विवेकी भक्तीचा श्रीगणेशा!
वाढती लोकसंख्या आणि पावसाचे बदलणारे चक्र यामुळे पाण्याचे उपलब्ध स्त्रोत काळजीपूर्वक जपण्याची गरज वादातीत आहे. पाण्याच्या प्रदूषणास अनेक कारणे आहेत आणि गणेशमूर्तींमुळे होणारे प्रदूषण हे त्यापैकी केवळ एक कारण आहे, हे खरे आहे. पण देशातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठीच प्रदूषण रोखणारे कायदे केले आहेत आणि त्यांच्या अंमलबजावणीचे अधिकारही प्रदूषण नियंत्रण मंडळांना दिले आहेत. कारखाने, व्यवसाय इत्यादींपासून होणार्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी. अनेक उद्योग बंद करण्याचे टोकाचे पाऊलही याआधी उचलण्यात आले आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे होणार्या प्रदूषणाचा अभ्यास करून, लोकांच्या श्रद्धेला, गणेशमूर्तींच्या पूजनाला बाधा येणार नाही आणि प्रदूषणही टाळले जाईल. अशी उपाययोजना मंडळाने सुचविली आणि मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वीही अनेक विचारी गणेशभक्तांनी प्रदूषण टाळण्यासाठी घरातच विसर्जन करणे, धातूच्या मूर्ती वापरणे असे पर्याय अवलंबण्यास सुरूवात केली आहे. शिवाय महानगरातही विसर्जन व निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे नैसर्गिक रंगाने सजवलेल्या मातीच्या मूर्तीच्या वापरासाठी समाजमन अनुकूल करणे सर्वपक्षीय नेते आणि संघटनांनी मनावर घेतले तर कठीण नाही. विघ्नांचे निवारण करण्यासाठी योग्य त्या बुद्धीचे, विवेकनिष्ठ निर्णयक्षमतेचे पाठबळ गणेशाविषयीची श्रद्धा देते ही प्रामाणिक भावना असेल, तर समाजाने स्वत:च्या बुद्धीने भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी जे वर्तन श्रेयस्कर मानायचे आणि समाजमानसात रूजवायचे, त्यासाठी फौजदारी कायद्याचा बडगा मुळात उचलावाच लागता कामा नये. -दै.महाराष्ट्र टाईम्स
खंडपीठाच्या निर्णयाने कुंभारराजेंना पुन्हा ‘मान’
औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे कुंभार बांधवांना पुन्हा मातीच्या मूर्ती बनविण्यास संधी मिळणार आहे. सध्या प्लॅस्टरच्या मूर्तींना मागणी असल्याने बहुतांशी ठिकाणी कुंभारांनी गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय सोडला होता. मात्र तो व्यवसाय पुन्हा सुरू होऊन आम्हाला ‘मान’ मिळणार आहे. -राहुल कुंभार, साजूर
इको-फ्रेंडली बाप्पा
आपल्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाची जपणूक करणारे स्पष्ट आदेश असतानाही आपण धर्माच्या नावावर अनेक वेळा निसर्गाची हानी करीत असतो. गणपती बाप्पा किंवा हिंदूंच्या अनेक प्रथा या मुळापासून अभ्यासल्या तर त्या ‘इको-फ्रेंडली’च आहेत हे सहजपणे लक्षात येऊ शकते. मात्र काळाच्या ओघात त्यांना लागलेले वेगळे वळण अनिष्ट आहे. विचित्र प्रथा निर्माण करून आपण कुठल्याही निकषाला सहज उतरतील, अशा आपल्या प्राचीन शास्त्रांना कमीपणा आणत असतो आणि पर्यायाने निसर्गाचेही नुकसान करीत असतो. या दोन्ही गोष्टी टाळणे आपल्याच हातात आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आपली प्राचीन, उज्ज्वल परंपरा जोमाने पुढे चालवू शकतो. -दै.पुढारी
मातीच्या मूर्तीला नमस्कार
अनेक सामाजिक संस्था गेली दोन दशके प्लास्टर ऑफ पॅरीसच्या वापराविरूद्ध ओरड करीत असूनही गणेशोत्सव मंडळांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. म्हणून न्यायालयाला अखरे बंदीचा निर्णय घ्यावा लागला आहे. खरे मूर्तीकार मातीच्या, शाडूच्या मूर्ती घडविणेच पसंत करतात. बुद्धिदेवतेवर श्रद्ध असणार्या मंडळांनी आता आयती चालून आलेली, सामाजिक जाणिवा प्रकट करण्याची संधी दवडू नये. मूर्तीचे आकार कमी करून, अनाठायी स्पर्धा टाळून त्यांनी गणेशोत्सवाचे खरे औचित्य दाखवून दिले पाहिजे. केवळ प्रबोधनातून, बांधिलकीतून ज्या गोष्टी घडू शकतात, घडायला हव्यात त्यासाठी न्यायालयाकडून आदेश मिळविण्याची पाळी यावी हेच मुळी उचित नाही. परंतु आता किमान या आदेशाला आव्हान देण्याचे नसते उद्योग तरी गणेशोत्सव मंडळांनी करू नयेत. -दै.लोकसत्ता
मंडळांनी मोठे पोस्टर्स लावावेत
– औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टळणार आहे. मात्र गणेश उत्सव मंडळांपुढे समस्या असणार आहे ती मोठी मूर्ती बनविण्याचे. तर त्यांनी गणेशमूर्ती लहानच बसवावी आणि मोठे पोस्टर्स लावून त्याची पूजा करावी.
-बाळासाहेब प्रभुणे, अध्यक्ष, महाराष्ट्र ग्राहक संरक्षण समिती.