Categories
परिषद मानसमित्र

चला मानसमित्र बनूया!

जानेवारी - २०१२

वेळ सकाळची, आठ-साडेआठची. हवेत बर्‍यापैकी गारठा. स्थळ आयबीएन-लोकमतवरील वृत्तांमुळे चर्चेत आलेला चाळीसगावचा दर्गा. दर्ग्याच्या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य आणि वातावरणात मलमुत्राचा विशिष्ट वास. दर्ग्याभोवतीच्या परिसरात भटक्यांची पालं पडलेली. त्यांच्या पालाबाहेर चुली पेटलेल्या. चुलीवर शिजत असलेल्या अन्नाचा वासही त्या विशिष्ट वासाबरोबर वातावरणात दरवळत होता. पुढे दुकानांची ओळ. गावातील व्यवहार अजून चालू व्हावयाचे होते, परंतु दर्ग्याभोवतीची दुकाने उघडली गेली होती. दुकानातून दर्ग्यावर घालावयाच्या चादरी लटकत असलेल्या. त्या दुकानांच्या ओळीतून पुढे जात असताना त्या चादरी घेण्याच्या दुकानदारांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करीत आम्ही (मी, नंदू तलाशीकर, शहाजी भोसले, डॉ. हमीद दाभोलकर) दर्ग्याच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍या चढून आत प्रवेश केला. आत दर्ग्याच्या चौथर्‍याच्या भोवतीने मुक्काम ठोकून असलेली अनेक कुटूंबे अस्ताव्यस्त पसरलेली. त्यांच्या गरिबीचा पुरावा त्यांचे कपडे, चेहरा देतच होता. कोणी नुकतेच उठलेले, कोणी अजुनही पांघरूणात लपटलेले, अनेकांचे स्टोव्ह चहा, नाष्ट्यासाठी पेटलेले. बाजुलाच शून्यात नजर लावून विमनस्कपणे उभा असलेला, काहीबाही हातवारे करीत येरझार्‍या घालत असलेला, बसलेला, अस्ताव्यस्त झोपलेला पेशंट आहे हे कळायला काहीच वेळ लागत नव्हता. आम्ही त्या चौथर्‍याच्या भोवतीने फेरी मारली. अनेक मुले, मुली, बायका, पुरुष त्या चौथर्‍याच्या भोवती असलेल्या जाळीला लगटलेले, त्याना साखळ्यानी बांधलेले. बाजूच्या लोखंडी बारनाही असेच अनेकजणाना साखळ्यानी बांधुन ठेवलेले. त्या चौथर्‍याच्या पाठीमागेच एकजण सुरी घेऊन बसलेला. त्याच्यासमोर अशाच एखाद्या पेशंटला धरून बसलेली त्याची आई, बाप, भाऊ किंवा त्याचा कोणी नातेवाईक. त्या सुरीवाल्याने बाजूलाच पडलेले लिंबू उचलले, सुरी त्या पेशंटच्या खांद्यावरून, डोक्यावरून फिरविली आणि लिंबू कापून त्या दोन्ही फोडी त्याने त्या पेशंटच्या डोळ्यात पिळल्या. तो पेशंट कळवळला ओरडला. गडागडा लोळायला लागला. बरोबरच्याने त्याच्या पाठीत धपाटे घालत त्याला बसता केला. सुरीवाल्याने पाच रूपये टाकायला सांगितले. तेवढ्यात त्या सुरीवाल्यापुढे दुसरा पेशंट येऊन बसलाच होता. या प्रकाराला ‘वार करणे’ असे त्यांच्या भाषेत म्हणत होते. एव्हाना दहा वाजायला आले होते. परिषद अकरा वाजता सुरू होणार होती. आम्ही दर्ग्यातून गडबडीने बाहेर पडलो. रिक्षात बसल्यावर हमीदने रिक्षावाल्याबरोबर बोलणे सुरु केले. रिक्षावाला उत्साहाने माहिती देऊ लागला. म्हणाला, ‘हजारो लोक येतात दररोज, अमावस्येला तर खूपच गर्दी असते. चाळीस दिवस उपचार घेतात. चाळीसगाव ना म्हणून! जास्त त्रास देणार्‍याना बांधतात साखळीने. मारहाण झाली तरी कोणी मरत नाही. एखादी केस झाली असेल तशी! डॉक्टरचे उपचार बंद करायचे नाहीत. दर्ग्यावरच तसे सांगतात. पण अनेकजण बरे होतात. अगदी डॉक्टरसुद्धा येतात इथे उपचाराकरता.’ तेवढ्यात परिषदेचे स्थळ आले होते.

कै. नानासो य. ना. चव्हाण महाविद्यालयाच्या भव्य कमानीतून आम्ही दर्ग्यातील मन विषण्ण करणारे वातावरण बाजूला सारत विस्तीर्ण मैदानात प्रवेश केला. मैदानावर परिषदेची उत्साही लगबग सुरू होती. कॉलेजमधील तरूण मुलांची संख्या भरपूर दिसत होती. नोंदणीच्या टेबलांभोवती गर्दी दिसत होती. पुस्तक विक्रीच्या स्टॉलभोवतीही गराडा पडला होता. अंनिस वार्तापत्राचा वार्षिक अंक नुकताच स्टॉलवर आलेला होता. कार्यकर्ते अंक उत्सुकतेने चाळत होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले कार्यकर्ते एकमेकांच्या गाठीभेटी घेत होते. तेवढ्यात हॉलमधून माधव वागवे आणि साथीदारांचे ‘बुद्ध, कबीर, फुले या भूमीवर जन्मले’ या गाण्याचे दमदार शब्द हॉलमधून कानावर पडले आणि हॉलबाहेरील सर्वांचीच पावले परिषदेच्या उद्घाटन सत्रासाठी हॉलकडे वळली.

हॉल जवळजवळ पूर्ण भरला होता. तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती. गाणे संपतासंपताच परिषदेचे उद्घाटक सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते आणि मानसोपचार तज्ञ डॉ. मोहन आगाशे, परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांचेसह हॉलमध्ये आले. गाणे संपताच सूत्रसंचालन करणार्‍या विनायक वाबळे यांनी उद्घाटक डॉ. मोहन आगाशे, अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, चाळीसगावचे अध्यक्ष गौतम निकम, अंनिस महिला विभाग प्रमुख नीता सामंत आणि अंनिसचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदिप जोशी यांना विचारमंचावर पाचारण केले व परिषदेस सुरवात झाली. डॉ. मोहन आगाशे यांचा परिचय करून देताना डॉ. हमीद दाभोलकर यांनी डॉ. मोहन आगाशे यांची सिनेनाट्य कलावंत म्हणून केलेल्या कामगिरीची ओळख तर करून दिलीच त्या व्यतिरिक्त सर्वसामान्यांना अपरिचित असणारी मानसोपचार तज्ञ म्हणून असणारी ओळख करून देताना त्यांनी सांगितले की, डॉ. मोहन आगाशे यांनी 1987 साली महाराष्ट्रातील मानसिक आरोग्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याबाबतीतील अहवाल सादर केला. तो पर्यंत असा अभ्यास झालेलाच नव्हता. बालमानसशास्त्रात त्यांना खास रुची असल्याचे सांगून सध्या ते दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग करून मानसशास्त्रासंदर्भात सर्वसामान्य जनतेत जाणीवजागृती करण्याचे काम सातत्याने करीत आहेत. त्यामुळे आजच्या परिषदेला अत्यंत योग्य उद्घाटक लाभल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

चाळीसगाव शाखेच्या वतीने नीता सामंत यांनी विचारमंचावरील मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केल्यानंतर परिषदेचे प्रतिकात्मक उद्घाटन अभिवन पद्धतीने करण्यात आले. यावेळी विचारमंचावर अंधश्रद्धेच्या बेड्यानी जखडलेली मनोविकाराने पीडित स्त्रिची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्या बेड्या तोडून डॉ. मोहन आगाशे यांनी परिषदेचे उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर महाराष्ट्र अंनिसचे उपाध्यक्ष व जळगावचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदिप जोशी यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी ही परिषद का? याचा उहापोह केला. मानसिक आजाराबद्दल समाजात प्रचंड अज्ञान व भिती असल्याचे सांगून ते म्हणाले, समाजाच्या आजाराच्या पारंपारिक कल्पनेत मानसिक आजार बसत नाहीत. आजारी म्हणजे अंथरूणावर पडलेला अशीच कल्पना आपल्या समाजात दृढ आहे. त्यामुळे धडधाकट व्यक्ति आजारी असेलच कशी? त्यामुळे हे काहीतरी देवाचे. बाहेरचेच आहे अशा कल्पनेतून उपचार केले जातात तसेच आज या आजारांबाबत अनेक ‘स्यूडो सायंटिफीक’ मांडण्याचे आधार घेतही अनेक उपचार केले जातात त्यातून अनेक सामाजिक, शारीरिक घातक परिणाम घडत आहेत. हे परिणाम टाळण्यासाठी समाजात मानसिक आजारांबाबत प्रबोधनातून जाणीव जागृती करण्याची आणि मानसिक आजारासंबंधित गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्याची गरज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला भासली आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही कृती परिषद आयोजित केलेली आहे. डॉ. प्रदिप जोशी यांच्या प्रास्ताविकानंतर डॉ. मोहन आगाशे यांनी मिश्किलपणे आपल्या भाषणात मानसिक आजारांचे वास्तव आणि त्याच्या निराकरणातील अडचणींचा उहापोह केला.

उद्घाटनपर भाषणात डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, ‘जसे वाद्य आणि संगीताचे नाते असते तसेच मन आणि शरीरराचे आहे. मन हे दाखविता येत नसले तरी तो शरीराच्या वर्तनाचा दृश्य परिणाम असतो. त्यामुळे निरामय आरोग्यामध्ये निरामय शरीराबरोबर निरामय मानसिक आरोग्याचा अंतर्भाव होतो. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या संवर्धनाचे प्रयत्न हे भविष्याची गुंतवणूक म्हणून बघण्याची गरज आहे. आजची शिक्षणपद्धती ही सरासरी बुद्धीमत्ता असणार्‍या साठ टक्के मुलांना सामोरे ठेवून तयार केलेली आहे. त्यामुळे त्यातून अधिक हुषार अथवा अधिक व्रात्य मुलाना विकसित होण्यास आपण वाव देऊ शकत नाही. अशा मुलांमधूनच समाज चालविणारी व घडविणारी व्यक्तिमत्वे तयार होत असतात. त्यामुळे आपल्या शिक्षण पद्धतीतील फक्त वैचारिक आकलन विकसित करण्यावर देण्यात येणारा भर आता भावनिक आकलन, संवेदनशीलता आणि बहु-आयामी जीवनानुभवाना भिडण्याला प्रवृत्त करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत प्रबोधन कृती परिषदेच्या आयोजनाबाबतची समितीची भूमिका विशद केली व परिषदेचे औचित्य साधत बामोशी बाबा दर्ग्यावर मानसिक रुग्णांवर केले जाणारे, साखळदंडाने बांधणे, डोळ्यात लिंबू पिळणे, मारहाण करणे यासारखे अत्याचार त्या दर्ग्याच्या ट्रस्टने ताबडतोब थांबवावेत अन्यथा संघटनेला त्याविरोधात सत्याग्रहाचे हत्यार उचलावे लागेल’ असा इशारा देणारा ठराव मांडला.

परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अंधश्रद्धा आणि मनोव्यापाराचा संबंध उलगडून दाखविला. बहिणाबाईच्या ‘मन वढाय वढाय….’ या कवितेच्या ओळी सांगत डॉ. दाभोलकरांनी मन आजारी पडते याची माहिती व ज्ञान याबाबत समाजाला खूपच मोठ्या प्रमाणावर प्रबोधीत करण्याची गरज आहे. त्यामध्ये श्रद्धा, अंधश्रद्धेतील धुसर सीमारेषा लक्षात घेऊन विचारांची गुंतवणूक न करता भावनेच्या आधारे होणार्‍या कृतीला अंधश्रद्धा म्हणून समजावून घेण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.

या उद्घाटन सत्रानंतर लगेचच मनाचे आरोग्य, आजार व अंधश्रद्धा या विषयावरील सत्रास प्रारंभ झाला. ह्या सत्राचे वक्ते होते खानदेशशतील जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदिप जोशी. त्यांची ओळख जळगावची कार्यकर्ती स्मिता शिरसाळे हिने करून दिली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी अंधश्रद्धा आणि मनोविकार यांचा संबंध खूपच निकटचा असल्याचे सांगितले व ह्याची जाणीव आपल्याला आपण मानसोपचाराची प्रॅक्टीस चालू केल्यानंतर सुरवातीलाच आलेल्या केसेसवरून आली असल्याचे प्रतिपादन ते म्हणाले, ‘याची कारणे शोधताना मला असे आढळले की, आपल्याकडील मानसिक आरोग्याची व्यवस्था अत्यंत तुटपुंजी आहे.’ जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी सांगितले की, भारतात एकूण आरोग्य व्यवस्थेवर जो खर्च होतो त्याच्या फक्त 1 टक्का खर्च मानसिक आरोग्यावर होतो. हाच खर्च इतर देशात 12 टक्क्यांवर आहे. संपूर्ण भारतात मानसिक उपचार करणारे फक्त 4000 डॉक्टर्स आहेत म्हणजे 10000 लोकसंख्येच्यामागे फक्त 3 मनोविकाराच्या पेशंटला मनोविकारतज्ञांपर्यंत पोहोचवण्यासाठी अडीचशे किमीचा प्रवास करायला लागतो. आजच्या घडीलाही ह्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे आजही ही मानसिक आरोग्य व्यवस्था सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही हे वास्तव आहे. मध्यप्रदेशातील एका अभ्यासानुसार 70 टक्के पेशंटांचा पहिला संपर्क अंधश्रद्धाळू उपचारांशी होतो आणि आजार सुरू झाल्यापासून उपचार होईपर्यंत दहा-दहा महिन्यांचा काळ गेलेला असतो. सुरवातीचा काल असा वाया गेल्यामुळे नंतरच्या काळात योग्य उपचार होऊनही पेशंट बरा होण्याचे प्रमाण खूपच कमी होते. या तुटपुंज्या आरोग्यव्यवस्थेमुळे जर पेशंट अंधश्रद्धाळू उपचारांकडे वळला तर काय झाले? या उपचाराचाही काही फायदा होतोच की नाही? असे प्रश्न उपस्थित करणार्‍यांना उत्तर देताना डॉ. प्रदिप जोशी यांनी प्रतिपादन केले की, ‘अशा उपचारांमुळे बरे वाटणे हे ‘खरे’ बरे वाटणारे नाही ते ‘खोटे’ बरे वाटणारे आहे. ते तात्पुरते आहे. हे उपचार नसून केवळ मलमपट्टी आहे.’ अशा अंधश्रद्ध पद्धतीने उपचार करणार्‍यांच्या हेतुंबद्दल योग्य शंका उपस्थित करीत त्यानी प्रतिपादन केले की, ‘मनोरुग्णांची सेवा करणे हे काही या दर्ग्याचे अगर तत्सम उपचार करणार्‍यांचे उद्दीष्ट नसून त्यांचे हेतु वेगळेच आहेत. उलट त्यांची स्पर्धा मनोविकार तज्ञांबरोबरच असल्याने ते मनोविकारतज्ञांबरोबर कधीच सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे मनोरूग्णांचे, त्यांच्या कुटुंबियांचे व पर्यायाने समाजाचे नुकसान करणार्‍या या उपचारात सहभागी होणे म्हणजे अंधश्रद्धानाच प्रतिष्ठा देण्यासारखे आहे.’ आज आपल्या समाजात मानसिक रोगावरील उपचारासाठी दर्ग्यात जाणे किंवा गाणगापूर वगैरे सारख्या ठिकाणी जाणे याला सामाजिक प्रतिष्ठा आहे पण मनोविकारतज्ञाकडे जाण्याला नाही. ही परिस्थिती बदलायची असेल तर मग अंनिससारखी संघटना काय करू शकते ? याचे विवेचन करताना ते म्हणाले, ‘अंनिससारख्या संघटनानी समाजात मानसिक आरोग्याविषयी जाणीव जागृती केली पाहिजे. समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. त्यासाठी प्रथम कार्यकर्त्यांना मार्गदर्शन झाले पाहिजे. त्यांनी हे रोग ओळखण्यास शिकले पाहिजे. परंतु मानसिक आजारांची ओळख म्हणजे तज्ञता नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे. केवळ मानसिक आजारांच्या ओळखीमुळेही मानसिक आजार कमी होण्यास निश्चितच मदत होईल.’ या सत्रात वक्त्याचे स्वागत संतोष सोनवणे यांनी केले तर संदीप मांडोळे यांनी आभार मानले.

परिषदेच्या दुसर्‍या सत्राचे वक्ते होते सातारचे तरूण मनोविकार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर. या सत्राचा विषय होता. ‘सामाजिक, मानसिक आरोग्याचा प्रश्न’. त्यांचा परिचय मुंबईचे कार्यकर्ते नंदकिशोर तळाशीलकर यांनी करून दिला. ‘आजकाल मानसिक आरोग्यासंबंधी वर्तमानपत्रे, मासिके, टी. व्ही. चॅनेल्स अशा सर्व माध्यमांतून दखल घेऊन बरेच लिहून येऊ लागले आहे. आजकाल मानसिक रोग्याला कोणी लगेच वेड्याच्या इस्पितळात टाका असे म्हणत नाही. ताण-तणाव, स्ट्रेस, टेन्शन वगैरे शब्द आज अगदी रस्त्यावरच्या सर्वसामान्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. मानसिक आरोग्य हा अत्यंत दुर्लक्षित असलेला विषय आज सर्वांच्याच चर्चेचा बनून गेलला आहे. मानसिक आजार ही बाब आता केवळ दर्गे आणि तत्सम ठिकाणी सीमीत राहिलेली नाही तर ती आपल्या पर्यंत येऊन पोहोचली आहे अशी जाणीव प्रत्येकाला होऊ लागली आहे. अशा या मानसिक आरोग्याचा प्रश्न कूस बदलत असतानाच्या काळात अंनिसने ही परिषद आयोजित केली आहे ह्याला महत्व आहे.’ असे आपल्या भाषणाच्या सुरवातीला डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रतिपादन करून गेल्या दहाबारा वर्षातील हा बदल अपरिहार्य असण्याची कारणे काय? असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या दहा पंधरा वर्षात झालेल्या बदलांचा वेध घेत ते म्हणाले की, गेल्या दहा पंधरा वर्षात आपल्या आयुष्याचा वेग प्रचंड वाढला आहे. लोकांना इकडे तिकडे बघायला वेळ नाही. आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा वेध घेण्यास वेळ नाही. त्यामुळे विसावा, विश्रांती, निवांतपणा नाही. प्रचंड स्पर्धा, आपण स्पर्धेत मागे पडू अशी सतत टांगती तलवार. कुटुंबव्यवस्थेचे बदलते स्वरूप. एकत्रित कुटुंबपद्धतीकडून विभक्त कुटुंपद्धतीकडे वाटचाल. मनाला आधार देणार्‍या जागा आता कमी होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपण मानसिक आजारांकडे बघितले पाहिजे. आज मानसिक आजारी असलेल्या शंभर पेशंटमध्ये सौम्य स्वरूपाचे म्हणजे उदासिनता, चिंता यासारखे आजार असलेले पेशंट जवळजवळ तीस असतात तर तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार असलेले पंधरा ते वीस असतात. सौम्य मानसिक आजार योग्य औषधोपचार आणि समुपदेशन यांच्या सहाय्याने बरे होऊ शकतात. परंतु याबद्दल योग्य आणि पुरेशी माहिती समाजाला नसल्याने ते अंगावर काढले जातात. विचारातील भ्रम, संवेदना नसताना होणारे भास यासारखे तीव्र स्वरुपाचे मानसिक आजार संपूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत तर ते नियंत्रणात येऊ शकतात. ह्याबद्दलही संपूर्ण माहिती लोकाना नसल्याने लोकांचा शास्त्रीय उपचारांवरील विश्वास उडतो आणि लोक पर्यायी अंधश्रद्धाळू उपचारांकडे वळू लागतात. त्याचबरोबर देशभरातील मनोविकारतज्ञांची तुटपुंजी संख्या, सुविधांची वानवा आणि ताणतणावातील वाढ यातील पोकळी आज या बुवा-बाबांनी मोठ्या हुषारीने भरून काढली आहे. दहा-पंधरा वर्षापूर्वी पारलौकिकतेची भाषा बोलणारे हे अध्यात्मिक बुवा आज ‘अलविदा तणाव’ सारखे कार्यक्रम आयोजित करू लागले आहेत. या अयोग्य उपचारपद्धतीबद्दल डॉ. प्रदिप जोशी यांनी मांडणी केली तेच सूत्र पुढे नेत मला असे सांगायचे आहे की, या अयोग्य उपचारपद्धती माणसाच्या विचारप्रक्रियेलाच बांध घालतात आणि हा सर्वात मोठा धोका आहे. हे मला काय होत आहे, का होत आहे या प्रश्नांची उत्तरे पारंपारिकतेत देत त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या स्वातंत्र्यावर त्या पद्धती बंधने घालतात. ‘स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविण्यासाठी लोकांना सक्षम करणे’ हे खरे तर शास्त्रीय उपचार पद्धतीचे उद्दीष्ट आहे. परंतु हे उद्दीष्ट या अयोग्य उपचारपद्धतीमुळे टाळले जात आहे. यात अर्थातच मानसोपचार व्यवस्थेचे अपयश आहेच. ते दोन पातळ्यांवर आहे. गुणात्मक आणि संख्यात्मक. संख्यात्मक त्रुटींचा आपण उहापोह केला. परंतु येथील मानसोपचारतज्ञांनी एतद्देशीय मानसिकता विचारात न घेता विदेशातून आलेल्या उपचारपद्धतीवर दिलेला भर हेही मानसोपचार व्यवस्थेच्या अपयशाचे एक ठळक कारण आहे असे मला वाटते.’ भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यानी मानसिक आजारांवर आपण व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर कशा पद्धतीने प्राथमिक उपचार करू शकतो याचा उहापोह केला. त्या संदर्भात त्यांनी मानसिक आजाराचे निदान, कौटुंबिक नातेसंबंध, अंतर्मुखता, हे कशा पद्धतीने मानसिक आजारावर प्राथमिक उपचार होऊ शकतात याचे विवेचन केले. जसे ‘शारीरिक लसीकरण’ केले जाते तसे ‘मानसिक लसीकरण’ केले पाहिजे असे सांगताना ते म्हणाले, ‘यासाठी सुईची गरज नाही तर त्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य, भावना हाताळण्याचे कौशल्य, संवादाचे कौशल्य अशी काही कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे.’ या परिषदेच्या निमित्ताने आपण मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे जास्त सजगपणे पहावयास लागू असा विश्वास भाषण संपवताना त्यानी व्यक्त केला. या सत्रातील पाहुण्यांचे आभार सागर नागणे यांनी मानले.

परिषदेच्या तिसर्‍या सत्राचा विषय होता. ‘सामाजिक, मानसिक आरोग्याची उपाययोजना’. ह्या विषयाच्या मांडणीसाठी पनवेलचे जेष्ठ मनोविकारतज्ञ डॉ. प्रदिप पाटकर हे वक्ते होते. त्यांचा परिचय सुशिला मुंडे यांनी करून दिला. त्यानी आपल्या भाषणाच्या सुरवातीला आज मानसिक आरोग्याच्या संदर्भात जो बाजार उभारून आला आहे त्याबद्दल माहिती दिली. एकूण बाजाराच्या तुलनेत हा बाजार पंधरा टक्के असल्याचे सांगून अध्यात्मिक संगीताच्या कॅसेटचे आजचे मार्केट जवळ जवळ 600 कोटी रुपयांचे आहे असे त्यांनी सांगितले. ही परिस्थिती एका बाजूला आहे तर दुसर्‍या बाजूला मानसिक आरोग्याच्या सुविधांची वानवा आहे. मनोविकारतज्ञांचा तुटवडा आहे. मनोविकारांबद्दल प्रचंड अज्ञान आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामाजिक, मानसिक आरोग्याच्या उपाययोजना करताना येणार्‍या अडथळ्यांकडे बघायला लागणार आहे असे सांगून त्यांनी या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शोध भुताचा, बोध मनाचा या कोकणात काढलेल्या मोहिमेचा, किल्लारी भूकंपाच्या वेळी केलेल्या मानसोपचारासंबंधीच्या कामाचा उल्लेख केला व अंनिस याबाबत पूर्वीपासून खूपच सजग असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळेस त्यांनी जिल्ह्याजिल्ह्यात मानसिक उपचार केंद्रे उभारून प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी ‘मानस मित्र’ म्हणून काम करण्याची कल्पना मांडली होती. हे मानस मित्र मानसिक आरोग्याच्या कामात येणारे अडथळे ओलांडून मनोरूग्णांपर्यंत पोहोचण्याचे काम करतील. आजच्या काळात याची सर्वात जास्त गरज असल्याचे सांगत त्यांनी मानसिक आरोग्याच्या कामात आज येणार्‍या अडथळ्यांबाबत उहापोह केला. आज उपचारात जरी आधुनिकता आली असली तरी बाजारूपणामुळे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात या बाजाराचा फायदा घेण्यासाठी अनेक भोंदु, अर्धवट ज्ञान असलेले पुढे आलेले आहेत. त्यामुळे समुपदेशन, उपचार या संदर्भात अनेक अनिष्ट, अशास्त्रीय गोष्टी घडत आहेत. मनोविकारात योग्य वेळेवर उपचार होणे अतिशय महत्त्वाचे असते. स्वयंघोषित समुपदेशकांच्या सल्लेबाजीमुळे हे पेशंट ही पॅथी, ती पॅथी मग हा गुरू, तो बाबा, बुवा, महाराज, ती माता, हा दर्गा, ते मंदीर असे करीत शेवटी मनोविकारतज्ञाकडे येतात. हे तथाकथित समुपदेशक त्याना कधीच मनोविकारतज्ञाकडे जाण्याचा सल्ला देत नाहीत. आजची चंगळवादी जीवनशैली, व्यसनाचे होत असलेले उदात्तीकरण, करमणुकीचा अतिरेक, कुवतीपलीकडच्या वाढलेल्या अपेक्षा व त्यामुळे निर्माण झालेली अतृप्ततेची भावना. मुलावर लादलेले अपेक्षांचे ओझे व त्या पूर्ण न झाल्याने त्यातून आलेले मुलांचे व त्याच्या पालकांचे फ्रस्ट्रेशन, आजचे ताण-तणाव याबाबत सविस्तर विवेचन केले, तसेच यावरील उपायांबाबत चर्चा करताना त्यांनी विवेकाची जाण, विचारांची शिस्त आणि प्रयत्नांची शिकस्त या गोष्टी अतिशय महत्वाच्या असल्याचे प्रतिपादन केले. ताण-तणावांचे व्यवस्थापन हाही सामाजिक मानसिक आरोग्यातील एक महत्वाचा भाग असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘ताणांचे व्यवस्थापन म्हणजे ताणाशी जुळवून घेण्यास शिका. हे करीत असताना आपल्याला इतरांशी संवाद साधता आला पाहिजे. आपल्याकडे दुसर्‍याचे म्हणणे ऐकण्याचे कौशल्य असले पाहिजे, दुसर्‍याला समजून घेता आले पाहिजे. मतभेद असतानाही स्नेहसंबंध वाढविण्याचीही कला आपल्याकडे असली पाहिजे. सहवेदना, सहअनुभूती करुणा, कणव, दुसर्‍याचा केलेला सन्मान, निकोप परोपकार ही संस्कृतीची बलस्थाने असून यातूनच निर्माण होणारी आस्था, आपुलकी, आत्मीयता ही मूल्ये समाजाला निरामय मानसिकतेकडे घेऊन जातात’ असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच या सर्व बाबींचे महत्त्व व्यक्तिगत जीवनशैली समृद्ध करण्यासाठीही महत्त्वाचे असल्याचे त्यानी आवर्जून सांगितले. या सत्राच्या आभारप्रदर्शनाचे काम मिलिंद देशमुख यांनी केले.

त्यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र झाले. यात दिवसभराच्या चर्चेमुळे उपस्थित कार्यकर्ते आणि लोकांच्या मनात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची अतिशय समर्पक आणि शास्त्रीय उत्तरे डॉ. प्रदिप जोशी, डॉ. प्रदिप पाटकर व डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली. या प्रश्नात व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक प्रश्न होते तसेच व्यसनाबद्दल, प्रेम आणि संशयाबद्दल व तिन्ही डॉक्टरांनी सकाळपासून केलेल्या मांडणीबद्दल होते. या सत्राचे आभार प्रदर्शन डॉ. गोर्‍हाणे यांनी केले तर स्वागत अ‍ॅड. आशा शिरसाठ यांनी केले.

शेवटचे आणि पाचवे सत्र होते समारोपाचे. त्यात महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ‘मानसिक आरोग्य आणि अंधश्रद्धा प्रबोधन जाहिरनामा’ उपस्थितांसमोर मांडला. त्याप्रसंगी बोलताना अविनाश पाटील म्हणाले, ‘चमत्काराना आव्हान, बुवाबाबांची भांडाफोड यापासून सुरू झालेले अंनिसचे काम आज समाजमनाचा ठाव घेणार्‍या गोष्टी, प्रश्न व त्यांचे पैलू यांना हात घालण्याचे काम येथपर्यंत येऊन ठेपलेले आहे हे संघटनेने हाती घेतलेल्या निरामय मानसिक आरोग्य संवर्धनाच्या कामावरून सिद्ध होत आहे. यासाठी आम्ही काय करू इच्छितो याचा कृती आराखडा कार्यकर्त्यासमोर व लोकांसमोर ठेवण्याच्या दृष्टीने चाळीसगावात मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा ही राज्यव्यापी परिषद आयोजित केली ही परिषद महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात मानदंड ठरेल.’ त्यानंतर त्यांनी मानसिक आरोग्य आणि अंधश्रद्धा परिषदेच्या जाहिरनाम्याचे वाचन केले.

आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर दिवसभराच्या झालेल्या चर्चेचा आढावा घेताना म्हणाले, ‘अंनिसची चळवळ ही माणसाला विवेकी बनविणारी चळवळ आहे आणि अंधश्रद्धेचे, बुवाबाजीचे सर्व प्रकार माणसाच्या अविवेकाला खतपाणी घालणारे आहेत. या बुवाबाबांकडून माणसाच्या बुद्धीच्या हत्येचे कारखाने चालविले जातात आणि लोक मात्र त्याला आपल्या अभ्युदयाच्या पायर्‍या समजतात. हे असे होऊ नये यासाठी आपण चंगळवादाला, खोट्या अध्यात्मिकेला नकार द्यावयास पाहिजे. तुमच्यावर लादलेली करमणुक कशी नाकारली पाहिजे, स्पर्धा नसलेले नातेसंबंध जपणारे जीवन कसे व्यतीत केले पाहिजे हे सर्व या परिषदेतून उमगलले हे या परिषदेचे अधिकचे यश आहे. हे उमगलले नसते तरी ही परिषद यशस्वी झालीच असती कारण लोक ज्या अपेक्षा आणि प्रश्न मनात घेऊन या परिषदेला आले होते त्या त्यांच्या अपेक्षा तर निश्चितच पुर्‍या झाल्या. त्यांच्या प्रश्नाला उत्तरे तर मिळालीच पण दिवसभराच्या विचारमंथनानंतर त्यांच्या मनात पहिल्यापेक्षाही जास्त निर्माण झालेले प्रश्न घेऊन ते परिषदेतून गेले आणि हेच या परिषदेचे यश आहे.’ त्यानंतर त्यांनी जाहीरनाम्यातील कलमांचे सविस्तर विवेचन केले व आपल्या भाषणाच्या शेवटी चाळीसगाव येथील दर्ग्याच्या प्रशासनाला नम्र, कळकळीचे आवाहन करीत ते म्हणाले, ‘चाळीसगावातील दर्ग्यावरील मनोरुग्णांच्या उपचारासाठी या साखळ्या तुटल्या नाहीत, डोळ्यात लिंबू पिळायचे थांबले नाही तरअंनिस चाळीसगावात शांततामय सत्याग्रह करून हे अमानुष आणि अघोरी प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करेल.’ चाळीसगावचे लोक याला तयार आहेत काय अशी विचारणा त्यांनी केली तेव्हा टाळ्याच्या कडकडात चाळीसगावकरांनी त्याला प्रतिसाद दिला. परिषदेच्या अतिशय चांगल्या, नेटक्या आणि वक्तशीर आयोजनाबद्दल चाळीसगावच्या कार्यकर्त्यांना शाबासकी देत आणि हितचिंतकांना धन्यवाद देत त्यांनी चाळीसगावच्या कार्यकर्त्याचे अभिनंदन करण्यासाठी सर्वांना उभे राहण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितानी उभे राहात टाळ्या वाजवत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर सचिन पाखले यांनी आभार मानल्यावर हम होंगे कामयाब… ह्या सर्वांनी एकसुरात गायलेल्या गीताबरोबर परिषदेची सांगता झाली.

-राजीव देशपांडे