“तुमच्या मुलाने खेळणे मोडले नाही तर तो खेळण्याशी खेळलाच नाही” असे कुणी म्हटले तर तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही त्याला वेडा तरी म्हणाल किंवा मग एकदम विचारवंत तरी म्हणाल. अरविंद गुप्ता हे असेच एक व्यक्तिमत्व! आय.आय.टी., कानपूर मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांच्या बुद्धीवर शंका घ्यायला वावच नाही. असे शिक्षण असताना आणि त्यानंतर टेल्कोमध्ये पाच वर्षे नोकरी केल्यावर काहीतरी विज्ञान खेळणी बनवण्यासाठी आणि गावोगाव भटकण्यासाठी कुणी नोकरी सोडणार असेल तर त्याला वेडा म्हणणे भाग आहे. पण असे मोठे काम उभारायचे असेल तर त्यासाठी बुद्धी आणि वेडेपणा एकत्र यायला हवा.
संधी असूनही तथाकथित यशस्वी आयुष्यासाठी पाठ फिरवून स्वत:चा मार्ग धुंडाळणारे व्यक्तिमत्व इतर अनेकांसाठी उर्जेचा स्त्रोत असतात. त्यामुळे अरविंद गुप्ता यांच्याबद्दल जस जसे वाचायला मिळायला लागले तसे त्यांच्याबद्दल उत्सुकता वाढत होती. आणि यावेळी वार्षिक अंकासाठी मुलाखत घ्यायची तर त्यांचीच हे आम्ही नक्की केले. अरविंद गुप्ता यांची पुन्हा एकदा थोडक्यात ओळख करून द्यायची तर सांगावे लागेल की, त्यांनी कानपूर आय.आय.टी.मधून इंजिनियर झाल्यानंतर आणि टेल्को सारख्या कंपनीत काम केल्यानंतर देखील समोर उभ्या असलेल्या मोहात पाडणार्या आयुष्याकडे पाठ फिरवून त्यांनी कामगारांच्या वस्तीत रहाण्याचं स्वीकारलं. मोठ्या डायनिंग टेबलवर बसून सुखाचा आहार घेण्याऐवजी मीठ कालवून भाकरी खाण्यात कसलेही वाईट वाटून घेतले नाही.
‘खेळण्याचा जादूगार’ म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या अरविंद गुप्ता यांची भेट घ्यायला मी, राजीव देशपांडे आणि प्रभाकर नानावटी आयुकामध्ये पोचलो. सुट्टीचा दिवस असल्याने त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलता येणे शक्य होते. अरविंद गुप्ता यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वार्तापत्र यांच्याबद्दल थोडी माहिती देऊन गप्पा मारायला सुरवात केली.

प्रश्न : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या वीस वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहे. आमच्या कामाचे स्वरूपच आम्ही असे ठेवले आहे की, समाजातील मोठा घटक त्यात सहभागी होऊ शकेल. वैचारिक आणि सैद्धांतिक पातळीवरील चर्चेपेक्षा प्रत्यक्ष लोकांमधून काम करत असताना विचार कसा पसरत जाईल हाच विचार नेहमी आम्ही करतो. आज तुमची मुलाखत घेण्यामागे देखील हाच हेतू आहे की, तुमचे काम आणि त्यामागचा विचार वाचकांपर्यंत पोहचावा.
अरविंद गुप्ता : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची मला ओळख आहे. हे काम महत्वाचे आहे याचीही मला जाणीव आहे. काही बाबतीत मात्र काम करण्याच्या पद्धतीशी माझे थोडेसे मतभेद आहेत.
काही धार्मिक परंपरांशी जोडलेले लोक देखील त्यांच्या चौकटीत का होईना पण आधुनिक मूल्यांशी जोडणारे काम करत असतात. अशी काही उदाहरणे देतो. सिस्टर सिरिल या कोलकता मध्ये लोरेटो कॉन्व्हेंट येथे शिकवत होत्या. त्यांच्या मनात विचार आला की, आपले काम काही फक्त श्रीमांतांच्या मुलांना शिकवणे नाही. मग त्यांनी गरीब मुलांसाठी रेनबो नावाची शाळा काढली होती.
आन्थोनी डिमेलो म्हणून एक जेसुआईट धर्मगुरू होते. चर्चशी जोडलेले असले तरी चर्चमध्येच एक उदारमतवादी आणि डावा विचार मानणारा वर्ग होता. ख्रिश्चन धर्मगुरू असूनही त्यांच्या आश्रमाचे नाव साधना होते. येशूने आपल्याला गरीबाची सेवाच करायला सांगितले आहे असे त्यांचे धर्माचे आकलन होते. त्यांच्या मनात विचार आला की, आपले काम गरीबांची सेवा करणे हे आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे “Song of the Bird” असे त्याचे नाव आहे.
त्यांचे म्हणणे हेाते की, मी जरी चर्चशी जोडलेला असलो तरी अनेक भारतीय परंपरांनी मला समृद्ध केले आहे, याच भावनेतून त्यांनी सर्व धर्माचा आणि विचारसरणीचा अभ्यास केला होता. त्यांनी अगदी छोट्या-छोट्या गोष्टीमधून मूलभूत शिकवण मांडलेली आहे. बुद्धाची एक गोष्ट सांगतो.
गौतम बुद्धाकडे एक भिक्षु आला आणि म्हणाला मला नवीन अंगरख्याची गरज आहे.
बुद्धाने विचारले : आधीच्या अंगरख्याचे काय केलेस?
भिक्शु म्हणाला : माझी चादर फाटली होती त्यामुळे मी त्याची चादर बनवली.
त्यावर बुद्धाने पुन्हा विचारले : “चादरीचे काय केलेस?”
“चादरीचा वापर मी उशीचे आवरण म्हणून केला.”
“याआधी पण तुझ्याकडे उशीचे आवरण असेल त्याचे काय केलेस? बुद्ध अगदी योग्य प्रश्न विचारत.
“त्याचे मी पायपुसणी म्हणून वापर करायला सुरवात केली.”
“आणि आधीच्या पायपुसणीचे काय?”
“त्याच्या चिंध्या झाल्या होत्या म्हणून दिव्याच्या वातीसाठी त्याचा वापर केला.”
या उत्तराने कुठे बुद्धाचे समाधान झाले आणि भिक्शुला अंगरखा मिळाला. ही गोष्ट आपल्या मातीतील आहे. यात पर्यावरणाचा विचार आहे. पाच हजार वर्षांपूर्वी बुद्ध हे सांगतो याचा मोठा परिणाम आपल्या मनावर होत असतो. डिमेलो यांना चर्चने काढून टाकले. त्यांच्या लक्षात आले हा माणूस आपल्यासाठी धोकादायक आहे. पण त्यांना पूर्ण जगभरात बोलावले गेले. धर्मावर थेट प्रहार न करता अशा गोष्टीतून त्याच्या अंतरंगातील दोष किंवा कमकुवतपणा दाखवा. लोकांची श्रद्धा असते, कुणी साईबाबा मानतो, कुणी गणपती मानतो. त्यावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. प्रसिद्ध खगोल वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचादेखील हाच आक्षेप आहे. अर्थात न चुकता अंनिसच्या कामात त्यांना पटते तेथे ते सहभागीपण होतात. आमचे म्हणणे आहे सकारात्मक विचारातून याकडे पहा. लोकांची खिल्ली उडवली तर त्यातून आपण त्यांचे तत्वज्ञान मोडून काढू पण आपले साध्य त्यांचा पराभव करणे नाही तर त्यांना बदलणे आहे. जी पोकळी निर्माण होते ती पुन्हा त्यांना अशाच मार्गाकडे खेचत राहील. लोकाच्या आतून जो विचार येतो तो जास्त टिकाऊ असतो. संतांनी हाच मार्ग वापरला आहे.

प्रश्न : “तुम्ही म्हणता त्याचा विचार केला तर आजच्या शिक्षणामध्ये हाच विचार आहे. सर्व काही सकारात्मक आहे. विज्ञान शिकवले जाते. कुठेही अंधश्रद्धा पेरली जात नाही. पण व्यवहारात मात्र उलट चित्र दिसते. लोक अजूनही देवळासमोर, बुवासमोर रांग लावतात. याचा अर्थ कसा लावणार?” अगदी हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारायचा म्हटला तर सकारात्मक विचारांची पेरणी करायला म्हणून तरी नकारात्मक विचारांचे उच्चाटन करायला हवे की नाही?”
अरविंद गुप्ता : एक नवीन पद्धतीची विचारधारा इथे रूजताना दिसते आहे. उदाहरणार्थ जे विज्ञान पदवीधर किंवा आय.आय.टी.मधून इंजिनिअर झालेले आहेत. त्यांच्याकडून आपण अपेक्षा करतो की, त्यांना विज्ञानाची मूलभूत जाण असेल, ते लोक विविध धर्मगुरूंकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. यात सर्व जण बहुधा 20 ते 30 वयोगटातील आढळून येतात. यांच्या जीवनात असे काय दंद्व आहे की ते इथे येतात. इथे पुण्यामध्ये काही असा गट आहे, त्यात सगळे उच्च स्तरातील आणि उच्चशिक्षित लोक आहेत. त्यापैकी एकाने मला त्यांच्याकडे कार्यक्रमासाठी बोलावले होते. मी नेहमीप्रमाणे तेथे पंधरा मिनिटे अगोदर गेलो. तेव्हा तेथे डायनामिक योगाचा प्रकार चालू होता. मी तेथे बसलो तर मला सांगण्यात आले की तेथे बसण्याची परवानगी नाही. जे लोक पैसे भरून प्रवेश घेतात तेच या कार्यक्रमाला हजर राहू शकतात. इतक्या व्यावसायिक पद्धतीने त्यांचे काम चालते. दोन दिवसांत त्यांनी पाच लाख गोळा केले. माझे म्हणणे आहे की, या धर्मगुरूंना दोष देण्यापेक्षा आपल्याला शोधले पाहिजे की, अशा मार्गाकडे उच्च वर्गातील आणि शिक्षणाने देखील वरचढ माणसे का खेचली जातात?
प्रश्न : आमचे असे आकलन आहे की, प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेतून हा सकारात्मक आशय पोचवला जात नाही. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने विज्ञान पोचवता त्याची गरज आहे. तुम्ही देखील अशाच प्रेरणेतून या कामाकडे वळलात काय? एका मोठ्या पगाराची नोकरी सोडून नवीन पद्धतीने विज्ञान शिकवावे या मागचा विचार काय होता?
अरविंद गुप्ता : मी सत्तरच्या दशकात कानपूर आय.आय.टी.चा विद्यार्थी होतो. सत्तरचे दशक एकूणच क्रांतिकारी होते. भारतातच नव्हे जगभरात एका अर्थाने घुसळण चालू होती. जेव्हा जेव्हा अशी वैचारिक घुसळण होते तेव्हा तेव्हा त्यातून एक समााजिक उर्जा मुक्त होत असते. गांधीजीच्या राष्ट्रीय आंदोलनाचे उदाहरण घ्या. चांगल्या आरामाच्या नोकर्या सोडून लोक या आंदोलनात आले होते. सत्तरचे दशक असेच सामाजिक, राजकीय विचाराने भारलेले होते. जगभरात, कुठे अमेरिकेच्या विएटनाम युद्धविरोधात, तर कुठे कीटकनाशकाच्या विरोधात तर स्त्रियांच्या हक्कासाठी आंदोलने होत होती. अशा वातावरणात आपल्या संवेदना गदगदा हलतात. त्या काळाची घोषणाच होती की, “लोकासोबत राहा, त्यांच्यासोबत आणि त्यांना जे माहीत असेल तेथून सुरवात करा, त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांच्या सोबत उभारा.” असा काळाचा एक रेटा असतो तो तुम्हाला नाकारात येत नाही. कानपूरच्या आय.आय.टी.चा विचार केला तर तेव्हा तेथे चाळीस अमेरिकन प्रोफेसर होते आणि जे भारतीय होते ते सर्व अमेरिकेत शिकून आलेले होते. जेव्हा अशी टोकाची परिस्थिती असते तेव्हा त्याला विरोध करणारा प्रवाह तयार होत असतो. हे वास्तव आहे. त्यावेळेस आय.आय.टी.च्या पहिल्या-दुसर्या वर्गातील आम्ही पाच सहा विद्यार्थ्यांनी मिळून शाळा सुरू केली. आमच्या मेसमध्ये जे कामगार होते त्यांच्या मुलांना कुठेच शाळेची सोय नव्हती. मेसमधील कामगार सकाळी सहा वाजता नाष्टा देत ते रात्री दहा वाजेपर्यंत राबत असत. या मुलांना शिकवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस तासाला बुट्टी मारून आम्ही त्यांना शिकवत असू. तेथून जवळच नानाकारी म्हणून एक गाव होते. त्या गावात प्रचंड गरीबी. त्याच्याशी आय.आय.टी.ला काही देणे घेणे नव्हते. तिथल्या मुलांना मी गणित आणि सायन्स शिकवत असे. माझ्या सामाजिक शिक्षणाला खर्या अर्थाने इथे सुरवात झाली. हा माझा पहिला अनुभव सांगता येईल. हल्लीच जवळ जवळ तीस वर्षांनंतर मला कानपूरला बोलावले होते आणि त्या शाळेत पाहतो तर आज तीनशे मुले शिकत आहेत.
त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की, आपल्याबरोबर असणार्या समवयस्क मित्राचा आपल्यावर परिणाम होत असतोच.
त्या पाच वर्षांत बेगम अख्तर, रविशंकर, सत्यजित राय यासारख्या कलाकाराच्या कलांचा थेट अनुभव घेता आला. एका चांगल्या संस्थेचा असा परिणाम होत असतो. तिथल्या उदार वातावरणाचा एक चांगला परिणाम माझ्यावर झाला. ते तेव्हा लक्षात नाही आले, पण आज मागे वळून पाहतो तर आपल्याला जाणीव होते की, किती मोठा प्रभाव त्या काळाचा झालेला असतो.
आमचे एक शिक्षक डी.बालसुब्रमानियन, यांना विज्ञान प्रसाराच्या कामासाठी कलिंगा पारितोषिक मिळाले हेते. ते 1972 मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत मध्य प्रदेशातील किशोर भारती या शिक्षण संस्थेत रसायनशास्त्राचे प्रयोग शिकवायला जात. किशोर भारती ही संस्था डॉक्टर अनिल सदगोपाल यांनी सुरू केली होती. किशोर भारतीचे असे म्हणणे होते की, गावाच्या शाळेत विज्ञान शिकण्यासारखी परिस्थिती नव्हती. मुले घोकंपट्टी करतात आणि परीक्षेत ते तसेच्या तसे उतरवतात. ही काही चांगली पद्धत नाही. मुले विद्यार्थी आहेत, परिक्षार्थी नव्हेत. त्यांनी मध्यप्रदेश सरकारला प्रस्ताव ठेवला की, आम्हाला पाच वर्षे प्रयोग करू द्या. त्याच गावातील साधने वापरून मुलांना प्रयोग शिकवता येतील. माझा अनुभव असा आहे की, अविकसित राज्यात असे कुणी असते की, ज्यांना शिक्षणाची जाण असते, ते मदत करतात. डॉक्टर ब्रम्हादत्त शर्मा, त्यावेळेला ते शिक्षण खात्याचे सेक्रेटरी होते त्यांनी परवानगी दिली. त्यांच्या हाताखालच्या माणसांनी सल्ला दिला की, हे तरूण काही बी.एड किंवा डी.एड.नाहीत, त्यांच्यावर भरवसा टाकू नका. त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले की, ‘मध्यप्रदेश’मध्ये शिक्षणाचा स्तर इतका खालावला आहे की, आता आणखी खालावणे शक्य नाही. कुणीही त्यात आणखी नुकसान करू शकणार नाही. त्यामुळे ही मुले करतील तर फायदाच होईल.” त्यावेळेस टी.आय.एफ.आर.चे प्राध्यापक यशपाल किशोर भारतीत पहिले शिक्षक म्हणून गेले. ते गावातील शिक्षकांसोबत बोलत. शिक्षक त्यांना प्रश्न विचारत की, याचे उत्तर द्या, तर हे उलट म्हणत की, मलाच उत्तर माहीत नाही. आपण सर्व मिळून शोधू या, अशी त्यांची शिक्षणाची अनोखी पद्धत असे.
तो काळच वेगळा होता. आज पहिल्यांदा विचारतात की, डी.ए.किती मिळणार? विमानाची सोय आहे का? त्यावेळी कुणालाच डी.ए.नाही, की टी.ए.नाही, पण तरी आम्ही जात होतो. मला डी.बालसुब्रमानियन यांनी बोलावले तेव्हा माझी पंधरा दिवसांची सुट्टी बाकी होती. आपल्या मनात गावाबद्दल उगाचच रोमांटिक कल्पना असतात. जेव्हा खोलात जातो तेव्हाच कळते की, वास्तव काय आहे. तेव्हा माझे काम असे होते की, स्थानिक साधने काय याची यादी बनवायची. आपल्या परिसरात काय साधने आहेत यावर आधारित प्रयोग, शिक्षण याची पद्धत ठरवायची. तेव्हा किशोर भारतीला टाटा ट्रस्ट आर्थिक मदत करत असे. त्यानंतर पुन्हा मी एक वर्षाची सुट्टी घेऊन गेलो. तेव्हा खर्या अर्थाने अधिक बारकाईने काम करू लागलो. रस्त्यावर आणि आठवडा बाजारात जे सापडेल ते खरेदी करत गेलो. कंगवा असेल, सुरी असेल, काडेपेटी असेल, आरसे असतील असे जमा करत गेलो. यातूनच तर पुढे शिकवण्याची पद्धत विकसित करायची होती. त्यावेळेस एक चांगले पुस्तक हाती लागले, ते होते कीथ वारेन यांचे समजून घेण्याची पूर्वतयारी. घराघरात काडेपेटी वापरली जाते त्यामद्दलचे हे पुस्तक हेते. त्याने मला एक दिशा मिळाली.
त्यात काडेपेटीबद्दल साधी पण महत्वाची माहिती होती. एका काडेपेटीच्या आतील पेटीत वीस मिली लिटर पाणी मावते. पन्नास काड्याचे वजन दहा ग्रॅम भरते. जेव्हा घाऊक पद्धतीने वस्तूचे उत्पादन होते तेव्हा त्याचे माप एक प्रमाण असते. ही जाणिव एका अर्थाने क्रांतिकारी म्हणायला हवी. जेथे कोणतेही मोजमापाचे साधन उपलब्ध होत नाही तेथे काडेपेटीचे माप म्हणजे जणू स्थानिक लोकांच्या हातात हत्यार गवसल्यासारखे आहे. काडेपेटीच्या मापावरून 100 मिलीलीटर त्यातून एक लिटर असे मोजता येते. दुकानदार जेथे वजन मारतात तेथे 1 लिटर रॉकेल घ्यायचे तर कोणतेही माप उपलब्ध नसते. पण काडेपेटी सगळीकडे मिळते. काही गोष्टी मला मुलांनी शिकवल्या 50 पैशाच्या नाण्याचे वजन 25 पैशाच्या नाण्याच्या दुप्पट होते. म्हणजे नाण्याच्या किमतीबरोबर त्याच्या वजनाचे मूल्य जोडले गेले होते.
“याकोव पेरेलमन” याने 1908 मध्ये म्हणजे रशियन साम्यवादी क्रांतीच्या अगोदर लिहिलेले “फन विथ फिजिक्स” हे पुस्तक हातात आले. पेरेलमन यांना विज्ञान प्रसार करणार्याचा भीष्म पितामह म्हटले पाहिजे. त्यात त्यांनी रूबलचे नाणे मोजमाप करण्यासाठी कसे उपयोगात आणले जाऊ शकते याची माहिती होती. माझ्या विज्ञानातील रूचीचे विज्ञानातील रूचीचे श्रेय रशियनाना द्यायला पाहिजे.

प्रश्न : तुम्ही अनेक पुस्तके लिहिली आहेत, अनुवादित केली आहेत त्याची सुरवात कशी झाली?
अरविंद गुप्ता : माचीसच्या काड्यांशी खेळता खेळता माझ्या लक्षात आले की, माचिसची काडी सायकलच्या छोट्या वाल्व नळीमध्ये एकदम व्यवस्थित बसते. त्यातून मग वेगवेगळे आकार आणि वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या जसे त्रिकोण, चौकोन, प्रिझम, पिरामिड बनवणे शक्य झाले. यातून मग मुलांना वस्तूचे आकार, त्यांचा वास्तव जीवनाशी संबंध शिकवता येणे शक्य झाले. जगभरात मेकानो कितीतरी महाग असतात पण आमच्याकडे मुले फक्त काड्यापासून मेकानो बनवू शकतात. माझे म्हणणे आहे की, मुले जेव्हा खेळणी मोडून बघतात तेव्हाच ती खर्या अर्थाने शिकत असतात. कारण त्यांच्या मनात खेळण्याच्या पोटात काय आहे याची जिज्ञासा असते. मुलांसाठी खेळणी अशी हवीत की, ती त्यांना मोडता यावीत आणि जोडता यावीत. नाहीतर महागाची खेळणी आणली जातात आणि शो-केसमध्ये बंद राहतात. 1978 मध्ये ‘खेल खेल मे’ हे पुस्तक लिहून काढले. त्यात मुलांना घरच्या घरी स्वत: बनवता येतील अशा खेळण्याची माहिती होती. ते घेऊन मी प्राध्यापक यशपाल यांच्याकडे गेलो. तेव्हा ते डी.एस.टी.चे सचिव होते. सुरवातीला 2000 प्रती छापण्याचा विचार होता. त्यांनी मला फेलोशिप दिली, आणि पहिली प्रिंट ऑर्डर 25000 प्रतींची निघाली. या पुस्तकाच्या तेरा भाषात मिळून सात लाख प्रती निघाल्या आहेत.
त्यानंतर Council for Advancement of Peoples Action and Rural Technology (CAPART) कडून फेलोशिप मिळाली. तेव्हा अशोक जेटली CAPART चे डायरेक्टर जनरल होते. त्यांनी तीन वर्षांसाठी फेलोशिप दिली. तेव्हा मी चार-पाच पुस्तके लिहिली. या फेलोशिपचा फायदा असा झाला की, उपजीविकेसाठी कुठे कारखान्यात नोकरी करावी लागली नाही, आणि चांगल्या लोकांशी संपर्क आला. मी ज्या हिंदी भाषिक प्रदेशातून आलो त्या भाषेत चांगल्या पुस्तकाचे दारिद्य्र आहे. मी स्वत: जवळ-जवळ एकशे चाळीस पुस्तके अनुवादित केली आहेत, आणि पी.डी.एफ.करून वेब साईट(www.arvindguptatoys.com)<http://www.arvindguptatoys.com%c2%a0%20)/> वर ठेवली आहेत. जेव्हा छापली जातील तेव्हा जातील. ज्या लोकामध्ये चांगल्या पुस्तकाची भूक आहे ते त्यांच्यासाठी मोफत उपलब्ध आहे.
यदुनाथ थत्तेची आठवण अरविंद गुप्ता टेल्कोमध्ये होते. किशोर भारतीच्या कामासाठी त्यांना एक वर्षाची रजा हवी होती. चित्रा नाईक यांच्या सांगण्यावरून ते यदुनाथ थत्ते यांच्याकडे गेले. थत्ते यांनी काही न विचारता, केवळ एक तेवीस चोवीस वर्षांचा तरूण कामासाठी गावी जाऊ पाहतो याच कारणासाठी थेट टेल्कोचे जनरल मॅनेजर जकातदार यांना फोन लावला आणि सांगितले, “जकातदार, या मुलाला एक वर्षाची रजा द्या” पुढे बराच काळ यदुनाथ यांच्याबरोबर गुप्ता यांचा पत्रव्यवहार होता. गुप्ता दिल्लीला जाणार होते तेव्हा त्यांनी पत्र लिहिले ‘जे दिल्लीला जातात ते परत येत नाहीत’ थत्ते नेहमी थोडक्या शब्दात नेमका मुद्दा मांडत.
प्रश्न : तुमच्या विचारावर कुणाचा प्रभाव आहे?
अरविंद गुप्ता : तुम्ही भारतात राहत असाल तर गांधीजीच्या विचारांचा प्रभाव नाकारता येत नाही. आणि त्यांच्याशिवायदेखील अशी खूप माणसे आहेत की ज्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा होती. त्यापैकी सर्वात ठळक नाव घ्यायचे झाले तर प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ लौरी बेकर यांचे नाव घ्यावे लागेल. गांधीजी सांगत, “घर बांधायचे तर त्यासाठी कच्चा माल पाच मैलाच्या आतूनच यायला हवा.” लौरी बेकर म्हणत याचा अर्थ समजायला मला पन्नास वर्षे लागली. 1978 मध्ये मला लौरी बेकर यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. मी सहा महिने त्यांच्यासोबत होतो. त्यांचा स्वभाव खूपच खेळकर व विनोदी होता. सतत हसत-खेळत पण भरपूर काम करत त्यांचा दिवस जात असे. जीवनाचा आनंद घेणे याला ते जास्त महत्व देत. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांचे म्हणणे होते कमीत कमी ऊर्जा वापरून घर बांधले जायला हवे. सिमेंटचा शून्य वापर असावा!!
माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी त्यांना सेमिनारसाठी दिल्लीला बोलावले होते. तर यांनी एका रात्रीत “How to Reduce Building Costs” हे पुस्तक लिहून काढले आणि त्यांना कळवले की, माझ्या प्रवास आणि राहण्यावर जो खर्च येणार होता त्यात हे पुस्तक छापून होईल. युनायटेड नेशनचा प्रतिष्ठेचा पहिला Habitant Award त्यांना मिळाला. पण त्यांनी कळवले की पुरस्कार घ्यायला मी तिकडे येणे काही योग्य वाटत नाही. कुणी इकडे येणारच असाल तर त्याच्याकडे पाठवून द्या. आणि झालेही तसेच. त्यांनी “Center for Development Studies”, कडसची इमारत बांधली. इतरांनी 2 कोटीचा प्रस्ताव दिला होता. बेकर यांनी साठ लाखात ती बांधून दिली. कुठेही सिमेंट किंवा स्टीलचा वापर न करता. वातानुकूल यंत्रणेशिवाय झरोक्यांचा वापर करून संगणकासाठी आतील वातावरण थंड ठेवले आहे. पाच सहा मजल्याची ही मातीची इमारत आजही दिमाखात उभी आहे. निसर्गामध्ये कमीत कमी हस्तक्षेप करून बांधकाम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य समजायला पाहिजे. जमीन सपाट केल्याशिवाय जमिनीच्या उंच सखलपणाला अनुसरून आणि तेथील झाडांना धक्का न लावता ते इमारत उभी करत. एकदा वास्तुशास्त्राचे 25 स्वीडिश विद्यार्थी प्रख्यात वास्तुशास्त्रज्ञ चार्ल्स कोरिया यांनी डिझाईन केलेल्या आयुकाच्या इमारतीचा अभ्यास करायला आले. चार्ल्स कोरिया सोबतच तुम्ही लौरी बेकर यांनी बांधलेल्या इमारतीचाही अभ्यास करा असे मी त्यांना सुचवले. मला त्यांच्या बरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. आंध्र प्रदेशात चक्रीवादळ आले होते त्यावेळेस आंतरराष्ट्रीय मदत उपलब्ध झाली होती. पण कुणालाच कळत नव्हते काय करावे. तेव्हा लौरी बेकर यांनी मला बोलावून घेतले की, आपण एक एकर चा प्लॉट घेऊ या आणि चार घरे बांधूया. ही घरे चक्री वादळांतही उभी राहतील अशी त्यांची रचना करू. चंदिगढचे कृत्रिम नियोजन त्यांना पसंत नव्हते. कोणतेच शहर कृत्रिमपणे वसत नाही. शहर हे नैसर्गिकरित्याच वसायला हवे असे त्यांचे म्हणणे होते. लौरी बेकर खर्या अर्थाने वास्तू कलेवर प्रेम करणारे होते.
प्रश्न : तुम्ही इतकी वर्षे मुलांसोबत काम करत आहात, काही ठळक आठवणी सांगू शकाल?
अरविंद गुप्ता : पुणे विद्यापीठ परिसरातील विद्यापीठ शाळेची एक दुर्गा जेटी नावाची मुलगी आहे. चार घरांमध्ये धुण्या-भांड्यांची कामे करून इयत्ता 10 वीत शिकत होती. पाण्यात बाटली खालीवर केल्यावर पंखा फिरतो. हे मॉडेल तिने तयार केले. त्याला जोडलेल्या तारांचे वेटोळे आणि चुंबकामुळे वीज निर्माण होते. ह्याच मॉडेलच्या सहाय्याने समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती कशी होते हे समजावून घेता येईल. या मुलीची कहाणी ‘दैनिक सकाळ’ व ‘महाराष्ट्र टाईम्स’ ने छापली. त्यानंतर महाराष्ट्र टाईम्सने आवाहन केले, की या गरीब व सुपात्र मुलीला आर्थिक मदत करा. पुण्यातून वीस रूपयांपासून ते दहा हजार रूपयांपर्यंत पाचशे सतरा चेक्स आले. त्यातून सहा लाख जमा झाले. आज दुर्गाला दर महिना पुढील शिक्षणासाठी पाच हजारांचे व्याज मिळते. दुसरे असेच उदाहरण आहे शिवाजी माने या मुलाचे. हा मुलगा सफाई कंत्राटदारातर्फे आयुकात कामाला येत असे. त्याची आवड बघून आम्ही त्या कंत्राटदाराकडे विनंती केली की, याची बदली करू नका. आज तो मुलगा आमच्या टीमचा भाग झाला आहे.
आमचा स्टुडीओ बघा(अरविंद गुप्ता एका टेबलाकडे हात दाखवतात. पार्श्वभूमी म्हणून एक रंगीत कागद वापरलेला आहे) या स्टुडीओमध्ये आम्ही तीनशेच्यावर व्हिडीओ तयार केले आहेत. रोज दहा हजार मुले या फिल्म बघतात. अशा पद्धतीने फिल्म बनवण्याची कल्पनादेखील मुलांकडूनच आली. दहा वर्षांपूर्वी पु.ल.देशपांडे यांनी जयंत नारळीकरांना चाळीस लाख दिले. त्यातून एक ग्रंथालय उभे राहावे अशी त्याची इच्छा होती. नारळीकर म्हणाले, मुलांसाठी विज्ञान केंद्र सुरू करू. त्यातून ही इमारत उभी राहिली. इमारतीला पुलस्त्य नाव दिले आहे. त्यात सप्तर्षी तारकासमूहातील एक तारा पुलस्त्य याचे नाव आणि पुलंचे अशी दोन्ही नावे येतात. आजही पुलंच्या पुस्तकाची रॉयल्टी आयुकाला येते.
दर मंगळवारी आणि गुरूवारी विज्ञान केंद्रात कार्यशाळा होते. मुले 10-12 विज्ञान खेळणी आपल्या हातांनी बनवतात आणि सोबत घेऊन जातात. इतर दिवशी आम्ही डॉक्युमेंटेशनचे काम करतो. आमच्या वेबसाईटवरून रोज सहा हजार पुस्तके डाऊनलोड होतात व 10000 लोक खेळण्यांच्या फिल्म्स पाहतात.
पाकीस्तान भेट पाकिस्तानमधील कलिंग पारितोषिक मिळालेले परवेझ हूडभोय यांच्या आमंत्रणावरून गुप्ता पाकिस्तानला गेले होते. तेथे गुप्ता रोज रात्री दोन वाजल्याशिवाय घरी येत नसत. त्या प्रेमाने भारावलेले गुप्ता म्हणतात, “तिकडे युरोप एक होऊ पाहतो आणि आपण जगातील सगळ्यात असे गरीब देश आहोत की जेथे अर्धे लोक रस्त्यावर झोपतात, तेथे अमेरिकेकडून आपण बाँब आणि रणगाडे विकत घेत आहोत.”
प्रश्न : कॉपी राईटची अडचण आली नाही का?
अरविंद गुप्ता : कधी काही लोक विचारतात, आमची पुस्तके वेब साईटवर का ठेवली? मी म्हणतो माफ करा चूक झाली. पण काय करू? आमच्याकडे सार्वजनिक ग्रंथालये नाहीत. लोकांना हाच एक मार्ग आहे. तुम्ही म्हणता तर काढून टाकतो. पण क्वचितच लोक काढून टाकायला सांगतात. तसे झाले तर आम्ही वेबसाईट वरून काढतो. रोज चांगली पाच पुस्तके स्कॅन करून वेबसाईट वर घालतो. खरंच आत्मा आहे की नाही मला माहीत नाही त्यामुळे मी म्हणतो वेबसाईट हाच माझा खरा आत्मा आहे, सायबर स्पेस पुस्तक रूपी आत्म्याने भटकत राहील!
प्रश्न : तुम्ही ज्या पद्धतीने विज्ञान शिकवले जावे असा आग्रह धरता त्याचा आणि आजच्या अभ्यासाचा आवाका बघता शिक्षकांच्या संख्येत प्रचंड वाढ करावी लागेल. ते वास्तवात शक्य होईल काय? की तुमच्या मनात असे स्वप्रेरणा पद्धतीनेच काम चालावे असे तुम्हाला वाटते?
अरविंद गुप्ता : एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की, शिक्षण एक राजकीय बाब आहे. हे कधीच विसरता कामा नये. या सर्वांशी लढत बसाल तर हुतात्मा व्हाल. आज आपण आपल्याला वाचवून ठेवायची गरज आहे. यु.पी.ए.सरकारने एक चांगले काम केले ते म्हणजे कृष्णकुमार यांना NCERT चे प्रमुख नेमले. आपल्या देशात लाखो मुले अशी आहेत की जी पाठ्यपुस्तकापलीकडे काही वाचत नाहीत. कृष्णकुमार यांनी देशातील सगळ्यात बुद्धिवंत लोक एकत्र आणले. माधव गाडगीळ हार्वर्ड विद्यापीठाचे distingushed माजी विद्यार्थी! NCERT ची पुस्तके पाहिली तर लक्षात येईल त्यांचा दर्जा किती वरचा आहे. पोलिटिकल सायन्सवरील पुस्तक जगातील सर्वोत्तम पुस्तक म्हणायला पाहिजे. न्युयॉर्क टाईम्सने याची दखल घेतली आहे. त्यांनी विधान केले की, भारतात सुप्त क्रांती घडत आहे. प्रश्न शिक्षणक्रमाचा नाही. पाठ्य पुस्तकात मोटार आहे पण कुणीही शिक्षक शिकवत नाही. या सर्व व्यवस्थेचा पाठलाग करायाची माझी इच्छा नाही. त्यात आपण हुतात्मा होऊ. आज गरज आहे ती स्वत:ला वाचवून चांगले काम करण्याची. जेवढे लोक हे काम स्वत:चे म्हणून पुढे नेतील तेवढे चांगले. मग त्यासाठी डिग्री असायची गरज नाही. आज जो तो अभ्यासक्रम कव्हर करण्याची गरज सांगतो पण गरज आहे ती ज्ञान आणि विज्ञानाच्या संकल्पना अनकव्हर करण्याची.
अणुउर्जा आणि अरविंद गुप्ता अरविंद गुप्ता अणु उर्जेच्या विरोधी आहेत. त्याऐवजी सौर उर्जेचा पर्याय जास्त योग्य आहे असे त्यांचे मत आहे. डी.डी.कोसंबीच्या “Sun vs Atom” या लेखाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, हा लेख होमी भाभाना पटला नाही. न्युक्लिअर एनर्जी (अणु ऊर्जा) नको तर न्यू-क्लिअर(नवीन पद्धतीची शुद्ध ऊर्जा) हवी असा त्यांचा आग्रह आहे.