Categories
अंधश्रद्धा

डाकीण जाळण्याची प्रथा

जुलै - २०१२

            डाकीण जाळण्याच्या आजच्या प्रकारांचा मागोवा घेतला तर त्याची कारणे अंधश्रद्धेपेक्षा आर्थिक आणि सामाजिक असतात. कधी जमीन बळकावण्यासाठी, कधी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून तर कधी अन्यायाविरोधात उभी राहिली म्हणून डाकीण ठरवून तिला ठार केले गेले जाते. कारणे काही असो पण ही अंधश्रद्धा या खुनाला फक्त सामाजिक मान्यताच मिळवून देते असे नाही तर समाज त्यात कोणतीही अपराधी भावना न ठेवता हिरीरीने सहभागी होतो हे लक्षात घेतले पाहिजे.

            डाकीण म्हणजे कोण हे समजून घेण्याअगोदर स्त्री पुरूष नात्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे. कारण त्याशिवाय पुरूषसत्ताक धर्म वारंवार स्त्रीला धोकादायक, विश्वासघातकी, मायावी वगैरे विशेषणे का लावतो? हे कळणार नाही. या मागचे कारण जसे जैविक आहे तसे ऐतिहासिक देखील आहे.

            वंश सातत्याचा विचार केला तर मुलाला जन्म देण्यासाठी जास्त गुंतवणूक स्त्रीला करावी लागते; परंतु त्याचबरोबर मूल तिचेच आहे याची तिला शंभर टक्के खात्री असते. पुरूष आपले बीज जास्तीत जास्त ठिकाणी कसे रूजेल याच्या चिंतेत असतो. आपल्या वर्चस्वाखालील स्त्रीचे मूल आपलेच असावे याची जास्तीत जास्त खात्री असावी म्हणून तो विविध मार्ग वापरतो. तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो. इतर पुरूष तिच्याजवळ फिरकणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रयत्नामुळे अर्थातच पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर पडते. परंतु त्याच वेळेला तो इतर पुरूषांच्या वर्चस्वाखालील स्त्रीला वश करण्याचा प्रयत्न करत असतो. (युद्ध जिंकणारे राजे आणि सरदार जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रियांना जनानखान्यात रवाना करत हा इतिहास तर माहीत आहेच. पुराणातील राजे महाराजे यांना शंभर मुले असत यात नवल वाटण्याचे काहीच कारण नाही.) परंतु हा सगळा उपद्व्याप करत असताना इतर कुणी पुरूष आपल्या स्त्रीला वश करेल याची भीती त्याला कायम असते. आणि आपण ज्याचे पालन पोषण करणार आहोत ते मूल आपलेच आहे ना? ही काळजी त्याला सतत असते. त्यामुळे पुरूष सामाजिक पातळीवर तरी स्त्रीबद्दल सतत संशय बाळगतो. तिच्या निष्ठेबद्दल शंका घेतो. याचे प्रतिबिंब त्याने स्थापन केलेल्या धर्मामध्ये पडलेले दिसते.

            धर्माने स्त्रीला विश्वासघातकी ठरवण्यामागे तितकेच ऐतिहासिक कारणदेखील आहे. इतिहासात एकेकाळी मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती याबाबत सगळ्याच इतिहास संशोधकाचे या बाबतीत एकमत आहे. परंतु तेव्हादेखील नरबळी सारख्या क्रूर प्रथा अस्तित्वात होत्या. अशा प्रथा अर्थातच निसर्गाबद्दलच्या चुकीच्या समजुतीमुळे निर्माण झाल्या होत्या. सुफलतेचा विधी करताना, नरबळी ही एक अत्यावश्यक बाब होती. नरबळी देण्याअगोदर मातृदेवतेशी लग्न लावले जायचे. ‘पुराणकथा आणि वास्तवता’ या पुस्तकात कोसंबी यांनी उर्वशी आणि पुरूरवा या कथेचे विश्लेषण केले आहे त्यात पुरूरवा उर्वशीला विश्वासघातकी म्हणतो त्याला या प्रथेचा संदर्भ आहे. मातृसत्ताक पद्धत नष्ट होऊन पितृसत्ताक धर्म स्थापन करताना हीच भीती नव्या धर्माच्या ठेकेदाराना वाटत होती की, छुपेपणाने या प्रथांचे पालन केले जात असणार. त्यामुळे नवीन धर्म स्त्रियांना कपटी, मायावी ठरवत होता.

डाकीण आणि डाकीण जाळण्याची प्रथा या दोन वेगळ्या प्रथा आहेत एवढेच नव्हे तर एकमेकाविरोधी प्रथा आहेत. डाकीनप्रथा ही मानव इतिहासात अतिप्राचीन प्रथा आहे. सगळ्या घटनांना अनैसर्गिक शक्ती (देव नव्हे!!) जबाबदार असतात अशी जेव्हा मानवाची समजूत होती आणि त्याकाळात अशा शक्तीशी संपर्क साधू शकणार्‍या आणि त्यांना वश करणार्‍या स्त्रियाया डाकीणी होत. स्त्रिया या गर्भ धारणा करू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे असाधारण शक्ती असते असाही समज अस्तित्वात होता. मातृसत्ताक समाजव्यवस्थेचा डाकीण हा अनिवार्य भाग होता. डाकीण जाळण्याची प्रथा मात्र त्यामानाने चौदाव्या शतकात अगदी अलिकडे सुरू झाली असे म्हणावे लागेल. दोन अंधश्रद्धांमधील ही एकतर्फी लढाई माणसाच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय आहे.

            मातृसत्ताक समाज आणि नव्या धर्मामध्ये आणखीन एक विरोध होता, पूर्वीचा धर्म(?) अनेक देवता मानणारा होता. निसर्गाच्या प्रत्येक घटकासाठी वेगळ्या देवता होत्या. या देवतांची उपासना केली की, त्यांनी हवे ते फळ देणे त्यांना भाग होते आणि समाज देखील अनियंत्रित सत्तेखाली नव्हता. टोळीची प्रमुख असली तरी अधिकार नियंत्रित आणि मुख्य म्हणजे टोळीच्या कायद्याने नियमित केलेले होते. नवीन धर्म, नव्या समाजव्यवस्थेसारखा एकतंत्री अधिकाराचा पुरस्कार करणारा होता. नवीन धर्माच्या मते निसर्ग, आकाशातील बापाच्या हातातील खेळणे होता. (आणि प्रजा देखील राजाच्या, सरदारांच्या हातातील खेळणे होती.) त्यामुळे नवीन धर्माच्या प्रभावी प्रस्थापनेसाठी, जुन्या कर्मकांडाचे निर्मूलन करणे भाग होते. डाकीण कोण होत्या? यांचा शोध घ्यायचा झाला तर एवढेच म्हणता येईल की, त्या मातृसत्ताक पद्धतीतील मांत्रिक होत्या. अर्थात त्यांच्याकडे सुष्ट आणि दुष्ट शक्तींना वश करण्याचे सामर्थ्य होते असाच समज होता. (आजही “विक्का” या नावाने या पंथाचे धंदेवाईक पुनरूज्जीवन केले जात आहे. हे नवपंथीय रेकी, पिरामिड वगैरे मार्गाने रोग बरे करण्याचा दावा करतात.)

            डाकीण आणि ख्रिस्ती धर्म यांच्या शत्रुत्वाची ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे सुरवातीच्या काळात ख्रिस्ती धर्माने डाकीण ही एक अंधश्रद्धा आहे अशी भूमिका घेतलेली दिसते. परंतु समाजातील समज असे केवळ धार्मिक ग्रंथामुळे किंवा तत्विक वाद-विवादाने नाहीसे होत नसतात याचा अनुभव चर्चला आला आणि मुद्दा फक्त विचाराचा नव्हता तर सत्तेचा होता त्यामुळे सुरवातीला डाकीण प्रथा ही अंधश्रद्धा आहे अशी भूमिका घेणार्‍या चर्चने नंतर डाकिणीकडे दुष्ट शक्ती असते असे मान्य केले. परंतु त्याबरोबर त्या सैतानाच्या हस्तक  असतात असेही ठरवून टाकले. ख्रिस्ती धारणेच्या विरोधी जे जे असेल ते ते सैतानी असेही जाहीर केले. इसवी सन 1000 च्या सुमारास जगाचा अंत होणार ही भीती(नेहमीप्रमाणे) पसरली आणि सैतानाच्या भीतीने कळस गाठला. अशा सैतानाचे दूत(पुरूष आणि स्त्रिया दोन्ही स्वरूपात) पृथ्वीवर भटकत असतात आणि ते सर्वसामान्य लोकांशी मैथुन क्रिया करतात अशी सर्वमान्य कल्पना होती. पंधराव्या शतकापर्यंत चर्चच्या भिंतीवर सैतानाने जागा मिळवली होती.

            चेटकिणी नष्ट करण्यासाठी आता प्रबोधन पुरेसे पडत नाही हे लक्षात आल्यावर शांती आणि अहिंसेचा संदेश देणार्‍या ख्रिस्ती धर्माच्या ठेकेदारांनी आता पुढचे पाऊल उचलले. तेराव्या शतकात चेटकिणींना कसे आणि का मारावे याचे मार्गदर्शन करणारी पुस्तिका उपलब्ध झाली होती. आणि इतिहासातील पहिली डाकीण 1324 मध्ये जाळण्यात आली. 1326 मध्ये पोप जोन 24 वा याने चेटकिणी या धर्मविरोधी आहेत आणि त्यांच्या विरोधात त्यांचा नायनाट करण्याचा फतवा काढला. 1348-50 मध्ये युरोपमध्ये काळ्या मृत्यूने थैमान घातले होते. त्यात शेकडो लोक मेले. या सर्वांमागे सैतानाचा हात आहे आणि चेटकिणी त्याला मदत करत आहेत अशी समाजाची खात्री पटली. त्याअगोदरच सैतान आणि चेटकिणी कशा दिसतात याचे पूर्ण चित्र समाजमनात तयार झाले होते. बकरीसारखे दिसणारे म्हणजे हलणारे तोंड आणि लांब हनुवटी म्हणजे चेटकीण असल्याचा पुरावा होता. 1615 मध्ये तर केप्लरच्या आईला चेटकीण ठरवून जाळण्याचा प्रसंग आला होता. केप्लरने त्याची प्रतिष्ठा वापरून हा प्रसंग टाळला. चेटकीण जाळण्याची क्रूर प्रथा इतिहासातील सर्वात जास्त काळ चाललेली सामूहिक हिस्टेरियाचा प्रकार म्हणायला हवा. पंधराव्या शतकात चेटकिणींना जाळण्याच्या उन्मादाला सुरवात झाली. अठराव्या शतकापर्यंत चेटकीण जाळणे हा गुन्हा ठरवेपर्यंत हा उन्माद चालू होता तोपर्यंत जवळजवळ चाळीस हजार चेटकिणी जाळल्या गेल्या होत्या. सोळाव्या शतकाच्या अखेरच्या काळात बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंतांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून या घटनांमध्ये घट झाली. 1735 मध्ये विचक्राफ्ट कायद्याने या प्रथेचा अंत केला. त्यांनंतर देखील काही काळ छुपेपणाने चेटकिणी जाळल्या जात होत्या. 

            डाकीण प्रथा विरोधी ख्रिस्ती धर्माची मोहीम अशा प्रकारे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी होती. अर्थात हा लढा काही विवेकवाद विरूद्ध अंधश्रद्धा असा नसून जुनी अंधश्रद्धा आणि नवी अंधश्रद्धा असा होता. या सगळ्या प्रकारात अर्थात किती जणांनी जुने शत्रुत्व फेडले आणि संपत्ती लाटली किंवा बलात्कार केले हे सगळे कळणे कठीणच आहे.

– संजय सावरकर