‘बुवाबाजी निरूपण’ या उपरोधिक कवितेत भ्रष्टाचारावर भाष्य करताना मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय,
“आधी म्हणे ‘जय साई’ मगचि अधिकारी लाच खाई
अजून पकडला गेला नाही, कृपा माना बाबाची”
लाचखोरी व भ्रष्टाचार यांना सोकावलेल्या अधिकारी व राजकीय नेत्यांनी देश पोखरून जात असताना आपण काय करतो? तर
आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही
आपण भिडायचे नाही, आयुष्याला.
अशा अगतिक भारतीय समाजाला ‘जाग उठो’ अशी हाक देणार्या ‘आण्णा हजारे’ यांचे आम्ही जाहीर आभार मानतो. सामान्य माणसांच्या मनातल्या असंतोषाला आण्णांनी तोंड फोंडले.
राजकारणाचे शुद्धीकरण करण्याचा व त्यायोगे सामान्य लोकांचे हित जपण्याचा महाराष्ट्रात आण्णांनी केलेला उठाव आता देशपातळीवर पोचला आहे. सत्तेपासून दूर राहून लोकहितासाठी संघर्षाचा हा मार्ग संपूर्णपणे अहिंसक राहिला आहे. आण्णांनी खर्या अर्थाने गांधीवादाचे पुनरूज्जीवन केले.
राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचारावर वचक ठेवण्यासाठी ‘जनलोकपाल’ कायदा करावा हा आण्णाच्या आंदोलनाचा हेतू आहे. यासाठी आण्णांनी केलेल्या जुलैमधील उपोषणाला भारत सरकारने विधायक प्रतिसाद दिला व लोकपाल विधेयक संसदेत मांडण्याची कार्यवाही सुरू झाली. पण सरकारी लोकपाल विधेयक आण्णा व त्यांचे सहकारी यांना अपुरे वाटले. परिणामी आण्णा व त्यांचे सहकारी यांनी जनलोकपाल विधेयकांची मागणी केली. सरकार त्याला प्रतिसाद देत नाही असे दिसताच आण्णांनी आंदोलन छेडले. देशभरात कँडल मोर्चे, मशाल मोर्चे आदी शांततामय मार्गाने आण्णांचा पाठींबा वाढत गेला. जनलोकपाल विधेयक आलेच पाहिजे हा आण्णांचा निर्धार आहे. त्यामागे भारताच्या राजकीय क्षेत्राचे शुद्धीकरण व्हावे हीच कळकळ आहे.
आण्णांच्या जनलोकपाल विधेयकाच्या मागणीतील काही आग्रह हे व्यवहार्य नसतील, सबुरीने जाणे गरजेचे असेल पण आण्णांचा हेतू मात्र स्वच्छ आहे. एका पाहणीचा निष्कर्ष असा आहे की, विकास योजनासाठी वरच्या पातळीवर मंजूर झालेल्या 100 रू.पैकी फक्त 18 रू. तळाच्या ग्रामीण समाजापर्यंत पोचतात. बाकीचे 82 रू. भ्रष्टाचारात गडप होतात. हे वास्तव बदलण्याची आण्णांची धडपड आहे. त्याला आपण कृतीने साथ दिली पाहिजे. सरकारमधील प्रामाणिक व्यक्तींना देखील भ्रष्टाचार नको आहे तर मग आण्णांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. त्यातून व्यवहार्य मार्ग निघेलच व एका पाऊल पुढे पडेल. पण आण्णांनी सुरू केलेल्या या जनआंदोलनात सहभागी भारतीय नागरिकांनी एक प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. जो येशू ख्रिस्ताने विचारला होता. अगतिक होऊन शरीर विक्रय करणार्या बाईला लोक दगड मारू लागले. येशू म्हणाला, “ज्या कोणी पापकृत्य स्वत: केले नसेल त्यानाच असे दगड मारण्याचा नैतिक अधिकार राहील.” आज आण्णाच्या आंदोलनात सहभागी असणार्या सर्वांना असेच आत्मपरिक्षण करावे लागेल. ज्यांनी स्वत: भ्रष्टाचार केला नसेल किंवा भ्रष्टाचाराला साथ दिली नसेल, स्वत: लाच दिली नसेल किंवा घेतली नसेल त्यानीच आण्णांना पाठींबा द्यावा. वास्तव हे आहे की, जाणून बुजून किंवा अगतिक होऊन आपण भ्रष्टाचाराला शिष्टाचार बनवण्यास सहभागी असतो याचे भान आपण राखले पाहीजे. तरच भ्रष्टाचारावर मात करणे शक्य होईल.
जीवशास्त्रज्ञ म्हणतात की, माणसांचा DNA (स्वभाव नियंत्रक घटक) मोठा खोडकर(Notorious) आहे. माणूस कधी कधी शहाणा तर बर्याचदा अविवेकी वागतो. मंगेश पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे आपण शोधायचे नाही, आपण झुंजायचे नाही अशीच त्याची वागणूक रहाते. पण विवेकाची बोचणी मधून मधून टोचत रहातेच. मग त्याला वाट दाखवणारा कोणी ‘मसीहा’ दिसला की, लोक त्याच्यामागे धावत रहातात. वास्तव असे असले तरी लोकांना विवेकाच्या पणत्या पेटवाव्या वाटतात व गांधी टोपी घालून ‘आण्णा, हम तुम्हारे साथ है।’ असे म्हणावे वाटते हेच दिलासा देणारे आहे. स्वत:च्या वर्तनात निश्चयाने बदल घडवून, जनचळवळीतून सशक्त संघटन उभे रहावे व संसदीय लोकशाहीच्या चौकटीत राहून नेतृत्वाला ‘अवतार’ न बनवता एक पाऊल पुढे टाकावे यासाठी प्रामाणिक प्रयत्नाला प्रामाणिक साथ द्यावी हाच आण्णांच्या आंदोलनाचा निष्कर्ष आहे.