Categories
कथा

भुताचा मळा

वार्षिकांक – २०११

            एका डोंगराच्या पायथ्याशी ऐन माळावर वाकडीतिकडी बाभळींची आणि लिंबांची झाडं उभी होती. त्या झाडांच्या गर्दीत सेवरवाडी एखाद्या वनवाशासारखी दिसत होती.

            सेवरवाडीपासून दीड मैलावर बंडू सेवर्‍याचा मळा होता. अगदी गर्द झाडीच्या सावलीत तो मळा गजबजला होता. भरपूर पाणी असलेली विहीर, तिथं नारळीची दोन उंच झाडं अंगात आल्यासारखी आभाळात डोलत होती. त्या मळ्यात पिकाला भलताच जोर होता. मांडीसारखा ऊस, कंबरभर हळद, तशीच मिरची, मका-अगदी माणूस पेरलं तरी उगवेल असा तो मळा होता.

            हत्तीसारखे पुष्ट बारा बैल, दुधाळ गाई-म्हैशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या यांनी तिथलं वातावरण बोलकं झालं होतं.

            चार मुलं, चार सुना, नातवंडं, चाकरीचे गडी असा प्रचंड कुणबा घेऊन बंडू सेवरा त्या मळ्यात चिरेबंदी वाडा बांधून संसार करीत होता. त्याच्या मळ्यात अमरावती उतरली होती.

            बंडू सेवरा जन्मला कधी आणि मरणार कधी याची सेवरवाडीत कित्येकांना चिंता वाटत होती. कारण बंडूच्या बरोबरीचा एकही माणूस नव्हता. उलट त्याच्यानंतर जन्मूनही जख्ख म्हातारपण पाहिल्यानंतरच कित्येकांनी राम म्हटलं होतं. त्यांची हाडं मातीला मिळाली होती. कुणाचा धूर कौलाशी गेला होता.

            परंतु बंडू सेवरा दणदणीत होता. त्याचा रूंद चेहरा सुरकत्यांनी झाकळला होता. पण त्याचे डोळे तीक्ष्ण होते. डोकीचे केस, भुवया नि गुलढबू मिशा… सारंच पिकून रेशमासारखं झळझळत होतं. त्याचा उंच देह ताठ होता. डोकीला जरीचा मंदील, अंगात पैरण, गुडघ्यापर्यंत स्वच्छ धोतर असा त्याचा थाट होता. तो मुसळाएवढी काठी हातात घेऊन शांतपणे चालत असे.

            बंडूचं आयुष्य आणि मळ्यातील ते वैभव पाहून लोक म्हणत, ‘बंडू सेवरा माणूस नसून भूत आहे’ आणि त्याच्या मळ्याला ‘भुताचा मळा आहे’ असे म्हणत.

            गावात बंडूविषयी अनेक कथा-दंतकथा रूढ झाल्या होत्या. त्या तोंडोतोंडी झाल्या होत्या. मळा दिसताच लोकांना भुताची आठवण होऊन त्यांच्या डोकीत भूत थैमान घालीत असे.

            काही बोलकी माणसं दुसर्‍याला बसवून एक कथा सांगत :

            पुष्कळ दिवसांपूर्वी बंडू सेवरा गरीब होता. तो आपल्या शेतात खोप करून राहत होता. तो आणि त्याची बायको लोकांचा रोजगार करून पोट भरीत असत.

            एके दिवशी बंडू लोकांचं गवत कापीत होता. त्याची बायको खोपीत भाकरी करीत होती. थंडीचे दिवस होते. दंवानं गवत भिजलं होतं. बंडूचा विळा सारखा चालला होता. त्यानं एक मूठ धरून विळा चालविला आणि त्या मुठीतून एक अस्सल नाग कापून ओढला गेला. मुठीतील सापानं बंडूला कडाडून चावा घेतला. साप चावल्याबरोबर बंडू घाबरला. त्यानं बोंब ठोकली. लोक धावले. त्याची बायकोही ऊर बडवीत आली.

            चार लोकांनी धावपळ केली. औषधं आणली, मुळ्या वाटून चारल्या, पण गुण आला नाही. बंडूने डोळे झाकले.

            ‘मला माझ्या बांधाला पुरा!’ अशी त्यानं मरणापूर्वी विनंती केली. मग लोकांनी बांधाला गोर काढून बंडूचं मढं गोरीत घातलं.

            आणि माती लोटण्यापूर्वीच बंडूने डोळे उघडले. तसे लोक चकीत झाले. मेलेला बंडू सेवरा उठला. सर्वत्र आरोळी झाली. बंडू गोरीत जिवंत झाला. ते नवल घडलं. आणि काही शहाण्यांनी त्या नवलाला पुढील अर्थ जोडला, ‘बंडू मेला व्हता. पण त्याचवेळी भूत आलं नि बंडूच्या मढ्यात शिरलं!’

            बंडू सेवरा परत संसार करू लागला. पण लोकांनी त्याला भुतात जमा केला होता.

            पुढे अनेक चमत्कार लोकांनी पाहिले. बंडूला चार मुलं झाली. ती कर्ती झाली. त्यानं तो मळाच खरेदी केला. विहीर काढली. चिरेबंदी वाडा उभा केला, आणि तेव्हापासून इतकी वर्षे झाली तरी तो मरतच नव्हता!

            हा सर्व भुताचा चमत्कार असून त्या मळ्यात भुताचा गोतावळा संसार करीत आहे, अशी कित्येकांनी आपली समजूत करून घेतली होती, आणि तशीच इतरांची समजूत ते आग्रहानं करून देत होते.

            त्या मळ्यात घडणारे चमत्कार पहाण्यासाठी गावचे लोक टपून बसलेले असत.

            एका रात्री भर मध्यान्हीला मोटेचे चाक वाजू लागले. सेवरवाडी खडबडून उठली. बंडूच्या मळ्यात अपरात्री मोट जुंपलेली पाहून पुन्हा लोकांची खात्री झाली की, हे काम फक्त भुतंच करू शकते.

            एकदा अशीच मध्यरात्र झाली होती. सर्वत्र अंधार दाटला होता, सेवरवाडी निपचित पडली होती. घरोघर माणसं घोरत होती. त्यांच्या झोपेचा भार चालला होता. एकाएकी नाना खोताला जाग आली, आणि तो दारात आला. तशी त्याची नजर चटकन भुताच्या मळ्याकडे वळली. तिथं त्याच्या दृष्टीला जे दिसलं ते पाहून तो चकित झाला.

            त्या मळ्यात अनेक मशाली पेटल्या होत्या. उग्र प्रकाशाने मळा उजाळला होता. अनेक जाळांचा एकच जाळ होऊन झाडंझुडपं स्पष्ट दिसत होती. कित्येक माणसं बोलावीत तसा गलबला वाढत होता. नाना खोतानं क्षणभर विचार केला, हा भुतांचा प्रताप गावाला दाखवावा. म्हणून तो गावाला उठवू लागला. ‘आरं ए, उठा, भुताच्या मळ्यात जत्रा भरलीया बघा’ असं म्हणत त्यानं गावाला वळसा घालून एकूणएक माणूस जागं केलं. सारा गाव अंथरूणावरला दारात आला आणि तो अघटित असा चमत्कार पाहू लागला. एक म्हातारा दबक्या आवाजात बोलला,

            ‘अरं, चाललंय तरी काय त्या मळ्यात?’

            ‘काय म्हंजी?’ एक गावकरी समोर पहात म्हणाला, ‘मुलखातली भुतं बंडू सेवर्‍याला भेटायला आली असतील, दुसरं काय?’

            ‘थांबा गा! नाना खोत दोन्ही हातानं लोकांना गप्प करीत म्हणाला, ‘मी जाऊन बघून येतो.’ त्यानं आजूबाजूला पाहिलं. त्याचा आगाऊ तुक्या त्याला दिसला नाही.

            गावची तरणी पोरं म्हणाली, ‘आमी येतो चला.’

            नाना खोत आणि ती पोरं बंडूच्या मळ्याकडं अंधारात पळत गेली. परंतु मळ्यापर्यंत कुणीच गेलं नाही. दुरूनच पाहून परत आले. अगदी धावत आले. सर्व गावानं उत्सुक होऊन एकच प्रश्न केला, ‘अरं, काय करत्यात भुतं?’

            ‘काई न्हाय,’ नाना धापा टाकीत म्हणाला, ‘सारी भुतं जमून नांगूर धरलाय. आपापलं बैल घेऊन लई भुतं आल्याती!’

            ती भयंकर बातमी ऐकून लोक घाबरले नि हळूहळू पाय काढू लागले. थोड्याच वेळात सारा गाव अंथरूणावर आडवा झाला. नाना खोत घरात आला, तेव्हा त्याचा दहा वर्षांचा तुक्या अंथरूणावर नव्हता. नाना घाबरून तुक्याला शोधण्यासाठी पळू लागला. तेव्हा तुक्या दारापुढच्या लिंबावर चढून भुतांचा मळा पहात होता. तो बापाला म्हणाला,

            ‘ए आबा, मी हाय न्हवं का! मी भुतांचा नांगुर बघतुया!’

            नानाला त्याचा राग आला. पण ते पोर झाडाच्या शेंड्याला होतं म्हणून वाचलं. नानानं शिवी हासडली, ‘भडव्या, खाली ये.’

            नाना वयानं तरूण होता. जुना पहिलवान. आता कुस्ती सोडून संसार करीत होता. ताकदवान, धाडशी म्हणून गावात त्याचं नाव होतं. घरात साप निघाला, कुत्रं पिसाळलं, गाडी रूतली, की नाना पैलवान न चुकता पुढं असायचा.

            तुक्या खाली येताच त्याच्या डोकीत एक बुक्की बसली आणि त्याच्या आईनं त्याला उचलून घेतला. ‘अगदी बापावाणीच गंऽऽऽ बाई’ असं म्हणत ती तुक्याला घरात घेऊन गेली.

            नानाचा तुक्या अवघा दहा वर्षांचा होता. त्याच्या खोडीला गावात जोड नव्हती. उभी शेंडी, गोल चेहरा, खोजे डोळे, बसकं नाक असा त्याचा अवतार असे. बोलण्यात तो भारी हुशार असे आणि म्हैशीच्या गळ्यातील लोढण्याप्रमाणे, जिकडे बाप जाईल तिकडे तो जात असे. पण नानाचं काहीच चालत नव्हतं. तुक्या अगदी सावलीवाणी बापाच्या मागं फिरत होता. पावलोपावली तो भांडणं काढीत होता. त्या पोराच्या लीलांना नाना वैतागला होता.

            आपापल्या घरात माणसं जागीच होती, भुतांच्या गोष्टी सांगत होती. नाना दारात बसून चिलीम ओढीत होता. इतक्यात भुजा कैकाडी आला. त्यालाही तलप आली होती. त्यानंही आपली चिलीम भरली. पौष महिन्याची थंडी ओरबाडीत होती. अंगावरचं पटकूर सरळ करीत भुजानं झुरका मारला आणि सारा धूर गिळून प्रश्न केला-

            ‘नाना, भुतं नांगर धरू लागली, आता म्होरं काय व्हनार ह्या जगाचं?’

            ‘आरं बाबा, ह्ये कलियुग हाय.’ नाना गंभीर आवाजात म्हणाला. ‘आता सारी भुतं गावात शिरून शेतंभातं करू लागलीत नि आमास्नी भुतं होऊन फिरावं लागलं बोंबलत.’

            ‘खरंच बाबा! कैकाडी मान डोलारीत म्हणाला, ‘आक्रीत हाय आक्रीत. पर ही बंडू सेवर्‍याची भानगड खरी का?’

            ‘आगा, ती भानगड खरी हाय.’ नाना म्हणाला, ‘बंडू सेवरा मरून लई दिवस झालंती-नव्हं वरसं झाली. त्यो गोरीत जिवंत झाला. त्येचं कारण त्याच्या मढ्यात भूत शिरलं! म्हंजी, आता हाय त्यो बंडू सेवरा नसून भूत हाय!’

            ‘मग एकाद्या दिवशी ह्ये भूत सेवरवाडी भरडून टाकील!’ कैकाडी घाबरून म्हणाला, तेव्हा त्याला धीर देत नाना म्हणाला, ‘तसं बिसं काई होणार न्हाय! ते भूत आता माणूस झालंय, म्हणून ते गावाला हात लावणार न्हाय.’

            ‘म्हंजी तरी बरं-’ भुजानं सुटकेचा नि:श्वास टाकला, आणि तो अंग टाकायला निघून गेला.

            तुक्या जागाच होता, पडून सारं ऐकत होता. कैकाडी जाताच तो म्हणाला, ‘आबा, भूत गरीब असतं न्हाय का?’

            तुक्याच्या शब्दानं नाना दचकला. क्षणात त्याला तुक्याचा राग आला. एक दणका द्यावा असं वाटून त्यानं मूठ वळली, पण राग आवरला. मनातल्या मनात चरफडत त्यानं अंग टाकलं.

            तो फाल्गुन महिना होता. दिवस मावळत होता आणि त्याच घडीला चंद्र उगवत होता. पुनवेची रात उमलत होती. रानात गुर्‍हाळं लागली होती. लाकडी घाणे हुकारत होते. मळ्यामळ्यात उसांच्या राशीतून गुळाच्या भेली उत्पन्न होत होत्या. शिवारात गोड वास रेंगाळत होता.

            नाना खोत उसाच्या वाड्याचा भारा डोकीवर घेऊन गावाकडं निघाला होता. त्याचा तुक्या सलग ऊस तोंडाला लावून चघळीत मागून पळत होता. मध्येच थांबून लंगोटी सरळ करीत होता.

            तेवढ्यात आडव्या वाटेनं भुजा कैकाडी आला नि नाना बरोबर चालू लागला. चालता चालता भुजा म्हणाला, ‘तुमचं ह्ये प्वार भारी चावट हाय, त्येला साळंत तरी घाला. नुसतं भुतावाणी हिंडतंय.’

            ‘नका, तेवढं बोलू नका!’ नाना म्हणाला, ‘हे प्वार मास्तराला मुतवंल नि मुतलास का म्हणून मग हगवंल. ह्यो बिब्बा हाय.’

            ते बोलत बोलत गावंदरीला आले. त्याचवेळी गावाकडून बंडू सेवरा आला. त्याला पाहून नाना नि भुजा दचकले. नानानं थांबून रामराम केला. बंडू म्हणाला, ‘आज मळ्यात डावरा हाय. आजपासनं माझं गुर्‍हाळ उभं र्‍हातंय, पाच बकरी मारल्याती, तवा जेवाय ये. गावाला आवातणं देऊन आलोय.’ असं म्हणून सेवरा कैकाड्याकडं फिरून म्हणाला, ‘ए कैकाडी, तूंबी ये कडाण खाया.’

            कैकाडी मागं सरला नि नुसतीच मुंडी डोलावू लागला. सेवरा मळ्याकडं गेला. तेव्हा कैकाडी खालच्या आवाजात म्हणाला, ‘खरंच बाबा भूत! तुमी रामराम केला तसा सेवर्‍यानं  रामाचं नाव घेतलं न्हाय.’

            ‘अगदी बराबर!’ नाना कैकाड्याची तारीफ करीत म्हणाला, ‘भुजा, तुला डोस्कं हाय बरं! आरं, म्या मुद्दाम रामराम ठोकला. पर भूतबी बेरकी हाय. त्येनं रामाचं नाव घेतलं न्हाय.’

            ‘पण आबा ह्ये भूत गरीब हाय.’ तुक्याला गप्प राहवलं नाही. नाना चिडला. त्यानं तुक्याच्या बोडक्या डोकीत जोरदार ठोसा हाणला, तशी त्याच्या तोंडातली उसाची चुई गळून पडली.

            जेवणवेळ आली होती. चंद्रप्रकाशात सृष्टी न्हाऊन निघाली होती, दुधासारखं चांदणं ओसंडत होतं. सेवरवाडीची कौलारू घरं चांदीच्या घरासारखी दिसत होती. भुताच्या मळ्यात कडाण खायला जावं की न जावं हा भयंकर पेच सेवरवाडीपुढं पडला होता. सार्‍यांची नानावर भिस्त होती. नाना आला तर आपण येणार असे सारेच म्हणत होते.

            परंतु नानाचा तुक्या उघडा बोडका दूर उभं राहून ऐकत होता. त्यामुळं नाना का कू करीत होता. आपण निघालो की, हा तुक्या येणार याची भीती नानाला वाटत होती.

            सर्व तरणी माणसं एका लिंबाच्या झाडाखाली बसून विचार करीत होती. नाना म्हणाला, ‘मला काई येता येत न्हाय, तुमी जावा’ आणि जवळच्या एका गावकर्‍याच्या कानात कुजबुजला, ‘आरं, आमचा तुक्या अजून निजला न्हाय. भुतावाणी उभा हाय. तुमी चला म्होरं, तुक्या निजला की मी येतोच.’

            ‘चला या. नाना न्हाय आला तर न्हाय येऊ दे. आपून जायचं. चला.’ सर्व एकमेकांच्या कानांत फुसफुसले आणि बैठक मोडली. एकजण नानाला हळूच म्हणाला, ‘नाना, लवकर ये. कडाण उलगडल्यावर येऊ नगं.’

            पुष्कळ माणसं निघून गेली आणि नाना चरफडत अंथरूणावर पडला. तुक्यानं बाप निजल्याची खात्री करून घेऊन मगच अंग टाकलं. नानाला त्या पोराचा राग आला, पण करणार काय? एकुलतं एक नि वाकडं! मारावं तर तुक्याची आई मारू देत नव्हती. नानाचा नुसता कोंडमारा होत होता.

            बाप जात नाही म्हणून तुक्या निर्धास्त झाला.

            परंतु पोराचा लोढणा झालाय. आपण कुठं जाऊ शकत नाही. हे पोर नसून भूत आहे. मारावं तर मरंल न मारावं तर मागचं टळत नाही. असा विचार करीत नाना पडला होता. वरचेवर तुक्या निजला की नाही याचा कानोसा घेत होता.

            उशीरानं तुक्या घोरू लागला. नानाला आनंद झाला. तो तुक्याला अंगावर घालून उठला. बायकोला जागी करून म्हणाला, ‘मी निघालो-डावरा जेवायला.’

            ‘जावा. निजला तुका’ बायकोनं नानाला सांगितलं.

            नाना काठी, घोंगडं घेऊन बाहेर पडला. गावची माणसं बरीच पुढं गेली म्हणून त्यानं जवळची वाट धरली. तो माळानं जलद निघाला. तेव्हा आकाशात राखी रंगाच्या ढगांनी गर्दी केली होती. पूर्णचंद्र त्या ढगांच्या घड्या तुडवीत भरधाव पळत होता. तो दडत लपत मार्ग आक्रमीत होता. चंद्र ढगांत दडला की सृष्टीवर अंधार पडत होता आणि बाहेर आला की प्रकाश उधळला जात होता. सृष्टीला रूपेरी मुलामा चढत होता. नाना पायाला गती देत होता. तो माळानं धावत निघाला होता. क्षणोक्षणी तो आपला वेग वाढवीत होता.

            चालता चालता त्याच्या डोकीत भुताचा विचार जागा झाला, अन् हळूहळू वाढू लागला. थोड्याच वेळात त्या विचारानं अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं. भूत अनंतरूपी असतं! ते वाटेल ते रूप घेऊन माणसाला मारतं. कधी साप होतं, कधी कुत्रं, तर कधी बाई होतं. एखादा पहिलवान मरून त्याचं भूत झालं तर ते माणसाला अडवून कुस्ती खेळतं. एखादी बाई असेल, तर ती पुरूषाला अडवून हैराण करते. एकूण माणूस हा भुतापुढं असमर्थ ठरतो नि मरतो.

            असा विचार करीत नाना निघाला होता. एकाएकी तो थांबला. त्यानं हळूच वळून पाहिलं. पाठीमागच्या लवणाच्या माथ्यावर एक कुत्रं दिसलं. ते कान टवकारून नानाकडं पहात उभं होतं. ‘ह्ये कुत्रं कुणाचं?’ नानानं स्वत:ला प्रश्न विचारून ‘असंल गावातलं!’ असं स्वत:च उत्तर दिलं. मग त्यानं आजूबाजूला पाहिलं. सर्वत्र बाभळीची, बोरीची झाडंझुडपं मुरटा होऊन बसली होती. ती दबा धरून बसल्याचा आभास निर्माण झाला. नाना मनात भ्याला. प्रत्येक झुडपाकडे निरखून पाहू लागला. रोजची झुडपं त्याला विचित्र दिसत होती.

            ‘आपून उगंच घाबरलो.’ असं म्हणून तो हसला. इतक्यात त्याच्या पायाखालून काहीतरी सळकन् झुडपात शिरलं. तसा तो पुन: चमकला. नकळत भ्याला आणि आपण असे भितो का म्हणून स्वत:वर चिडला.

            सृष्टी अंधारातून प्रकाशात ये जा करीत होती. माळावरची वाकडी-तिकडी बाभळीची झाडं वातावरण विद्रूप करीत होती.

            नानानं उभं राहून मागं पाहिलं, तेव्हा ती कुत्र्याची आकृती उभी होती. फर्लांगभर दूर असलेल्या कुत्र्याचा चेहरा निरखण्याचा नाना प्रयत्न करू लागला. उंचच्या उंच कान, तीक्ष्ण डोळे, रूंद जबडा, असं भयाण कुत्रं नानाला दिसू लागलं, तसा तो बिचकला. हे कुत्रं गावचं नसून भूतच असावं असं समजून पाय काढला. तो झपाट्यानं निघाला. भुताच्या विचारानं त्याला घेरलं. ती भीती झटकून टाकण्याचा तो प्रयत्न करू लागला. चंद्र ढगातून बाहेर आला आणि नानानं पुन: वळून पाहिलं, तेव्हा त्याला ते कुत्रं दिसलं नाही. त्या जागी एक मानवाकृती दिसली. तोच चंद्र ढगात शिरून अंधार झाला नि त्या अंधारात ती माणसाची लहानशी आकृती उंची भासू लागली. मग मात्र नानाची पाचावर धारण बसली आणि त्यानं पळायचा विचार केला. तो गर्रकन् फिरून भुताच्या मळ्याकडं पळू लागला. पळत पळत त्यानं मागं पाहिलं. तेव्हा पाठीमागचं भूतही पळत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं अधिक जोरानं धूम ठोकली.

            माळ सरला होता आणि नाना एका पांदीत शिरून पळत होता. ती पांद दुतर्फा असलेल्या झाडांनी झाकली होती. त्यामुळं अंधार भरला होता. पण जिथं झाडांची पानं तुरळक होती तेथून तेवढा प्रकाश पांदीत गळत होता आणि त्या पांदीत अंधार नि प्रकाश एक जागी अगदी पाठीला पाठ लावून बसल्याचं दृश्य दिसत होतं.

            पांदीत नानाला धीर आला. तो अंधारात दडून बसून पाहू लागला. कुत्रं होतं ते माणूस कसं झालं? आपण पळून तरी काय होणार? भूत आपणाला पहाणार! असं म्हणत तो पुन्हा उठला. त्यानं आल्या मार्गानं परत पाहिलं. झाडाच्या पानातून गळणार्‍या प्रकाशात ती आकृती पुढं पुढं येत असल्याचं दिसत होतं. ती जलद चालत होती. अंधारातून प्रकाशात नि प्रकाशातून अंधारात शिरत होती. तिच्या पायाखाली पांदीतील वाळू सळसळ वाजत होती. नाना भयभीत होऊन पुढं चालत होता आणि ती आकृतीही त्याच्याच वेगानं पळत होती. पांदीत पळापळ सुरू होती.

            नानाला दरदरून घाम फुटला होता. अंगावरची सारी कापडं भिजली होती. डोकीचं पागुटं विस्कटलं होतं. हातातील काठी आवळून त्याच्या हाताला थेटा आला होता. त्याला धाप लागली होती. पांद संपत नव्हती अन् तो भुताचा मळा जवळ येत नव्हता.

            भुताचा मळा जवळ येताच नानाला धीर आला आणि तो स्वत: संतापला. दणका देऊन पळायचं, असा विचार करून तो थांबला. त्यानं चाचपून एक दगड घेतला आणि दबा धरून पाहू लागला.

            त्या गडद अंधारातून ती आकृती दिसत नव्हती. परंतु वाळूत खसखसत तिची पावलं नानाकडं येत होती. नाना एका झाडाच्या बुडख्याला दगड घेऊन बसला होता. दणका देऊन पळायचं हा निश्चय पक्का झाला आणि ती आकृती वैतागून पळत आली. नानानं अंधारात कानोसा घेतला. अंदाज करून जोरानं दगड हाणला अन् तितक्याच जोरानं पळ काढला. एक भयंकर किंकाळी त्याच्या पाठीवर टक्करली.

            नाना भुताच्या मळ्यात आला, तेव्हा त्याला आनंद झाला. जणू काहीच घडलं नाही. असा अविर्भाव करून तो हसला. जेवला आणि सर्व मंडळी सेवरवाडीला निघाली. नानाला दम निघाला नाही. तो म्हणाला, ‘मर्दा, मला भुतानं गाठलं व्हत!’

            ‘मग काय केलंस?’ सर्वांनी एकच प्रश्न केला.

            आणि नानानं सर्व कथा सांगितली. बोलत बोलत सर्वजण सेवरवाडीत आले नि घरोघर गेले. नाना आपल्या घरी गेला. त्यानं अंधारात तुक्याला चाचपून पाहिलं. तेव्हा तुक्या अंथरूणावर नव्हता नानाला धक्का बसला, त्यानं बायकोला जागं करून विचारलं, ‘तुक्या कुठायं?’

            ‘असंल की अंथरूणावर!’ बायको उत्तरली.

            आणि नाना घाबरला. त्यानं दारात येऊन आरडाओरड केला. आळीतील सारी माणसं उठली. नंतर सर्व सेवरवाडी उठली. नाना रडू लागला. त्याची बायको ऊर बडवू लागली. एकदम गलका वाढला. सारा गाव बोलू लागला. ‘आरं, तुक्या कवासा गेला?’, ‘आरं कुठं गेला?’

            एक म्हातारा ओरडला, ‘आरं प्वाराला हाक तरी मार!’

            नानानं हाक मारली- ‘तुक्याऽऽऽऽ’ त्याचा पल्लेदार आवाज रात्रीची चिरफाड करीत दूर गेला. नाना चरफडून बसला. आपल्या मागं कुत्रं दिसलं! मग माणूस दिसलं!! आपण अंधारात दगडाचा दणका दिला!!! ते कोण? नानाच्या डोकीत पुन: विचार घण घालू लागले.

            ‘नाना, तुला भुतानं कुठं गाठलं व्हतं?’ एकानं विचारलं.

            नाना म्हणाला, ‘चावर्‍याच्या पांदीत.’

            ‘मग तू काय केलंस?’ दामू मास्तरनं नानाला विचारलं.

            ‘म्या दगड हाणून पळ काढला.’ नाना म्हणाला.

            ‘कंदील, मशाली पेटवा.’ मास्तर म्हणाला-‘चला, तुक्याला शोधू या.’

            लोकांनी पलिते, कंदील पेटवले आणि ज्या वाटेने नाना भुताच्या मळ्याकडे गेला होता त्या वाटेने लोक पळत गेले.

            पांदीत तुक्या पडला होता. त्याचं डोकं फुटलं होतं. तो रक्तात पडून कण्हत होता. त्याला पाहून नानानं तोंडात मारून घेतलं नि मास्तर म्हणाला, ‘गावाकडं त्याला पळवा. जिवंत आहे.’

            तुक्या मरता मरता वाचला आणि तुक्याच्या जाचातून नानाची सुटका झाली. आठ दिवसांनी तुक्या हिंडू फिरू लागला पण नानाबरोबर फिरायचं त्यानं बंद केलं.

            एकदा नानानं विचारलं, ‘भूत गरीब असतं न्हाय का?’

            ‘छा, गा. भूत वंगाळ असतं!’ तुक्या उत्तरला. आणि नाना हसला.

अण्णा भाऊ साठे