Categories
उपक्रम

भगतांची कार्यशाळा

मे - २०१५

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूूलनाच्या एकूण 25 वर्षाच्या वाटचालीत आम्ही अनुभवलेली एक थरारक अनोखी आणि विलक्षण आगळीवेगळी कार्यशाळा. अंनिसच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी हा अपरिचीत अनुभव

एका भल्या सकाळी जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातून एक फोन आला, “सुशिला मुंडे का? अंनिस कार्यकर्त्या? मी म्हटले “हो” त्यांच्या बोलण्यात एक अधिरता, घाई, काहीतरी गवसल्याचा आनंद स्पष्ट जाणवत होता. मॅडम डहाणूला भक्तांची कार्यशाळा घ्यायचीय, याल का? मी विचारलं ’स्वरूप काय’? ते मला नीट सांगता येणार नाही, आमच्या डहाणूच्या पर्यवेक्षिका रूपाली पाटणकर तुम्हाला सांगतील. पुढे दोन दिवस गेले. मी शांतपणे संघटनेच्या कामात गढून गेले.

तिसर्‍या दिवशी रात्री 8.30 वाजता रूपाली पाटणकर यांचा फोन आला. हॅलो मॅडम, नमस्कार, सॉरी हं, तुम्हाला आधीच संपर्क करायला हवा होता परंतु आमच्या विस्तार अधिकार्‍यांबरोबर बैठकांवर बैठका होत होत्या परंतु निर्णय होत नव्हते. आम्हाला खूप वाटतं, नवीन माहिती मिळवावी, पाड्यांपर्यंत पोहोचवावी, पण काय….. जाऊ दे मग अमुक तमुक तारखांना तुम्ही येणार ना? मी म्हटलं, डोंबिवली डहाणू अंतर खूप आहे. शिवाय मुक्काम पण आहे तेव्हा माझे जोडीदार प्राचार्य मुंडे सुद्धा माझ्या सोबत असतील. पुढे रूपालीने शंका उपस्थित केली. “ते तुमच्या चळवळीत आहेत का?” मी शंकेचे निरसन केले मात्र आता माझ्या मनात शंका घोंगाऊ लागल्या, आपल्या हातात आमंत्रणाचे पत्र नाही. शिबिराचे सुत्रधार कोण, प्रशिक्षणार्थी किती? आपले निवास कुठे? एव्हाना रात्रीचे 9.30 वाजले म्हटलं सकाळी बघू. तर सकाळी 10.00 वाजता तिचाच फोन आला. मी लगेच विचारलं. ह्या कार्यशाळेचा मुख्य सुत्रधार कोण? ती म्हणाली “ठाणे जिल्हा उपायुक्त मा.भावसारसाहेब. पण मग विभाग कोणता? एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-डहाणू परंतु मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद इथून आदेश असल्याचे समजले.

ठरलेल्या दिवशी आम्ही दोघे सकाळी 5 वाजता घरातून निघालो. ठीक 10.30 वाजता डहाणूला उतरलो तर अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा हातकर आम्हाला घ्यायला आल्या होत्या. सोबत महाराष्ट्र शासनाची गाडी. गच्च हिरव्यागार जंगलातून मंद हवेचा गारवा अनुभवत, चिकूच्या बहरलेल्या दाट सावल्यांची बुटकी झाडे पाहत आम्ही चाललो होतो. एका वाडीत आम्ही चहाला थांबलो. तिथेही जाम चिकू, छोट्या कैर्‍यांचा सडा पडलेला होता. गरम गरम आमलेट पाव खाता-खाता मनीषा एकदम गंभीरपणे म्हणाली, मॅडम, सावधपणे शिबीर घ्या हं तुम्ही करताय ते चूक आहे असं थेट बोलू नका. कारण भगतांची संख्या जास्त आहे मी म्हटलं कुणाची? “भगतांची” आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. कारण फोनवर ऐकताना आम्ही भक्तांची कार्यशाळा ऐकले होते. मनात म्हटलं हे संकट नाही ही संधी आहे.

एव्हाना आम्ही गंजाड ग्रामपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात पोहोचलो. सभागृहात पाय ठेवताच दारूचा वास भसकण माझ्या नाकात शिरला. सर्वांसमोर मला नाकावर रुमाल ठेवता येईना .क्षणभर मला बाबा आमटे, अभय बंग, राणी बंग यांनी आदिवासी पाड्यात कसे काम केले असेल याची जाणीव झाली. आम्ही, गंजाडचे सरपंच जाणा वरठा यांनाही भेटलो. सुरवातीला प्रास्तविकात मी भगत मंडळी भगतगिरीकडे का वळली याचे विश्लेषण केले. त्यांच्याकडे पाहून मला अंदाज आला की भगतगिरी मधून त्यांना फारसे उत्पन्न नसणार पण पाड्यावर सन्मान निश्चित असणार. मी म्हटलं माझ्या भावांनो, खरं तर या पाड्यातील गावकरी तुम्हाला खूपच सन्मानाने वागवतात कारण तुम्ही त्यांची सेवा करता, तुमच्याकडे परंपरेने आलेले कुलदैवत आहे, जंगलाचा भाग असल्यामुळे रस्ते कच्चे असतात, रात्री अपरात्री रोग्यांना डॉक्टरकडे नेण्यासाठी वाहन मिळत नाही, सर्पदंशाचा किंवा विंचूदंशाचा रुग्ण असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसते, कुत्रा चावला असेल तर इंजेक्शन उपलब्ध नसते, सुविधा असल्या तर डॉक्टरचा पत्ता नसतो. डॉक्टर असले तर तुमचा अवतार बघून तुमच्याशी नीट संवाद साधत नाहीत, कधी कधी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी रूग्णाला घेवून जा असं सांगतात.वारेमाप पैसे उकळतात, विनाकारण रक्त, लघवी, थुंकी तपासून घ्यायला लावतात. रूग्णाला दाखल करून घेतले तर त्याच्या सोबत राहायला माणूस ठेवला तर त्या माणसाचा रोजगार बुडतो. ही सगळी कारणे आणि परंपरा व संस्कार यामुळे तुमच्या वरील विश्वास तुमची भागतगिरी तेजीत ठेवतो. तर दुसर्‍या बाजूला सर्दी, कावीळ, खोकला, थकवा, खरूज, गोवर, कांजण्या इ. आजार उपचार न करता देखील मानसिक आधार, पुरेशी विश्रांती, पथ्य पाळल्यास बरे होतात. मी त्यांचे चेहरे वाचत होते. चेहर्‍यावरून तरी मी जे काही सांगत होते ते त्यांना पटत होते. चेंडू आपल्या कोर्टात आहे याची जाणीव होत होती एकट्या डहाणू तालुक्यात भगतांची संख्या 200 हून अधिक आहे. एव्हाना भगत व आमच्या मधील दूरी संपली होती. मग मोर्चा चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांकडे वळवला. चमत्कार पाहताना ते बरेच अस्वस्थ वाटत होते. त्यांना काहीतरी सांगावेसे वाटत होते. आम्ही त्यांना संधी दिली तर सुर असा होता की असले चमत्कार करून आम्ही लोकांना फसवत नाही, तुमच्या शहरात ते चालतं, आमच्या पाड्यावर नाही. सर म्हणाले, “ठीक आहे, पण तुम्ही महिन्या दोन महिन्याच्या बाळाला पोटावर डाग तर देता, अडलेल्या गर्भार बाईला वेळीच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देण्याऐवजी जळीमुळी, मंत्रतंत्र असे उपचार करत बसता त्यामुळे कधी कधी रुग्ण दगावतो. साप चावलेल्या रुग्णावर मंत्र मारत बसता, प्रसंगी बकरा, कोंबडा यांचा बळी देता हे तर तुम्हाला मान्य आहे.”

एक तरुण भगत उठला, म्हणाला “आम्ही अशी सेवा नाही दिली तर गावकरी आमच्यावर रूसतात. आम्ही सल्ला दिला तरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचे टाळतात. हा, पण आमच्या मंत्रात शक्ति आहे त्यावर मुंडे सरांनी पण एक फक्कड मंत्र म्हणून दाखवला व आपोआप कळशावरचा नारळ पेटू लागला तसे पुन्हा एकदा सन्नाटा पसरला. आम्ही त्यांना त्यांचा जालिम मंत्र म्हणून असाच नारळ पेटवून दाखवयाचे आवाहन केले. तसे साठीतले आजोबा उठले म्हणाले, आम्ही इथे मंत्र म्हटला तर आमची विद्या निघून जाईल. दूसरा म्हणाला, “मी मंत्र म्हटला असता पण मला सूतक आहे. सुतकात आम्ही मंत्र म्हणत नाही.” शेवटी एक तरुण मांत्रिक उठला म्हणाला, “मी मंत्र तुम्हाला म्हणून दाखवतो पण नारळ काही पेटवून दाखवणार नाही तसेच त्याने एक दमात घडाघडा त्याचा लांबलचक मंत्र म्हणून दाखवला. सरांनी समोर बसलेल्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना विचारले, काय समजलं? तसा जोरात हंशा पिकला. कार्यशाळेचा शेवटचा टप्पा सुरू झाला बचत गटामार्फत भगतांच्या चहा, पोहेंची सोय केली होती. सरांनी चहापानानंतर स्थिरस्थावर झाल्यानंतर जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत प्रत्येक कलमानुसार कसा गुन्हा ठरू शकतो व कशी शिक्षा होऊ शकते हे सांगितले. शेवटी हा कायदा कुणाच्या प्रयत्नांनी झाला हे तुम्हाला माहीत आहे असे विचारल्यानंतर पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका सोडून कोणालाही डॉक्टर दाभोलकरांचे नाव माहीत नव्हते. मुळातच सर्व भगतांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते फक्त दोघा तिघांचे पाचवी ते सहावी झालेले होते. शिवाय स्वत:चा पाडा सोडून ते इतर ठिकाणी फिरकतही नव्हते. सलग तीन ते चार तासाच्या संवादात त्यांचा भिडस्तपणा निघून गेला होता. समारोपाच्या वेळेला मी आवाहन केले की कोणाला असं वाटतं का की आपण अघोरी उपचार करतोय ज्यामुळे रोगी दगावू शकतो. तेव्हा आपण बदललं पाहिजे तसे एका पाठोपाठ एक असे चार भगत पुढे आले सगळ्यांचा सुर एकच होता रुग्ण तर आमच्याकडे यणारच मात्र आम्ही त्यांना कोणताही टाइमपास न करता, जळीमुळी न करता, मंत्रतंत्र न करता, झाडपाल्याचा उपचार न करता डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देऊ. आम्हाला दोघांनाही एक पाऊल पुढे पडल्यासारखे वाटले. आणि डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत सोडून आम्ही सत्येन्द्र स्मारक सभागृह, वाणगाव येथे धडकलो. तिथे महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती विनीता कोरे यांनी आमचे स्वागत केले. टळटळीत दुपार आणि समोर झिंगलेले भगत तोच परिचयाचा दर्प अशा वातावरणात भगतांची दुसरी कार्यशाळा सुरू झाली. वानगावचे भगत थोडे सुशिक्षित वाटत होते, तुम्ही जे सांगता तसलं अघोरी आम्ही करतच नाही. आम्ही फक्त घाबरलेल्या रुग्णांना मंत्र म्हणून आधार देतो. शेवटी कोरे मॅडमनी प्रश्न विचारला तुम्ही गावात मयत झाल्यावर, त्या मयत माणसाची आवडती वस्तु नातलग लपवून ठेवतात ती तुम्ही कशी शोधता? कोणतेही आडेवेडे न घेता त्या तरुण भगताने गरीबीमुळे आपण शाळेची पायरीही चढू शकलो नाही याची खंत व्यक्त केली. बालपणापासूनच गावातल्या डॉक्टर चुरी यांची गुरे सांभाळण्यात गुंतलेलो होतो, अपमान, अवहेलना रोजच्यारोज पचवत होतो. मात्र भगत म्हणून वडीलधार्‍या माणसांना मिळणारा सन्मान मला खुनावत होता. कसली विद्या आणि कसले मंत्र काहीच दम नसतो त्याच्यात. आवडती वस्तू शोधायची कशी? सगळ्यात पहिले म्हणजे तिथल्या पाडयावरच्या स्त्री किंवा पुरुष प्रत्येकाची आवडती वस्तू एकच ती म्हणजे दारूची बाटली.त्यामुळे अर्धी लढाई जिंकलेलीच असते. मयत व्यक्तीच्या नातलगाचा हात पकडून एक दिशा पकडायची व त्या दिशेला चालत राहायचे जर त्या दिशेला दारूची बाटली नसेल तर तो नातलगच माझा हात ओढून मला मागे खेचतो. मग मी दिशा बदलतो. बाटली लपविलेल्या दिशेला बरोबर चाललो तर तो नातलग माझा हात खेचत नाही. त्यामुळे दिशा कळते. आदिवासीच्या घरात फार सामान नसल्यामुळे अवघ्या दोन तीन मिनिटातच दारूची बाटली सापडते. तसेच आलेल्या भगताने मेलेल्या माणसाचे सख्खे नातेवाईक शोधायचे काम करायचे असते. लय सोपं आहे ते काम. सख्खे नातेवाईक असतात ते मान खाली घालून तेराव्याच्या दिवशी दु:खी चेहरा करून एका जागी बसलेले असतात. लांबचे नातेवाईक अंगणात विडी ओढतात, ताडी पितात, मोठमोठ्याने गप्पा मारतात, जेवायला कधी मिळेल याची वाट बघतात. त्याच्यासाठी भगतच कशाला तुम्ही सुध्दा सहज ओळखाल. कार्यशाळा संपवयाच्या आधी काही चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवली. पुन्हा तेच उत्तर आम्ही बालकाला डाग देतो, कोंबडं मागतो.’फळ मागतो, त्यांच्या खुशीने ते पन्नास, शंभर रुपये देतात पण तुमच्या शहरात जसे फसवतात तसे फसवत नाही. शेवटी त्यांनी मान्य केलं की इथून पुढे मंत्र तंत्र म्हणण्यात टाइमपास न करता डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देऊ. दुसरी कार्यशाळा संपली. भगत फारसे शिकलेले नसतानाही त्यांनी चमत्कारांची, वयात येतांनाची, कायद्याची पुस्तके 50%सवलतीच्या दरात का विकत घेतली? न राहून मी एकाला विचारलेच, “आम्ही नाही वाचणार आमची मुले तर वाचतील, घरात नातवंडे आहेत ती तर वाचतील.”

दुसर्‍या दिवशी आम्ही डहाणू तालुक्यातील आशागड येथे पोहोचलो. इथले वैशिष्ट्ये म्हणजे या कार्यशाळेत एक भगतीन होती ती बर्‍यापैकी शिक्षित होती, तिची भाषा शुद्ध होती.ह्या वेळेस आमच्या सोबत बोईसरचे अण्णा कडलासकर होते. त्यांनी म्हटलेल्या गाण्यांवर भगतांनी ताल धरला होता. सुरवातीची मांडणी झाल्यानंतर आम्ही त्यांचा विश्वास संपादन केला सहसा आपले मंत्र अनोळखी माणसांपुढे न म्हणणारे भगत आशागडच्या कार्यशाळेत घडाघडा न बुजता आपले मंत्र किती प्रभावी आहेत हे आम्हाला सांगत होते. याही कार्यशाळेत आम्हाला भगतांवर असलेला दारूच्या व्यसनाचा अंमल जाणवत होता. कुठेतरी खरचटलेलं, कुठेतरी जखमांचे व्रण, कळपट मळकट कपडे, मध्येच खाकारे, पचकन भिंतीवर थुंकणे, पर्यवेक्षकाची परवानगी घेऊन विडी ओढून येणं हे सगळं बघून मनामध्ये त्यांच्या प्रती कधी सहानुभूती, कधी चीड, कधी व्यवस्थेबद्दलचा संताप, तर कधी शासनांच्या प्रकल्पांचे वाजणारे तीन तेरा थैमान घालत होते. शेवटी मनोगतामध्ये आमचे मार्गदर्शन महत्वाचे असल्याचे व आम्ही नक्की आम्हाला बदलू, आम्हाला पैशापेक्षाही गावात मिळणार्‍या सन्मानाची अधिक गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

चौथी भगतांची कार्यशाळा कासा, तालुका डहाणू येथे गटविस्तार अधिकारी श्याम पासलवाड यांनी आयोजित केली होती. इथे आम्हाला फरक जाणवला तो असा की इथे एकही भगत हाफ पँटीत नव्हता, भाषा शुद्ध होती, बसायला खुर्च्या होत्या. खरं तर कासा ही ग्रुप ग्रामपंचायत आहे तरीही सुसज्ज वाटत होते. हॉलमध्ये महापुरुषांच्या तसबिरी होत्या. माझ्या सुरवातीच्या प्रास्तविकावरून त्यांना असे वाटले की आम्ही शासनांची माणसे आहोत आणि त्यांना काहीतरी मदत मिळवून देणार आहोत. म्हणजे अवकाळी पाऊस पडला, पिकांचं नुकसान झालं, नैसर्गिक आपत्ती, घरे वाहून गेली, पाण्याअभावी पिके करपली, रेल्वे अथवा बस अपघातामध्ये माणसे मेली, भूसंपादनात जमीन गेली इतकच काय डान्स बार बंद पडले तरी शासन दखल घेते आणि जर आमचा अनेक कुळांपासून चालत आलेला धंदा बंद केला तर शासन आम्हाला काय देणार? असा त्यांचा सवाल होता आम्ही जे उपचार करतो ते चुकीचे आहेत. असे तुम्हाला का वाटते? आमच्या उपचाराने शंभरात एखादा रोगी दगावला तर काय झाले? दवाखान्यात माणसे मरत नाहीत का? डॉक्टरांचे ज्ञान चुकत नाही का? लेकराला हात लावला की पाचशे रुपये मागतात. बाहेरचे दवा लिहून देतात. आमच्या लोकांना का तेवढी कमाई असते का? आम्ही तर कोणी दिले तर पाच पन्नास घेतो जबरदस्ती नाही. आलेल्याची आपुलकीने चौकशी करतो, पाणी देतो, कपभर चहा पाजतो. दवाखान्यात डॉक्टर सोडा दरवाज्यातला कंपाउंडर सुद्धा नीट बोलत नाही. मग शहरातली ही बुवाबाजी त्या बद्दल तुम्ही काय करता? आम्हाला क्षणभर बुमरॅग होतंय असं वाटलं. उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच चुकीचे नव्हते.

तुम्ही म्हणाल तर सोडतो आम्ही हा धंदा मात्र येणार्‍या प्रत्येक पेशंट मागे शासनाने आम्हाला मानधन नेमून द्यावे किंवा दरमहा ठराविक रक्कम आम्हाला द्यावी. मी त्यांना असे विचारले की सुईण बाईला जसे बाळंतपण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाते तसं काही ठराविक फारश्या गंभीर नसणार्ुया आजारांवर प्रशिक्षण दिले तर तुम्हाला चालेल का? त्यावर ते म्हणाले हो, का नाही चालणार? थोडक्यात काहीतरी एक जे अशास्त्रीय आहे ते सोडा म्हणताना ठोस पर्याय देण्याची जबाबदारी शासनाची आहे असे स्पष्ट जाणवले. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत झालेल्या या चारही कार्यशाळा एक भीषण आणि वास्तव अनुभव देऊन गेल्या.

गेल्या चार दिवसांपासून आमच्या मनात प्रश्न पडत होता. चार पाच तासांसाठी ही मंडळी येतात तरी कशी? नंतर कळलं ही जबाबदारी म्हणजे भगतांना एकत्र आणण्याची ठिकठिकाणच्या अंगणवाडी सेविकांनी घेतली होती. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून मिळालेल्या माहिती प्रमाणे पालघर जिल्ह्यात 9 तालुक्यात मिळून 1351 भगत तर ठाणे जिल्ह्यात चार तालुक्यात मिळून 250 भगत आहेत. स्पेसिफिक योजने अंतर्गत मान्यता प्राप्त भगतांच्या कार्यशाळेस एकूण रुपये 13 लाख प्रदान करण्यात आले होते. डहाणू सोडलं तर इतर 12 तालुक्यात या प्रशिक्षणांचे पंचायत समितीवर असलेल्या गट विकास अधिकार्‍यांनी काय केले?

सुशीला मुंडे

संपर्क : 9870730368, 9404870434