Categories
चळवळ

बार्टीच्यावतीने अंनिसच्या कार्यकर्त्यांची वैज्ञानिक जाणीवा जागृती कार्यशाळा

जुलै - २०१४

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)यांच्या वतीने 29 जून 2014 रोजी पुणे येथे बार्टीच्या कार्यालयात ‘वैज्ञानिक जाणीवा जागृती कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेत अंधश्रद्धा व विकास कृतीसंशोधन संकल्पना, अंनिस च्या वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचा आढावा व मूल्यमापन आणि अंधश्रद्धाचे विकास विरोधी स्वरूप , संशोधन व कृती कार्यक्रमाचे प्राधान्यक्रम या विषयी विचारमंथन झाले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले. त्यांनी अंनिसच्या गेल्या 25 वर्षातील कामाचे कौतुक करून या सर्व कामाचे दस्तऐवजीकरणाची आवश्यकता व्यक्त केली.

डॉ हमीद दाभोलकर यांनी ‘अंधश्रद्धा व विकास कृतीसंशोधन संकल्पना’ या विषयाची मांडणी केली. यावेळी ते म्हणाले, आजपर्यंत वैज्ञानिक दृष्टीकोनाला धरून असणारे लढे आपण लढलो आता आपल्या कामाच्या सैद्धांतीकरणाची गरज आहे. कोणताही प्रश्न अथवा समस्या आंतरराष्ट्रीय पटलावर आणायचा असेल तर त्याचा विकासाशी असलेला संबंध सिद्ध करून दाखवावा लागेल. त्यामुळे अंधश्रद्धा व विकास यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे आपणांस अधोरेखित करायला हवे. याविषयीचं आकलन वाढवणे , सैदधांतीकरण करणं, संशोधन करणं हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही देखील या देशातील विकासाच्या प्रश्नावर काम करतोय हे उच्चरवात बोलायला हवं.

विकास आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांमध्ये आपल्या समाजात सातत्याने द्वंद्व राहिले आहे.सामाजिक न्यायाच्या प्रश्न हेच समाजाच्या विकासाचे प्रश्न आहेत अशी आपली भूमिका आहे. ज्या पद्धतीचा विकास गेल्या 20 वर्षात झाला त्यानं सामाजिक न्याय मिळाला नाहीच पण या क्षेत्रातील कार्यकर्त्यांसमोर नवीन आव्हाने मात्र उभी राहिली.

विकास प्रक्रिया आणि अंधश्रद्धा निर्मुलन याचा गेल्या 20 वर्षातील अभ्यास आणि शोषितांच्या जीवनावर अंधश्रद्धा आणि व्यसनांचा होणारा परिणाम या आपल्या संशोधनाच्या दिशा असायला हव्यात अशी अपेक्षा डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. त्यासाठी संशोधनाची आवड असणारे कार्यकर्ते , आंतरराष्ट्रीय तज्ञता असलेले लोक यांची मदत घ्यावी लागेल. अशी सूचनाही त्यांनी केली.

डॉ. हमीद दाभोलकर यांच्या विषय मांडणीनंतर त्यावर चर्चा झाली. या चर्चेत मुक्ता दाभोलकर , डॉ. ठकसेन गोराणे, अनिल चव्हाण , गजेंद्र सुरकार, प्राचार्य राजेंद्र कांकरिया व अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मुक्ता दाभोलकर यांनी संशोधन करताना सामाजिक न्यायाचा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. तर प्राचार्य कांकरिया यांनी आतापर्यंत अनुभवावर काम केले असे सांगून आता शास्त्रावर आधारित काम करण्याची गरज व्यक्त केली.

या सत्राचा समारोप करताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा मुल्यभाव अंगी आणण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन ही एक आहे. अंधश्रद्धा हा एक प्रश्न आहे हे जगाच्या पातळीवर मान्य आहे पण त्याच्या सोडवणुकीसाठी काय करायचे याचा विचार करायला हवा. अंधश्रद्धा या विषयावर 25 वर्षे काम करणे हा खूप मोठा टप्पा आहे, आता यापुढील टप्प्यावर आणखी काही वेगळी आव्हाने आहेत. संघटनेच्या पातळीवर अनुभवाच्या आधारावर आलेल्या निष्कर्षाना व्यवहाराच्या पातळीवर सांगड घालण्याची गरज आहे.देव, धर्माच्या नावावर चालणारे शोषण हा आपल्या कामाचा पाया आहे असे सांगून तो न सोडता आपले काम या पायावरच अधिक विस्तृत करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.

विकासाची आपली कल्पना काय? आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचे प्रतिबिंब धोरण आखणीमध्ये का येत नाही? याचा विचार करायला हवा.आपले काम धोरणात प्रतिबिंबित करण्यासाठी काय करायला हवे याच्या मांडणीसाठी कृतीसंशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली.

लोकशाही राबवण्याचे सर्वाधिक अधिकार हे भारतीय नागरिक म्हणून आपल्याकडे आहेत. त्यासाठी युवा पिढीशी संवाद,भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा नागरिक, त्याचे अधिकार,कर्तव्ये यांचे भान त्यांच्यामध्ये आणण्याची गरज आणि महत्व स्पष्ट करणे यासाठी आपल्या क्षमता विकासाची गरज आहे असे अविनाश पाटील म्हणाले.

कार्यशाळेच्या दुसर्‍या सत्राची सुरवात महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते हेमंत धानोरकर आणि तारका वानखेडे या नवदांपत्याच्या स्वागताने झाली. या सत्रात अनिल चव्हाण, प्रभाताई पुरोहित, प्रशांत पोतदार आणि कुमार मंडपे यांनी ‘वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचा आढावा आणि मूल्यमापन याविषयी चर्चा केली. यावेळी प्रकल्पाची सुरवात, अंमलबजावणी, यश आणि प्रकल्प मंदावण्याची कारणे’ याविषयी सविस्तर मांडणी केली. या सत्राच्या अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक मा. परिहार साहेब यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची बार्टी सोबत काम करण्याचे खूप स्वप्न होते असे सांगून आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचे बलिदान आपल्या प्रेरणेसाठी आहे असे समजून मैदानात उतरले पाहीजे असे मत व्यक्त केले.

अंनिस जे काम करते ती शासनाची घटनादत्त जबाबदारी आहे. आपण ती पार पडत आहोत. हे करून आपण शासनाची मदत करत नाही तर शासनावर उपकार करत आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात डॉ. ठकसेन गोराणे, नीला आपटे, मुक्ता दाभोलकर आणि प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी ‘अंधश्रद्धांचे विकासविरोधी स्वरूप, संशोधन व कृती कार्यक्रमाचे प्राधान्यक्रम’ याविषयी सविस्तर मांडणी करून कृतीसंशोधनाची वैज्ञानिक दृष्टीकोन, मानसिक आजार, व्यसन, शिक्षकांमध्ये वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह, व्रतवैकल्ये, आरोग्य आणि अंधश्रद्धा ही क्षेत्रे चर्चेतून निश्चित केली.

डॉ. रामटेके प्रकल्प संचालक,बार्टी यांच्या भाषणानंतर ‘हम होंगे कामयाब …’ या गीताने कार्यशाळेचा समारोप झाला.

कृष्णात कोरे