Categories
व्यक्तिविशेष

अण्णाभाऊ साठे आणि अंधश्रद्धा निर्मूलन

वार्षिकांक - २०१९

तत्कालीन लेखकांना जे विषय साहित्यनिर्मितीसाठी वर्ज्य होते, ते अण्णा भाऊंच्या साहित्याचे मुख्य विषय बनले. गरिबी, शोषण, आर्थिक विषमता, वेश्या व्यवसाय, झोपडपट्टीतील जीवन, कामगारांचे जीवन, निरक्षरता, जातिभेद आणि ताणतणाव हे त्यांच्या लेखनातील कळीचे मुद्दे होते. अण्णा भाऊंनी हे विषय हाताळेपर्यंत यापैकी अनेक विषयांवर मराठी साहित्यात लेखन व्हायचे होते. अण्णा भाऊंच्या साहित्यात चित्रित झालेली पात्रेही सर्व स्तरातील स्त्रिया त्यांच्या साहित्याचा पट साकारतात. असा व्यापक समाजपट मराठी साहित्यात यापूर्वी कधीच नव्हता. अण्णा भाऊंच्या लेखनाने मराठी साहित्य प्रथमच उदार आणि व्यापक झाले.

अण्णा भाऊ साठे हे व्यापक मानवतावादी लेखक होते. त्यांचे साहित्य समाजपरिवर्तनाचा विचार घेऊन पुढे येते. अण्णा भाऊंनी सर्वसामान्य माणसाचे दु:ख साहित्याच्या परिघात आपल्या तत्कालीन साहित्याच्या कक्षेत न येणारे विषय हाताळले. मराठी साहित्यात विषय, आशय आणि अभिव्यक्तीच्या नव्या पाऊलवाटा निर्माण केल्या. अफाट लेखन करून मराठी साहित्यविश्वात स्वत:चे स्वतंत्र असे स्थान निर्माण केले.

अण्णा भाऊ मार्क्सवादी होते व त्यांचे इतिहासाचे आकलन मार्क्सवादी होते. याचबरोबर त्यांनी भारतीय समाजातील जातीचा प्रश्न लक्षात घेतलेला होता. जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था व वर्गव्यवस्था याविरुद्धचे लढे समग्र दृष्टिकोनातून लढवले पाहिजेत, याची त्यांना जाण होती. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात भारतीय समाजातील दबलेल्या व वंचित घटकांच्या हलाखीचे चित्रण येते. त्याविरुद्ध बंड पुकारणारा बंडखोर नायक अण्णा भाऊ साठे यांनी रेखाटला आहे. त्यांच्या साहित्यात भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍या वीराचे चित्रण आहे; तसेच जागतिक स्तरावर साम्राज्यवाद व फॅसिझम यांच्या विरुद्ध लढणार्‍या कामगारांचे चित्रण आहे. अशा प्रकारे जागतिक, भारतीय व मराठी समाजापुढील व्यापक प्रश्नांची दखल अण्णा भाऊंच्या साहित्यातून अभिव्यक्त होते.

साहित्याच्या प्रांगणात उतरण्यासाठी फार मोठ्या शिक्षणाची व पुस्तकी ज्ञानाची गरज असते, असा जो एक समज होता, तो अण्णा भाऊंच्या प्रतिभेने खोटा ठरविला. घरात शिक्षणाची कोणतीही परंपरा नसलेल्या, दलित आणि गरिबीने गांजलेल्या कुटुंबातील अण्णा भाऊंनी महान साहित्यिक म्हणून नाव कमावले. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी 33 कादंबर्‍या, 13 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये, 11 पोवाडे इत्यादी नाटके, शेकडो गाणी, प्रवासवर्णन, पुस्तक परीक्षण, चित्रपट परीक्षण, कम्युनिस्ट पक्षाची साप्ताहिके- ‘लोकयुद्ध’, ‘युगांतर’मध्ये वृत्तांत लेखन, मुलाखती, लेख लिहिले, ‘वाट्टेल ते’आणि ‘हवे ते’ ही सदरे लिहिली. ‘मराठा’सारख्या दैनिकातही लेखन केले. अण्णा भाऊंचे हे साहित्यिक कार्य खरोखरच अचंबित करणारे आहे.

तत्कालीन लेखकांना जे विषय साहित्यनिर्मितीसाठी वर्ज्य होते, ते अण्णा भाऊंच्या साहित्याचे मुख्य विषय बनले. गरिबी, शोषण, आर्थिक विषमता, वेश्या व्यवसाय, झोपडपट्टीतील जीवन, कामगारांचे जीवन, निरक्षरता, जातिभेद आणि ताणतणाव हे त्यांच्या लेखनातील कळीचे मुद्दे होते. अण्णा भाऊंनी हे विषय हाताळेपर्यंत यापैकी अनेक विषयांवर मराठी साहित्यात लेखन व्हायचे होते. अण्णा भाऊंच्या साहित्यात चित्रित झालेली पात्रेही सर्व स्तरातील स्त्रिया त्यांच्या साहित्याचा पट साकारतात. असा व्यापक समाजपट मराठी साहित्यात यापूर्वी कधीच नव्हता. अण्णा भाऊंच्या लेखनाने मराठी साहित्य प्रथमच उदार आणि व्यापक झाले.

अण्णा भाऊंनी जे पाहिले, भोगले, अनुभवले तेच लिहिले आहे. पांढरपेशा साहित्यिकांना ज्यांची दखलही घ्यावीशी वाटली नाही, अशा उपेक्षितांना त्यांनी नायक बनविले. मांग, महार, गारुडी, फासेपारधी, डोंबारी, वडार, बेलदार, गोंधळी, नागवाले, अस्वलवाले, माकडवाले, कुडमुडे जोशी, झोपडपट्टीतील मुकुल, बरबाद्या, सकीना, भोमक्या… आदी असंख्य माणसांचे दु:ख त्यांनी चितारले आहे. त्यांना जगण्यासाठी करावी लागणारी धडपड शब्दबद्ध केली आहे. हे जग भेकड माणसांचे नाही. या जगात चांगल्या पद्धतीने जगावयाचे असल्याचे माणसाने धाडसी, निर्भय आणि प्रसंगी संघर्षाला तोंड देण्याइतपत शक्तिमान बनले पाहिजे, असा संदेश दिला.

‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून, ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने, निष्ठेने मी चित्रित करणार आहे, नि करीत आहे.’ (वैजयंता – प्रस्तावना)

या एकाच वाक्यातून अण्णा भाऊंनी पारंपरिक, धार्मिक मूल्यांना छेद दिला आहे. मार्क्स, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून पुढे नेला. परिवर्तनाच्या चळवळीतील संत-महात्म्यांना त्यांनी वंदन केेले आहे.

महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला।

अन्याय निवारून न्याय द्याया दलिताला॥

(महाराष्ट्राची परंपरा)

अशा शब्दांत महात्मा फुले यांचे कार्य नेमकेपणाने रेखाटले आहे. तसेच ‘जगबदल घालूनी घाव। सांगून गेले मला भीमराव॥’ अशा शब्दांत आपल्यावर बाबासाहेबांनी टाकलेल्या जबाबदारीची जाणीव व्यक्त केली आहे.

तमाशाचे स्वरूप आमूलाग्र बदलले

अण्णा भाऊंनी तमाशाची सांप्रदायिक हिंदू धर्मनिष्ठ बैठकच पार बदलून टाकली. तमाशाला जनतेची कला बनविले. तमाशाचे केवळ नावच बदलले नाही, तर त्याचे अंतरंगही बदलून टाकले.

पारंपरिक तमाशात गण, गवळण, बतावणी, सवाल-जवाब, वग असे घटक असत. प्रारंभी गणेशवंदन असे. तमाशाच्या प्रारंभी होणार्‍या गणेशवंदनाला त्यांनी फाटा दिला.

‘प्रथम मायभूच्या चरणा

छत्रपती शिवबा चरणा

स्मरोनि गातो। कवना॥’

अशा शब्दांत गणेशवंदनेची परंपरा मोडून मातृभूमी, हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांना ‘पहिल्या नमना’चा मान दिला. गणानंतर गवळण येत असे. मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गवळणी आणि त्यांना अडवणारी कृष्ण-पेंद्याची जोडी अण्णा भाऊंनी वगळून टाकली. त्यातील पांचटपणा आणि अश्लील संवाद काढून टाकले. गणानंतर सरळ म्हणणी व वग सादर करण्याची प्रथा अण्णा भाऊंनी सुरू केली. पारंपरिक वगनाट्ये ही दंतकथा, पुराणकथा यांच्यावर आधारित असत. उदा. नल-दमयंती, हरिश्चंद्र-तारामती इत्यादींमध्ये प्रणय आणि अध्यात्म यांचे मिश्रण सहेतुकपणे केलेले असे. अण्णा भाऊंनी तमाशाचे कल्पनारम्य, अंधश्रद्धेचे समर्थन करणारे धार्मिक आणि आध्यात्मिक असे मूळचे स्वरूप बदलले. त्यांनी सामान्य लोकांसमोरील चालू व ज्वलंत समस्यांवर लोकनाट्ये लिहिली. पुराणातील कथा किंवा राजा-राणीच्या काल्पनिक कथांची जागा काळाबाजार, युद्ध, संप, निवडणुका, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, मोर्चे, मजुरांचे शोषण, दुष्काळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा विषयांनी घेतली.

तमाशातील स्त्रीला लोकनाट्यात आणताना अण्णा भाऊंनी तिला सन्मान दिला. लोकनाट्यात स्त्रीपात्रे येतात ती शेतकर्‍यांची किंवा कामगारांची बायको म्हणून. आपले ठसकेबाज संवाद ही पात्रे सादर करतात. लोकनाट्यातील एक पात्र असेच तिचे स्थान असते. अण्णा भाऊंनी मनोरंजनातून प्रबोधन करता येते, याचा वस्तुपाठच समाजासमोर ठेवला. त्यांनी लिहिलेल्या 14 लोकनाट्यांपैकी एकाही लोकनाट्यात पौराणिक, धार्मिक विषय निवडलेला नाही. थोडक्यात, अण्णा भाऊंनी महात्मा जोतिराव फुले यांचा ‘सत्यशोधकी जलसा’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील आंबेडकरी जलशाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा लोकनाट्यातून पुढे नेली.

अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथा-कादंबर्‍यांमधून सामाजिक, राजकीय, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले आहे. जुन्या रुढी, परंपरा, जातपंचायतीचे अन्यायी कायदे यांच्यावर आघात केले आहेत. काही वेळा विनोदी चित्रणाने रुढी-परंपरा मधील फोलपणा चित्रित केला आहे.

‘काडीमोड’ या कथेत सखूबाईने केलेल्या ‘नवसा’मुळे निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीचे चित्रण विनोदी पद्धतीने केले आहे.

‘काडीमोड’ या कथेतील सखूबाई मुलाचे-भीमाचे – लग्न व्हावे म्हणून भैरोबाला नवस बोलते, ‘देवा माझ्या मुलाचं लगीन जुळूं दे. म्होरच्या वर्षी मुलगा नि सून ह्यास्नी गाठ मारून त्येंची वावरजत्रा तुझ्या दरबारापतुर आणीन.’ (अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय पृ. 515)

त्याच महिन्यात लग्न जुळते. मनासारखी देखणी सून मिळते. याचबरोबर सखूला नवसाची आठवण येते. आपला शब्द पाळला नाही, तर भैरोबा कोपेल. ती भीमाला ताकीद देते, ‘देवाच्या पाया पडल्याशिवाय तू हरणाला शिवू नगंस, बोलू नगंस.’ ‘देवाच्या पाया कधी पडायचं?’ भीमा विचारतो. ती उत्तरते, ‘अजून आठ महिने.’

त्या दिवसापासून भीमा पत्नीशी बोलणे बंद करतो. तिला काहीच कळत नाही. ती कंटाळून माहेरी निघून जाते. पत्नीला आणायला गेलेल्या भीमाला सासरचे लोक अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतात. तो काहीही उत्तर देत नाही. शेवटी तो काडी मोडून गावाला निघून येतो. त्याच्या पाठोपाठ मुलीला घेऊन व्याही येतात. शेजारी-पाजारी गोळा होतात. ‘त्या भैरूबाचं मडं गेलं! त्येच्या नवसापायी माझी सोन्यावाणी सून गेली. (पृ. 520)’ असे म्हणून सखूबाई नवस, वावर जत्रा, भीमाला दिलेली ताकीद, हे सारे लोकांना सांगते. हे ऐकून लोक हसू लागतात, पाव्हणा हसू लागतो. हसता-हसता वाचक विचारमग्न होतो.

‘भुताचा मळा’, ‘जोगीण’ या कथांमधून ग्रामीण भागातील भुताविषयी प्रचलित असणार्‍या अंधश्रद्धांचे दर्शन घडते.

ग्रामीण भागात भुता-खेतांच्या दंतकथा एकमेकांना नेहमी सांगितल्या जातात. या दंतकथांमागील समज-गैरसमज-वास्तव सत्य मांडण्याचा प्रयत्न अण्णा भाऊंच्या कथेत केला आहे.

‘भुताचा मळा’ या कथेतील बंडू सेवराला साप चावतो. कोणी काय, कोणी काय उपाय करतात; पण तो मृतप्राय होतो म्हणून पुढील तयारी चालू होते. अचानक तो सरणावर उठून बसतो. चांगला होतो. शेतीमध्ये भरपूर कष्ट करतो. शेतात विहीर काढतो, वाडा बांधतो. बंडू सेवरा आणि त्याची पत्नी व चार मुले दिवसरात्र कष्ट करून श्रीमंत होतात; पण गावकर्‍यांना वाटते हा साप चावून मेला होता. कोणी तरी भुताने याच्या शरीरात प्रवेश केला म्हणून त्याची भरभराट झाली. त्याच्या शेताला गावकरी ‘भुताचा मळा’ असेच म्हणतात.

एकदा बंडू सेवरा सार्‍या गावाला जेवणाचे आमंत्रण देतो. नाना खोत जरा वेळाने एकटाच जेवायला जातो. अंधारात चालताना त्याच्या डोक्यात भुताचा विषय जागा होतो. मागून कोणी तरी येते आहे, असे वाटते. मागे वळून तो अंदाजाने एक दगड भिरकावतो. एक भयंकर किंकाळी ऐकू येते. तसाच पळत भुताच्या मळ्यात पोचतो. ‘मला भुतानं गाठलं’ असे सार्‍यांना सांगतो. जेवण करून घरी गेल्यावर त्याच्या लक्षात येते आपला मुलगा तुक्या घरात नाही. रडारड सुरू होते. शेजारी गोळा होतात. एकानं नानाला विचारलं, ‘तुला भुतानं कुठं गाठलं व्हतं?’ नाना म्हणाला, ‘चावर्‍याच्या पांदीत’ सारे तिथे जातात, तुक्या सापडतो. डोक्याला लागलेला तुक्या पडलेला असतो. अंधारात भूत म्हणून नानाने तुक्यालाच दगड मारलेला असतो. नाना व इतर गावकर्‍यांच्या मनातील भुताविषयीचे समज-गैरसमज अण्णा भाऊंनी मांडले आहेत.

‘जोगीण’ कथेत जाखिणवाडी गावच्या शेजारी असणार्‍या घनदाट जंगलात जोगणीचे भूत आहे, अशी दंतकथा प्रचलित असते. सार्‍या गावात भीतीचे वातावरण असते. लष्करात नोकरी करणारा रामराव नवविवाहित पत्नी-नंदाला घेऊन गावात येतो. एक दिवस भूत नंदालाच पळवून नेते. रामराव आणि शामराव नंदाला वाचवण्यासाठी बंदूक घेऊन जंगलात शिरतात. जंगलात असणार्‍या एका धिप्पाड माणसाला गोळी घालून ठार करतात आणि नंदाला वाचवितात. ते दोघे जेव्हा प्रेत ओढत बाहेर आणतात, तेव्हा सारे गावकरी चकित होतात. गुरवाचा खून करून बेपत्ता झालेला मळू चाळक्या वीस वर्षे त्या जंगलात भूत होऊन वावरत असतो आणि सार्‍या गावाला भीती दाखवत असतो. हे वास्तव सार्‍यांच्या समोर येते.

‘अमृत’ कथेत साप पकडणार्‍या ‘जिवा’चे चित्रण येते. ज्ञानेश्वरीतील एका संदर्भावरून सर्पदंशावरील औषधाचा उपयोग करून अनेकांचे प्राण वाचविणारा जिवा ‘अमृत’ कथेमध्ये चित्रित होतो.

‘चिखलातील कमळ’ या कादंबरीत ‘मुरळी’ प्रथेतील व्यथा, मुरळीवर होणारा सामाजिक अन्याय मांडला आहे. ‘खंडोबा’ या दैवताला ‘मुरळी’ म्हणून मुली सोडण्याची प्रथा महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतात आहे. मुरळी-वाघ्या यांनी खंडोबाच्या यात्रांमध्ये देवाची गाणी म्हणत फिरावयाचे. भक्तांच्या घरी लग्नकार्य असेल, तर त्यांच्या दारात जाऊन आपला कार्यक्रम सादर करावयाचा. ‘मुरळी’ने देवाशी लग्न करावयाचे. त्या देवाला डोकीवर घेऊन गावोगाव भीक मागत फिरावयाचे, अशा जीवघेण्या सामाजिक प्रथेवर अण्णा भाऊंनी या कादंबरीत प्रकाश टाकला आहे.

तुळसा नावाची मुरळी मुरार पाटलांच्या आधाराने ‘टोप’गावी घर बांधून राहते. तुळसाला सीता नावाची मुलगी असते. एकदा पाटील आजारी पडतात. ‘पाटलांना बरे वाटू दे, मी सीताचे तुझ्याबरोबर लग्न लावीन,’ असा तुळसा खंडोबाला नवस बोलते. नवस फेडायचा राहिला म्हणून तिचे सावत्र भाऊ आजारी पडले, असे वाघ्या सांगतो. भावांच्यासाठी सीताला देवाशी लग्न लावण्याची पाळी येते. अशा वेळी तिचा बंडखोर प्रियकर रामोशाचा बळी तिला संरक्षण व आधार देतो. सीताचे सावत्रभाऊ प्रथा मोडून तिचे व बळीचे लग्न लावून देतात. या कादंबरीच्या निमित्ताने अण्णा भाऊंनी वाघ्या-मुरळीच्या संस्कृतीचे वास्तव दर्शन घडविले आहे. धार्मिक प्रथेच्या नावे मुरळी म्हणून स्त्रियांचे असे अमानुष शोषण होते, याचे चित्रण आले आहे.

आजही आंतरजातीय विवाहांना बहुतेक ठिकाणी कडवा विरोध होतो. आपली जात अधिक पवित्र, अधिक वरिष्ठ आहे आणि घरातील कोणी अन्य कमी पवित्र, कमी प्रतिष्ठित जातीतील व्यक्तींशी लग्न केले, यामुळे घराण्याची अप्रतिष्ठा होते, या भावनेतून हा विरोध होतो. जन्मजात उच्च-नीचता प्रदान करणारी जात ही भावना अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेमुळे आजही भांडण-तंटे-मारामार्‍या होत आहेतच.

अण्णा भाऊंच्या ‘आवडी’ या कादंबरीत जातीबाहेर विवाह करू पाहणारी आवडी, तिचा खून करणारा भाऊ नागू याचे चित्रण आहे.

‘आवडी’ ही तात्याबा चौगुले यांची मुलगी. ही धनाजी नावाच्या रामोशी मुलाच्या प्रेमात पडते. घरच्यांना हे आवडत नाही. आवडीचे लग्न जातीतीलच भगवंतराव पाटलांच्या मुलाशी करून दिले जाते. त्याला फेफरे येते हे आवडीला समजते. फेफरे येणारा नवरा सोडून आवडी पळून येते. गावी येते ती सरळ धनाजीच्या घरीच. धनाजी तिच्याशी लग्न करतो; पण या घटनेने सारी चिडतात. आवडीचा भाऊ नागू आवडीला गौरीच्या सणाला बोलावून कपटाने तिचा खून करतो. अण्णा भाऊंनी नागूला खलनायकाच्या भूमिकेत चित्रित केले आहे. नागू तुरुंगात जातो. तो तुरुंगवास सोसून बाहेर येताच धनाजी योग्य वेळ साधून नागूचा खून करतो, अशी ही साधी सरळ एका प्रेमाची, म्हटले तर सूडाची कथा आहे. प्रेम ही जातीत बंदिस्त करता येईल, अशी वस्तू नाही, हे अण्णाभाऊंना येथे सांगावयाचे आहे. आंतरजातीय विवाहातून निर्माण झालेले क्रौर्य चित्रित करून जातियता नष्ट झाली पाहिजे, हे वास्तव मांडणारी ही अण्णा भाऊंची कादंबरी आहे.

पावित्र्याच्या पारंपरिक कल्पनेमुळे स्त्रियांवर केल्या जाणार्‍या अन्यायाचे चित्रण अण्णा भाऊंच्या साहित्यात आले आहे.

पावित्र्याच्या पारंपरिक कल्पनांमुळे एखाद्या बाईला तिचे चारित्र्य चांगले आहे किंवा नाही, याची खात्री पटविण्यासाठी उकळत्या तेलात हात घालून नाणे बाहेर काढावयास सांगितले जाते. हा उघडच जीवघेणा अन्याय आहे; तसेच कार्यकारणभावाची पूर्णपणे विसंगत अशी ही बाब आहे. एखाद्या बाईचे चारित्र्य चांगले असणे वा नसणे, याचा उकळत्या तेलात घातलेला तिचा हात भाजला किंवा नाही, याचा कार्यकारणभाव शून्य आहे. आजच्या विज्ञानयुगात ही अंधश्रद्धा समाजामध्ये टिकून आहेत. या अन्यायाचे चित्रण अण्णा भाऊंच्या कथेत आले आहे.

‘डोळे’ या कथेतील गीताचे डोळे अतिशय सुंदर होते. त्यामुळेच नवरा तिच्यावर सारखा संशय घेई. गीता निष्पाप, निरागस असते; पण नवरा संशयी. शेवटी तो तिला घेऊन विशाळगडावर जातो.

‘विशाळगडावर खर्‍या-खोट्याचा निवाडा करणारा देव आहे. तिकडं चल, तू तिथं खरी ठरलीस, तर ठीक, नाहीतर तुझी तू नि माझा मी.’ (निवडक वाङ्मय 443)

विशाळगडाला गेल्यावर एका माणसाने एका पातेल्यात गोडे तेल आणून ते चुलीवर चढवलं. त्यात एक पैसा टाकला. जेव्हा तेल कडकडून कढू लागले, तेव्हा तो देवमाणूस म्हणाला-

‘हं बाई, तू जर पवित्र आहेस, तर तो तेलातील पैसा काढून दे. जर तुझा हात जळाला, तर पापी नि जर तुला काहीच इजा झाली नाही, तर तू देव…’

ते ऐकून गीता म्हणाली –

‘तुम्हीच ते करा. मी पापी आहे, असं म्हणून तो पैसा काढा. जर तुमचा हात जळाला नाही, तर मी पापी.’

…. त्यावेळी तो माणूस एकदम पिसाळला नि काठी घेऊन तिच्या अंगावर आला. त्याने गीताला शंभर टक्के गुन्हेगार म्हणून निर्णय दिला. तिला पापी ठरवले…. शेवटी ती माहेरी निघून गेली. गीताच्या दुर्दैवी जीवनाचे चित्रण अण्णा भाऊंनी केले आहे.

भटक्या जमातीमध्ये आजही जातपंचायतीचा पगडा आहे. जातपंचायतीने केलेले नियम व कायदे महत्त्वाचे मानले जातात. ‘माकडीचा माळ’ या कादंबरीत ‘दुर्गा’चा न्यायनिवाडा करणार्‍या जातपंचायतीचे चित्रण येते.

‘माकडीचा माळ’ या कथेतील दुर्गा इनामदाराच्या वाड्यात कामाला जाते. म्हणून तिच्यावर व्यभिचाराचा आरोप केला जातो. दुर्गाचा होणारा सासरा – सख्या – माकडवाल्यांची दैवकाशी (जातपंचायत) जमवतो. हेकट, तापट, कर्ते, बोलके, माकडवाले एकत्र बसून दुर्गाच्या पावित्र्याचा न्यायनिवाडा करू लागतात. सख्या म्हणाला –

‘ऐका दैवकाशी’ मी दुर्गाला सून करीन; पण तिनं कढत्या तेलातला पैसा काढून दिला पायजी. जर तिचा हात भाजला, तर ती पापी आणि जर तिचा हात न्हाय भाजला, तर ती तुळस!’ (निवडक वाङ्मय पृ. 633)

‘ही तोड बरी हाय’ सर्व ओरडले. सख्या पळत पालात गेला. तेलाची बाटली, तवा, काडी घेऊन आला. त्यानं लगेच चूल केली आणि तव्यात तेल ओतून खाली जाळ केला. लोक गंभीर होऊन पाहत होते. एक पंच म्हणाला, ‘दुर्गाला आणा!’ दुर्गा आली. ती निर्भय होती. ती तव्यात कढणार्‍या तेलाकडे निघाली. नि येमू उठला. हात जोडून म्हणाला –

‘दैवकाशी, ऐका माझा बाप येडा हाय. त्यो म्हणतोय दुर्गानं पाप केलं, तर मी म्हणतो त्येनंच तेलातला पैसा काढावा. जर बाबाचा हात भाजला, तर दुर्गानं पाप केलं न्हाय नि जर त्याचा हात जळाला न्हाय, तर दुर्गा पापी, बाटलेली!’

भरसभेत येम्यानं आपल्या बापाच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात घातल्या आणि ‘दुर्गा तेलातला पैसा काढणारा न्हाय, दुर्गा कशी का असंना मला परवडली,’(पृ. 694) अशा शब्दांत खंबीरपणे येम्यानं दुर्गाची बाजू घेतली. दुर्गावर होणारा अन्याय त्याने थांबवला. अण्णा भाऊंच्या साहित्यातील व्यक्ती अन्यायापुढे मान तुकवत नाहीत, तर अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहतात. येमू दुर्गाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि जातपंचायत काहीही करू शकत नाही.

‘बरबाद्या कंजारी’ ही जातपंचायतीला पेचात पकडणार्‍या एका कलंदर माणसाची कथा. बरबाद्या या मुंबईमधल्या एका झोपडपट्टीत राहत होता. लोकांच्या कानातील मळ काढणे हा त्याचा धंदा. सार्‍या झोपडपट्टीत ‘नेक आदमी’ म्हणून त्याला ओळखत होते. बरबाद्याच्या मुलीचे लग्न झोपडपट्टीतीलच दल्लारामच्या सैद्या नावाच्या मुलाशी झाले. दोनशे रुपये घेऊन बरबाद्याने निल्लीचे लग्न उरकले; पण सहाच महिन्यात सैद्याचा क्षय रोगाने मृत्यू झाला. निल्ली नशिबाला दोष देत तेथेच राहू लागली. अकाली आलेल्या वैधव्याने ती भांबावून गेली होती. तशातच झोपडीसमोर राहणार्‍या हैदरशी तिचे संबंध जुळले… अन् एका रात्री ती हैदरबरोबर पळून गेली.

ही बातमी समजताच सारी झोपडपट्टी खवळून उठली. निल्लीच्या सासर्‍याने जातपंचायत बोलावली. मुंबापुरीच्या अगदी जवळ जगप्रसिद्ध लेबर कँपजवळ. त्या ओसाड जागेत बरबाद्याचा खटला उभा राहिला.

बरबाद्याने, ‘तुझा पोरगा मेला म्हणून माझी निल्ली गेली… पोरगा मेला नसता, तर निल्ली गेली असती का?’ असा प्रतिप्रश्न केला. पंचांनाही त्याने दम भरला. ‘तुमच्या पोरींचे नवरे मेले असते आणि पोरी पळून गेल्या असत्या, तर काय केले असते?’ असे प्रश्न विचारून बरबाद्याने दोनशे रुपये आणि दंड द्यायचे नाकारले. शेवटी बरबाद्याला जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली. एक पंच म्हणाला –

‘आजपासून बरबाद्या वाळीत पडला. त्याचे हुक्का-पाणी बंद. यापुढे त्याचा रोटी व्यवहार, बेटी व्यवहार बंद!’ पण बरबाद्याने त्यांना भीक घातली नाही. ‘माझी खोपडी फिरवू नका. मला धमक्या देऊ नका. मी हॉटेलात चाय पीन, संडासातल्या नळावर पाणी भरीन; पण तुमच्या पंक्तीला येणारच नाही.’ (निवडक वाङ्मय पृ. 333)

बरबाद्या आपल्यावर होऊ घातलेला अन्याय मोडून काढतो. पंचांचा निर्णय झुगारून देतो. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. जमातीच्या पंचांविरुद्ध बंड करणे सोपे नव्हते नि बरबाद्याने तेच केले होते….

अण्णांनी हा बरबाद्या जवळून पाहिला होता… इतकेच नव्हे, तर पंचायत भरली होती, तेव्हा ते तिथे स्वत: बसून होते. बरबाद्याचा बेदरकारपणा त्यांनी अनुभवला होता. तोच त्यांनी या कथेतून साकार केला.

अण्णा भाऊंची माणसावर आणि माणुसकीवर नितांत श्रद्धा आहे. समाजातील दु:ख दूर करण्यासाठी कलेचा वापर व्हावा, असे त्यांचे स्पष्ट मत होते. समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत प्रगल्भ अशी होती. अन्याय करणे जसे वाईट, तसेच तो सहन करणेही वाईट, असा विचार मांडून अन्याय करणार्‍यांच्या विरोधात ज्यांच्यावर अन्याय होतो आहे, अशांची फळी अण्णा भाऊंनी उभी केली आहे.

धार्मिक कर्मकांडाबाबत पारंपरिकता नाकारून नवा पुरोगामी विचार स्वीकारणार्‍या व्यक्तींचेही चित्रण अण्णा भाऊंच्या साहित्यामध्ये आले आहे. ‘वारणेच्या खोर्‍यात’ या कादंबरीत 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनाचे चित्रण आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून धडपडणारा हिंदूराव, त्याची पत्नी मंगला या दोघांचे चित्रण आहे. हिंदूरावचे स्वातंत्र्यवेड, त्यासाठी त्याने उभारलेले बंड, त्या बंडाला अखेरच्या क्षणापर्यंत साथ देऊन, सुखी संसाराचे बलिदान देऊन ब्रिटीश धार्जिण्यांशी लढता-लढता प्राणार्पण करणार्‍या मंगला व हिंदूराव यांची ही कथा आहे. शंभर वर्षांपूर्वी कोल्हापूर-सातारा परिसरात सत्यशोधक चळवळ जोमदारपणे कार्य करीत होती. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्रांतिकारकांनी हे सत्यशोधक विवाह प्रत्यक्ष अमलात आणलेले होते. हिंदूराव आणि त्याच्या साथीदारांचे जीवन चित्रण करताना त्यांचे पुरोगामी विचार अण्णा भाऊंनी रेखाटले आहेत.

गणू, शिवा, भिवा, सखाराम नदीकाठाने निघाले होते. नदीकाठी एक प्रेत जळत असते. याप्रसंगी माणसाच्या मृत्यूनंतर केल्या जाणार्‍या कर्मकांडाबाबतचे विचार व्यक्त झाले आहेत. मृत्यूनंतर माणूस जाळून राख करतात, त्याची हाडं जमवतात आणि ती पाण्यात नेऊन टाकतात. आता म्हणे तो पुण्यवान झाला. त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. शिवा म्हणतो- ‘खरं म्हटलं, तर तसं काहीच नसतं. ही त्या राख होणाराची आणि ती पाण्यात टाकणाराची नुसती फसवणूक आहे. कारण राख पाण्यात टाकून पुण्य मिळत नाही व शांतीही मिळत नाही.’ (वारणेच्या खोर्‍यात पृ.56)

काही वेळाने हिंदूराव आल्यावर गणूने हिंदूरावला प्रश्न केला. एखाद्या माणसाला जळायलाही भरपूर लाकडे का मिळू नयेत? – हिंदूराव म्हणाला – ‘गणू! जगात माणसं दोन प्रकारची आहेत. त्यातील एक जन्मभर काबाडकष्ट करून उपासमारीनं जर्जर होऊन मरणारे व नंतरही ज्यांना जाळायला भरपूर जळण मिळत नाही ते. आणि ऊन, पाऊस, थंडी वारा काहीच ठाऊक नसतं, ज्यांच्या पोटातील पाणीसुद्धा हालत नाही, जे आयतं बसून खातात आणि मरणानंतर कापराच्या ढिगात जळतात, ते दुसरे. एक धनी धनवान म्हणून सुखात जगतो आणि कापरात जळतो, तर चाकर दरिद्री म्हणून दु:खात जगतो आणि शेवटी जळणाशिवाय जळतो. ज्या मूठभर लोकांच्या हाती सर्व जमीन आहे, ते मालक आहेत, तर कोटमाप लोकांच्या मालकीचं काहीच नाही. फक्त खुरपं आणि दोरी एवढंच त्यांचं आहे आणि अशाच लोकांना जाळण्यासाठी जळण मिळत नाही आणि असं असूनही लोक त्या शेतकर्‍यांची ‘शेतकरी राजा जग पोसणार’ म्हणून कावेबाजपणानं तारीफ करतात.

‘ज्याप्रमाणं काही लोक चंदनाची तोंडानं फार तारीफ करतात; पण हातानं त्याला सहाणेवर घासून, राबवून त्याचा रेंदा पाडतात, त्याप्रमाणं हे शेतकर्‍यांची तोंडानं तारीफ करतात; पण आपला फायद्यासाठी त्याला जमिनीवर घासून, राबवून त्याचा रेंदा पाडतात. म्हणून ती तारीफ मला कबूल नाही. मी म्हणतो, जो शेतावर राबेल, त्याची शेती झाली पाहिजे; नुसती तारीफ नको; शिवाय जसा आंब्याच्या झाडावर जांभळीचा बांघोळा लादला जातो, त्याप्रमाणं आज शेतकर्‍यांच्या पाठीवर ऐतखाऊंची पोटं लादली आहेत…. आजच्या राज्यकर्त्यांनी, म्हणून आम्ही त्यांच्याशी लढलं पाहिजे. ते बदललं पाहिजे; तरच शेतकर्‍यांच्या पाठीवरची पोटं गळून पडतील.’ (वारणेच्या खोर्‍यात) हिंदूरावच्या या निवेदनातून अण्णा भाऊंचे विचार प्रकट झाले आहेत. शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे राज्य आले पाहिजे. त्यासाठी ही स्वातंत्र्य चळवळ ही भूमिका इथे व्यक्त होते.

या कादंबरीत मंगला आणि हिंदूराव यांचा विवाह ठरविण्याचा प्रसंग आहे. दोन्हीकडील वडीलधारी मंडळी जमून विचारविनिमय होतो. नारूमामा म्हणाला – ‘नारळ, एक रुपया व साखर एका ताटात घालून आणा आणि मुलीलाही घेऊन बाहेर या बरं!’

बहिरूने शंका काढली. तो म्हणाला – ‘मुलीला कशाला आणता? हे लग्न ठरवण्यापूर्वी भटजीकडे जाऊन नाव, नावरस नाव पाहिलं का?’

नारूमामा म्हणाला – ‘पाच तिथं परमेश्वर; मग भटजीची काय जरुरी आहे?’ आणि भटजीही पंचांगात पाहूनच जर सर्व करायचं, तर माणसाला काहीच करता येत नाही. मुहुर्ताची वाटत पाहत बसावं लागेल. कारण विहीर काढायला, मोट जुंपायला, नांगराला, कुळवाला, पेरणी करायला, कुपान घालायला सार्‍यालाच मुहूर्त लावून ठेवला आहे आणि रोज उठून मुहूर्त पाहावयाचा म्हटलं, तर आमचे बारा वाजतील. अहो, मरायसाठी देखील पंचांग चाळावं लागेल. म्हणून आता नवीन कायदा सुरू करा. काय मंडळी, तुमचं काय मत आहे?’ (वारणेच्या खोर्‍यात पृ. 64)

त्याने सर्व लोकांना विचारले. सर्वांनी त्याचे म्हणणे कबूल केले आणि अंगावर शाल घालून मंगलाला बाहेर आणले. सर्वांनी तिच्या तोंडात साखर घातली. लग्न ठरले आणि त्याच दिवशी लग्नाचा दिवसही नक्की झाला.

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा ठसा यामध्ये जाणवतो. भटजी, मुहूर्त वगैरे बाजूला ठेवून सोयीच्या दिवशी मंगलाचा साखरपुडा आणि विवाहसमारंभही पार पडतो, असे चित्रण अण्णा भाऊ करतात. हा विवाह समारंभ अगदी साधेपणाने, कोणताही डामडौल न करता पार पडतो. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी पुरोगामी विचार अमलात आणलेले होते. अण्णा भाऊंनी हे वास्तव चित्रण केले आहे. तत्कालीन सामाजिक, धार्मिक परिस्थितीचे यथायोग्य चित्रण आले आहे.

पारंपरिकता नाकारून इहनिष्ठ, विज्ञाननिष्ठ जाणिवांचे चित्रण करणारी ‘मरीआईचा गाडा’ ही कथा उल्लेखनीय आहे.

मरीआई देवीचा कोप झाल्याने कॉलरासारख्या साथी सुरू होतात, तेव्हा देवीची पूजा करून दुसर्‍या गावात सोडल्यास साथ निघून जाते, अशी अंधश्रद्धा ग्रामीण भागात होती. या अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.

गावात मरीआई शिरली होती. हागओकीनं दहा माणसं पडली होती. त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी सारा गाव जमला होता. चार शहाणे म्हातारे पारावर बसून विचार करत होते. सभा सुरू होते. सटवाजी म्हणाला –

‘गावकरी मंडळी गावात मरीआई शिरलीय. ती लई वंगाळ हाय. आमचं असं मत हाय की, आजपसनं शुक्किरवार पाळावं – आजपासनं तीन आठवडे गावात व शिवारात चाकं बंद. ही चाकं बंद झाली की, मरीआईच्या गाड्याची चाकं बंद व्हनार.’(निवडक वाङ्मय पृ. 354)

‘हे मला पटत न्हाय,’ नाना म्हणाला. ‘चाकं बंद करून भागणार न्हाय. आपुन गाव झाडून काढू. तालुक्यास्नं औषध आणू. डॉक्टर आणून मानसास्नी टोचावं.’ हे ऐकून म्हातारे भडकले. गोंधळ वाढला. गुरव ओरडला- ‘ऐका मंडळी, आपुन नानाचंबी ऐकू आणि सटवाजीचं बी ऐकू.’

‘आम्हास्नी कबूल; पण तिसर्‍या शुक्किरवारी मरीआईचा गाडा गावाभाईर घालवायचा, हे कबूल हाय का?’ ‘कबूल! कबूल!’- सार्‍यांनी माना डोलावल्या.

नाना पाच-पन्नास गडी घेऊन कामाला लागला. गाव झाडून स्वच्छ केला. तालुक्याहून औषध आले. डॉक्टर आले. रोग हटला. पण म्हातार्‍यांच्या हट्टामुळे मरीआईचा गाडा गावाबाहेर पाठवणे गरजेचे होते. नानाचा नाईलाज झाला.

सरता शुक्रवार – लोकांनी गावात आरास केली. घरोघर आंबील-घुगर्‍यांचा नैवेद्य होता. सुतारानं लहानसा गाडा करून दिला होता. त्यात लहानशी मरीआई बसवली होती. आयाबाया येऊन तिला नैवेद्य दाखवत होत्या. खण-नारळांचा ढीग लागला होता. गाड्यांचे पुढारी सर्वांकडे अभिमानाने पाहत उभे होते. नाम्या महार उघडा-बोडका उभा होता. परटाची म्हातारी मळवट भरून खडी होती. दोघांच्या अंगात मरीआई येणार होती. नानानं कसलंही विघ्न आणू नये याबद्दल काळजी घेतली जात होती.

‘अंगात आलं, अंगात आलं, मागं सरा,’ सटवाजी ओरडला.

‘मरीआईच्या नावानं चांगभलं!’ वाद्यं वाजू लागली, गाडा निघाला. नाना एका पडक्या भिंतीवर उभा होता, तो चटकन पुढं होऊन म्हणाला –

‘हो ऽऽ हो ऽऽ वाद्य थांबा.’ वाद्यं मंदावली. सटवाजी पुढं झाला.

‘ए दीडशेण्या गाडा का थांबवलास?’

‘न्हवं देवी कंच्या बाजूला जाणार?’

सटवाजी मागं वळला. देवीला हात जोडले आणि विचारलं ‘आई कंच्या बाजूला जाणार तू?’

‘मी ऽऽ शिरट्याकडं जाणार ऽऽ हाय ऽऽ’ नाम्याच्या अंगातली देवी म्हणाली.

नाना शांतपणे म्हणाला, ‘न्हवं, आम्हीही मरीआईला शिरट्याच्या शिवंला सोडणार नि मग मरीआई शिरट्यात शिरून हागओक सुरू होणार.’

‘मग तेला आमी काय करायचं?’ केरूनं विचारलं.

मग नाना मोठ्यानं बोलला, ‘आगा त्या शिरट्यात आमच्या गावच्या आठ मुली दिल्यात त्यांचं काय व्हनार?’

ज्यांच्या मुली शिरट्यात दिल्या होत्या, ते सर्व पुढं येऊन ओरडले- ‘न्हाय न्हाय मरीआईचा गाडा शिरट्याकडं जाऊ देणार न्हाय!’

हा भयंकर कोलदांडा बघून देवी म्हणाली, ‘आरं बाबानू ऽऽ मी पाडळीला जाणार हाय ऽऽ’ ‘पर पाडळीतबी आमचं पाव्हणं हायती त्येंचं काय व्हनार?’ नाना हात जोडून म्हणाला. मग पाडळीत ज्यांचे पाहुणे होते, ते सर्व पुढे झाले. त्यांनी दंगल केली. दक्षिण-उत्तर दोन्ही दिशा बंद झाल्यावर मरीआई आणि तिचे पुढारी पेचात पडले. मग देवीने विचार बदलला, ‘मला मावळतीला जायचं हाय!’ पण मावळतीला तर खुबी हाय. खुबीत आमच्या गावच्या अकरा पोरी दिल्यात.’ खुबीकरांचे पाहुणे पुढे झाले. ‘खुबीला मरीआईचा गाडा जाऊ देणार न्हाय.’ सटवाजी, केरू, भाऊ ओरडले.

‘बरं, देवीला उगवतीला जाऊ द्या,’ नाना चिडून म्हणाला, ‘न्हाय जाऊ देणार’, ‘आरं का जाऊ देणार न्हाय?’

‘उगवतीला बिचूद हाय नि बिचुदात अठरा घरं पाव्हण्यांची हायती,’ नानानं गर्जना केली. बिचुतकरांचे पाहुणे पुढे आले. पुन्हा गोंधळ उडाला.

मरीआईच्या चारी वाटा बंद झाल्या आणि हमरी-तुमरीवर येऊन सर्व लोक ओरडू लागले. वाद्यं केव्हाच बंद झालं होतं. ‘देव गेला, देव गेला’ सर्वत्र आवाज उठला. दंगल शांत झाली. मग त्या गाड्याचं काम करायचं याचा विचार झाला आणि मरीआईचा गाडा निखळून देवळात ठेवण्यात आला.

‘जुन्याचा पराभव आणि नव्याचा विजय झाला. त्या चार म्हातार्‍यांनी नानाचा विजय कबूल केला आणि त्या दिवसापासून ‘नान्या’ऐवजी ‘नाना पाटील’ अशा नावानं ते त्याला बोलावू लागले. त्यांनी नानाचं पुढारीपण मान्य केलं.’ (अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय पृ. 360)

अशा प्रकारे गावातील अंधश्रद्धा दूर करून विज्ञाननिष्ठ भूमिका घेणारा एक नवयुवक अण्णा भाऊंनी ‘नाना पाटील’च्या रुपाने रेखाटला आहे. गावातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. नव्या पिढीतील युवकांनी साधक-बाधक विचार करून गावातील जुन्या रुढी-परंपराबाबत योग्य ती भूमिका घेतल्यास जुन्या लोकांचेही मतपरिवर्तन होऊ शकत हा आशावाद अण्णा भाऊ व्यक्त करतात.

व्यापक समाजपरिवर्तनाच्या भूमिकेतून गेली तीस वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे विविध प्रश्न हाती घेतले आहेत त्याबाबत अण्णा भाऊंच्या साहित्यात 50-60 वर्षांपूर्वीच आवाज उठवल्याचे आढळते. जातिभेद, विषमता यामधून माणसा-माणसांमध्ये होणारे कलह, आंतरजातीय विवाहाला विरोध असल्यामुळे निर्माण होणारे क्रौर्य, जातपंचायतीच्या कडक कायद्यामुळे सामान्य माणसावर होणारा अन्याय, वाघ्या-मुरळीसारख्या अन्यायी धार्मिक प्रथा, त्यामधून स्त्रियांचे होणारे शोषण, भूत-पिशाच्य याबाबतची अंधश्रद्धा, नवस करणे, मुहूर्त पाहणे असे अनेकविध विषय अण्णा भाऊंच्या साहित्यामध्ये चित्रित होतात. अन्यायाविरोधात, अंधश्रद्धेविरोधात त्यांच्या साहित्यातील माणसे ठाम भूमिका घेऊन उभी राहतात, संघर्ष करतात. समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करतात. त्यांच्या साहित्यात वैज्ञानिक दृष्टिकोन एक मूलभूत गाभा म्हणूनच येतो.

‘वैर’ कादंबरीच्या प्रस्तावनेत आपले लेखन हेतू स्पष्ट करताना अण्णा भाऊ म्हणतात – ‘जुन्या चालीरीती दूर करण्यात आणि जुन्या; पण लोप पावलेल्या प्रगत प्रथांना पुन्हा पुढं आणावं, हेवेदावे, दुष्टावे, वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि या नवमहाराष्ट्रात प्रेम, सलोखा यांची वाढ व्हावी, जनता सुखी संपन्न व्हावी, विषमता नष्ट झालेली नि समाज-सत्तावादाचा अरुणोदय झालेला आपण पाहावा, अशी श्रद्धा घेऊन मी लिहितो.’ अण्णा भाऊ साठे थोर मानवतावादी लेखक होते, याची साक्ष यामधून पटते. अण्णा भाऊंची जन्मशताब्दी या वर्षी आपण साजरी करत आहोत. मानवमुक्तीचे शिलेदार अण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा.

संदर्भ :

1) अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय, म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई 2001

2) अण्णा भाऊ साठे – वारणेच्या खोर्‍यात, विद्यार्थी पब्लिकेशन, पुणे – 2, 1 एप्रिल 2009 (नवीन आवृत्ती)

3) रणधीर शिंदे – अण्णा भाऊ साठे साहित्य-समीक्षा, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर. 2011

4) बाबूराव गुरव – अण्णा भाऊ साठे- साहित्यविचार, लोकवाङ्मयगृह, 1999 (दु. आ.)