आधुनिक भारताच्या इतिहासाकडे आपण थोडी नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, प्राचीन भारतीय तत्वज्ञानाच्या आणि इतिहास लेखनाच्या क्षेत्रात मार्क्सवादी विचारवंतांनी अनमोल योगदान दिलेले आहे. त्याला तोड नाही. वानगीदाखल दोनचार नावे घेतली तरी आपल्याला ही महानता दिसून येईल. देवीप्रसाद चट्टोपाध्याय, राहुल सांस्कृत्यायन, डी.डी.कोसंबी, इरफान हबीब, रोमिला थापर असे एकचढ एक दिग्गज विचारवंत आपल्या नजरेसमोर येतात. त्यांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान या बाबतीत येणार्या पिढ्यांसाठी वर म्हटल्याप्रमाणे अतुलनीय असे काम करून ठेवले आहे. राहुल सांस्कृत्यायन यांची कामगिरी तर अष्टपैलू आहे. त्यांनी प्रत्यक्ष चळवळीत काम केले, किसान सभेचे ते अ.भा.अध्यक्ष होते, त्यांनी कादंबर्या लिहिल्या, माओ, स्टालीन यांची चरित्रे लिहिली. ज्यांच्या नावांचा वर उल्लेख आहे ते जगभर मान्यता पावलेले विचारवंत आहेत. परंतु अतिशय कठीण परिस्थितीत एकीकडे कम्युनिस्ट पक्षाचे संघटन करताना, आंदोलने उभारताना तत्कालीन परिस्थितीचे आकलन करून भूमिका ठरवताना वेळात वेळ काढून वैचारिक स्वरूपाची मांडणी करणारे अनेक विचारवंत कम्युनिस्ट चळवळीने घडविले आहेत. ईएमएस नंबुद्रीपाद यांचे नाव त्यात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. केवळ राजकीयच नव्हे तर कला, संस्कृती या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे.
महाराष्ट्रातही अशा विचारवंतांची वानवा नाही. गं.बा.सरदार, नलिनी पंडीत यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून फुले-आंबेडकरांची चळवळ, संतचळवळ या संदर्भात विपुल लेखन केलेले आहे. परंतु एस.ए.डांगे, एस.जी.सरदेसाई, प्रभाकर संझगिरी हे कम्युनिस्ट चळवळीचे नेते होते आणि त्यांनी त्यांना मिळालेल्या वेळात इतिहास, तत्वज्ञानाबद्दल लेखन केले या लेखात आपण प्रभाकर संझगिरी यांच्या ‘चार्वाक ते मार्क्स’ या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत.
प्रभाकर संझगिरी अत्यंत सोप्या, सुगम भाषेत अवघड विषयाचे लिखाण करण्यात वाक्बगार होते. ‘अणूच्या अंतरंगात’ आणि ‘मानवाची कहाणी’ ही त्यांची पुस्तके त्याची साक्ष देतात. या दोन्ही पुस्तकांचे विषय तत्वज्ञानाशी संबंधित होते, गहन होते तरी त्यांची ही पुस्तके वाचताना आपल्याला अडचण येत नाही. सहज सोप्या भाषेत हा अवघड विषय सर्वसाधारणपणे कोणाही वाचकाला समजत असे.
‘चार्वाक ते मार्क्स’ हेही पुस्तक याच पद्धतीचे आहे. संझगिरींनी त्यांच्या सुगम भाषा लेखनाचे रहस्य पुढील शब्दात मांडले आहे, “अणुच्या अंतरंगात या पुस्तकास मिळालेल्या पुरस्काराच्यावेळी श्रीमती मालतीबाई बेडेकर या लेखन शैलीच्या परीक्षक होत्या. त्यांनी मला भेटून सुगम भाषा शैलीबद्दल माझी पाठ थोपटली आणि ‘संझगिरी तुम्ही छान लिहिता. कामगार संघटनेत काम करण्याऐवजी लेखनाकडेच लक्ष द्या’ असे म्हटले. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते, ‘मी कामागारात काम करतो म्हणून तर असे सुगम लिहून शकतो आणि आजही माझे हे मत कायम आहे.”
प्रभाकर संझगिरी हे अनेक वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी होते. तसेच ‘सिटू’ या कामगार संघटनेचे महाराष्ट्रातील व केंद्रीय पातळीवरील नेते होते. तसेच महाराष्ट्र माकपचे मुखपत्र असलेल्या ‘जीवनमार्ग’ या साप्ताहिकाचे संपादकही होते. ‘जीवनमार्ग’मध्ये ते अनिरूद्ध नावाने प्रासंगिक घडामोडींवरील एक सदरही लिहीत. हे सदर लोकप्रियही होते. सुगम भाषेमुळे ते केवळ वाचनीयच नव्हे तर ते जो विषय हाताळीत त्या विषयासंबंधी ते अगदी नेमकेपणाने लिहीत. अगदी ‘सार’ काढल्याप्रमाणे. त्याची तर्कशुद्धता वाचकांना अगदी भुरळ पाडीत असे. पक्षाची भूमिका पक्ष कार्यकर्त्यांना आणि वाचकांना अगदी नेमकेपणाने कळत असे.
‘चार्वाक ते मार्क्स’ हे पुस्तक म्हणजे त्यांनी ‘जीवनमार्गा’च्या वाचकांसाठी लिहिलेले ‘तत्वज्ञान’ या विषयावरचे लेख आहेत. ते लेख नीट संगतवार मांडून पुस्तकरूपाने छापले आहेत. या पुस्तकाचा हेतु विशद करताना पुस्तकातील आपल्या मनोगतात त्यांनी म्हटले आहे, “गेल्या दोन तीन दशकात अंधश्रद्धा, कर्मकांडे, अध्यात्म यांचे प्रस्थ फारच वाढत गेले आहे. एकीकडे झटपट पैसा मिळवून देण्याचा दावा करणार्या मांत्रिका तांत्रिकाकडे लोक मोठ्या संख्येने जात आहेत. दुसरीकडे मन:शांती आणि मोक्ष मिळवून देणार्या बुवाबाबांच्या प्रवचनालाही गर्दी करीत आहेत, धर्म आणि जात यांचा प्रभावही राजकारणात वाढला आहे. भारतीय भांडवलदार वर्गाने सरंजामदार वर्गाशी भौतिक आणि वैचारीक बाबतीत कधीच लढा केला नाही. जमीनदारी, जातीव्यवस्था आणि धर्मश्रद्धा या तीनही बाबतीत तडजोड केली. स्वातंत्र्यलढ्याचा जोर ओसरला आणि जनतेच्या स्वातंत्र्योत्तर आकांक्षांचा चक्काचूर झाला. तेव्हा धर्म, जात, अंधश्रद्धा यांना उधाण येत गेले. तेव्हा क्रांतीसाठी आणि परिवर्तनासाठी झटणार्या कार्यकर्त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे म्हणजेच भौतिकवादाचे शिक्षण देण्याची गरज वाढत गेली.” या गरजेपोटीच संझगिरी यांनी या पुस्तकाचा प्रपंच मांडला आहे. 114 पानांच्या या छोटेखानी पुस्तकात 27 प्रकरणे आहेत. तत्वज्ञानावरचे पुस्तक म्हणजे पाचशे पानांचा जाडजूड ग्रंथच अशी आपली समजूत असते. पण कामगार वर्गाला काय हवे, किती प्रमाणात हवे की ज्यामुळे तो त्याचे आकलन करू शकेल असा विचार करून संझगिरी यांनी या पुस्तकाची व्याप्ती सिमीत ठेवली आहे.
‘विज्ञाननिष्ठा आणि अंधश्रद्धा’ या पहिल्या प्रकरणात संझगिरी यांनी एकीकडे विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे, मानव चंद्रावर पोहोचला आहे आणि त्याच्याही पुढे जाण्याची त्याची तयारी आहे, असे असतानाही सामाजिक क्षेत्रावर ‘अंधश्रद्धांचा’ प्रचंड प्रभाव आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘भारतात तर धर्मश्रद्धांचा आणि अंधश्रद्धांचा सुकाळ आहे. तेथे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख हे पारलौकिक मुक्तीच्या आपापल्या मार्गांचा आणि कर्मकांडांचा आग्रह तर धरून आहेतच पण नाना पंथ, नाना देवता, मांत्रिक-तांत्रिक, साधुसंत, बुवा आणि बाया यांचीही चलती आहे.’ या पार्श्वभूमीवर संझगिरी यांनी ‘ज्यांना मूलगामी परिवर्तन हवे आहे, आजच्या समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमतेचा आणि शोषणाचा अंत करून समाजवादी समाज अस्तित्वात आणावयाचा आहे त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय याच्या पलिकडे जाऊन अंधश्रद्धांचा आणि दैवाधिनतेचा सामना करावयास हवा. त्यासाठी त्यांनी विज्ञाननिष्ठ तत्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा स्वीकार आणि प्रसार केला पाहिजे.’ यासाठी भारतीय चिंतन परंपरेतच आपल्याला प्रेरणा देणार्या तात्विक शक्ती उपलब्ध आहेत. त्या संदर्भात त्यांनी म्हटले आहे, “भारतीय चिंतनपरंपरा ही अध्यात्मवादी आहे, भारताने जगाला अध्यात्माचे धडे दिले आहेत आणि या परंपरेला भौतिकवादाचा विटाळ झालेला नाही असा दावा मोठमोठे विद्वान करीत असतात. परंतु हा दावा खरा नाही. भारतात फार प्राचीन काळापासून लोकायत, चार्वाक किंवा बृहिस्पत्य या नावाने ओळखले जाणारे भौतिकवादी तत्वज्ञान किंवा दर्शन प्रभाव ठेवून होते.” संझगिरींनी पुढे म्हटले आहे, “चार्वाक पंथाने त्या काळाच्या मर्यादेत ज्ञानाच्या चौकटीत अध्यात्मवादाच्या आणि अंधश्रद्धांचा बुद्धीनिष्ठ आणि तर्कसंगत सामना केला तरी समाजरचनेच्या संदर्भात त्यांचे कार्य क्रांतीकारक नव्हते. त्या काळात तशी अपेक्षाही करता येत नाही. आज वर्गसंघर्ष उघड्यावर आला आहे, विज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे, अशावेळी मार्क्सवाद चार्वाकांचा वारसा पुढे घेऊन जात आहे आणि गत्यात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवादाचे समृद्ध आणि समाजक्रांतीचे तत्वज्ञान क्रांतीकारकांच्या हाती देतो. मार्क्सने म्हटले आहे, “आत्तापर्यंत दार्शनिकांनी जगाचा अर्थ लावण्याचे कार्य फक्त केले आहे. खरे कार्य आहे ते जग बदलण्याचे.”
‘तत्वज्ञानातील संघर्ष’ या दुसर्या प्रकरणात अध्यात्मवादी आणि भौतिकवादी वैशिष्ट्ये मांडून संझगिरी यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, “भौतिकवाद आणि अध्यात्मवाद यामधील संघर्ष हा शुष्क बौद्धिक झगडा नाही. जैसे थे वादी आणि परिवर्तनवादी शक्ती संघर्षाशी त्याचे जवळचे नाते आहे.” या संदर्भात संझगिरी यांनी ‘इतिहासाचे तत्वज्ञान’ हे पुस्तक लिहिणार्या प्रा.सदाशिव आठवले यांचा उल्लेख केला आहे. या आठवल्यांनी मार्क्सवाद्यांना असा सल्ला दिला होता की, “ज्यांना जग बदलण्याच्या उठाठेवीत पडायचे असेल त्यांनी त्यात खुशाल पडावे, पण तत्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी लुडबूड करू नये.” त्याला उत्तर देताना संझगिरींनी म्हटले आहे, “जग बदलण्याची उठाठेव तत्वज्ञानात लुडबूड केल्याशिवाय होत नसते आणि त्या उठाठेवीसाठी व लुडबुडीसाठी फार मोठी किंमत देण्याची तयारी ठेवावी लागते.” याचे उदाहरण म्हणून संझगिरींनी म्हटले आहे, “प्राचीन काळात एका चार्वाकाला जाळले तर आज या युगात मार्क्सवादाच्या अनुयायांच्या कत्तली झाल्या आहेत.”
प्रकरण तीन ते दहापर्यंत संझगिरी यांनी चार्वाकांच्या तत्वज्ञानाचा सखोल ऊहापोह केला आहे. प्रमाणाचा वाद, भूतचेतनावाद, स्वभाववाद, वेदनिंदा, वर्णविषमतेला विरोध, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार अशी चार्वाक दर्शनाची सर्वांगीण चर्चा या प्रकरणांतून केली आहे ती मुळातून वाचली पाहीजे.
प्रकरण दहावे हे ‘जमाती आणि जाती’ यांच्या संदर्भातील आहे. जाती कशा निर्माण झाल्या असा प्रश्न नेहमीच पडत आलेला आहे. परंतु भारतात इतिहासाच्या साधनांची वानवा असल्यामुळे या संदर्भात अंदाजच बांधता येतात. भारताचा विश्वसनीय इतिहास बुद्धाचा जीवनकाळ, अलेक्झांडर, सम्राट अशोकाचे स्तंभात कोरलेले आदेश यातूनच फक्त मिळतो. त्यामुळे भारतीय प्राचीन समाजरचनेविषयी काही ठोस मांडणी करणे अवघड बनते. संझगिरींनी म्हटले आहे, “वेदपुराणादी साहित्य हे धार्मिक साहित्य आहे, त्यात इतिहास लेखनाची दृष्टी अजिबात नाही. वेदातील सूख्ते रचणार्या ऋषींची नावे कळतात. महाभारत व्यासांनी रचले, रामायण वाल्मिकीने रचले. पण कधी रचले याचा पत्ता लागत नाही आणि रचणार्या नावापलिकडे काहीच माहिती मिळत नाही…. पुराणात राजांच्या वंशावळी दिल्या आहेत. पण त्यात प्रचंड गोंधळ आहे. या सर्व साहित्यातून ऐतिहासिक तथ्ये शोधून काढणे, त्यांचा कालक्रम निश्चित करणे हे अतिशय जिकीरीचे काम आहे.” संझगिरी यांनी देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या प्रतिपादनाचा हवाला देत या संदर्भात काही निष्कर्ष मांडले आहेत. त्यांनी लिहिले आहे, “भारताच्या सामाजिक इतिहासाची दोन ठळक वैशिष्टे म्हणजे विषम विकास आणि आदिवासी जमातींचे अखंड अस्तित्व ही होत. आजही अशा जमातींचे प्रमाण 8 टक्के आहे. त्या जमातींना प्रगत नागर समाजात सामावून घेण्याची प्रक्रिया अगदी प्राचीन काळापासून चालूच आहे आणि सामिलीकरणाच्या या प्रक्रियेत ह्या आदीम समाजाच्या अवशेषांची भारताच्या सामाजिक घडणीवर छाप पडलेली दिसून येते.” देवीप्रसादांचा दुसरा मुद्दा आहे की, मातृप्रधानता हे टिकून राहिलेल्या अवशेषांचे प्रमुख लक्षण आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे, “पुढचा काळ या आदिवासी जमातींना कृषीवल नागर समाजात सामावून घेण्याचा आहे व त्या समावेशनाच्या प्रक्रियेत या जमातींना जातींचे स्थान मिळाले. जातीबाह्य संबंधांवर बंदी, जातपंचायत, वाळीत टाकण्याची शिक्षा अशी जी जातींची वैशिष्ट्ये आहेत ती या जमातींचीच वैशिष्ट्ये होत. कोसंबी यांनी मांडलेल्या मताशी बहुतेक सर्व मार्क्सवादी विचारवंत सहमत आहेत.” याचा अर्थ जातीव्यवस्थानिर्मिती प्रक्रिया या समावेशनाच्या प्रक्रियेत घडून आली असावी असा अंदाज बांधता येतो. अर्थात ही समावेशनाची प्रक्रिया दोन्ही बाजूने चालू राहते. म्हणजे वैदिक आर्यांनी या मूळ अनार्यांच्या पद्धती स्वीकारलेल्या दिसून येतात. उदा.गणपतीसारखा आधी विघ्नेश्वर म्हणून धिक्कारलेला देव विघ्नहर्ता म्हणून नंतर मान्यता पावतो. असे अनेक संदर्भ दाखवता येतील.
परंतु ही समावेशनाची प्रक्रिया सहजपणे घडली असे मानता येत नाही. संझगिरींनी लिहिले आहे, “परंतु ही समावेशनाची प्रक्रिया संथ व शांतपणे होत गेली असे मानण्याचे कारण नाही. त्यात संघर्षही झाले आणि वैचारिक क्षेत्रात तो अवैदिक किंवा अब्राम्हणी विचारप्रवाहात व्यक्त झाला. लोकायत, तंत्र आणि सांख्य तत्वज्ञानाकडे त्या दृष्टीने पाहिले पाहीजे असे देवीप्रसादांचे प्रतिपादन आहे.”
यानंतर 11 व्या प्रकरणात सांख्य आणि तंत्र संप्रदायाने मांडलेल्या भौतिकवादी दर्शनाची ओळख करून देण्यात आलेली आहे. प्रकरण 12 ते 15 या चार प्रकरणात बौद्ध तत्वज्ञानाची विस्तृत माहिती आणि दिनयान आणि महायान या पंथातील मतभेदांची चर्चा करण्यात आली आहे. 16 व्या प्रकरणात भक्ती संप्रदायाबद्दल मांडणी आहे.
17 व्या प्रकरणापासून युरोपात अवतीर्ण झालेल्या विज्ञान युगाची माहिती आलेली आहे. त्यात देकार्त, लॉक, बर्कले, ह्युम यांच्या तत्वज्ञानाची ओळख करून देण्यात आली आहे. त्यानंतर 21 व्या प्रकरणात फ्रान्समध्ये घडलेल्या भांडवली क्रांतीची हकीकत सांगितली आहेत. याच क्रांतीने सर्व माणसे जन्मत:च स्वतंत्र आहेत आणि समान अधिकार त्यांचा हक्क आहे तसेच “स्वातंत्र्य, समता, बंधुत्व” ही जगप्रसिद्ध घोषणा याच क्रांतीने पुढे आली. वोल्तेर, दिदोरे, ला मेत्री असे श्रेष्ठ विचारवंत या क्रांतीने जगाला दिले. 23 व्या प्रकरणात कांट आणि हेगेल या महान तत्ववेत्यांची ओळख करून देण्यात आलेली आहे. हेगेल यांच्या विरोधविकासवादाची चर्चा करताना संझगिरीने म्हटले आहे, “बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पादाचा विकास भौतिकवादी सौमांतिकांनी जगाच्या क्षणिकत्वात केला होता आणि विज्ञानवादी धर्मकिर्ती आणि शांतरक्षित ह्यांनी जास्त सखोल युक्तीवाद करून क्षणिकवादाची समर्थ मांडणी केली होती. म्हणजे हेगेलच्या कित्येक शतके आधी सार्वत्रिक परिवर्तनशीलतेचा सिद्धांत भारतीय चिंतनशीलतेला परिचित होता. इतिहास आणि विज्ञान ह्यांनी पुष्कळ पुढचा पल्ला गाठल्यानंतर हेगेलने या गतीवादाची जास्त समृद्ध मांडणी केली. बदल घडतात ते विरोधी तत्वांच्या संघर्षातून काही काळ सूक्ष्म बदल होऊन ते साचल्यानंतर एका टप्प्याला मोठा बदल घडतो हा विरोधविकासवाद हेगेलने प्रथम मांडला.” त्यांनी पुढे म्हटले आहे, “परंतु परिवर्तनशीलतेच्या किंवा गतीवादाच्या या सिद्धांताच्या क्रांतीप्रवण आशयावर त्याचवेळी हेगेलने बोळा फिरवला. इतिहास म्हणजे मानवी समाजात सतत घडत असलेल्या बदलांचा इतिहास आहे हे दाखवून झाल्यावर हा सारा विकास म्हणजे एका केवलस्वरूप आत्मतत्वाचा अविष्कार आहे असे त्याने प्रतिपादन केले. भारतीय तत्वज्ञानात त्याला ‘ब्रह्म’ म्हटले आहे त्याचीच ही हेगेली आवृत्ती.”
प्रकरण 24 ते 28 यामध्ये ‘वर्गयुगांताचे दार्शनिक’ म्हणून मार्क्स आणि एंगल्स यांनी मांडलेल्या ‘मार्क्सवादाची’ ओळख करून देण्यात आली. चार्वाकापासून सुरू झालेला भौतिकवादी विचारांचा प्रवास मार्क्सवादाजवळ येऊन थांबतो. मार्क्सवाद हे ह्या सर्वांचे प्रगल्भ, समृद्ध असे रूप आहे. मार्क्स-एंगल्स यांच्यापूर्वी भौतिकवादी असणार्या सर्व महामानवांच्या विचारांचे हे प्रगल्भ रूप आहे. ‘गत्यात्मक भौतिकवाद’, ‘ऐतिहासिक भौतिकवाद’, ‘भांडवलशाहीचे गतीनियम’ अशा तिन्ही प्रकरणात संझगिरी यांनी मार्क्सवादाच्या गाभ्याची ओळख करून दिलेली आहे. खरेतर हा विषय एकदोन प्रकरणात संपणारा नाही. त्यामुळे वाचकांनी केवळ या प्रकरणांवर आपली बौद्धिकता अवलंबून ठेवू नये. तर मुळापासून मार्क्सवाद वाचण्याची, समजून घेण्याची, अभ्यासण्याची प्रेरणा त्यातून घेतली पाहिजे. गत्यात्मक भौतिकवादाबद्दल संझगिरींनी म्हटले आहे, “सर्व वस्तू आणि प्रक्रिया परस्परविरोधी अंगे असतात. त्या विरोधी तत्वांच्या संघर्षातून त्या वस्तू वा घटनेत बदल घडतात, विकास होतो. विरोधी अंगाचे एकत्व आणि संघर्ष हा गतिवादाचा ज्याला द्वंद्ववातही संबोधतात त्याला मूलभूत नियम आहे……. त्यामुळे कुठलीही वस्तू आणि घटना समजून घेताना त्यामधील अंतर्विरोध समजून घेणे आवश्यक आहे. अंतर्विरोधात प्रमुख आणि दुय्यम अशी विभागणी होते. उदा.भारतात साम्राज्यशाही विरूद्ध जनता, जमीदार-सावकार विरूद्ध शेतकरी, भांडवलदार विरूद्ध कामगार, उच्च जाती, खालच्या जाती, असे कित्येक विरोध आहेत…… वस्तुमध्ये होणारे बदल दोन प्रकारचे असतात, संख्यात्मक आणि गुणात्मक….. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीतही हजारो वर्षे मंदगतीने बदल होत होते तर टप्प्यांवर मोठे बदल झालेले आढळून येतात. हाच बदलाचा नियम आपण समाजविकासाला लागू केला तर आजपर्यंत बदलत आलेल्या समाजाच्या विकासाचा अर्थ आपल्याला लावता येतो. वर्गसंघर्ष हीच वर्गसमाजाला चालना देणारी शक्ती आहे. गुलाम आणि त्यांचे मालक, भूदास आणि जमीनदार, कामगार आणि भांडवलदार, तसेच वसाहती देशातील जनता आणि साम्राज्यवाद असे संघर्ष आजवर होत आलेले आहेत, होत आहेत. परंतु समाजविकासाचे नियम निसर्गनियमांसारखे नाहीत. कारण हे बदल जिवंत माणसांच्या कृतीतून अस्तित्वात येत असतात. वस्तुनिष्ठ परिस्थिती जरी अनुकूल असली तरी तिचा फायदा उठवून क्रांतीकारक बदलापर्यंत तिला घेऊन जाणे हे शेवटी आत्मगत घटकांवर म्हणजे जिवंत माणसांवर अवलंबून असते.”
इतिहासाची ही भौतिकवादी अन्वेषण पद्धती मार्क्सवादाचे खास योगदान असल्याचे संझगिरींनी प्रतिपादन केले आहे. या प्रकरणांच्या अखेरीस संझगिरींनी म्हटले आहे, “मार्क्सवाद म्हणजे ठोकळेबाज मंत्राची पोथी नव्हे, मार्क्सने भांडवलशाहीचे अत्यंत प्रज्ञावंत विश्लेषण करून भांडवलशाहीचे गतीनियम विशद केले आणि मार्क्स-एंगल्स नंतर लेनिन, माओ व देशोदेशीच्या कम्युनिस्ट चळवळीने हे क्रांतीकारक तत्वज्ञान अधिक समृद्ध केले. समता व बंधुभाव यावर आधारलेल्या गणांची जीवनपद्धती उगवत्या वर्गसमाजाने नष्ट केली होती. याचा विषाद गौतम बुद्ध आणि लोकायतिक यांच्या विचारात व्यक्त झाला होता. आता वर्गसमाजाची सद्दी संपत आलेली आहे आणि त्याचे ऐतिहासिक कार्यही संपत आलेले आहे आता मानवसमाजापुढे समता व बंधुता यावर आधारलेला नवा समाज नव्या पायावर उभारण्याची संधी प्राप्त झाली आहे हे मार्क्सवादाच्या शिकवणीचे सार आहे.” आणि कॉम्रेड प्रभाकर संझगिरी यांनी लिहिलेल्या या पुस्तकामागची प्रेरणाही तीच आहे. वर्ण-वर्ग-जाती-स्त्रीदास्य विहीन समाज निर्माण व्हावा यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. ते आज आपल्यात नसले तरी त्यांनी पुस्तकरूपाने आणि प्रत्यक्ष व्यवहारात केलेल्या कामांचा जो क्रांतीकारक वारसा आपल्यासमोर ठेवला आहे तो घेऊन आपण त्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-सुभाष थोरात
पुस्तकाचे नाव : ‘चार्वाक ते मार्क्स’ लेखक - प्रभाकर संझगिरी प्रकाशक - जनशक्ती प्रकाशन, संघर्ष, मंगतराम पेट्रोल पंपामागे, भांडुप(पश्चिम), मुंबई.