Categories
प्रतिसाद

अंनिस ही माणूसपण जपण्याची चळवळ

सप्टेंबर - २०१२

भारतीय संस्कृती ही स्त्रीच्या बाबतीत सडलेली संस्कृती आहे, असे डॉ.रूपा कुलकर्णी म्हणतात. किती पुरूषप्रधान संस्कृती अभिमान्याला याच्या संवेदना आहेत? स्त्री भ्रूणहत्या चालूच आहे. समाजमन अधिक संवेदनहीन होत निघलंय.

            तुमच्या संपादकीयात ‘पेजेला देईल तो शेजेला घेईल’ असा एक सुसंस्कृत माणसाला अस्वस्थ करणार उद्गार आहे.

‘जोगतीण देवाची मालकीण गावाची!’
‘मुट्टिर मुलचट हट्टर शील इल्ल!(कन्नड)
‘बाई म्हणजे पायातलं वाहाण!’
‘बाई म्हणजे चामड्याची पिशवी!’; ‘बाई म्हणजे जित्राब!’
‘स्त्रीचा गर्भाशय म्हणजे पुरूषाच्या मालकीचे क्षेत्र!’
‘पुरूष म्हणजे तिच्या वस्तूपणावर शिक्का!’

‘शंकराचार्य जगद्गुरू तर स्पष्टच धर्मवचन सांगतात : किमेकं नरकस्य द्वार नारी!

            स्त्री म्हणजे नरकाचं द्वार! यावरच आमची स्त्री संबंधातील संस्कृती चालत आली आहे काय?

            ‘कुमारी’ या सुंदर शब्दाचा अर्थ काय? चाहे जानेवाली! आपण पुत्र! तो-पित्याला नरकातून बाहेर काढणारा, पुण्यलोकी पाठविणारा असा-“पु नाम् नरकात त्रायते स पुत्र:!’

            आपण देवदासी, भाविणी, मुरळ्या यांचाही कळ्या खुडण्याच्या भयाण वास्तवात संदर्भ आणला आहे. देशभरच हा प्रकार आहे. भाविणी, कलावंतिणी, जोगती, शरणी, मातंगी, देवरादियाळ, भगतीन, अशा विविध नावांनी या दासी देवाला म्हणजे माणूस नावाच्या पुरूषाला भोग देत असतात. त्या देवदासी नव्हे, भोगदासीच!! नाव देवाचा भोग पुरूषाचा!!! पुरूष माणूस आहे की नाही? मग हे असं कसं?

            आणीबाणीच्या काळात एसेम आण्णा गडहिंग्लजला आले होते. आम्ही श्रीमती दावणे या जोगतिणीकडे गेलो होतो. एस.एम.शी बोलताना ती भिंतीची खुंट धरून उभ्या उभ्या कोसळली…. ‘विठ्ठल ही दुष्ट रूढी अशीच कोसळली पाहिजे. नष्ट झाली पाहिजे!… तेव्हापासून मी देवदासी मुक्ती चळवळीसाठी भारतभर फिरतो आहे. आण्णा दुराई, जयललिता, गुंडूराव, रामकृष्ण हेगडे, गोव्याचे मुख्यमंत्री शरदराव, त्यावेळचे लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी अशा सार्‍यांशी याविषयावर बोलणी झाली. दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ, गोवा या राज्यात परिषदा, मोर्चे केले. आज सर्वत्र कायदा, बंदी, पुनर्वसन होत आहे. सांगताना कुणाही पुरोगामी माणसाला शरम वाटावी, की या विषयी महाराष्ट्र सरकारने स्वच्छ असं काहीच केलेले नाही. नुसती जाहिरातबाजी, दिशाभूल. आम्ही 4 जुलैला कोल्हापूरला जाऊन मंत्र्यांना भेटलो. महिला बालकल्याणविभागामार्फत येत्या आठवडादरम्यान खास संयुक्त सभा बोलविण्यात येत आहे. देवदासी रूढीचं पूर्णतया निर्मूलन झालेच पाहिजे आणि जुन्या देवदासी/देवदास अशा सर्व स्त्री पुरूष जोग्यांचं निर्वाह, घरकुल, विवाह, मुलांचं शिक्षण असं पूर्ण पुनर्वसन झालं पाहिजे असा अल्टीमेटस मी दिला आहे.

            8 मे ला सोनालीचा विवाह जेजुरीच्या खंडोबाशी होणार होता. तो अंनिसच्या कार्यकर्त्यांनी रोखला. परिवर्तन सदरात अंधश्रद्धा निर्मूलन ही वार्ता आणि कार्यकर्त्यांची छायाचित्रं यांची 15 पृष्ठांकावर प्रसिद्धी दिली आहे. विरोध, झीज, लोक नावड सर्व स्वीकारून समाजपरिवर्तनाला धडाडीनं पुढं धावणार्‍या या कार्यकर्त्यांचे अंत:करणपूर्वक आभार मानावेत. असे हे राष्ट्रीय कार्यकर्ते. हे खरे समाजवादी म्हटले पाहिजे.  बंधुशाही निर्माण होण्यासाठी जशी जाती निर्मूलनाची गरज आहे, तशीच ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे.  आपण अं.नि.वा.च्या माध्यमातून समाजाला अंधश्रद्धेचे मगरमिठीतून कसे बाजूला काढता येईल, या चिंतेत मग्न आहात. अंनिस ही माणसाचं माणूसपण जपण्याची चळवळ आहे.

            प्रशांत पोतदार, रोहित घाडगे, वसीम बागवान, शंकर कणसे, किशोर धरपडे, संतोष जाधव, संजय बनसोडे, योगेश कुदळे, अवधूत कांबळे, भास्कर सदाकळे, अंकुश चव्हाण, राजकुमार डोंबे, गणेश पिसे, संपतराव जगदाळे, तानाजी वंजारे व दिगंबर गुडे, तसेच अंकुश चव्हाण, शब्बीरभाई पठाण, हिरामण येळपणेकर, भा.सो.साळोखे, निर्मला चौगुले, सविता सुढीक, कपील यादव, राधिका मिसाळ, शोभाताई पवार, ज्ञानेश्वर ढोकळे, लक्ष्मण राख, प्राजक्ता साळवे, क्षीरसागर हे खरे समाजवादी होत. कारण ते समाजाची चिंता वाहतात.

-विठ्ठल बन्ने, गडहिंग्लज, जि.कोल्हापूर