॉर नावाचा महाकाय प्राणी असाच नष्ट झाला.
निसर्गात टिकून रहाण्यासाठी मानवाला ना तीक्ष्ण नखे, ना तीक्ष्ण डोळे मिळाले. पण मिळाला तो मेंदू. इतर प्राण्यांच्या मेंदूपेक्षा तुलनेले मोठा. या मेंदूचा(बुद्धीचा) वापर करीत माणसाने निसर्गाचे ज्ञान मिळविले. त्याचा चार बोटापासून सुटा झालेला अंगठा वस्तुची पकड घेण्यास उपयोगी ठरला. हाताचा व मेंदूचा उपयोग करून मानवाने निसर्ग विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात केले. पण मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे. जीवन कलहात टिकून रहाण्यासाठी म्हणून तंत्रज्ञानाला विवेकाची साथ हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक नैतिक आचरण म्हणजे विवेक. काय करावे व काय करू नये हे मानवाला विवेकाने कळते. यासाठी उपभोगावर नियंत्रण ठेवावे लागेल.
पर्यावरण रक्षण, अंधविश्वासाचे निराकरण व संयमी भौतिक विकास यासाठी निसर्गाकडे व धर्माकडे पहाण्याचा आपला दृष्टिकोन विवेकी हवा. टॉफलर लिहितो ते खरे आहे. आपणास उपग्रह हवेत पण गांधीजीही हवेत.
पण याबाबत दुसराही एक कळीचा मुद्दा आहे. तंत्रविज्ञानाच्या राक्षसी वापरावर जगभरातील भांडवलदारी अर्थव्यवस्था उभी आहे. भांडवली व्यवस्थेत केवळ नफा हेच साध्य असल्याने ओरबडणारी प्रवृत्ती वाढत रहाते. त्यास प्रतिबंध घालायचा असेल तर विवेकाच्या जोडीला संघर्षही हवा. पर्यावरणरक्षणाच्या जोरदार चळवळी उभ्या करणे व धार्मिक प्रदूषणाच्या विरोधात उभे ठाकणे यासाठी जनआंदोलनाचे सामर्थ्य तेवत ठेवायला हवे.
–प्रा. प. रा. आर्डे