श्री. गो. ना. दातार (1876 ते 1941) यांनी लिहिलेल्या व 1930 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘चतुर माधवराव’ या पुस्तकातील ‘भुताटकी’ ही कथा अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने वाचावी असे मला वाटते. 1930 मध्ये या लेखकाला इतकी आधुनिक दृष्टी होती, हे विशेष - भारत सासणे, जिल्हाधिकारी बीड
माधवरावांच्या चाणाक्षपणाच्या गोष्टी माझ्यामार्फत कित्येक पुस्तकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या आणि त्यांचा स्नेहही अधिकाधिक वाढत चालला. त्यांच्या नावाची प्रख्याती होण्यास मी कारणीभूत झालो, म्हणून त्यांचा माझा स्नेह वाढला, असे समजण्याचे मात्र कारण नाही. आपले नाव मासिक-पुस्तकात किंवा वर्तमानपत्रात छापले गेले म्हणजे आपल्या जन्माचे सार्थक झाले असे समजणारे कित्येक लोक असतात, हे जरी खरी आहे, तरी माधवराव मात्र त्यापैकी नव्हते. आपले नाव अशा रीतीने वारंवार लोकांच्या नजरेसमोर येण्यात आपला फायदा नसून तोटाच आहे, हे त्यांनी मला अगोदरच सांगून ठेवले होते. व ते खरे ठरत चालले होते. त्यांच्या नावाची प्रसिद्धी होऊ लागल्याबरोबर त्यांच्याकडे गिर्हाईकांची इतकी गर्दी जमू लागली की, सगळ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याबरोबर मनमोकळे बोलण्यास सुद्धा त्यांना फुरसद मिळेनाशी झाली. यामुळे बरीच गिर्हाईके निराश होऊन परत जाऊ लागली, इतकेच नव्हे तर, आपली ती निराशेची कहाणी इतरास सांगून त्यांनाही नाराज करू लागली. माझ्यावरही पुष्कळ ‘संपादकांची’ इतराजी संपादन करण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले. आपल्या ‘विख्यात’ आणि ‘सन्मान्य’ नियतकालिकांत माधवरावांच्या चातुर्याची एखादी तरी गोष्ट प्रसिद्ध व्हावी अशा मागण्या माझ्याकडे इतक्या येऊ लागल्या की, त्यातील बर्याच नाकारण्याखेरीज दुसरा मार्गच उरला नाही. माधवरावांच्या विलक्षण तर्कशक्तीचे प्रतिबिंब ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे, अशा शेकडो गोष्टींची टाचणे माझ्या संग्रही आहेत, पण ती तपासून, त्यांची नीट जुळवणी करून आणि माधवरावांची परवानगी मिळवून छापण्यासारखे हस्तलेख तयार करावयास किती त्रास पडतो तो माझे मलाच माहीत! या माझ्या गोष्टी प्रेमाने वाचणारे कित्येक मार्मिक वाचक आहेत, आणि ते माझे कौतुक करतात, यातच मी आपल्या श्रमांचे सार्थक मानून घेतो, यापेक्षा अधिक काय सांगू? असो. मी त्यांचा स्तुतिपाठक बनलो, हे त्यांच्या माझ्या स्नेहाच्या वृद्धीस कारण नसून, त्यांच्या सहवासाने व शिक्षणाने माझी निरीक्षणशक्ती वाढत चालली होती, आणि कित्येक वेळी मी आपल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून एकनिष्ठेने त्यांच्या कामात सहाय्य करीत असे म्हणून माझ्याविषयी त्यांच्या मनात आवड उत्पन्न झालेली होती. पुढील गोष्ट घडून आली त्या वेळी मी एका व्यापार्याकडे नोकरीत होतो. मी नोकरी सोडून काहीतरी स्वतंत्र धंदा करावा, अशी माधवरावांची इच्छा होती. आणि स्वतंत्र धंदा करू लागल्यास नोकरीपेक्षा काहीतरी अधिक कमाई करता येईल असा आत्मविश्वास उत्पन्न झाल्यामुळे कलकत्त्याकडील कित्येक कारखान्यांच्या एजन्स्या घ्याव्या अशा हेतूने मी तिकडील कारखानदारांशी पत्रव्यवहारही सुरू केला होता.
गेल्या दोन वर्षांत मी कोकणात गेलो नव्हतो. यंदाची दिवाळी आपल्या घरी साजरी करावी आणि भाऊबीजेसाठी ताईलाही घरी घेऊन जावे असा बेत करून मी तिला पत्र लिहिले, आणि शेटजीपाशी रजाही मागितली. त्यांनी मोठ्या नाखुषीनेच का होईना, मला पंधरा दिवसांची रजा दिली. माझी बहीण त्यावेळी दापोलीस आली होती. तिचा नवरा रेव्हिन्यू खात्यात अव्वल कारकून होता. बहिणीकडून पत्राचे उत्तर आले खरे, पण ते माझ्या हेतूच्या अगदी विरूद्ध होते. आपणास येण्याची सवड नाही, म्हणून तूच दापोलीस ये, असे तिने आग्रहाने लिहिले होते. म्हणून मी आठ दिवस तिच्याकडे राहावयाचे आणि मग जमल्यास गोठण्यास जाऊन आपल्या आप्तेष्टांच्या भेटी घ्यावयाच्या असे ठरवून मी बाजारात गेलो. बहिणीसाठी व तिच्या मुलांसाठी माहेश्वरी लुगडे, बडोदी जरीचा खण, खारका, खोबरे, डिंक, आळीव, एक जरीची टोपी, पुणेरी बाहुल्या, एक झबले, कागद, पेन्सिली, फटाके. वगैरे जिनसा खरेदी करून आणल्या. खाणावळीतून जेऊन येताना वाटेतल्या उपहारगृहातून वाटखर्चासाठी काही फराळाचे जिन्नसही आणले. इतके होईपर्यंत रात्रीचे साडेआठ वाजले. मला दुसर्या दिवशी सकाळच्या सातच्या बोटीने जावयाचे असल्यामुळे रात्रीच्या रात्री आपली बॅग भरणे भाग होते. एकदा तंबाखूचा बार भरून मी त्या कामास लागणार इतक्यात तेथे माधवरावांची स्वारी आली.
चंची जवळच होती, ती मी त्यांचे हाती दिली. पान खाता खाता ते म्हणाले, ‘तर मग तुमचा मेहुणा दापोलीस आला असून अगोदर दापोलीस बहिणीकडे भाऊबीजेला जाण्याचा तुमचा विचार कायम झालेला दिसतो.’
मी विचारले, ‘मी दापोलीसच जाणार, घरी जात नाही हे कशावरून?’
ते म्हणाले, ‘हे येथे तिकिटावर दापोलीचा छाप असलेले व डिलिव्हरीचा आजच्या तारखेचा छाप असलेले लखोट्याचे कव्हर आहे ना?’
मी म्हटले, ‘होय, पण त्यातले पत्र माझ्या खिशात आहे. ते काही तुम्ही अजून वाचलेले नाही. असे असता तुम्ही बरोबर कसे सांगितले?’
त्यांनी सांगितले, ‘फक्त निरीक्षण. तुम्ही आता रात्रीचा वेळ मोडून आपल्या सामानाची आवराआवर चालविली आहे, यावरून उद्या सकाळीच तुमच्या प्रवासाला आरंभ होणार, हे उघड दिसत आहे. तुमचा हा फराळाचा डबा तुम्हाला उद्या दुपारचे जेवण मिळणार नाही, असे सांगतो. आता या नुसत्या कव्हरावरून काय अनुमाने निघतात ती पहा. हे पत्र काल दापोलीहून निघाले, आणि आज चार वाजता तुमच्या हाती आले, हे त्याजवरील छापांवरून उघड दिसत आहे. त्याच्यावर “चिरंजीव बळवंतराव” इत्यादी पत्ता आहे, यावरून हे तुम्हाला तुमच्यापेक्षा वडील माणसाकडून आलेले आहे. अक्षराचे वळण बायकी आहे. या सगळ्या तर्कांना तुम्ही खरेदी केलेल्या सामानावरून पुष्टी मिळते. या सामानावरून असे दिसते की, तुमच्या बहिणीला सध्या तीन मुले आहे. दोन मुलगे, आणि त्यांच्या मधील एक मुलगी. थोरला मुलगा नऊ वर्षांचा, मधली मुलगी सहा वर्षांची आणि लहान मुलगा तीन वर्षांचा आहे. मोठा मुलगा हुशार व तरतरीत आहे. बहिणीची स्थिती तुमच्या स्थितीपेक्षा चांगली आहे. ती सध्या बाळंत असून तिचे मूल गमावले आहे.’
मी म्हटले, ‘माधवराव, तुम्ही तर कमाल केलीत! मी आपल्या बहिणीची हकिकत तुमच्यापाशी कधी बोलल्याचे मला आठवत नाही. असे असता तिच्या संबंधाची इतकी बारीक माहिती तुम्ही सांगावी याचे मला मोठे आश्चर्य वाटते. विशेषत: शेवटची गोष्ट तुम्हाला कशी कळली, याचे तर मला फारच आश्चर्य वाटते.’
माधवराव म्हणाले, ‘नुसते निरीक्षण. ती जरीची टोपी, त्या बाहुल्या आणि ते लहान झबले, हे पदार्थ तुम्ही निरनिराळ्या तीन मुलांकरीता घेतले आहेत. एवढे लहान झबले घालणार्या मुलीसाठी कोणी पुणेरी बाहुल्यांचा खेळ घेणार नाही; आणि एवढ्या मोठ्या आकाराची टोपी घालणार्या मुलीसाठी मोठ्या मुलग्याला बाहुल्यांच्या खेळाची आवश्यकता नाही. अर्थात बाहुल्यांच्या प्रेमास पात्र असणारी मधली मुलगी अवश्य असली पाहिजे व ती सहासात वर्षांच्या अंदाजाची असली पाहिजे. ही टोपी तुम्ही थोरल्या मुलग्यासाठी घेतलेली आहे. ही घेताना तुमची चूक झालेली नाही असे गृहीत धरून अनुमान केले, तर वयाच्या मानाने टोपी मोठी दिसते. मुलाचे डोके मोठे असावे. टोपीच्या जोडीला दगडी पेन्सिलीची पेटी आहे, यावरून मुलगा मराठी शिकणारा दिसतो. मोठ्या डोक्याची माणसे प्राय: हुशार व तरतरीत असतात. या तुमच्या सामानामध्ये डिंक, खारका, खोबरे, आळीव हे पदार्थ आहे, हे सगळे बाळंतिणीच्या उपयोगाचे आहेत. असे असून तुम्ही तान्ह्या मुलाला भेट देण्यासाठी एकही पदार्थ घेतलेला नाही, यावरून ते मूल अस्तित्वात नसावे, असा मी तर्क केला. हे लुगडे व ही दुसरी कापडे तुमच्या पगाराच्या मानाने जरा अधिक किंमतीची आहेत; ही घेताना तुम्ही आपली स्थिती बाजूला ठेवून तिच्या योग्यतेला शोभण्यासारखे पदार्थ घेतले, यावरून तुमच्या स्थितीपेक्षा तिची स्थिती अधिक चांगली आहे असे मी म्हटले.’
मी सांगितले, ‘या गोष्टी इतक्या उघड आहेत की, अगदी थोड्या विचाराने या कोणाच्याही लक्षात आल्या असत्या. बरे, आज भलत्याच वेळी आपली स्वारी इकडे कोणीकडे?’
माधवराव म्हणाले, ‘तुमच्या प्रवासाची इतकी जय्यत तयारी झाल्यावर मी तुमचा बेत फिरवू पाहाणे अप्रयोजकपणाचे होणार आहे. बाकी तुम्ही मनात आणाल तर तुम्हाला दोन दिवसांची सवड काढता यावयाची नाही असे नाही. दिवाळी सुरू व्हावयाला अजून चांगला चार दिवसांचा अवकाश आहे.’
मी म्हटले, ‘तसेच एखादे महत्वाचे काम असेल तर मी आपला बेत दोन दिवस पुढे ढकलावयास तयार होणार नाहीच असे नाही.’
माधवराव म्हणाले, ‘तुम्हाला भुताटकीचे चमत्कार पाहण्याची आवड आहे ना? भुताटकीचे प्रकार जर कोठे होत असले, तर मुद्दाम चार दिवस मोडायला आनंदाने तयार आहोत, असे तुम्ही म्हणत असता ना? सध्या एके ठिकाणी असले चमत्कार होत आहेत आणि त्यातले सत्य काय आहे हे शोधून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मला बोलावणे आलेले आहे. मग आहे तुमची तयारी?’
मी म्हटले, ‘भुताटकी या जगात नाही असे आता माझे ठाम मत झाले आहे. मी आजपर्यंत जे पाचचार अनुभव घेतले त्यावरून हा सगळा लबाड लोकांचा कावेबाजपणा आहे अशी माझ्या मनाची पुरती खात्री झाली आहे. सगळी लुच्चेगिरी-द्वेष-आपलपोटेपणा!’
माधवराव म्हणाले, ‘हे प्रकरण वाटते तितके सरळ व सोपे दिसत नाही. आज जवळ जवळ एक महिनाभर त्या गृहस्थाशी माझा पत्रव्यवहार चालू आहे. त्याने लिहिलेल्या हकिकतीवरून काही तर्क बसवून मी त्याला थोड्या सूचनाही दिल्या होत्या, पण तो गृहस्थ असावा तसा धूर्त नसल्यामुळे त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. आता समक्ष तिकडे जाऊन एक-दोन दिवस मोडण्याखेरीज हे प्रकरण हातावेगळे होणार नाही असे आढळून आल्यामुळे, उद्या सकाळच्याच बोटीने तिकडे जावयाचे असे मी ठरविले आहे. येत असाल तर बरोबरच जाऊ, काय ते ठरवा.’
मी विचारले, ‘भुताटकी तरी आहे कोणत्या तर्हेची?’
ते म्हणाले, ‘सांगतो, पण तुम्ही सामान आवरावयाचे काम बंद ठेवू नका. माझ्याबरोबर या, की नका येऊ, तुम्हाला सकाळी बोटीत बसावयाचे आहे हे मात्र खरे. आला तर अलिबागेला उतरावे लागेल. तेथून पाच मैलांवरच्या एका गावी रामभाऊ सोमण नावाचे एक गृहस्थ राहात असतात. सध्या त्यांना दरमहा पाऊणशे रूपये पेन्शन मिळत असते. त्याने तेथे एक ठिकाण विकत घेतले असून, त्यात त्याने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. त्याला स्वत:ला शेतकीचे सखोल ज्ञान आणि कामाची हौस असल्यामुळे त्याने पाच वर्षांपूर्वी नोकरीवर असतानाच ती जमीन खरेदी केली, आणि नोकरचाकर ठेवून ती सुधारण्यास प्रारंभ केला. नोकरीवर असेपर्यंत तो वरचेवर तेथे जाऊन कामावर देखरेख ठेवीत असे. पुढे पेन्शन घेण्यापूर्वी एक वर्षभर हक्काची रजा घेऊन तो तेथे कायमचा जाऊन राहिला. जमीन चांगली व मशागत उत्तम झाल्यामुळे आजच त्याला एकोत्र्याचे व्याज सुटू लागले आहे, व पुढे अधिक सुटेल अशी त्याच्या मनाची खात्री आहे. पण अलिकडे चार महिने तेथे भुताटकी सुरू झाली आहे. त्याने घेतलेल्या ठिकाणाचे नावच मुळी भुताटकीचे ठिकाण असे कागदोपत्री लागलेले आहे. त्या ठिकाणात भुते असून तेथे नेहमी भूतचेष्टा होत असतात, ही गोष्ट त्याला ते ठिकाण खरेदी करण्यापूर्वीच समजलेली होती. रामभाऊंचा बिलकुल विश्वास नसल्यामुळे त्यांनी ते बेशालक विकत घेतले आणि आपल्या कर्तबगारीने ते पाच वर्षांत स्वरूपास आणले. पण चार महिन्यांपूर्वी तेथे भुताटकीस प्रारंभ झाला, आणि तेव्हापासून आतापर्यंत ती सारखी वाढत्या प्रमाणात आहे. तेथे काय काय प्रकार होतात, हे तोंडाने सांगत न बसता आजच आलेले हे त्या गृहस्थाचे पत्र तुमच्या हाती देतो, हे वाचलेत की सगळे काही तुमच्या ध्यानी येईल.

रा.रा.माधवराव भाऊसाहेब यांस,
साष्टांग नमस्कार विनंती विशेष. मी आठ दिवसांसाठी मुंबईस आलो असता आपणास ज्या गोष्टी समक्ष सांगितल्या, त्याच मासल्याच्या गोष्टी पुन्हा घडून येऊ लागल्या आहेत. परवापासून अति विलक्षण अशा चार गोष्टी घडून आल्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शक्य त्या व्यवस्था केल्या, पण त्यांचा काहीच उपयोग होत नाही. घडून आलेल्या गोष्टीतील महत्वाची, विलक्षण व भयंकर गोष्ट म्हणजे परवाच्या रात्री माझ्या घरावर एकसारखा दगडांचा मारा होत होता-दगडांचा पाऊस पडत होता, म्हटले तरी चालेल. तुमच्या सुचनेप्रमाणे सगळे दगड जमा करून ठेवले आहेत. रात्र काळोखी असल्यामुळे दगड कोणत्या दिशेने येत होते, हे बरोबर उमगले नाही. मी चूड पेटवून शोधासाठी बाहेर जाणार होतो. मी घरातून बाहेर अंगणात पाऊल ठेवणार तोच एक सुमारे अर्धामण वजनाचा दगड माझ्यापुढे पडला, आणि सौभाग्यवतीनेही मला अडवून धरीले, म्हणून मी बाहेर जाण्याचा बेत सोडून दिला. सार्या रात्रीत तीनशेच्या वर दगड घरावर पडले. कोणालाही दगड लागला नाही हे तरी दैवच म्हणावयाचे. घरावर पडलेल्या दगडांपैकी तीन दगड जवळजवळ पंधरा शेर वजनाचे आहेत. दुसरी विलक्षण गोष्ट म्हणजे म्हादू गड्याने धुवून वाळत घातलेले माझे नेसावयाचे धोतर दांडीवरच्या दांडीवर जळून राखाडी उडाली. धोतर केव्हा व कसे पेटले याचा काहीच अंदाज करता येत नाही. तिसरी गोष्ट ही की, काल संध्याकाळी सुमारे साडेचार वाजण्याचे सुमारास मी स्वत: बागेमध्ये हजर असता एकाएकी एका पोफळीचा शेंडा जळू लागला. ही पोफळ चांगली तीस हात उंच आहे. चवथी गोष्ट ही की, मी आज सकाळी झुंझरक्याचे सुमारास नेहमीचे जागी बहिर्दिशेसाठी गेलो असता सुमारे आठनऊ हात उंचीची एक आकृती पायतण चराचर वाजवीत माझ्या पुढून चार हातांवरून सावकाशपणे निघून गेली. त्यावेळी पायांखाली नीटसे दिसू लागले नव्हते मी त्या आकृतीकडे सारखा पाहत होतो. मी बसलो होतो तेथून सुमारे पंचवीस हातांवर एक वडाचे झाड आहे, त्या झाडापाशी जाईपर्यंत त्या आकृतीवर माझे लक्ष होते. वडाखाली गेल्याबरोबर ती आकृती हळूहळू सखल सखल होत होत एकदम गडप झाली ती जमिनीत गुत झाली असाच मला भास झाला. ही आकृती मीच एकट्याने पाहिली असे नाही. माझ्याच ठिकाणाला लागून जी जमीन आहे, तिच्यामध्ये जवळच एक कुणब्याचे घर आहे. रोजच्याप्रमाणे भिणभिणताना आपली गुरे सोडून ती रानात लावण्यासाठी तो पाळंदीपर्यंत आला असता ती आकृती त्याच्याही नजरेस पडली, आणि तो भीतीने तेथल्या तेथे बेशुद्ध पडला. तो चांगला अर्धी घटका त्याच जागी तशाच स्थितीत पडलेला होता. आपला नवरा अजून परत का येत नाही याची चौकशी करीत त्याची बायको पाळंदीत आली, तेव्हा त्याची दाद लागली. तिने घाबरून जाऊन आपल्या पोरीला माझ्याकडे पाठविले. मी लागलीच त्या वडापाशी गेलो व काही उपचार केल्यावर तो शुद्धीवर आला. त्याने असे सांगितले की, गुरे वाटेस लावून आपण परत फिरणार तोच पायतणाचा आवाज मला ऐकू आला आणि पाहतो तो एक दहाबारा हात उंचीचा माणूस पायतण चरचरावीत आपल्याकडे येत आहे, असे माझ्या दृष्टीस पडले व मी चरकलो. आपल्या डोळ्यांपुढे भोवळ आली, तरी आपण त्याच्याकडे पाहातच होतो. पाहाता-पाहाता तो लहान लहान होत चालला आणि जमिनीत गडप झाला. त्याबरोबर आपली शुद्ध जाऊन आपण बेशुद्ध पडलो. या सगळ्या गोष्टी छत्तीस तासांच्या आत घडून आल्या आहेत. इतके दिवस माझा भुताटकीवर विश्वास नव्हता पण अलीकडे नेहमी असे प्रकार होऊ लागल्यापासून मनाची चलबिचल होऊ लागली आहे. घरातील माणसे तर इतकी भेदरून गेली आहेत की, हा गाव सोडून कोठेतरी चालते व्हावे असे स्पष्ट बोलू लागली. पंचाक्षरी आणण्याबद्दल घरच्यांनी नव्हे, तर सार्या गावच्या लोकांची किटकीट माझ्या कानांशी एकसारखी सुरू आहे. मी सगळ्यांच्या समाधानासाठी होय होय म्हणतो आहे, तरी आता माझा सगळा भरवसा आपल्यावर आहे. कोणत्या वेळी काय होईल याचा नेम नाही. आजची रात्र म्हणजे मला विषासारखी दिसत आहे. आपणास आणण्यासाठी उद्याचे बोटीचे वेळी मी अलिबागेस येतो. तरी कसेही करून, हजार कामे असली, तरी ती बाजूला ठेवून येथपर्यंत येण्याचे करून मला काय तो मार्ग दाखवावा आणि या संकटातून मुक्त करावे, अशी विनंती आहे. अधिक काय लिहू? आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. कळावे, बहुत काय लिहिणे, अगत्य अगत्य यावे, ही विनंती.
–आपला,
रामचंद्र बल्लाळ सोमण.
हे पत्र वाचून झाल्यावर मी मोठ्या विचारात पडलो. माझा स्वत:चा भुताखेतांवर बिलकूल विश्वास नाही, तरी हे वाचल्याबरोबर माझ्या मनातील उत्कंठा जागृत झाली. बहिणीकडे जाण्याची तयारी तर झालेली. परगावी गेल्यावर आणि असल्या भानगडीच्या कामात गुरफटल्यावर नेमक्या वेळी आपली सुटका होऊन भाऊबीजेला ताईकडे जाता येईलच असा भरवसा वाटेना. शेवटी, ताईकडे जाण्यास एक किंवा दोन दिवसांचा उशीर झाला तरी हरकत नाही, माधवरावांबरोबर त्या गावी जाऊन सगळा प्रकार पाहावयाचा, फारशी कधी न येणारी संधी आयती चालून आली असता ती फुकट घालवावयाची नाही, असा मी निश्चय केला. त्या गावाहून परत मुंबईस न येता आपले सामान अलिबागेत ठेवून तेथून परभारे दापोलीस जावे, अशा विचाराने मी त्यांना होय म्हटले.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही आगबोटीतून बसून अलिबागेस गेलो. आम्ही खपाट्यातून बंदरावर पाऊल ठेवतो तोच एका गृहस्थाने पुढे होऊन माधवरावांना नमस्कार ठोकला. त्या गृहस्थाचे पंचावन्न वर्षांच्या आजमासाचे वय, कणखर व पुष्ट शरीर, उन्हामध्ये पुष्कळ वेळ घालवला असल्यामुळे चेहर्यावर आलेला काळा रंग इत्यादी खुणांवरून रामभाऊ सोमण ते हेच असा अंदाज करून, मीही त्यांना नमस्कार ठोकला. परस्परांचे नमस्कार-चमत्कार झाल्यावर रामभाऊ म्हणाले, ‘भाऊसाहेब, आपणासाठी आणलेली घरची दमणी मी खाडीपलिकडे ठेवली आहे. व तेथपर्यंत जाण्यासाठी भाड्याचा टांगा ठरविला आहे. आपण आला हे मजवर खरोखरच मोठे उपकार झाले. आता मला धीर आला. बरे, हे कोण? आपले स्नेही आहेत की काय?’
माधवराव स्मितपूर्वक म्हणाले, ‘होय, मजबरोबर काम करण्यात यांना मोठा आनंद वाटतो आणि मला जेव्हा एखाद्या विश्वासू माणसाची गरज लागते, तेव्हा मी यांनाच आपल्यात मदतीस घेतो. यांना पुढे दापोलीस जावयाचे आहे आणि येथूनच परस्पर जावे असा त्यांचा विचार आहे. यासाठी यांचे हे सामान येथेच कोठे तरी शहरात ठेवण्याची सोय जमेल तर पहा. एवढा बोजा तुमच्या गावी नेऊन परत आणण्याची यातायात नको.
रामभाऊंनी होय म्हटले, आम्ही लागलीच टांग्यात बसलो. रामभाऊंच्या स्नेह्यांचे घर येताच त्यांनी टांगेवाल्याला टांगा उभा करण्याची सूचना केली. टांगा उभा राहाताच माधवरावांनी आपली बॅग हातात घेऊन खाली उडी मारली. मीही उतरू लागलो. इतक्यात ते म्हणाले, तुम्ही कशाला उतरता? टांगेवाला तुमचे सामान नेऊन ठेवील. तुम्ही बसा स्वस्थ. आम्हाला काही अधिक वेळ लागावयाचा नाही.
ते दोघे घरात गेल्याला चांगली पंधरा मिनिटे झाली, तरी त्यांच्यापैकी कोणीच परत येईना, हे पाहून ते चहात गुंतले असा मी तर्क केला, आणि माधवराव परत आल्यावर त्यांना याबद्दल टोमणा मारल्याखेरीज राहावयाचे नाही असा मी आपल्याशी निश्चय करून ठेवला. आगबोटीच्या त्रासाने मला चांगलीच तहान लागली असल्यामुळे चहाची फारच आवश्यकता वाटू लागली होती. अशा स्थितीत आणखी पाच मिनिटे गेली आणि एका भटजीसह रामभाऊ त्या घरातून बाहार पडले. भटजींच्या अंगात एक बाराबंदी असून तिचे मोकळे सुटलेले बंद अस्ताव्यस्त लोंबत होते. डोकीस एक मळकट कंदी रंगाचे पागोटे असून त्याच्या पुट्ट्या गळ्यात येण्याच्या बेतात आलेल्या होत्या. भटजींचा अंगवर्ण धुवून स्वच्छ केलेल्या निखार्यासारखा तेजस्वी असल्यामुळे त्यांच्या कपाळावरचे भस्माचे पट्टे आणि त्यावरचे आडवे दुबोटी गंधी ही निरभ्र आकाशातील आकाशगंगेप्रमाणे शोभायमान दिसत होती. त्यांच्या हातात डोईभर उंचीची बांबूची लठ्ठ काठी असून खांद्यावर भक्कम पडमाच्या कापडाची पडशी होती. पायात तुटक्या वहाणा होत्या आणि नेसावयाच्या पंचाने कोणाचे ढोपराखालचे पाय झाकावयाचे नाहीत अशी अगोदर प्रतिज्ञा करून मग जन्म घेतला होता. रामभाऊंबरोबर माधवराव यावयाचे त्यांच्याऐवजी हा देशावारी करणारा पडशीवाला भटजी पाहून मला मोठे आश्चर्य वाटले. ते दोघे टांग्यात बसले आणि लागलीच टांगा चालू लागला. हे पाहून मी त्यांना विचारले, माधवरावांना घेतल्यावाचून टांगा कसा सोडता? ते सध्या येत नाहीत काय?
रामभाऊ भटजींकडे पाहात हसून म्हणाले, येथल्या टांग्यामध्ये फक्त तीन उतारू बसण्याची परवानगी असते. भटजींना आमच्या गावी येण्याची घाई असल्यामुळे त्यांना टांग्यात घ्यावयाला त्यांनी मला सांगितले आहे, आणि ते निराळा टांगा करून येणार आहेत. तरी वर त्यांची आमची गाठ पडेल. असे बोलून भटजीकडे पाडून ते पुन्हा गालातल्या गालात हसले.
त्यांच्या हास्यामध्ये चेष्टेचे बरेच मिश्रण आहे हे पाहून मी गंभीर मुद्रेने भटजीबुवांकडे पाहू लागलो. त्यावेळी ते आपल्या पडशीतून लालभडक खारव्याचा बटवा काढून, पान-तंबाखू खाण्याच्या तयारीत आहेत, असे माझ्या दृष्टीस पडले. मी त्याच्याकडे पाहात असता त्याचा चेहरा मला ओळखीचा भासला. या ब्राह्मणास आपण पूर्वी कोठे पाहिले असावे असे माझे मन मला सांगू लागले. पण कोठे व केव्हा हे मात्र लक्षात येईना. मी अगदी बारकाईने त्याच्याकडे पाहू लागलो असता तो ब्राह्मण मला म्हणाला, ‘का बळवंतरावजी, अजून ओळख पटली नाही का? तुम्हीतर फारच लवकर ओळख विसरता.’
मी म्हटले. ‘होय बुवा, मी या आरोपास पात्र आहे खराच. तुमचा चेहरा पुष्कळदा नजरेखालून गेल्यासारखा वाटतो व तुमचा आवाज देखील पुष्कळदा ऐकल्यासारखा वाटतो, पण ओळख पटत नाही, याबद्दल माझे मला फार आश्चर्य वाटत आहे.’
तो म्हणाला, ‘बरोबर आहे. आम्ही पडलो पडशीवाले दारोदार याचना करणारे गरीब भिक्षुक. आमची ओळख तुमच्यासारख्या शेट लोकांना कशी राहावी?’
या त्याच्या उघड हल्ल्याने मी तर अगदी खुळा झालो. तंबाखू खाता-खाता भटजीबुवांनी मारलेला तो टोमणा मला बराच झोंबला. भटजीच्या चेहर्यावरूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरबुद्धी उत्पन्न झाली होती, त्यामुळे तर त्याने मारलेला टोमणा मला चांगला झणझणला. त्याची आपली ओळख कोठची, याचा मी जो जो अधिक विचार करू लागलो, तो-तो माझी मती अधिकाधिक गुंग होत चालली. ओळख आहे ही समजूत चुकीची वाटेना व ओळख तर पटेना. अशा स्थितीत गाडी तरीपाशी आली. आम्ही तिघे तरीत बसलो, तर सुटली, तरी माधवराव आले नाहीत. या घोटाळ्यात मी गुंग झालो असता भटजी स्मितपूर्वक म्हणाला, ‘चला, हरलो म्हणा, की मी ओळख बरोबर पटवून देतो.’
मी निरभिमानतेने बोललो, ‘ओळख पटत नाही खरी, मग कबूल करावयास काय हरकत आहे?’
भटजी म्हणाले, ‘आणखी एकदा नीट पहा तर खरे.’
मी पाहिले, आणि चमत्कार काय सांगावा? नुसती एकदा नजर टाकली तोच बरोबर ओळख पटली. मी आश्चर्याने थक्क होऊन म्हटले, “माधवराव, कमाल केलीत. तुम्ही जरी एखाद्या नाटकमंडळीत गेला असता तरीसुद्धा रंगभूमीच्या इतिहासात आपले नाव अजरामर करून टाकिले असते. चेहरा आणि स्वर पालटण्याची कला इतक्या पूर्णतेस गेलेली आपण सार्या जन्मात कधी पाहिलेली नाही.”
माधवराव म्हणाले, ज्या अर्थी तुम्हाला माझी ओळख पटली नाही, त्या अर्थी हे वेषांतर चांगले साधले आहे, असे म्हणावयास हरकत नाही. यांच्या गावी गेल्यावर जेव्हा पुन्हा तुमची माझी गाठ पडेल, तेव्हा तुम्ही माझ्याशी कशा रीतीने वागावयाचे याबद्दल तुम्हाला थोडे सुचवून ठेवतो. माझे नाव भिकंभट गोडबोले. मी बहिरा आहे. माझ्याशी बोलताना तुम्ही चांगले मोठ्याने ओरडले पाहिजे. मी एक य:कश्चित पडशीवाला आहे, अशा रितीने माझ्याशी वागा. मी एक अक्षरशून्य व दरिद्री आहे यापलिकडे माझी किंमत मानू नका, आणि सोंगाची बतावणी नीट होण्यासाठी एखादे वेळी माझी खरडपट्टी काढावयास कमी करू नका. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे, माझ्याशी अगदी परकेपणाने वागा.
या त्यांच्या पूर्वनियोजनेवरून त्यांनी काहीतरी अनुमाने काढली असावी, असा मी तर्क केला. त्यांना ओळखणारी एखादी व्यक्ती तेथे असल्यास तिला चकविण्याचा त्यांचा हेतू असावा, असे लगेच माझ्या मनात आले. मी तंबाखू खाण्यासाठी त्यांचा बटवा सोडला, आणि एका कप्प्यात हात घातला, त्यावेळी त्यामध्ये त्यांचे आवडते सहाबारी पिस्तूल माझ्या हातास लागले आणि पुढे काहीतरी साहसाचा प्रसंग येणार, अशी आपल्या मनाशी खूणगाठ घालून ठेवली. माझे विचार ओळखून माधवराव म्हणाले, ‘या बाबतीत यांचा माझा पत्रव्यवहार आज एक महिनाभर सुरू आहे, हे मी तुम्हास सांगितलेच आहे. ही गोष्ट रामभाऊंनी गुप्त ठेवली असली तर ठीकच; पण जर ही गोष्ट हे कोणापाशी बोलले असले, आणि तो गृहस्थ जर भुतांच्या गोटांतील असला तर तो माझ्याशी विरोध करण्यास तयार होईल, आणि त्यामुळे माझा मार्ग अधिक बिकट झालेला असेल. माझे प्रतिपक्षी जर माझी वाट पाहात असतील. तर त्यांना चकविण्यास हे वेषांतर पुरे आहे. रस्त्याने चालताना समोरून जर एखादे जनावर येत असेल तर ते मारके आहे असे समजून आपण आपल्या रक्षणाच्या तयारीने असावे. जनावर मारके निघाल्यास आपली तयारी आहेच. नसेल तर त्यात काहीच बिघडत नाही.’
तरी पलीकडे गेल्यावर आम्ही रामभाऊंच्या घरच्या दमणीत बसलो. दमणीला एकच बैल होता व तो चांगला चलाख व दमदार होता. रामभाऊ स्वत: गाडी हाकावयास बसले. रस्ता मात्र खराब असल्यामुळे त्यांच्या गावी पोचेपर्यंत आमचे सांधे चांगलेच ढिले झाले. गावापाशी गाडी येताच माधवराव खाली उतरले. ते पायी चालत एका रस्त्याने गावात गेले, व आमची दमणी थेट रामभाऊंच्या घरी आले.
माधवराव केव्हा दृष्टीस पडणार हे मला माहीत नसल्यामुळे रामभाऊंच्या घरी जाताच आपल्या निरीक्षणशक्तीचा उपयोग करून काही तरी शोध लावून माधवरावांना चकीत करून सोडावयाचे असा मी बेत केला. रामभाऊंचे घर जरी फारच मोठे होते तरी ते अगदी जुने झालेले असल्यामुळे उदासवाणे दिसत होते. घर चौसोपी होते. पूर्वी कित्येक वर्षे त्यामध्ये वस्ती नसल्यामुळे त्याचे काही भाग मोडकळीस आले होते. घर इतके मोठे होते की, त्यात तीस चाळीस माणसांचा सहज समावेश झाला असता, आणि तितकी माणसे असती तरच त्यामध्ये जिवंतपणा-चैतन्य दिसले असते. रामभाऊ, त्यांची पत्नी, आठ व दहा वर्षांचे असे त्यांचे दोन मुलगे आणि म्हादू गडी अशी पाच डोकीच काय ती त्या घरात असल्यामुळे ते अगदी मृतवत भासत होते. घराच्या उत्तरेकडील सगळे दरवाजे बंद होते. रामभाऊंनी ते विकत घेतल्यावर जुजबी दुरूस्ती करून फक्त अधिक नाश होऊ नये इतकीच खबरदारी घेतली होती. तरीसुद्धा त्या घराचा देखावा काहीसा भयाण व उदास दिसत होताच. भुताखेतांना राहावयाला ती जागा चांगली प्रशस्त आहे, असे बाहेरच्या देखाव्यावरून दिसत होते. घराच्या बाह्य स्वरूलपावर नजर टाकून मी तेथल्या झोपाळ्यावर बसलो, आणि पुन्हा एकदा चोहीकडे नजर टाकली. घराच्या मध्यभागी असलेला चौक हमचौरस पंधरा हातांचा होता. यावरून तो भोवतालच्या इमारतीने केवढी जागा व्यापिली असेल याचे सहज अनुमान करता येईल. पावसाळा नुकताच संपल्यामुळे चौकाची जमीन नवीनच केलेली होती, तर अजून तिचे ओल मोडले नव्हते. चौकाच्या एका कोपर्यात एक मोठी थोरली दगडांची रास घातलेली होती. बहुतेक दगड लिंबापासून आंब्याच्या आकारापर्यंत होते, व तीनचार दगड कोहळ्या एवढे होते. घरावर पडलेल्या दगडांची ही रास असावी ही गोष्ट लागलीच माझ्या ध्यानी आली. एवढे मोठे दगड घराव फेकले जाणे मनुष्याच्या अंगसामर्थ्याच्या पलीकडचे होते. म्हणून मी विचारले, ‘ही घरावर पडलेल्या दगडांचीच रास की काय? होय म्हणता? छे:! एवढाले दगड घरावर पडणे मला तर शक्य दिसत नाही.’
रामभाऊ म्हणाले, ‘शक्य दिसो वा न दिसो हे सगळे दगड घरावर पडले, हे मात्र खरे.’
मी विचारले, ‘हे दगड घरावर पडताना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेत?’
रामभाऊ म्हणाले, ‘रात्र काळोखी असल्यामुळे दगड पडताना प्रत्यक्ष दिसणे शक्यच नव्हते. तथापि तो थोरला दगड घडघडत पडला, त्यावेळी झालेला आवाज मी ऐकला आहे, आणि पलिकडचा दगड तर माझ्यासमोर चार हातांवर पडला.’
बैलास घालण्यासाठी पेंड फोडीत तेथे बसलेला म्हादू गडी म्हणाला, ‘हे दगड माझ्या डोळ्यांदेखत पडले. तो पलीकडचा तर अगदी माझ्या पुढे पडला. चार बोटे चुकले नाही तर तो बरोबर माझ्या टाळक्यातच पडला असता. घरावर दगड पडू लागले त्यावेळी आम्हाला भीती वाटली, पण मी धन्यांना बोललो, आपण बाहेर जाऊन दगड कसे येतात, कोण मारते हे बघू या. हे भित्रे नाहीत नि मीही भित्रा नाही. वहिनीबाई नको नको म्हणत होत्या तरी यांनी चूड पेटवली आणखी हातात सोटे घेऊन बाहेर जाण्यास तयार झालो. मी पुढे होतो नि हे माझ्यामागे होते. या पुढच्या पडवीतून आम्ही खालच्या अंगणात पाऊल ठेवणार तोच हा दगड नळ्यांवर धाडकन पडला, नि घडघडत येऊन माझ्यापुढे आपटला. थोडे चुकले, नाहीतर माझ्या कपाळाच्या चिंधड्याच झाल्या असत्या.’

रामभाऊ म्हणाले, ‘हा प्रकार प्रत्यक्ष नजरेसमोर घडून आल्यामुळे, मी बाहेर जाण्याचा बेत रहित केला. भुताचे दगड अंगाला लागत नाहीत असे हा म्हणत होता, पण मी विषाची परीक्षा पाहिली नाही. शिवाय तीही जाऊ देईना.’
मी म्हटले. ‘गेला नाही, हे तुम्ही चांगले केले. छपरावरच्या कौलांचा चुराडा उडाला आहे आणि चौकात दगड पडले तेथेही जमिनीला खाचा पडल्या आहेत. माणसाचे शरीर कौलांपेक्षा अधिक टणक असते, असे नाही. बरे, त्यावेळी रात्र किती झाली होती?’
रामभाऊंनी सांगितले, ‘बाहेर जाण्याचा बेत रहित करून जो मी परत येऊन झोपाळ्यावर बसतो तोच बाराचे ठोके पडले. बरोबर मध्यरात्र.’
म्हादू म्हणाला, ‘ऐन भुतांची वेळ!’
मी आपला पोषाख उतरून ठेवला, आणि खाली चौकात जाऊन पाहू लागलो. खालची जमीन दमट असल्यामुळे जेथे दगड पडले तेथे पडलेल्या खोचा स्पष्ट दिसत होत्या. चौकातून चारी बाजूंच्या छपरांचा वरचा भाग चांगला दिसत असल्यामुळे घरावरील कौलांचा चुराडा उडाला आहे आणि छपरावर जिकडे तिकडे लहान लहान दगड अडकून राहिले आहेत ही गोष्ट एकदम लक्षात येत होती. जो मोठा दगड कौलांवरून घडघडत खाली आला त्याच्या वाटेतल्या सगळ्या कौलांचे तुकडे तुकडे उडालेले स्पष्ट दिसत होते, त्यावरून मोठाले दगड छपरावरून खाली पडले, याबद्दल तर माझ्या मनास संशयच उरला नाही. पण ते घरावर पडले कसे हे मात्र माझ्या ध्यानी येईना. मी जसजसा अधिक विचार करू लागलो तसतशी माझी अक्कल अधिक गुंग होत चालली. तशा स्थितीत मी आणखी किती वेळ राहिलो असतो नकळे: घरात भोजनाची तयारी होताच स्नानाची वर्दी आली आणि मी रामभाऊंबरोबर स्नान करण्याचे जागी गेलो. दारी पाटाचे स्वच्छ पाणी वाहात होते, आणि अंगणापलिकडे पाटाच्या कडेला त्यांनी लहानसे खोपट काढून स्नानगृह बनविले होते. तेथील काळ्याभोर दगडाच्या विस्तीर्ण चौरंगावर बसून स्नान करीत असता माझी नजर समोरच्या बागेकडे गेली. बागेची शोभा व तरतरी पाहून मला मोठे समाधान वाटले.
बागेमध्ये माझे लक्ष गेले आहे असे पाहून रामभाऊ सांगू लागले, ‘तुमच्या उजव्या हाताकडे ज्या पोफळी दिसत आहेत त्यांपैकी पाटाजवळच्या रांगेतील तिसर्या पोफळीच्या शेंड्यांकडे नजर टाका. पाहिलात, तो कसा होरपळून गेला आहे?’
मी विचारले, ‘ही पोफळ भरदिवसा जळली?’
ते म्हणाले, ‘होय. मी त्या पलीकडच्या चिकूच्या कलमाला आळे बांधीत होतो, आणि म्हादू मजजवळ माती तयार करून देत होता. इतक्यात एकाएकी ओल्या झावळ्या जळत असल्याचा तडतड आवाज माझ्या कानी पडला. मी पाहू लागलो, तो शेंड्यांमध्ये आगीचा झोत धडधड पेटत होता! आम्हा दोघांखेरीज तिसरे माणूस जवळपास कोणीत नव्हते.’
मी काहीच बोललो नाही. तथापि ज्याला असले काम करावयाचे त्याला ते करण्याला फारसे श्रम करण्याचे कारण नव्हते. रॉकेलात बुडविलेल्या थोड्याशा चिंध्या अगोदर वर नेऊन ठेवून आणि त्यात तेलात भिजलेला बारीक धागा लोंबत ठेवून त्याला काडी लावली असती म्हणजे सहज हे काम झाले असते. हा विचार माझ्या मनात आला, पण तो बोलून दाखविण्यात हशील नव्हते. स्नान आटोपून मी घरात गेलो. रामभाऊंनी दिलेले सोवळे मी नेशीत असता ते मला म्हणाले, धोतर जळले ते या दांडीवरचे. सकाळी आठ वाजता नित्याप्रमाणे म्हादूने ते येथे वाळत घातले. बागेतले काम आटोपून देवाला जाण्यासाठी संध्याकाळी सहा वाजता जेव्हा मी धोतर पाहाण्यासाठी येथे आलो, तेव्हा जाग्यावर काय? नुसती राखाडी!’
दांडी भिंतीशी समांतर बांधलेली असून आसपास विस्तवाचा संबंध असल्याचे चिन्हदेखील दिसत नव्हते. चुकीने किंवा हयगयीने धोतराला आग लागण्याचा तेथे मुळीच संभव नव्हता, अशी आपल्या मनाची खात्री करून घेतल्यावर मी जेवावयास बसलो. जेवण झाल्यावर वर रामभाऊ नित्याप्रमाणे वामकुक्षी करावयास गेले. मी झोपाळ्यावर पडून झालेल्या गोष्टींचा आपल्यापाशी विचार चालविला. झोपाळ्यावरून समोरच्या भागाचे आड्यापासून पाघोळ्यापर्यंत सगळे छप्पर स्पष्ट दिसत होते. मोठा दगड घडघडत खाली येते वेळी त्याने कौलांचा चुराडा उडवून जो मार्ग तयार केला होता, तो तर मला तेथून चांगलाच दिसत होता, एवढा मोठा दगड इतक्या उंचीवर फेकला जाण्यास शक्ती तरी किती लागेल याचा मी आपल्याशी विचार करीत असता एक प्रश्न माझ्या मनात उत्पन्न झाला. तेथे आरंभी एवढा थोरला दगड पडला, तेथल्या जागेचे काय झाले असेल? तिथल्या कौलांचाच काय, खालच्या रिफांडांचा किंवा ओमणाचासुद्धा चुराडा व्हावयास हवा होता. पण तसे झालेले कोठेच दिसेना. कौलांचे बारकाईने निरीक्षण करीत असता मला आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट दिसून आली. दगडाने तयार केलेल्या मार्गांच्या आरंभाची कौले अधिक फुटली नसून, तो जसजसा उतरणीवरून धडधडत खाली येत चालला तशी खालच्या दिशेची कौले अधिकाधिक चुरडत गेलेली माझ्या दृष्टीस पडली. दगड उतरणीस लागल्यामुळे दरक्षणी त्याचा वेग अधिकाधिक वाढत चालला व त्यामुळे आरंभीच्या कौलांपेक्षा खालच्या दिशेची कौले अधिक फुटली हे रास्तच झाले. पण अगोदर जेथे तो दगड पडला, तेथे जसा चुराडा उडालेला दिसावयास हवा होता तसा कोठेच दिसेना. ही अस्वाभाविक गोष्ट दिसून आल्यावर दुसरा मोठा दगड जेथे पडला असे म्हादूने सांगितले ती जागा पाहावयास मी अंगणात आलो. अंगणातून पडवीवरचे सगळे छप्पर स्पष्ट दिसत होते. जेथे लहान दगड पडले तेथली जिकडची तिकडची कौले फुटलेली दिसत होती. पण मोठा दगड घडघडत येताना चुराडा उडालेला नव्हता. तो दगड अगदी पाघोळ्यांबरोबर निसटता पडल्यामुळे तेथील तोंडाजवळची कवले मात्र जाग्यावर नव्हती.
छप्पर अगदी ठेंगणे होते. माझा हात जरी कौलांस पोचत नव्हता, तरी माझ्यापेक्षा मूठभर अधिक उंचीच्या माणसांचा हात तेथे सहज पोचला असता. मी तेथील जागा बारकाईने पाहू लागलो. तो ओमणाच्या दोन कामटांच्यामध्ये अडकलेला सरासरी वीतभर लांबीचा एक काठीचा तुकडा माझ्या दृष्टीस पडला. मी तो हाताने ओढून काढू लागलो, पण तो खाली येईना. वरच्या अंगाला त्याला एक लहानशी गाठ असल्यामुळे कामटांच्या फटीतून तो सुटेना. हा तुकडा येथे कशासाठी घातलेला आहे याचा मी आपल्या मनाशी विचार करू लागलो पण योग्य असे कारण ध्यानी येईना. तुकडा जरी खाली ओढून येत नव्हता, तरी तो सैल असल्यामुळे हवा त्या दिशेला ढकलता येत होता. या तुकड्यांचा संबंध खाली पडणार्या दगडाशी असला पाहिजे, असे माझ्या मनाने घेतले, आणि थोडासा विचार केल्यावर सगळा जम बरोबर बसला.
हे माझे निरीक्षण चालले आहे, तोच एक गृहस्थ तेथे आला. त्याच्या पोषाखावरूनच तो घरचा सधन असावा, असे उघड दिसत होते. त्याने अंगणातूनच रामभाऊंना हाका मारण्याचा सपाटा सुरू केला. त्याच्या हाका ऐकताच रामभाऊ तेथे आले. आम्ही तिघे आत जाऊन झोपाळ्यावर बसलो त्या गृहस्थाचे नाव धोंडोपंत असून रामभाऊंनी ते ठिकाण खरेदी घेण्यापूर्वी ते त्याच गृहस्थाकडे कित्येक वर्षे गहाण होते. त्याची व माझी ओळख करून देताना मी माधवरावांचा मित्र आहे ही गाोष्ट त्याच्या ध्यानी येऊ नये, म्हणून, मी रामभाऊंचा एक मित्र असून काही देवघेवीच्या कामासाठी आलो आहे अशी आम्ही त्याजपाशी थाप मारली. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गोष्टीत वेळ घालविल्यावर धोंडोपंत चालू विषयावर आले. ते म्हणाले, ‘आज आपल्या गावी एक पंचाक्षरी आला आहे. त्याच्यापाशी मोठमोठ्या लोकांची सर्टिफिकेट आहेत. त्याला तरी एकदा इकडे बोलावून पाहा. उपाय करीत राहिले पाहिजे; साधले तर ठीकच. नाहीतर नाही हे आहेच.’
रामभाऊ म्हणाले, ‘आता आपण त्या फंदात पडावयाचे नाही असे ठरविले आहे. तुमच्या सारख्यांच्या शिफारशीमुळे या नादाला लागून आजपर्यंत मी पुष्कळ पैसा फुकट घालविला तेवढा पुरे झाला. उलट असला काही उपाय केला म्हणजे त्या दिवशी नासाडी अधिक होते. भुतांना जणू काय अधिकच चेव येतो!’
धोंडोपंत म्हणाले, ‘मी कबूल करतो, पण असे होते म्हणून काय उपाय करायचे नाहीत? रोग्याला एखाद्या औषधाने गुण येण्याऐवजी त्याचा रोग अधिक झाला, म्हणून त्याला पुन्हा औषध द्यायचे नाही, असे म्हणून कसे चालेल? एका वैद्याच्या औषधाने गुण आला नाही तर आम्ही दुसरा वैद्य आणतोच की नाही? जोपर्यंत अक्कल चालेल तोपर्यंत स्वस्थ बसता कामा नये. आज जो पंचाक्षरी आला आहे, तो मोठा हुशार दिसतो. शिवाय तो असल्या गोष्टीत कोणाकडून काही घेत नाही. द्रव्य घेतल्यास आपला मंत्र फुकट जाईल, असे तो म्हणतो. फुकटचा उपाय करायला काय जातो?’
मी म्हटले, ‘असल्या ढोंगात काही अर्थ नसतो, हे एकदा आणखी सिद्ध होईल. जशी भुते झूठ तसेच मंत्रतंत्रांचे बंडही झूठच.’
धोंडोपंत म्हणाले, ‘येथे होणार्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यापुढे दिसत असतानासुद्धा जर तुम्ही असे म्हणता, तर खुशाल म्हणा! ही भुताटकी काही आजकालची नाही. मला समजायला लागून चांगलीव पंचवीस वर्षे झाली, या ठिकाणात कधी चमत्कार झाला नाही असे एक वर्षसुद्धा गेल्याचे मला आठवत नाही. या ठिकाणचे नावच मुळी भुताचे ठिकाण. पूर्वीच्या मालकाला भुताटकीस कंटाळून, घरदार सोडून, ठिकाण गहाण टाकून, गाव सोडून चालते व्हावे लागले. आमच्याकडे गहाण असताना हे जवळ जवळ ओसाडच पडलेले होते. या गोष्टी काय रामभाऊंना माहीत नाहीत? आमच्या वडिलांनी हे गहाण घेतले खरे, पण आम्हालादेखील हे यशालाभाला आले नाही. पण या गोष्टी आता हव्या कशाला? तुमचा भुतांवर विश्वास नाही म्हणताना? हे एवढाले दगड घरावर कसे पडले? आणि जिवंत झाडे भर दिवसा कशी जळतात? याचा उलगडा जर बरोबर करून दिलात तर खरे!’
मी म्हटले, ‘मला सगळ्या गोष्टींचा उलगडा करता आला नाही म्हणजे पिशाच्चाचे अस्तित्व सिद्ध होते असे काही नाही. जेवढ्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणांनी सिद्ध होतील तेवढ्याच आपण बोलाव्या, नाहीतरी लोकांचे खरेखोटे समज मुकाट्याने कबूल करावे, ही त्xमची विचारसरणी मला बिलकुल पसंत नाही.’
धोंडोपंत म्हणाले, ‘नसेल. तथापि आपले पूर्वज काही मूर्ख नव्हते. त्यांचा भुतांवर पूर्ण विश्वास होता.’
मी म्हटले, आमचे पूर्वज जसे मूर्ख नव्हते तसे आपणही मूर्ख नाही. आजच काही जग संपत नाही. पुढे आणखी अनंत पिढ्या व्हावयाच्या आहेत, त्यांचे आपणही पूर्वजच आहोत. पूर्वज या नात्याने शहाणपणावर किंवा मूर्खपणावर आमचा आमच्या पूर्वजांइतकाच बरोबर हक्क आहे असल्या शुष्क कोटिक्रमाने या वादाचा शेवट कधीही होणार नाही.’
रामभाऊ म्हणाले, ‘माझाही भुतांवर विश्वास नसल्यामुळे जाणूनबुजून मी हे ठिकाण घेतले. पण गेल्या चार महिन्यांत झालेल्या विलक्षण गोष्टींमुळे माझे मन आता डळमळू लागले आहे. तुमच्या बोलण्यावरून तुम्ही येथे होत असलेल्या काही चमत्कारांचा उलगडा केलेला असावा, असे दिसते. एखाद्या गोष्टीचा जरी समाधानकारक उलगडा झाला तरी पुरे. शितावरून भाताची परीक्षा.’
मी म्हटले, ‘लहान दगड कसे पडले, हा प्रश्नच नाही. प्रश्न काय तो मोठ्या दगडांबद्दल. मी असे विचारतो, भुताने जर घरावर दगड फेकले असे तुम्ही म्हणता, तर त्याने सगळेच दगड मोठे का फेकले नाहीत.’
धोंडोपंत म्हणाले, ‘ते आम्ही काय सांगणार! भुताची मर्जी!’
मी म्हटले, ‘मी विचारलेल्या प्रश्नाचे हे उत्तर होत नाही. जर दगड भुताने मारले असतील, तर त्याचा काहीतरी हेतू असला पाहिजे. हा हेतू काय असावा?’
ते बोलले, तो आपणास कसा कळावा? त्याचे काही देणेघेणे राहिले असेल म्हणून त्याने दहशत घालण्यासाठी दगड मारले असतील!’
मी म्हटले, ‘आता बरोबर बोलला. दहशत घालवण्यासाठी किंवा चमत्कार दाखवण्यासाठी जर खरोखरच हे दगड भुताने मारले असते, तर त्याने असले लहान दगड मारण्याच्या भरीस न पडता सगळेच मोठे दगड मारले असते तर भुताचे दोन्ही हेतू अधिक साध्य झाले असते. भुताला काय! त्याला सगळेच मोठे दगड मारता येणे मुळीच अशक्य नाही.’
धोंडोपंत निरूत्तर झाले. तथापि ते म्हणाले, ‘असल्या वकिली युक्त्यांनी असल्या प्रश्नांचा निकाल होणे शक्य नाही. बरे, हे दगड जर भुताने मारले नाहीत तर काय माणसाने मारले? एवढाले पंधरापंधरा वीसवीस शेर वजनाचे दगड जमिनीवरून ज्यास फेकता येतील असा राक्षसी शक्तींचा माणूस असू शकेल, असे तर तुमचे म्हणणे नाही?’
मी सांगितले, ‘फेकता येतील असे मी तरी कोठे म्हणतो? मात्र थोड्याशा युक्तीने याहून मोठे दगडसुद्धा घरावरून पाडून दाखविता येतील.
रामभाऊ म्हणाले, ‘पुरे झाला हा वाद. असले ऐकता-ऐकता माझे कान किटून गेले आहेत. म्हादू, तू धोंडोपंताच्या घरी जा आणि तेथे जो कोणी मांत्रिक आलेला आहे, त्याला इकडे घेऊन ये. पंत, तुम्ही का निघाला? तुम्ही जाता कामा नये. त्याची माझी मुळीच ओळख नाही, म्हणून तुम्ही येथे असलेलं बरे.’
धोंडोपंत म्हणाले, ‘ठीक आहे. मी बसतो हवातर. म्हादू, भटजी अगदी बहिरा आहे, हे ध्यानात ठेव. पण असे कशाला? आपण चिठीच लिहू या, म्हणजे सगळे सरळ होईल.’
चिठीसह म्हादूची रवानगी झाल्यावर धोंडोपंतांनी पुन्हा तोच विषय काढला. मोठे दगड घरावरून कसे पडले या संबंधाने मी जो तर्क बांधला होता तो त्यांना सांगून त्यांची खात्री करून घेण्यासाठी मी मोठ्या अभिमानाने पुढे सरसावलो. त्या दोघांना पुढच्या पडवीत नेऊन तेथे ओमणाच्या कामट्यांमध्ये असलेला काठीचा तुकडा त्यांना दाखविला. छपरावर ठेवलेला दगड आपल्या भाराने घडघडत खाली येऊ नये म्हणून तो तुकडा आधारासाठी घातलेला आहे असे मी त्यांना सांगितले. इतकेच नव्हे, तर, एक मोठा वाटोळा दगड मुद्दाम छपरावर ठेवून तो कसा खाली पाडता येतो ते त्यास सप्रयोग दाखवून दिले. त्या काठीच्या तुकड्याला खालच्या बाजूने मी एक दोरी बांधली, आणि दगड त्या काठीच्या आधाराने छपरावर ठेवला. खालची दोरी एका बाजूस ओढताच विरूद्ध दिशेला काठी आडवी पडली आणि दगडाचा आधार सुटून तो धपकन खाली पडला. तीन-चार वेळा तो प्रयोग करून दाखविल्यावर मी रामभाऊंस म्हटले, ‘ज्याने कोणी हे दगड मारले ते माणूस घराबाहेर होते, आणि त्याने अगोदरच ही योजना करून ठेवली होती. तुम्ही दगड मारणाराचा शोध करण्यासाठी घराबाहेर पडाल अशी त्याची अटकळ असल्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडताच त्याने हा दगड खाली पाडून तुम्हाला भिवविले याबद्दल मला शंका नाही. दुसरा मोठा दगड जो पश्चिमेच्या छपरावरून खाली पडला, तेथेसुद्धा अशीच काहीतरी युक्ती केलेली असली पाहिजे अशी माझ्या मनाची खात्री आहे. तेवढा दगड जर खरोखर काही शक्तीच्या प्रेरणेने छपरावर पडला असता, तर तेथच्या ओमणाचा चुराडा उडवून तो घरातच पडला असता. तेथील ओमण मजबूत आहे, अशी जरी कल्पना केली, तरी तेथल्या कौलांपैकी एक कौलसुद्धा सबंध राहिले नसते. दहा-वीस कौलांच्या तरी ठिकर्या ठिकर्या उडाल्या असत्या. पण तसे कोठेच झालेले दिसत नाही. यावरून माझा तर्क बरोबर आहे की नाही हे तुम्ही ठरवा.’
हा माझा युक्तीवाद रामभाऊंना चटकन पटला. धोंडोपंतांना मात्र पटला नाही. त्याने बोलता बोलता मला आडून टोमणे मारण्याचा सपाटा सुरू केला होता, पण मी त्यांचे बोलणे मनावर घेतले नाही. असल्या एककल्ली लोकांची समजूत युक्तीवादाने पटावयाची नाही अशी आपल्या मनाची समजूत घालून मी मुकाट्याने त्यांचे बोलणे नुसते ऐकत होतो. त्या ठिकाणात घडून आलेल्या निरनिराळ्या चमत्कारांचा पाढा वाचून हे कसे झाले ते सांगा, ते कसे झाले हे सांगा, असे प्रश्न तो मला विचारीतच होता. अशा रीतीने अर्धा तास लोटला, आणि म्हादूसह भिकंभटजींची स्वारी तेथे येऊन पोहोचली.
भिकंभटजींच्या वेषाने आलेल्या माधवरावांस झोपाळ्यावर जागा देऊन धोंडोपंत रामभाऊंस म्हणाले, ‘कर्नाटकात दुष्काळ असल्यामुळे चांगला शंखध्वनी केल्याखेरीज भागावयाचे नाही.’
‘मुले किती आहेत?’ ‘मिळतात भाजी पुरती.’ असला हास्योत्पादक प्रकार काही वेळ झाल्यावर शेवटी प्रस्तुत विषयास आरंभ झाला. रामभाऊंनी विचारले, ‘आपणास मंत्रविद्या अवगत आहे, असे ऐकले.’
तंबाकू खाता खाता माधवराव गंभीर मुद्रेने बोलू लागले. ‘होय, गुरूकृपेने थोडीशी जाणतो. बडोद्याचे महामांत्रिक वैजनाथ भट्टाचार्य हे माझे गुरू. ते तैलंगणातील रहिवासी असून गौडबंगाल्यातून मंत्रविद्या शिकून आले होते. त्यांचे मंत्रसामर्थ्य अचाट होते. ते वारल्याला वीस वर्षे झाली तरी अजून बडोद्यातील लोक त्यांची किर्ती गात असतात. बावन्न बीरांपैकी छत्तीस बीर त्यांना साध्य झालेले होते. सगळे बीर फक्त गोरक्षनाथांना साधले होते. गुरूजींना इतके बीर साध्य होते, तरी त्यांनी त्यांच्यापासून स्वत:चा काहीच फायदा करून घेतला नाही. मी त्यांचा कित्ता गिरविला आहे. मला फक्त बावन्नांपैकी तीन बीर साध्य आहेत. महाकर्म कठीण आहे. धाडस लागते, अक्कल लागते, खर्च लागतो. मी पडलो दरिद्री. तथापि गुरूची कृपा. एकेक बीर साध्य करून घ्यायला काय काय सामग्री लागते हे जर नुसते तुम्ही ऐकलेत तर तुमची छाती दडपून जाईल. बरे, काय म्हणता? तुमच्या घरावर दगड पडतात, जिवंत झाडे जळतात व असल्याच सटरफटर गोष्टी होतात? इतकेच ना? अगदी साधे काम! बरे, आधी भुताटकी कोणत्या प्रकारची आहे ती तर अजमावून पाहू. तुमच्या घरात पिंजर असेलच. थोडी आणा पाहू.’ रामभाऊंनी हळदकुंकवाचे पंचपाळे आणल्यावर त्यातली एक चिमटीभर पिंजर डाव्या हातावर घेऊन त्यांनी म्हटले, ‘हा एक माझा तोडगा आहे. येथे जर भुताटकी असेल तर तुमच्या समक्ष या पिंजरीची माती होईल.’
आणि चमत्कार हा की, त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने ती पिंजर रगडता रगडता तोंडाने काही मंत्र म्हटले आणि डावा हात आम्हाला दाखविला तो पूर्वीचा पिंजरीचा लाल भडक रंग नाहीसा होऊन तिची काळ्या मातीसारखी पूड झाली होती! ती पूड आमच्यापुढे टाकून ते म्हणाले, ‘पाहिलेत हे! तुमच्या सुंदर संसाराची अशी माती करून टाकण्याचा त्या पिशाचाचा विचार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काळजी नको. ते पिशाच्च आहे आणि मी आहे. अगदी साधे काम आहे. तीन दिवस तीन मांड भरले की, बंदोबस्त झालाच समजा. बरे वाजले किती? पाच वाजले ना? उतरती वेळ झाली, आता भरायला हरकत नाही. थोडा उद किंवा धूप, एक लिंबू, थोडा कापूर, मूठभर उडीद, मूठभर मोहर्या, थोडा गुलाल नाहीतर पिंजर, आणखी थोडे भस्म इतके पदार्थ जुळवा, म्हणजे झाले. आणखी सव्वाशेराचा भात शिजत ठेवायला सांगा. तुमचे घर आणि हे सगळे ठिकाण असे भारून टाकतो की, तेथे पुन्हा म्हणून भूत डोके वर करणार नाही.
माधवरावांनी पाटाच्या थंड पाण्याने आंघोळ केली, आणि ओलेत्यानींच मांड भरिला. एका पाटावर थोडे तांदूळ पसरविले. आणि त्यावर गुलालाच्या काही विचित्र आकृत्या काढल्या. एका पाटावर थोडे तांदूळ पसरविले. आणि त्यावर गुलालाच्या काही विचित्र आकृत्या काढल्या. उडीद व मोहर्या भारून त्या घरात जिकडे तिकडे फेकावयास सांगितल्या. तोंडाने एकसारखी बडबड सुरूच होती. इतके पाठांतर त्यांनी कधी केले असेल असे मनात येऊन मला त्यांचे मोठे कौतुक वाटले. भात शिजून तयार होताच तो एका परडीत भरून त्याच्यावर गुलाल घालून व त्यात एक पेटलेला कांकडा रोवून ती परडी वाहात्या नदीत सोडून द्यावयाची असे त्यांनी सांगितले.
मांत्रिकबुवांचे हे भुताटकी बंद करण्याचे कुवेडे चालू असताच त्यांच्या मंत्रसामर्थ्यापेक्षा आपली शक्ती अधिक आहे, हे प्रत्यक्ष दाखविण्यासाठीच की काय, भुताने एक चमत्कार करून दाखविला. अंगणापलिकडील जागेत जे न्हाणीघर बांधलेले होते, तेथील पाणी तापविण्याचा रिकामा हंडा चुलीवरून उतरून खाली ठेवला होता, तो आपोआप फरफटत जमिनीवर चालू लागला. जमिनीवरून घसटत जात असता हंड्याचा जो आवाज झाला तो कानी पडताच आम्ही तिकडे पाहू लागलो. हंडा आपला पुढे पुढे चाललाच होता! हे दृष्टीस पडताच म्हादू गडी पुढे धावला आणि त्याने तो हंडा धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. हंडा त्याला आवरेना. त्याच्यासकट तो आणखी चार-पाच हात पुढे गेल्यावर त्याची गती आपोआप बंद झाली. हा प्रकार काय आहे हे पाहाण्यासाठीच मी म्हादूच्या मागोमाग तेथे गेलो होतो, पण मी जवळ जायला आणि हंडा जाग्यावर थांबायला एकच गाठ पडली. या वेळी ऐन तिन्हीसांजा झाल्यामुळे पायाखाली दिसत नव्हते. म्हणून मी म्हादूस म्हटले, ‘जा, आणि एक चांगली चूड पेटवून आण. मला आताच्या आता या चमत्काराच्या मुळाशी काय आहे, हे पाहिले पाहिजे.’
म्हादू गेल्यावर मी डोळे ताणून तेथील जमिनीचे निरीक्षण करू लागलो. पण अंधारामुळे उपाय चालेना. म्हादूची बराच वेळ वाट पाहिली, तो येत नाही असे पाहून मी अंगणात आलो. तो माधवराव बळीची परडी नदीवर पोचवायला त्याला सांगत आहेत, आणि तो भीती वाटते असे सांगून नाही म्हणत आहे, असे माझ्या नजरेस पडले. नंतर धोंडोपंत किंचित करड्या स्वराने बोलले, ‘हे काम तुलाच केले पाहिजे. तू नाही करणार तर दुसरा कोण करील? भीती कसली घेऊन बसलास! चल, कंदील लावून घे, मी तुझ्याबरोबर येतो. मी अगोदर नदीपर्यंत तुझ्याबरोबर येतो. नंतर मला घरी पोचव. आणखी तू परत इकडे ये.’
धोंडोपंतांनी इतके ताठून सांगितल्यामुळे व ते स्वत: त्याच्याबरोबर नदीपर्यंत जाण्यास तयार झाल्यामुळे म्हादूचा नाईलाज झाला. ते दोघे गेल्यावर मी चांगला दिवा लावून घेतला, आणि न्हाणीघरात जाऊन तपासणी आरंभिली त्या तपासणीत माझ्या मनाची अशी खात्री झाली की, कोणी तरी दोरीने हंडा ओढल्यामुळे तो पुढे गेला. जमिनीवरील पातेरा व खडेमाती दोन बाजूला झाली असून, मधून दोरी गेल्याचे चिन्ह तेथे स्पष्ट दिसत होते. इतक्यात माधवराव तेथे आले. त्यांना आपला शोध दाखवून मी म्हटले, ‘या प्रकाराच्या मुळाशी भुते नसून जिवंत माणसे आहेत याबद्दल आता माझ्या मनाला शंका नाही. घरावरून मोठे दगड कसे पडले हे सुद्धा मी शोधून काढले. आता फक्त याच्या मुळाशी कोण माणूस आहे हे पाहावयाचे.’
माधवराव म्हणाले, ‘तुमचे हे शोध ठीक आहेत, पण भुताटकीचा उलगडा झाल्याखेरीज तुम्ही आपले अर्धवट शोध लोकांपाशी बोललात ही मोठी चूक केलीत. पण सांभाळा हो, येथे खरोखरच भुते आहेत, आणि त्यातले एखादे आज रात्री तुमच्या छातीवरसुद्धा बसेल.’
आम्ही जेवावयास बसलो असता रामभाऊ म्हणाले, ‘आजची रात्र कशी जाते याची मला मोठी काळजी पडली आहे. लोकांच्या समजुतीसाठी मांत्रिक बोलावून मी याच्या पूर्वी पाचचारदा मांड भरविले, पण त्यापासून उपयोग काही न होता त्याच रात्री उपद्रव मात्र पुष्कळ झाला. आज तसले काही झाले नाही म्हणजे निभावले.’
माधवराव हळूच चेष्टेच्या स्वराने म्हणाले, ‘बळवंतराव, तुम्ही मात्र आज सांभाळून राहा. आज रात्री भुते तुमच्या छातीवर बसणार असे माझ्या एका बीराने माझ्या कानात हळूच सांगितले आहे.’
मी म्हटले, ‘ठीक आहे, त्याचा समाचार मी घेईन.’
जेवणे आटोपतात तोच म्हादू परत आला, व त्याने माझ्यासाठी पुढच्या सोप्यात बिछाना घालून दिला. माधवरावांनी आपल्या बाण्यास अनुसरून एक घोंगडे मागून घेतले आणि ते माझ्यापासून चार हातांवर पसरिले. माधवरावांनी बहिर्याचे सोंग टाकले नव्हते, व आपल्याशी बोलत बसायला येऊ नये अशी रामभाऊंनाही अगोदर त्यांनी सूचना दिली होती. जेवण झाल्यावर दुसरे काहीच कर्तव्य नसल्यामुळे नऊ वाजण्यापूर्वीच घरातले सगळे दिवे मालवून जिकडे-तिकडे सामसूम झाली. मी अंथरूणावर पडलो असता माझ्या मनात तेच विचार घोळत होते, हे सांगणे नकोच. रामभाऊंना जी सात-आठ हात उंचीची आकृती दिसली तिच्या बुडाशी काय असावे याचा मी विचार करीत असता माझ्या डोळ्यांवर निद्रेची झापड पडू लागली. आज रात्री काही तरी चमत्कार होणार अशी, रामभाऊंच्या तोंडातून पाचचार वेळा बाहेर पडलेल्या उद्गारावरून माझ्या मनाची दृढ समजूत झालेली असल्यामुळे असा चमत्कार तरी काय होईल याचा मी आपल्या मनाशी अंदाज करीत असता घड्याळ्याचे बारा ठोके पडेपर्यंत मी अर्धवट भ्रमात होतो. माझे मन विचार करीत होते, पण त्यात संगती मात्र कोठेच नव्हती अशा स्थितीत मला स्वप्न दिसण्याला प्रारंभ झाला. आरंभी एक मांजर ओरडल्याचा भास झाला. नंतर ते मांजर काळोखातून पुढे आले. पाहाता-पाहाता त्याचा आकार वाढत चालला आणि ते वाघासारखे दिसायला लागले! पुन्हा त्याचे रूपांतर होऊन तेथे एक वृद्ध पुरूष दिसू लागला. बघता बघता त्याचे हातपाय लांब होऊन ते उंच उंच वाढू लागला. त्याची उंची दहा हात वाढली. आणि तो सरळ माझ्या अंगावर चाल करून येऊ लागला. तो माझ्या अंगास भिडला, माझ्यावर हल्ला करून त्याने मला खाली पाडले आणि तो माझ्या छातीवर बसला. मी ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तोंडातून शब्दच उलटेना! मी जागा होताच हे स्वप्न नसून कोणी तरी आपल्या छातीवर बसले आहे असे माझ्या ध्यानी आले. आपले सर्व बळ एकत्र करून मी जो त्याला ढकलून देणार तोच माझ्या छातीवरून उठला आणि काळोखात जाऊन अदृश्य झाला.
माझे मनगट जर दुखत नसते तर हा सगळा स्वप्नातील भास आहे, असे मला वाटले असते. मी लागलीच खिशातील आगपेटी काढून काडी पेटवली आणि इकडे तिकडे पाहू लागलो, पण मला तेथे काहीच दिसले नाही. फक्त तेथे एका कोपर्यात एक मांजर मात्र बसलेले होते. माधवराव एका कुशीवर निजलेले असून त्यांना गाढ झोप लागलेली दिसत होती. काडी विझल्यानंतर मी हळूच त्यांच्यापाशी गेलो आणि त्यांच्या हाताला हळूच खूण केली. त्यांनीही लगेचच माझा हात दाबून मला जागृतीची उलट खूण दिली, आणि माझ्यात कानांत हळूच सांगितले, ‘सध्या काही बोलू नका. मुकाट्याने स्वस्थ पडून राहा. मी चांगला जागा आहे!’
आणखी एक तास दीड तास लोटला. घड्याळात दोनचा ठोका पडला. थोड्याच वेळाने एक दार उघडल्याचा भास झाला. माधवरावांनी माझा हात दाबून मला खूण केली, आणि मीही त्यांना आपल्या जागृतीची खूण पटविली. लगेचच माधवराव उठले व त्यांनी मला आपल्याबरोबर येण्याची सूचना दिली. आम्ही पाहू लागलो तोच पश्चिमेच्या सोप्याच्या मागचा दरवाजा उघडलेला आम्हाला आढळून आल्यामुळे आम्ही हळूहळू पण जलद पावले उचलून याच दरवाज्याने मागच्या पडवीत जाऊन उभे राहिलो. रात्र जरी काळोखी होती तरी आकाश निरभ्र आणि झाडी कमी असल्यामुळे आम्ही उभे होतो. तेथून आसपासची जागा बरीच स्पष्ट दिसत होती. दारातून बाहेर पडलेले माणूस कोणीकडे गेले हे आम्हास उमगले नसल्यामुळे आम्ही जिकडे-तिकडे नजर टाकीत होतो, तोच आम्हाला चकमक झाडल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आम्ही त्या धोरणाने पाहू लागलो असता तेथील लहानशा खोपटाच्या वळचणीस कोणीतरी उभे असून त्याच्या हातात विस्तव चमकत आहे, असे आम्हाला आढळून आले. मी लागलीच पुढे जाण्याला तयार झालो, पण माधवरावांनी माझा हात धरून मला थांबिवले. त्या माणसाने विस्तव कसा तरी गुंडाळला आणि तो छपराच्या गवतात खोवून ठेवला. हे कृत्य केल्यावर तो माणूस परत घराकडे येऊ लागला. त्याने पडवीत पाऊल टाकले, तोच माधवरावांनी त्याच्यावर उडी घातली. तो बेसावध असल्यामुळे खाली पडला. मी आधी खोपटाकडे धावलो, आणि अजमासाने जेथे विस्तव असावा असे मला वाटले, तेथील बरेच गवत ओढून ते मोकळ्या जमिनीवर टाकले. मी जो पुन्हा पडवीत येतो तो माधवराव खाली पडले असून म्हादू त्यांच्या छातीवर बसला आहे असे मला आढळून आले. (तो म्हादू आहे, असे मी अंदाजाने ताडले होते.) मी त्यांच्या साहाय्यास पुढे झालो तोच म्हादूची बुक्की माझ्या कुशीत बसून चांगलीच कळ आली. आपणास दोघांशी लढावयाचे आहे हे ध्यानी येताच म्हादू माधवरावांच्या छातीवरून उठला, आणि दुसर्या क्षणी त्याचे हाती सुरी चमकू लागली. तोच पिस्तुलाचा धाडकन आवाज झाला, आणि माधवरावांची गर्जनाही ऐकू आली, ‘हत्यार खाली टाक नाही तर टाळक्याच्या चिंधड्या झाल्याच असे समज! या पिस्तुलात अजून पाच काडतुसे शिल्लक आहेत.’
म्हादूने सुरी टाकली, की त्याच्या हातून गळून पडली, की पिस्तुलाची गोळी तिला लागल्यामुळे ती त्याच्या हातून पडली हे सांगता येत नाही, पण तो नि:शस्त्र झाला. त्याने चटकन माधवरावांचा पिस्तुलासह उजवा हात धरला आणि त्यांना टांग मारिली. म्हादू कसलेला पहिलवान आहे हे त्याच्या शरीरावरून दिसतच होते. माधवरावांना जर मल्लविद्या अवगत नसती, तर प्रसंग बिकट ओढवला असता. आम्ही दोघे त्याला कसेबसे आवरून धरीत आहोत तोच हाती दिवा घेऊन रामभाऊ तेथे आले. पिस्तुलाचा आवाज आणि माधवरावांची गर्जना कानी पडताच ते जागे होऊन दिवा लावून घाईघाईने तेथे आले होते. एकास तीन झाल्यामुळे म्हादू हतवीर्य झाला. त्याला खाली पाडून धरून ठेविल्यावर रामभाऊंनी एक दोरी आणली आणि आम्ही त्याचे हातपाय बांधून टाकिले. इतक्यात मी ओढून टाकलेले गवत पेटू लागले. त्यावर माती टाकून ते विझवून आम्ही घरात आलो.
आम्ही झोपाळ्यावर बसल्यानंतर माधवराव म्हणाले, ‘हे तुमच्या भुताटकीचे मूळ. याला पाणी घालून वाढविणारा वेगळाच आहे. पण तो स्वत: पोचट असल्यामुळे त्याच्या हातून यापुढे उपद्रव होणे शक्य नाही. भुताटकीचे मूळ तुमच्या घरातच आहे, हा तर्क मी अगोदरच बांधून ठेविला होता. हे चमत्कार करून दाखविण्याचे कामी म्हादूचा एक साथीदार आहे. तो कोण म्हणाल तर म्हादूचा मेहुणा. बाहेरून घरावर दगड मारणारा आणि हंड्याला बांधलेली दोरी लांबून ओढणारा तोच. हंडा चालू लागल्याबरोबर अगोदर म्हादू पुढे धावला तो त्याला अडकविलेली दोरी सोडून टाकण्यासाठी पुढे धावला होता. बळवंतराव, तुम्ही दगडाच्या बाबतीत जे अनुमान बांधलेत, ते अगदी बरोबर आहे. पण ते धोंडोपंताजवळ बोलून दाखविण्याची तुम्ही चूक केलीत, म्हणून थोड्या वेळापूर्वी भूत तुमच्या छातीवर बसले. मी जरी दिसण्यात स्वस्थपणे गाढ झोपेत पडल्यासारखा दिसत होतो, तरी सगळे लक्ष म्हादूकडे होते. म्हादू तुमच्या छातीवर बसला हे मी प्रत्यक्ष पाहिले. तुम्हाला भिववण्यापलिकडे त्याचा हेतू नसावा, असे मला वाटत असल्यामुळे मी स्वस्थपणे तो काय करतो हे पाहात होतो. त्याने जर तुम्हाला अधिक इजा करण्याचा प्रयत्न केला असता, तर मी बेशालक पिस्तुल झाडून त्याला जखमी केले असते. तो असे काही तरी करील हे मी तुम्हास अगोदर सांगितलेच होते. तुम्ही तर्कशक्तीच्या जोरावर भुताटकीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करू लागला म्हणून तुम्ही या जिवंत भुताला माझ्यापेक्षा अधिक भयंकर वाटला. इतर मांत्रिकांप्रमाणेच मी एक भोंदू असेन असे त्याला वाटत असल्यामुळे माझ्या वाटेस न जाता त्याने आपल्या भुताटकीचा प्रयोग तुमच्यावरच केला. तुम्ही आरडाओरड केली नाही, हे तुम्ही बरे केलेत. तुम्ही जर आरडाओरड केली असती तर आज त्याने हे भयंकर कृत्य केले नसते. तुम्ही भुताटकी नाही असे काल जोराने प्रतिपादन करीत होता, त्यामुळे रात्री आपल्या छातीवर भूत बसेल ही गोष्ट बोलून दाखविण्याची तुम्हाला लाज वाटेल असा विचार करून अद्भुत चमत्कार दाखविण्यासाठी त्याने हे अद्भुत कृत्य केले.’
रामभाऊंनी विचारले, ‘तर मग या नाटकाचा खरा सूत्रधार कोण? खरेच सांगतो, म्हादू या गोष्टीच्या मुळाशी असेल असे कधी माझ्या स्वप्नातसुद्धा आले नाही. हा माझ्या हिताला इतका जपत असे की, असा गडी आपणास मिळाला, हे मी आपले मोठे भाग्यच समजत होतो.’
माधवराव म्हणाले, तुमचा विश्वास संपादन केल्याखरीज त्याला असल्या गोष्टी करता येणे शक्यच नव्हते. तुमची हकिकत ऐकल्यापासूनच या प्रकरणात कोणीतरी घरभेद्या आहे, अशी माझ्या मनाची खात्री झाली होती म्हणून मी येथल्या एका चांगल्या गृहस्थाकडून तुमच्या गृहस्थितीसंबंधाने माहिती मिळविली. म्हादूला धोंडोपंतांचे शंभर रूपणे कर्ज असल्यामुळे. हा त्यांचा ओशाळा आहे. तुमचे हे ठिकाण फायदेशीर झालेले दिसू लागल्यापासून धोंडोपंताच्या तोंडाला पाणी सुटले. पण सरळ मार्गाने ते त्याला मिळण्याचा संभव नसल्यामुळे त्याला असली युक्ती योजावी लागली. तुमचा अगदी नाईलाज झाल्यावाचून तुम्ही हे विकावयास तयार झालाच नसता.’
रामभाऊ म्हणाले, “चार महिन्यांपूर्वी त्याने स्वत: मला हे ठिकाण विकून टाकण्याची सूचना केली खरी, आणि त्यानंतर अलिकडे दुसर्या दोघा-तिघांनीसुद्धा मला अशीच मसलत दिली होती.”
माधवराव म्हणाले, ‘आज जर तुमचे ते खोपट जळले असते, तर तुम्ही भिऊन जाऊन ठिकाण हातावेगळे करण्यास तयार झाला असता! तुम्ही भुताटकीला भ्याला म्हणजे ठिकाण विकायला तयार व्हाल, इतकेच नव्हे, चार पैसे कमी आले तरी ते घेऊन मोकळे व्हाल, अशी त्यांना पूर्ण आशा वाटत होती. असो. इमारतीस आग घालण्याचा भयंकर गुन्हा करताना तुम्ही याला पकडलेच आहे. उद्या पोलीसपाटलाकडे वर्दी दिलीत की, पुढची सगळी व्यवस्था बरोबर होईल.’
मी विचारले, ‘हे सगळे होईल, पण ती दहाहात उंचीची आकृती कसली, आणि तुम्ही आमच्या देखत पिंजरीची माती कशी केलीत?’
त्यांनी सांगितले, ‘एखाद्या उंच काठीला डोक्याच्या ठिकाणी गाडगे अडकविले, आणि खांद्याचे जागी हातभर लांब काठी बांधून घोंगडीची खोळ त्या गाडग्यावर टाकून काठी उंच करून धरली की, काळोखाचे वेळी दहा हातच काय, वीस हात उंचीची आकृतीसुद्धा बनविता येईल. ती काठी हळूहळू खाली करीत गेल्यावर ती आकृती लहान दिसू लागेल, आणि ती जमिनीत जात आहे असासुद्धा भास होईल. वडाखाली जो माणूस बेशुद्ध पडलेला आढळला, तो म्हादूचा मेहुणा हे तुम्हाला माहीतच असेलच. त्याने स्वत: भुताचे सोंग घेऊन भीतीचे ढोंग केले असावे किंवा म्हादूने ते सोंग आणून त्याने भीतीचे ढोंग केले असावे. म्हादूला पोलिसात गुजरून त्याच्या मेव्हण्याचे त्याला सहाय्य होते एवढेच कळविलेत की, पुढे पुरावा जमविण्याचे काम पोलीस सहज करील. धोंडोपंतावर जरी प्रत्यक्ष गुन्हा शाबीद होणार नाही, तरी त्याला खर्चाचे रूपाने चांगलाच दंड बसेल. पिंजारीची माती करून दाखविण्याची युक्ती अगदी साधी आहे. खाण्याच्या चुन्याचे एक बोट घेऊन त्याने पिंजर मळली, की तिला थेट काळ्या मातीचा रंग येतो. तंबाकू खाता खाता मी आपल्या अंगठ्यास चुना अगोदरच घेऊन ठेविला होता. ही गोष्ट तुमच्या ध्यानी येण्याचे कारणच नव्हते. हा प्रयोग हवातर करून पहा. तुमच्या घरात म्हादूचा हवा तिकडे प्रवेश असल्यामुळे असल्या ढवळाढवळी करून ठेवायला त्याला हवी तितकी संधी होती. धोतर त्याने जाळले, आणि शेंड्यात रॉकेलचे बोळे ठेवून खाली सोडून ठेवलेल्या सुताला आग लावून पोफळ याने जाळली. सगळे घरातले खेळ याचेच. बळवंतराव, तुम्ही फक्त कार्याचाच विचार करीत बसला. भुताटकी नाही अशी एकदा मनाची खात्री झाल्यावर मग चमत्कार कसे घडून येतात ह्याचा शोध लावण्यात मुळीच हाशील नाही. म्हादूला किंवा धोंडोपंतांना जर रसायनशास्त्राची माहिती असती, तर त्यांनी याच्यापेक्षा निराळे चमत्कार करून दाखविले असते, हे चमत्कार कोण करते आणि का करते हे जे महत्वाचे प्रश्न. तिकडे तुम्ही लक्ष पोचविले नाही. जर पोचविले असते, तर तुम्हाला म्हादूची शंका सहज आली असती. असो. अजून रात्र बरीच आहे, आता थोडी झोप घ्यावी हे बरे.’
दुसर्या दिवशी पोलीस पाटलांनी म्हादूला अलिबागेस मॅजिस्ट्रेटकडे नेले. आमच्या जबान्या झाल्यावर आमची मोकळीक झाली. नंतर माधवराव मुंबईला व मी दापोलीला निघून गेलो.
– गो.ना.दातार