Categories
परिवर्तन

चुकीच्या रूढी नाकारणार्‍या धापूबाई सांकला

ऑगस्ट - २०११

धापुबाई सांकला या अंनिसचे हितचिंतक फुलचंद साकला यांच्या मातोश्री. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आपले मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. एका अल्पशिक्षित(मराठी 3 री) वृद्धेने कालबाह्य व चुकीच्या रूढी नाकारण्याचे जे धाडस या मृत्यूपत्राद्वारे दाखविले ते अनेक सुशिक्षितांनाही मार्गदर्शक ठरेल.

धापुबाईचे मृत्यूपत्र :

1) अलिकडे शव स्ट्रेचरवर ठेवून स्मशानभूमीकडे नेले जाते ते योग्य आहे. बांबूची शिडी बनविण्याच्या फंदात पडू नये.

2) शाव, पिठाचे गोळे(पिंड), चंदनाचे लाकूड, मृताच्या तोंडात सोन्याचा तुकडा ठेवणे या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. याला संपूर्ण फाटा द्यावा. 3) शिंकाळे व त्यात ठेवलेले गाडगे(त्यातील विस्तव) ही कालबाह्य प्रथा आहे, सबब शिंकाळे माझ्या प्रेतासोबत नसावे. 4) चिता न रचता विद्युतदाहिनीचा वापर करावा. 5) अंत्यसंस्काराच्या दुसर्‍या दिवशी पिंड ठेवणे, अस्थींचे विसर्जन करणे, हे प्रकार करू नयेत. 6) बारावा, तेरावा किंवा मोसर करू नये. उठावणा झाल्यावर सर्वांनी आपले नित्य व्यवहार सुरू करावेत. 7) सांत्वन करण्यासाठी येणार्‍यास दोन घास जेऊनच पाठवावे.

8) अनाथ, विकलांग, गरजुंच्या भल्यासाठी काम करणार्‍या व तुम्हाला ज्ञात असलेल्या संस्थांना तुमच्या इच्छेप्रमाणे यथाशक्ती अवश्य मदत करा. 9) माझ्या स्मृतीप्रित्यर्थ कोणताही चांगला उपक्रम(जो समाजवादी असेल) व जो करण्याची माझ्या मुलांची इच्छा असेल तो सुरू करण्यास माझी संमती आहे. अर्थात या संबंधीचे सर्व निर्णय कुटुंबियांनीच घ्यावयाचे आहेत.

10) वरील सांगितलेल्या सुचनांचे पालन करण्यास, इतर सर्व नातेवाईकांनी माझ्या मुलांना सहकार्य द्यावे.

            कोणीही वरील मुद्यांना बगल देऊन पर्यायी कार्यक्रम सुचवू नयेत. वरील सर्व निवेदन मी स्वखुषीने माझ्या अंतीम इच्छेप्रमाणे एका साक्षीदारासह टाईप करून घेतले आहे. याच्या खरेपणाबद्दल यत्कींचितही शंका व्यक्त करू नये. सर्वांना आशिर्वाद!                     

-श्रीपाल ललवाणी , पुणे