सार्वजनिक जीवनात विधायक उपक्रमशीलतेत सातत्य टिकवून ठेवणार्या अं.नि.स.च्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला आहे. यंदापासून दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे. दहा हजार रूपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या वर्षी 2011 ला इचलकरंजीच्या तुकाराम रामचंद्र शिंदे उर्फ टी.आर.शिंदे आणि कोल्हापूरच्या काशिनाथ दत्तात्रय खुर्द तथा के.डी.खुर्द यांना अं.नि.स. जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. शनिवार दि.9 जुलै 2011 रोजी सायंकाळी 5.30 वा. कोल्हापूरच्या शाहू स्मारक, दसरा चौक येथे पुरस्कार वितरण होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे(मुंबई) यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून ज्येष्ठ विचारवंत व नेते कॉ.गोविंद पानसरे, डॉ.नरेंद्र दाभोलकर, प्रा.डॉ.एन.डी.पाटील, अविनाश पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे विधायक कर्तृत्व पथदर्शक व दिशादर्शक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून हे दोन्ही कार्यकर्ते अवितरपणे व समर्पित भावनेने समितीत कार्यरत आहेत. त्यांचा कार्याचा संक्षिप्त आढावा घेत आहे.
टी. आर. शिंदे

अं.नि.स जीवन गौरव पुरस्कार प्राप्त तुकाराम रामचंद्र शिंदे हे इचलकरंजी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथील रहिवाशी असून त्या परिसरातील राजकीय, सामाजिक, कामगार क्षेत्रातील एक आदराचे स्थान असलेले व्यक्तिमत्व आहे. 79 वर्षे पूर्ण केलेल्या टी.आर.शिंदे यांनी सातत्यांनी पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याचे काम केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक कार्याची तळमळ असणारे टी.आर.शिंदे तरूणांना प्रेरणादायी वाटतात. शाळकरी जीवनात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. 1942 च्या स्वातंत्र्यचळवळीत इंग्रजांच्या दडपशाही विरूद्धच्या मोर्चातील त्यांचा सहभाग ही त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा ठरली. थोरले बंधू स्वातंत्र्य सैनिक त्यामुळे घरची जबाबदारी अंगावर पडल्याने शिक्षण सोडून पॉवरलूम कामगार म्हणून जीवनाची सुरवात केली. राष्ट्रसेवा दलाच्या कार्यातही त्यांनी सहभाग घेण्यात सुरवात केली होती. सत्यशोधक समाजाच्या इचलकरंजी शाखेचे प्रचारक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. कामगार म्हणून काम करत असताना कामगारांना संघटित करून न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिलेला आहे. गिरणी कामगार संघ स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे. इंटक प्रणित गिरणी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. कामगार नेता म्हणून त्यांचा इचलकरंजी भागात नावलौकिक आहे. इचलकरंजी नगरपरिषदेत अॅक्ट्रॉय क्लार्क म्हणून त्यांनी काम केले. याच दरम्यान नगरपालिका कर्मचार्यांची संघटना त्यांनी बांधली. संघटीत व असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्याचे महत्वपूर्ण काम टी.आर.नी केले. कामगारांसाठीच्या अनेक महत्वाच्या योजना त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण केल्या, कर्मचार्यांच्या सोसायट्या स्थापण्यातही ते अग्रभागी होते.
1974 साली त्यांनी सक्रीय राजकारणास सुरवात केली. या वर्षी नगरपालिकेच्या नोकरीचा राजीनामा देऊन नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नगरपरिषदेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी गौरवास्पद आहे. 1980 साली शरद पवार व आबासाहेब खेबुडकर यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसपक्षाचे त्यांनी काम सुरू केले. 1999 पासून ते राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते आहे. या पक्षाचे मार्गदर्शक म्हणून ते कार्य करतात.
दक्षिण महाराष्ट्रात प्रबोधनाचे काम करणार्या समाजवादी प्रबोधिनीत संस्था स्थापनेपासून ते सक्रिय आहेत. समाजवादी प्रबोधिनीचे आचार्य शांतारामबापू गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली आज अखेर त्यांचे प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. त्यांचे हसतमुख बोलणे, सर्वांशी नम्रतेने वागणे, मृदू पण स्पष्ट आणि वृत्ती चौकस व जिज्ञासू आहे. समताधिष्ठित सामाजिक व्यवस्थेकडे ओढा असणारे हे व्यक्तिमत्व आहे. साधी राहणी, निस्पृह वृत्ती, सामाजिक कार्यात मग्न असणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. एल.आय.सी.मध्ये त्यांनी केलेले काम खूपच गौरवशाली असून त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
इचलकरंजीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे व प्रेरणादायी आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सर्वत्र पोहोचावा यासाठी टी.आर.नेहमीच धडपडत असतात. सत्यशोधकी वारसा घेतलेल्या टी.आर.नी शाखेमध्ये वडिलधारा सहकारी म्हणून अनेक महत्वाच्या जबाबदार्या पार पाडल्या आहेत, दुसर्याला समजावून घेणे, तरूण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे, लोकाभिमुख काम करणे, तत्वनिष्ठेने काम करणे ही तर त्यांची खासीयत आहे. गेली 15 वर्षे ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सक्रिय आहेत. समितीच्या वतीने जे जे उपक्रम राबविले जातात त्यामध्ये टी.आर. यांचा सहभाग उल्लेखनीय असतो. विशेषत: अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र नोंदणीमध्ये त्यांचा पुढाकार महत्वाचा ठरतो. इचलकरंजीत आयोजित केलेल्या अधिवेशनात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. समितीच्या कार्याला गती येण्यासाठी निधीची आवश्यकता असते हेच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातत्याने समितीसाठी मोठ्या रकमेच्या देणग्या गोळा केल्या आहेत. तसेच वार्तापत्रासाठी दरवर्षी लाखो रूपयांच्या जाहिराती गोळा करून अं.नि.स.कार्य सर्वत्र पोहचवत आहेत. म्हणूनच त्यांना अं.नि.वा.साथी पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. टी.आर. यांच्या कार्यात त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा आहे. घरच्यांच्या सहकार्याने त्यांच्या हातून हे मोठे सामाजिक कार्य उभे राहिले आहे. अं.नि.स.च्या कार्यात सतत झोकून देऊन काम करण्याची वृत्ती टी.आर.(आबा) यांनी जोपासली आहे.
के. डी. खुर्द

अं.नि.स.जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेली दुसरी व्यक्ती कॉ.काशिनाथ दत्तात्रय खुर्द तथा के.डी.खुर्द, कोल्हापूर. 77 वर्षे पूर्ण केलेल्या के.डी.सरांचा अं.नि.स.च्या कार्यातील सहभाग तरूणांना लाजविणारा आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.
के.डी.खुर्द यांचे मूळ गाव शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर. सध्या ते कोल्हापूर येथे रहात आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मलकापूर या ठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी काम करत, शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस सुरवात केली आणि शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. 35 वर्षे त्यांनी शिक्षणक्षेत्रात सेवा केली. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. शिक्षक संघटनेत कार्यरत असताना शिक्षकांच्या अनेक समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण केंद्राचा कार्यवाह म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षकांच्या शेकडो शिबिरात, प्रशिक्षणात त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचाही के.डी.सरांनी ध्यास घेतलेला होता आजही तो उत्साह त्यांच्यात दिसतो आहे.
के.डी.सरांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची सुरवात जटानिर्मूलन कार्याने केली. 1982 मध्ये त्यांनी एका शाळकरी मुलीचे जटानिर्मूलन केले. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात जटाधारी व्यक्ती, मुले-मुली अधिक संख्येने होती. स्वच्छता आणि निगा न राखण्याने केसात जटा होत होत्या, मानसिक गुलामगिरी, दैवीभिती, दहशत यामुळे मुला-मुलींच्या जटा काढण्यासाठी त्यांच्या पालकांचा विरोध होत असे; मात्र हा विरोध डावलून, पालकांचे प्रबोधन करून शेकडो मुलांचे जटानिर्मूलन करण्यात त्यांना यश आले.
मुलींच्या केसांची निगा राखली जावी, त्यांच्या केसात जट होऊ नये म्हणून कोल्हापूर जि.प. शाळेत त्यावेळी शाळकरी मुलींच्यासाठी बॉबकट योजना राबविली. त्यामुळे जटानिर्मूलनाच्या कार्याला अधिक बळकटी मिळाली. बॉबकट हा सौंदर्याशी संबंधित नसून आरोग्याशी संबंधित आहे हा विचार त्यांनी रूजविला, जटानिर्मूलन चळवळ कोल्हापूर जिल्ह्यात फोफावली. यासाठी के.डी.सरांचे योगदान मोठे आहे.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी भारतीय कम्युनिष्ट पक्षात प्रवेश केला. खरं तर यापूर्वीही ते या पक्षाच्या विचारांशी बांधील होते. कॉ.गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सी.पी.आय.मध्ये ते आजअखेर कार्यरत आहेत. पक्षाच्या वतीने आयोजित संप, मोर्चा, धरणे, शिबीरे, उपक्रम यामध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
1988 साली ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या संपर्कात आले. त्यांनी बी.एम.पाटील, अनिल चव्हाण यांच्या पुढाकाराने कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. गेली 20 वर्षे ते कोल्हापूर अं.नि.स.शाखेत सक्रिय आहेत. शाखा व जिल्हास्तरावर अं.नि.स.च्या विविध पदावर त्यांनी काम केलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत विविध उपक्रमांचे नाविन्य जपण्याचे काम कोल्हापूर शाखेने केलेले आहे. ‘विसर्जित गणपती व निर्माल्य दान करा’ हा पर्यावरणीय महत्वाचा उपक्रम सर्वप्रथम कोल्हापूर अं.नि.स.ने सुरू केला. गेली सतरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. शहरातील सर्व शिक्षण संस्था, विद्यार्थी, समविचारी संघटना यांना बरोबर घेऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जातो. यामध्ये के.डी.सरांचे योगदान महत्वाचे ठरलेले आहे. हजारो गणेश मुर्ती आणि शेकडो टन निर्माल्य दान मिळत आहे. महानगरपालिकेच्या सहकार्याने दान मिळालेल्या मुर्त्या, निर्माल्य निर्गत केले जाते.
त्याचबरोबर ‘होळी लहान करा, होळीची पोळी गरजूंना द्या.’ हाही उपक्रम राज्यभर गाजला. पर्यावरणीय मूल्य जपणार्या या उपक्रमास विद्यार्थ्यांच्यातून उत्स्फूर्त सहकार्य मिळते. शेकडो पुरणपोळी गोळा करून त्या गरजूपर्यंत पोहचविण्याचे काम अं.नि.स. करते. याही उपक्रमात खुर्द सर सर्व ताकदीनिशी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतात. 1967 साली त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. आज कोल्हापूरात आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह सहाय्यता केंद्र सुरू आहे. त्यांच्यावतीने आतापर्यंत 100 हून अधिक विवाह झालेले आहेत. यामध्येही ते हिरीरीने सहभाग घेतात. प्रबोधनासाठी आणि जनजागृतीसाठी अनेक वृत्तपत्रातून त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. वृत्तपत्र लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्यांचा सहभाग हे तरूणपिढीसाठी प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक असते. खुर्द सरांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. अं.नि.चळवळीत तरूणांचा सहभाग वाढावा यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. टीममधील तरूण सहकार्यांना प्रोत्साहन, प्रेरणा, पाठींबा देण्याचे काम खुर्द सर करतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचा ध्यास घेतलेले हे व्यक्तिमत्व आहे. घरामध्ये कोणत्याही धार्मिक विधींना थारा दिला नाही. माणुसकी हाच माझा धर्म सांगणारे खुर्द सर अं.नि.स.चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
वाहनधारक अमावस्येला लिंबू-मिरची लावतात. हजारो लिंबू वाया घालवितात. लिंबू आपल्या आरोग्याला खूप उपयुक्त आहे. मात्र प्रथा चालत आली आहे म्हणून लोक ही प्रथा चालू ठेवतात. भावी काळात याबाबत व्यापक प्रबोधन करण्याची खुर्द सरांची इच्छा आहे.
या दोन्ही पुरस्कार विजेत्यांमध्ये बरेच साम्य आढळते, दोघेही 75 वर्षांच्या पुढचे आहेत. तरीही मनाने तरूण आहेत, साधी राहणी आहे, सामाजिक काम हीच आपली शक्ती व प्रेरणा मानणारे हे दोघे आहेत. दोघांनाही सामाजिक कार्याची प्रेरणा, ऊर्जा, प्रोत्साहन कुटुंबातून मिळते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी अविरतपणे, समर्पित भावनेने ते काम करतात, दोघांच्याकडे निस्वार्थीपणा व निर्भिडपणा दिसतो.
अं.नि.स.च्या या दोन ज्येष्ठ सहकार्यांचे कार्य पाहिल्यावर आपणाला प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो. या दोघांकडे बघितल्यावर मला ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय बाबा आमटेच्या विचारांची आठवण येते. बाबा म्हणतात, “तरूण कुणाला म्हणायचे? ज्यांच्या खांद्यावर सुंदर विचार देणारे डोके असते, त्याला तरूण म्हणायचे.” हे बाबांचे विधान या आमच्या ज्येष्ठ सहकार्यांना तंतोतंत लागू होते. वय ही बाब सामाजिक कार्यात अडसर ठरत नाही हे दोघांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
के.डी.खुर्द सर आणि टी.आर.शिंदे(आबा) यांचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्य आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असून, उत्साहवर्धक आहे. त्यांच्या सामाजिक कार्यास, त्यांच्या समर्पित भावनेला सलाम. त्यांच्या हातून अजूनही खूप कार्य होवो, ही सदिच्छा.
–संजय बनसोडे