– छद्मविज्ञानाचे अभ्यासक प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती समारंभात आंतरराष्ट्रीय विवेकवादी संमेलनाचे एक प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी हे मूळचे इटलीचे असून इफरेन (मोरक्को) येथील अल् अख्वायन विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. इटली येथील यू.ए.ए.आर. या विवेकवादी संस्थेच्या ‘ल’अतेओ’ या मुखपत्राच्या संपादकीय टीमचे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत ते सदस्य होते व त्यामध्ये लिहीत होते; परंतु हल्लीच या संपादक मंडळाची पुनर्रचना झाली आहे. वेळ नसल्याने त्यांनी नवीन मंडळात जाण्याचे टाळले आहे. ‘सी.आय.सी.ए.पी.’ या इटली येथील छद्म विज्ञानाच्या दाव्यांचे अन्वेषण करणार्या समितीचे मुखपत्र ‘क्वेरी’ मध्ये मात्र त्यांचे लिखाण चालू आहे. धर्म आणि विज्ञान/छद्मविज्ञान यामधील संबंध; विशेषतः समकालीन इस्लाम व नवीन धार्मिक चळवळी, हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. एक शैक्षणिक प्रकारातले आहे, ज्यात मुस्लिमांमधील धार्मिक लोकांची वैचारिक विविधता दाखविणे, हा उद्देश आहे आणि दुसरे छद्म विज्ञान; मुख्यत: मुस्लिमांमधील छद्मविज्ञान हा विषय हाताळला आहे. विज्ञानाचे तत्त्वज्ञान या विषयात पीएच.डी. मिळवलेल्या स्टेफानो यांनी 24 वर्षे वय असतांना इटली देश सोडला व जर्मनीत पाच वर्षे, स्वीडनमध्ये तीन वर्षे, मेक्सिको येथे दोन वर्षे, स्वित्झर्लंड येथे एक वर्ष व गेली तीन वर्षेनोकरी करीत आहेत. ‘आपण विवेकी विचारांकडे का व कसे वळलात?’ असा प्रश्न विचारत आम्ही मुलाखतीची सुरुवात केली. त्यावर उत्तर देताना स्टेफानो म्हणाले, “माझे पालनपोषण एका धर्मनिरपेक्ष परिवारात झाले. त्यामुळे लहानपणी धर्म ही काही तशी महत्त्वाची बाब नव्हती. माझी आई रेजिना हिने मला अगदी लहान वयात वाचायला शिकविले. माझ्या कुटुंबाला बुद्धिवादाचा काही वारसा नाही. माझी आई माझा व माझ्या बहिणीचा सांभाळ करायची. वडील एका कार्यालयात काम करायचे; पण मला आईनेच वाचायला शिकवले. वडिलांकडून मला कठोर परिश्रमाचा वारसा लाभला. शिक्षण घेताना कुठेही धर्म हा प्रकार आडवा आला नाही. त्यामुळे माझ्यासमोर बरेच अनुत्तरित प्रश्न उपस्थित राहत होते व म्हणून तत्त्वज्ञान या विषयाचे शिक्षण विद्यापीठात घेण्याचे मी ठरविले. याद्वारे मला जगातील वेगवेगळ्या विचारप्रणाली शिकून, समजून घ्यायच्या होत्या. यात वळण घेणारा टप्पा म्हणजे मी मेक्सिको येथे अध्यापनाचे काम करत होतो तेव्हाचा आहे. मी विद्यापीठ व माध्यमिक विद्यालयात एकाच काळात शिकवत होतो. विद्यापीठात शिकवणे व माध्यमिक विद्यालयात शिकवणे यात खूपच फरक आहे, हे त्या वेळी जाणवले. विद्यापीठात अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने, विश्लेषण करून शिकवले जाते. तिथे आपण तत्त्वज्ञ घडवतो; परंतु माध्यमिक विद्यालयात मात्र विद्यार्थी तरुण असतात. तिथे आपण एक मनुष्य घडवत असतो. तिथे अशा क्लिष्ट पद्धतीने शिकवण्यापेक्षा वैज्ञानिक काय व अवैज्ञानिक/छद्म वैज्ञानिक काय याचे निकष सांगून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार त्यांच्यात रूजविला पाहिजे, असे मला प्रकर्षाने वाटले.
तुम्ही कार्य करीत असलेली सीआयसीएपी ही संस्था कसले कार्य करते?
ही तर्कवाद्यांची संस्था आहे. ही संस्था चमत्काराने आजार बरे करणे, भूत, जादूटोणा, प्रार्थनेने आजार बरे करणे इत्यादी अतींद्रिय शक्तीविषयक दावे पडताळून पाहण्यासाठी 1989 साली स्थापन झाली आहे. म्हणजेच आमच्या संस्थेचे वय तुमच्या संस्थेएवढे (महाराष्ट्र अंनिस) आहे. त्यानंतर आम्ही छद्मविज्ञानाचा विरोध या विषयात लक्ष केंद्रित केले. आमच्याकडे रोग प्रतिबंधक लस या प्रकाराला प्रचंड विरोध आहे. लसीमुळे आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम) येतो असा आरोप केला जातो. मुस्लिमांचा धार्मिक कारणाने लसीकरणास विरोध असतो. होमिओपॅथी; शिवाय आशिया खंडातून आलेले अॅक्युपंक्चर, रेकी हेही प्रकार आहेत. अत्यंत अल्प प्रमाणात फेंगशुई सुद्धा चालते. आमच्या देशात अजून एक प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे, तो म्हणजे प्राचीन परग्रहवासी सिद्धांत. या सिद्धांतानुसार परग्रह, अन्य सूर्यमालिका यामधून तिकडचे लोक इकडे आले व त्यांनी इथल्या मानवांना जनुकीयदृष्ट्या बदलून इथली प्रगत मानव संस्कृती निर्माण केली, असा दावा केला जातो. या विरोधात लढताना त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कायद्यातूनच कारवाई करावी लागते, ज्यामध्ये अशा प्रकारांसाठी सरळ तरतुदी नाहीत.
मग अशी एखादी घटना घडल्यावर व ती तुम्हाला माहीत झाल्यावर तुम्ही काय करता? लोकांना प्रत्यक्ष भेटता, लेख लिहून की सोशल मीडियाद्वारे प्रबोधन करता?
एक लक्षात घ्या. मी इटलीमध्ये राहत नाही व सक्रिय कार्यकर्ता देखील नाही. त्यामुळे मी लेख लिहितो. अशा काही घटना तिकडे घडत असल्या, तरी त्या माझ्या आवाक्याबाहेरच्या आहेत. या बाबतीत मी हे सांगू इच्छितो की, सी.आय.सी.ए.पी. स्थापन झाली, तेव्हा आम्ही अशा घटना घडल्यास लोकांना प्रत्यक्ष जाऊन भेटत होतो. उदा. एखाद्या गढीत भूत आहे, असे कळल्यास एक टीम त्या गढीला भेट देत असे व तपासणी करून तिथे भूत नाही, असे जाहीर केले जात असे; परंतु हल्ली आम्ही जास्त करून प्रबोधनावर भर देतो. कारण सध्या प्रचलित असलेले जे परग्रहवासी सिद्धांत, लसविरोधी मोहीम, डार्विन सिद्धांताला विरोध इत्यादी छद्मविज्ञान प्रकार आहेत. त्या बाबतीत सहमती व त्यावर ठाम विश्वास असणारे लोक आहेत व त्या बाबतीत त्यांच्याशी संवाद साधण्याचा परिणाम तीव्र संघर्षात होतो. त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. यावर उत्तम उपाय म्हणजे विज्ञान लोकप्रिय करणे. आमच्याकडे ऑनलाईन नियतकालिक आहे. त्यातून छद्मविज्ञानाची माहिती मिळताच आम्ही काटेकोर माहिती गोळा करून त्या छद्मविज्ञानाचा भांडाफोड करतो. ते वाचून जे लोक अजून कुंपणावर आहेत, जे अजून छद्मविज्ञानाकडे वळले नाहीत किंवा वळू पाहत आहेत, त्यांना तिकडे जाण्यापासून रोखले जावे ही आमची अपेक्षा असते; परंतु होमिओपॅथी, लसविरोधी मोहीम, युरोपियन युनियन थियरी, सप्टेंबर 11 थियरी या प्रकारात लोक यातील छद्मविज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत; परंतु त्या विरोधात आपले मत नोंदले जाते व त्याची माहिती उपलब्ध असते, हे महत्त्वाचे आहे. याशिवाय आमच्याकडे ‘अंधश्रद्धाविरोधी दिवस’ विवेकवाद्यांकडून पाळला जातो. हा शुक्रवार, दिनांक 13 या दिवशी पाळला जातो. हा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो. या दिवशी जिन्याखालून/शिडीखालून जाणे, फुटक्या आरशात पाहणे, काळी मांजर हे प्रकार अत्यंत अशुभ मानले जातात. त्या दिवशी विवेकवादी आपला स्टॉल लावतात व या बाबतीत प्रबोधन करतात, स्वतः जिन्याखालून चालतात, फुटक्या आरशात पाहतात, काळी मांजर हाताळतात. तसेच ‘डार्विन दिवस’ सुद्धा साजरा केला जातो व त्या निमित्ताने परिषदा भरवून त्या मार्फत प्रबोधन केले जाते. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवले त्यास नुकतीच 50 वर्षे झाली. त्यावेळी सुद्धा चंद्र कट सिद्धांत (Moon Conspiracy Theory) प्रचलित होता. त्याचा विरोध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात आम्ही एक परिषद घेऊन या सिद्धांताच्या बाबतीत वस्तुस्थिती मांडणार आहोत. आणखी एक बाब सांगायची राहून गेली. ती म्हणजे आमच्याकडे करदात्यांच्या पैशावर चालणार्या सरकारी वाहिन्यांवर फलज्योतिष यावर कार्यक्रम दाखविला जातो; पण अशा कार्यक्रमांना विरोध करणे अवघड असते. पूर्वी ज्योतिषशास्त्रातील फोलपणा आम्ही वेळोवेळी दाखवून दिला आहे. यात केले जाणारे दावे संदिग्ध स्वरुपाचे आहेत, हे सिद्ध करून दाखवले आहे. या बाबतीत आम्ही गेल्या काही काळात अधिक पाठपुरावा केलेला नाही. कारण सध्या तो विषय अग्रक्रमाचा नाही.
आपण काल आमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित होता. आमच्या संघटनेविषयी आपण आधी वाचले किंवा ऐकले असेल. त्यावरून आपण आमच्या संघटनेच्या कामाविषयी काय अभिप्राय द्याल?
होय, मी कालच्या संपूर्ण दिवसाचे कामकाज पाहिले. आपल्या संघटनेविषयी जोहानीज क्वाक यांनी लिहिलेली माहिती वाचून काढली आणि पूर्ण गृहपाठ करून आलो आहे. आमच्या देशात धार्मिक अंधश्रद्धा व छद्मविज्ञान या दोन वेगळ्या कारणांसाठी लढणार्या दोन वेगळ्या संघटना आहेत. मी त्या दोन्हींसोबत जोडलो गेलेलो आहे. तुमच्या संघटनेचे कार्य; विशेषतः दोन कायदे अस्तित्वात आणणे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. माझ्या देशात असे काही होऊ शकलेले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तारांगण हा प्रकार विज्ञानाला तळागाळापर्यंत घेऊन जाणारा व लोकप्रिय करणारा आहे. यापासून आम्हीही शिकलो आहोत. आपल्या संघटनेच्या सर्वच कामाचे अत्यंत कौतुक वाटते.
तुमच्याकडील अंधश्रद्धा व आमच्याकडील अंधश्रद्धा; तसेच त्या विरुद्ध तुमच्या देशातील कार्य व आमच्या देशातील कार्य यात आपल्याला काय फरक जाणवतो?
मी अनेक देशात राहिलो आहे, निरीक्षण केले आहे. त्यावरून मला असे वाटते की, अंधश्रद्धा या सर्वच देशात आहेत. धर्म, देव, धार्मिक चिन्हे हे समाजातील एका वर्गाला मान्य असतात. अंधश्रद्धा व छद्मविज्ञान यांचा गाभा सर्वत्र समानच आहे आणि तो केवळ तर्कदोषावर आधारित आहे. याबाबतीत मी भारत आणि मोरक्को या देशांचे उदाहरण देत असतो. आपण विज्ञान घेऊया. आता जेव्हा विज्ञानाचा विषय निघतो तेव्हा ते विज्ञान कुराणामध्ये आधीपासूनच आहे, असे मुस्लिम लोक सांगतात. कुराण हे जुन्या अरबी भाषेत लिहिलेले आहे, त्यात एकेका शब्दाचे हजारो अर्थ निघू शकतात; पण त्याचा सोयीस्कर असा अर्थ लावून धर्मगुरू त्यात विज्ञान घुसवतात. अशा प्रकारे काढलेले निष्कर्ष अगदी विज्ञान शिकवणार्या उच्चशिक्षित लोकांना मान्य असतात. विद्यार्थी सुद्धा हीच धारणा बाळगून आलेले असतात. मी त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती ठेवतो. अन्य धर्मांतील असेच दावे त्यांच्यासमोर ठेवतो. त्यासाठी हिंदू धर्मग्रंथात सुद्धा विज्ञान सांगितले आहे, असा दावा करणार्या चित्रफिती दाखवितो. त्यांच्या सिद्धांतातील तर्कदोष दाखवून देतो व असे प्रकार न्यूनगंडातून येतात, हे निदर्शनास आणतो. माझ्या देशात विज्ञान गॅलिलिओने सुरू केले म्हणून आज माझा देश या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे, असा दावा मी कसा काय करू शकतो? विज्ञान हे हिंदू, मुस्लिम, बौद्ध नसते. ते ज्यांनी निर्माण केले त्यांचे असते. तुम्ही विज्ञानाच्या पद्धती वापरता ते विज्ञान असते, त्यात हिंदू, मुस्लिम, नास्तिक असे काही नसते.
आपल्या पुढील योजना काय आहेत?
मी यापुढे भारतातील विवेकी चळवळ व डॉ. दाभोलकर यांच्याविषयी अधिक जाणून घेणार आहे. माझ्या विद्यापीठात त्यांच्याविषयी एखादा विषय सुरू करता येईल काय, याची पडताळणी सुद्धा मी करत आहे. प्राचीन एलियन थियरीवर मी अधिक संशोधन करणार आहे. कारण माझ्या देशातील काही नास्तिक सुद्धा ही थियरी मान्य करू लागले आहेत. ही थियरी धार्मिक नसली, तरी त्याविषयी बायबलमध्ये सांगितले गेले आहे, असे लोक म्हणतात व मानव हा एलियन द्वारा निर्माण केला गेला आहे, अशी थियरी ते मांडतात. आपली पुढील लढाई ही या सर्व फसव्या विज्ञानाविरोधात असणार आहे. त्यासाठी आपण त्याचा अभ्यास करून तयार राहिले पाहिजे.
प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी यांचा ईमेल पत्ता
s.bigliardi@aui.ma