Categories
संपादकीय

अंनिसची त्रिदशकपूर्ती आणि जवाब दो…

सप्टेंबर- २०१९

जुलै अखेरपासून मुंबईत आणि राज्यातील इतर भागात सुरू झालेला पाऊस आणि त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा भागात उद्भवलेल्या भयानक पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 9, 10, 11 ऑगस्ट रोजी संघटनेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त मुंबईतील मुलुंड येथील ‘महाकवी कालिदास नाट्यगृहा’त आयोजित केलेली एक दिवसाची ‘मानवतेसाठी विवेकवाद’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आणि दोन दिवसाचे अधिवेशन राज्यातील 35 जिल्ह्यांतून व देशातील 15 राज्यांतून मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहाने आणि दिमाखदारपणे साजरे झाले. मुंबईसारख्या महानगरात अनेक नैसर्गिक व मानवी अडचणींवर मात करीत या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आणि अधिवेशनाचे अत्यंत शिस्तबद्ध, नेटके आणि उत्कृष्ट नियोजन संपूर्ण महाराष्ट्रातील; विशेषतः मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी अविश्रांत मेहनत घेत केले. त्यांचे; तसेच सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कार्यकर्ते कलावंत यांचे ‘अंनिवा’तर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

या आंतरराष्ट्रीय परिषद आणि अधिवेशनाच्या निमित्ताने ‘अंनिस’ने गेल्या तीस वर्षांत केलेले विधायक, प्रबोधनात्मक आणि संघर्षपूर्ण काम ठोसपणे जगासमोर मांडले गेले व तीस वर्षांपूर्वी डॉ. दाभोलकरांनी प्रारंभापासून घातलेला संघटनेचा पाया त्यांच्यानंतर जराही न डळमळता पुढील आव्हाने पेलण्यास पक्केपणाने उभा आहे, याची खात्री सर्वांना झाली.

20 ऑगस्ट 2019 ला डॉ. दाभोलकरांच्या खुनाला सहा वर्षे झाली. अजूनही खुनी आणि त्यांचे सूत्रधार यांच्यापर्यंत पोचण्यात तपासयंत्रणा संपूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. या अपयशाचा जाब विचारण्यासाठी “जवाब दो – 6 वर्षे झाली, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुन्यांच्या सूत्रधाराला कधी पकडणार?” हा सवाल घेऊन राज्यातील ‘अंनिस’च्या जवळजवळ प्रत्येक शाखा आणि समविचारी संघटना निवेदने, निदर्शने, धरणे, निर्भय मॉर्निंग वॉक; याबरोबरच व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे मोहीम राबवीत आहेत. त्याला सर्वसामान्य लोकांकडून प्रतिसादही मिळत आहे. तसेच गेल्या वर्षीपासून 20 ऑगस्टला संपूर्ण देशभर साजरा होत असलेल्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिना’चे कार्यक्रमही ठिकठिकाणी झाले. 20 ऑगस्टला पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी गाणी म्हणत घोषणा देत डॉ. दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले आणि संध्याकाळी पहिल्याच ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्याना’त झालेले ‘द हिंदू’चे संचालक व माजी संपादक एन. राम यांचे देशासमोरील तीन आव्हाने : सार्वत्रिक दारिद्य्रामुळे वंचित जनसमूह, धर्मनिरपेक्षतेवरील हल्ला आणि व्यक्तिस्वातंत्र्यावरील बंधने या विषयावरील व्याख्यान लक्षवेधी ठरले.

या सर्व कार्यक्रमांचे संक्षिप्त वृत्तांत या अंकात आम्ही देत आहोत. हे सर्व वृत्तांत आपण आजवर केलेल्या कामाचा आढावा आपल्यासमोर ठेवतील, तसेच आज आपल्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानांच्या तीव्रतेची जाणीव तर देतीलच; तसेच या सर्व आव्हानांना तोंड देण्याची ऊर्जाही निर्माण करतील, अशी आशा वाटते.

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने घातलेल्या थैमानात महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पुराच्या वेळेस आणि पुरानंतरच्या पुनर्वसनाच्या बाबतीत बरेच काम केले. राज्यातील इतर कार्यकर्त्यांनी शालेय वस्तूंची पूरग्रस्तांना मदत केली; तसेच पूरग्रस्तांना मानसिक आधार देण्यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यांत ‘मानसमित्र प्रकल्प’ अंनिस राबवित आहे. या सर्व मदतकार्याचे वृत्तांत या अंकात पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे आम्ही देऊ शकत नाही. पुढील अंकात हे सर्व वृत्तांत देत आहोत.